मंगळवार, १९ एप्रिल, २०११

आमचे गोंय - भाग २ - मध्ययुग व मुसलमानी सत्ताइ. स. ९६० मध्ये हळसी चा कदंब राजा कंटकाचार्य याने शिलाहार राजा भीम याच्याकडून गोवा जिंकून घेतला. पण शिलाहारांनी त्याच्याकडून गोवा परत जिंकून घेतला. कंटकाचार्य ऊर्फ षष्ट्यदेव याची पत्नी कुंडलादेवी ही कल्याणी चालुक्यांची कन्या. आणखी साधारण २० वर्षानी षष्ट्यदेवाने अपल्या सासर्‍याचीच मदत घेऊन शिलाहारांना पराभूत केले. आणि याच सुमारास राष्ट्रकूटांचा पराभव करून कल्याणी चालुक्य कुळातील राजा जयसिंह दुसरा याची सत्ता सप्तकोकणात प्रस्थापित झाली. चालुक्यांचा मांडलिक म्हणून षष्ट्यदेव चंद्रपूर येथून दक्षिण कोकण आणि गोव्याचा कारभार पाहू लागला. भोज राजांचा काळ गोव्याच्या इतिहासात सुवर्णयुग मानला जातो, तसाच कदंब राजवटीचा सुमारे ४०० वर्षांचा हा काळ गोव्याच्या इतिहासात दुसरे सुवर्णयुग म्हणून नोंदला गेला.

कदंबांना 'कदंब' हे नाव कसं मिळालं यामागे एक कथा आहे. यांचा एक पूर्वज 'मुकण्णा' हा इ. स. च्या चौथ्या शतकात, सौंदत्ती इथे कदंब वृक्षाच्या तळी बसून तपश्चर्या करत होता, तेव्हा त्याला त्रिलोचन हरिहराचा दृष्टान्त झाला. इथून या घराण्याचे नाव कदंब असे पडले. म्हणूनच कदाचित, कदंब राजे शिवभक्त होते. कदंब राजवंशाची स्थापना 'मयूरवर्मा' या दक्षिण पल्लवांच्या अमात्याने केली असं मानलं जातं. काही काळाने त्याने पल्लवांची नोकरी सोडून हल्याळ, शिर्सी, कुमठा, कद्रा या प्रदेशात आपले स्वतंत्र राज्य स्थापन केले. काही इतिहासकारांच्या मते त्याचं मूळ नाव मयूरशर्मा असं होतं आणि राज्य स्थापन करताना क्षत्रियोचित असं मयूरवर्मा हे नाव त्याने घेतलं. काही इतिहासकारांच्या मते हे घराणं नागवंशातलं होतं, तर काही त्यांना मौर्यांचे संबंधित मानतात. काही इतिहासकार त्याना यदुवंशातलेही मानतात!

कदंब राजांची सत्ता मुळात कर्नाटकातील कुंतल प्रदेशातली. तिथे त्यांचं राजचिन्ह "हनुमान" हे होतं. गोव्यात येताच त्यानी आपलं राजचिन्ह बदलून "सिंह" हे केलं. याचं कारण म्हणजे गोव्यातील कुशवनात (आताचा केंपे तालुका) तेव्हा सिंह भरपूर प्रमाणात होते. तसंच कदंब राजे स्वतःला सिंहाप्रमाणे शूर समजत असत. गोव्याच्या स्वातंत्र्यानंतर मगो पक्षाने याच सिंहाला आपल्या पक्षाची निशाणी म्हणून स्वीकारलं, तर बसवाहतूक करणार्‍या सरकारी 'कदंब परिवहन मंडळाने' कदंबांच्या नावाबरोबर त्यांचं बोधचिन्ह 'सिंह' याचाही स्वीकार केला.

शिलाहारांच्या काळात समुद्रमार्गे होणारा व्यापार अरबांच्या हातात होता. तिसवाडी बेटवर त्यांची 'हंजमाननगर' नावाची मोठी व्यापारी वसाहत होती. त्यांना शिलाहारांनी बर्‍याच बाबतीत स्वायत्तता दिली होती. षष्ट्यदेवाचा मुलगा, कदंब राजा गुहलदेव याने या अरब व्यापार्‍यांबरोबर आपल्याला फायदेशीर होईल अशा प्रकारचा करार केला. गुहलदेवाचा मुलगा षष्ट्यदेव (दुसरा) याच्या काळात गोव्यात कदंबांची सत्ता स्थिर झाली. त्याने गोव्यावर इ.स. १००५ ते इ.स. १०५० एवढा काळ राज्य केलं. त्याच्यानंतर गोव्यात त्याचे २ मुलगे जयकेशी (पहिला) आणि वीरवर्मादेव यानी राज्य केलं. पहिल्या जयकेशीच्या काळातली महत्त्वाची घटना म्हणजे इ.स. १०५४ साली गोव्याची राजधानी 'चंद्रपूर' इथून हलवून 'गोवापुरी' (गोपकपट्टण) म्हणजे आताचं गोवा वेल्हा (थोरले गोवे) इथे गेली. याचं कारण म्हणजे कुशावती नदीचं पात्र गाळाने भरून अरुंद झालं होतं आणि तिथून गलबताना ये-जा करायला त्रास होत होता. तसंच पहिल्या जयकेशीने इ.स. १०६०-६५ च्या दरम्यान उत्तर कोकणावर स्वारी करून आपल्या राज्याचा विस्तार केला.

जयकेशीचा मुलगा गुहलदेव (दुसरा) याने राजधानी परत चंद्रपूर इथे नेली ती इ.स. १०८१ मध्ये. इ.स. १०८१ ते इ.स. ११२६ पर्यंत परत चंद्रपूर हीच गोव्याची राजधानी होती. पण गोपकपट्टण इथे कदंबांचे सामंत कारभार पाहत असत. मध्येच इ.स. १०९५ साली कोकण शिलाहार राजा अनंतपाल याने गोव्यावर हल्ला करून गुहलदेवाचा पराभव केला. गुहलदेव पळून हाळसी (खानापूर) इथे गेला, तो इ.स. ११०६ मध्ये परतला. त्याच्यानंतर त्याचा मुलगा जयकेशी (दुसरा) राज्यावर आला. त्याने आपल्या राज्याचा विस्तार पूर्ण कोकण, गोवा, धारवाड, बेळगाव, हुबळी आणि हनगल प्रांत एवढा वाढवला. इ.स. ११३८ मध्ये विक्रमादित्य चालुक्याच्या मृत्युनंतर दुसर्‍या जयकेशीने चालुक्यांचं मांडलिकत्व झुगारून दिलं. यामुळे रागावून चालुक्य राजा तिसरा सोमेश्वर याने 'अच्चुगी' नावाच्या सेनापतीला गोव्यावर स्वारी करायला सांगितलं. त्याने गोपकपट्टण जाळून भस्म केले. पण यानंतर जयकेशीने ते पूर्ववत उभे केले आणि करवीर (कोल्हापूर) वेळूग्राम (बेळगाव) हे प्रांत आपल्या राज्याला जोडले. बळंबर(हैद्राबाद)चे शिंदे, बैलहोंगलचे कदंब यांचा पराभव करून जयकेशी कोकण चक्रवर्ती बनला.
जयकेशीनंतर त्याचा मुलगा शिवचित्त परमदेव हा राजा झाला. शिवचित्त परमदेवाच्या कारकीर्दीत गोपकपट्टण इथे सप्तकोटेश्वराचे देऊळ बांधण्यात आलं. तसंच तांबडी सुर्ला इथलं महादेव मंदिर याच काळातलं आहे. या राजाची पत्नी 'कमलादेवी' ही गोव्याच्या इतिहासात प्रसिद्ध आहे. ती अतिशय धार्मिक आणि कर्तबगार होती. या कमलादेवीने स्त्रियांसाठी एक खास न्यायालय स्थापन केल्याचा उल्लेख इतिहासात सापडतो.यानंतर कदंबांच्या वंशात विष्णुचित्त विजयादित्य, तिसरा जयकेशी, वज्रदेव, स्वयंदेव आणि षष्ट्यदेव तिसरा हे राजे होऊन गेले. यापैकी काहींनी हाळशी, तर काहींनी गोपकपट्टण/चंद्रपूर इथून कारभार चालवला. कदंब राजानी दिलेले अनेक ताम्रपट अजून अनेक ठिकाणी पहायला मिळतात. त्यांनी गोव्यातल्या देवळांना उत्पन्नासाठी जमिनी दिल्या. गद्याण आणि डाक्मा ही सोन्याची नाणी काढली. कदंबपूर्व काळात देवळांमधे पूजाअर्चा स्थानिक लोक करत असत. कदंब राजांनी पंच द्रविड ब्राह्मणाना गोव्यात आणून वसवले आणि त्याना देवळांमध्ये पूजा करायला अधिकार दिले. हे 'जोशी' नावाचे ब्राह्मण होते आणि आर्यादुर्गा ही त्यांची कुलदेवता. अशा ब्राह्मणांसाठी कदंब राजांनी अनेक अग्रहार उभारले. गरीबांसाठी अनाथाश्रम उभारले. गोपकपट्टण इथे विद्यादानाचे केंद्र उभारले.
कदंबांचं राज्य उत्तर तसेच दक्षिण कोकणात पसरलेलं होतं. गोपकपट्टण हे महत्त्वाचं बंदर होतं. तिथून मोठ्या प्रमाणात व्यापार व्हायचा. सुपे, हल्याळ, बेळगावकडून चोर्लाघाट आणि रामघाटातून गोव्यात माल यायचा, आणि गोवळकोंड्याहून हिरे निर्यात करण्यासाठी यायचे, ते याच मार्गाने. तसंच परदेशातून अरबी घोडे यायचे, ते याच मार्गाने घाटावर नेले जायचे. या रस्त्यातलं मुख्य जकात केंद्र मणिग्राम म्हणजेच आमोणा हे होतं. योग्य जकात गोळा करून सरकारी खजिन्यात जमा करणारे त्या काळातले तज्ञ दलाल घराणे कदंब राजांनीच कर्नाटकातून गोव्यात केंपे इथे आणून वसवले.

तिसर्‍या षष्ट्यदेवाच्या कारकीर्दीत देवगिरीच्या कण्णर यादवाने गोव्यावर हल्ले सुरू केले. तसेच होन्नावरच्या नवाबाने आरमारी हल्ले सुरू केले. या आरमाराच नेतृत्व इब्न बतूताने केलं असा उल्लेख आहे. षष्ट्यदेवाचा मेहुणा कामदेव याने एकदा यादवांचा पराभव करून गोव्याचे राज्य षष्ट्यदेवाच्या हवाली केले. पण त्याला ते सांभाळता आलं नाही. होन्नावरच्या सैन्याने हिंदूंची अंदाधुंद कत्तल केली आणि हे यादवांच्या आदेशावरून केलं अशी मल्लीनाथी केली. उत्तर गोव्याचा भाग यादवांच्या ताब्यात गेला. पण त्यांचं राज्य नंतर लवकरच लयाला गेलं. इ.स. १३०७-०८ मधे अल्लाउद्दिन खिलजीने आपला दख्खनचा सुभेदार मलिक काफूर याला प्रचंड सैन्यानिशी दक्षिणेत पाठवले. त्याने इ.स. १३१० साली हरपालदेव या रामदेवराय यादवाच्या जावयाचा पराभव करून देवगिरीचे राज्य धुळीला मिळवले. मग त्याची वक्रदृष्टी गोव्याच्या दिशेने वळली. त्याने इ.स. १३१५ मधे गोपकपट्टणचा सत्यानाश केला. सप्तकोटेश्वराचे देऊळ उद्ध्वस्त करून अमाप संपत्ती लुटली. सप्तकोटेश्वराचे लिंग लोकानी शेतात लपवले आणि नंतर दिवाडी बेटावर नेऊन तिथे एक लहान देऊळ बांधले. इ.स. १३२० मधे वेळ्ळी आणि रामाचे भूशिर इथले सेतुबंधेश्वराचे देऊळ धुळीला मिळवले. हिंदूंच्या कत्तली केल्या. अनन्वित अत्याचार केले. यातून जीव वाचवून षष्ट्यदेवाचा वारसदार वीरवर्मा याने राजधानी परत चंद्रपूर इथे हलवली आणि इ.स. १३२४ ते इ.स. १३४६ कसाबसा राज्यकारभार चालवला.


दरम्यान, महमद तुघलकाने इ.स. १३४४ साली चंद्रपूरवर हला चढवून अमाप धन लुटून नेले. पुन्हा इ.स. १३४६ मधे जमालुद्दिनने चंद्रपूरवर हल्ला केला. चंद्रेश्वराच्या देवळाची वीट न वीट मोडून टाकली. तिथल्या मोठ्या नंदीचे शिर उडवले. अजून हा भग्न नंदी देवळाच्या अवशेषांसकट पहायला मिळतो. त्याच्या सैनिकांनी स्त्रियांवर अत्याचार केले. मग तुघलकाने जबरदस्तीने या स्त्रियांची लग्ने आपल्या सैनिकांबरोबर लावून दिली. त्यांची संतती म्हणजे "नायटे". राजा वीरवर्माला हाल होऊन मरण आले. त्याच्या वंशातील स्त्रियानी आपले अलंकार कुशावती नदीत टाकून दिले. सोने नाणे उधळून दिले आणि "अत्याचार करणार्‍यांचा सत्यानाश होवो," असा आक्रोश करत कुशावती नदीत ठाव घेतला. त्यानी चंद्रेश्वराच्या द्वारात आक्रोश करताना पाय आपटले त्याच्या खुणा पायर्‍यांवर उमटल्या अशी लोककथा आहे. इथे कदंबांचे वैभवशाली राज्य लयाला गेले, त्याचबरोबर चंद्रपूर राजधानीचाही अंत झाला. आज हे एक लहान गाव आहे. गावात हिंदू वस्ती जवळ जवळ नाही. आम्ही नंदीच्या शोधात गेलो तेव्हा बरोबर रस्ता सांगणारा भेटला त्यापूर्वी दहा जणाना विचारावं लागलं!

१३४६ मधे गोव्यात हसन गंगू बहामनीची सत्ता सुरू झाली. पण यापूर्वीच १३३६ मधे विजयनगरच्या साम्राज्याची सुरुवात हरिहर आणि बुक्करायाने विद्यारण्यांच्या आशीर्वादाने केली होती आणि सगळ्या दक्षिण भारतात आपल्या राज्याचा विस्तार सुरू केला होता. त्यांचा मंत्री, माधव याने इ.स. १३७८ मधे गोव्यात आपली सत्ता स्थिर केली आणि गोवा विजयनगर साम्राज्याचा भाग बनला. आतापर्यंत सप्तकोटेश्वराचे देऊळ ही गोव्यातल्या राज्यकर्त्यांची खूण बनली होती. या माधव मंत्र्याने हसन गंगू बहामनीने पाडलेले दिवाडी बेटावरचे सप्तकोटेश्वराचे देऊळ परत उभे केले. माधव मंत्र्यानंतर गोव्यात विजयनगरच्या साम्राज्याच्या सौंदे या शैव लिंगायत सुभेदारानी राज्यकारभार केला. त्यांचे वंशज इ.स. १७४५ पर्यंत कधी पोर्तुगीजांचे आश्रित तर कधी मराठ्यांचे आश्रित म्हणून गोव्यात टिकून होते.

इ.स. १४७१च्या फेब्रुवारीमधे महमूद गवनने तिसवाडी बेट जिंकले, आणि त्याचा सुभेदार किश्वरखान गोव्याचा कारभार पाहू लागला. इ.स. १४७२ मधे बेळगावच्या राजाने गोवा जिंकून घ्यायचा एक अयशस्वी प्रयत्न केला. त्यानंतर गोव्याचा सुभेदार गिलानी याने बंड केलं आणि इ.स. १५०१ मधे गोवा बेट आदिलशहाच्या ताब्यात आलं. गोवापुरीतल्या एका मंदिराचा विनाश करून आदिलशहाने आपला राजवाडा बांधला. त्याचं प्रवेशद्वार अजून आपल्याला जुने गोवे इथे पहायला मिळतं. आदिलशहाच्या काळात फोंडा इथे आदिलशाही मशीद बांधली असं म्हणतात. ही मशीद एखाद्या देवळासारखी दिसते. तशीच काळवत्री दगडांची. समोर दीपमाळेचे असावेत असे वाटणारे पडके खांब आहेत. बाजूला एक सुंदर दगडी बांधणीचा तलाव आहे आणि एक विशाल वटवृक्ष आहे. मशिदीच्या भिंतीत आणि तलावात महिरपी आहेत. प्रथम बघताना ते एखादं देऊळ असावं असंच मला वाटलं होतं. पण तसा, म्हणजे देवळाच्या जागी मशीद केल्याचा कुठेही उल्लेख नसल्यामुळे मी मनातली शंका मनात ठेवली!


इ.स. १४९८ मध्ये गोव्यावर दूरगामी परिणाम करणारी घटना कालिकतला घडली होती, वास्को द गामाने भारताच्या भूमीवर पाऊल ठेवले होते. आणि संपूर्ण भारत जिंकून घेण्याची स्वप्नं बघायला पोर्तुगीजांचा पहिला गव्हर्नर अफोन्सो डी अल्बुकर्क याने सुरुवात केली होती ती इ.स. १५०३ पासून.

क्रमशः

**

विशेष सूचना - या लेखमालेचे स्वरूप एकंदरीतच ललित लेखनाच्या अंगाने जाणारे पण गोव्याच्या समृद्ध इतिहासाचे, आणि वर्तमानाचेही, दर्शन वाचकांना करून देणे एवढेच आहे. वाचकांना विनंती की त्यांनीही ते तेवढ्याच बेताने घ्यावे. आम्ही कोणीही इतिहासकार / इतिहासतज्ञ वगैरे नाही आहोत. पण थोडे फार वाचन करून, माहिती जमा करून इथे मांडण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे. तपशीलात अथवा आमच्या निष्कर्षात चूक / गल्लत असू शकते. पण काही चांगले लेखन यावे आणि गोव्याची रूढ कल्पना सोडून त्याहून वेगळा गोवा काय आहे हे लोकांना कळावे म्हणूनच हा सगळा लेखमालेचा उद्योग.

मायबोली , मिसळपाव व मीमराठी वर टीम गोवा या नावाने पूर्वप्रकाशित२ टिप्पण्या:

  1. धन्यवाद सुदीपजी. ह्या लेखमालेच लिखाण मी ,ज्योती ताई व बिपीन दादा अस तिघांनी मिळुन केलय. तुमच्या शुभेच्छा त्यांच्यापर्यंत पोचवेन :)

    उत्तर द्याहटवा