बुधवार, ४ मे, २०११

आमचे गोंय - भाग ४ - पोर्तुगिज (सांस्कृतिक आक्रमण)***
धर्मसमीक्षण सभा (Inquisition)

धर्मसमीक्षण सभेचे कर्तृत्व हे युरोपच्या व ख्रिस्तीधर्माच्या इतिहासातील एक लांच्छनास्पद आणि अघोरी कृत्यांनी रक्तरंजित झालेले पृष्ठ. नास्तिक लोकांना, चेटुक करणार्‍या स्त्री-पुरुषांना शिक्षा देणे हे या धार्मिक नायालयाचे काम असे. या शिक्षा अगदी माणसांना जिवंत जाळण्यापर्यंत काहीही रूप घेत.

पोर्तुगालमध्ये ह्या न्यायालयाने स्पेनसारख्या देशातुन पळून पोर्तुगालमध्ये आलेल्या ज्यू लोकांवर 'न भूतो न भविष्यति' असे अत्याचार केले. ज्या ज्यूंनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला, त्यांनाही हे भोग चुकले नाहीत. त्यांनी भयंकर, अमानुष असे शारिरीक व मानसिक अत्याचार भोगले. छळ करणार्‍यांना हव्या तशा जबान्या घेउन या ज्यूंना जिवंत जाळण्यात येत असे. आणि त्यांची मालमत्ता सरकारजमा केली जात असे.

अशीच धर्मसमीक्षण सभा, मिशनरी 'संत' फ्रान्सिस झेवियर यांच्या आग्रहास्तव, गोव्यात स्थापण्यात आली. सन १५६० ते १८१२ पर्यंत या इन्क्विजिशनचा अनियंत्रित दुष्ट कारभार गोमांतकात बेछूटपणे चालू होता. या काळात एकुण ५ धर्मसभा बसल्या. प्रत्येक सभेत आधीचे नियम अधिक जाचक करुन हिंदूंना छळण्यासाठी नवनवे जाचक नियम बनवले जायचे. हा 'संत' फ्रांसिस झेवियर गोव्यातील हिंदू लोकांवर अनन्वित अत्याचारांची सुरुवात करून चीनमधे गेला होता. तिथे मृत्यू पावला. असं म्हणतात की तो खराच मेला याची खात्री पटविण्यासाठी त्याचं शव परत भारतात आणण्यात आलं, आणि ओल्ड गोवा इथल्या चर्चमधे लोकांना बघायला मिळावं म्हणून ठेवलं गेलं.

इन्क्विजिशनने ख्रिस्तीधर्मप्रसारासाठी गोव्यातील सर्व देवळे, मशिदी जमीनदोस्त करण्याचा, 'पाखंडी' मत नष्ट करण्याचा, हिंदुधर्मीय उत्सवास मनाईचा आणि लाकूड, माती किंवा धातू ह्यांच्या मुर्ती बनविणार्‍यास कडक शिक्षा देण्याचा हुकुम प्रसृत केला.

हिंदुंना कायद्याने सार्वजनिक अधिकाराच्या जागा वर्ज्य करण्यात आल्या. त्यांना धार्मिक आचार, विधी पालन करण्यास मनाई करण्यात आली. ह्यामध्ये यच्चयावत सगळे विधी समाविष्ट आहेत. अगदी स्त्रियांनी कुंकू लावायला मनाई करण्यात आली, तर शेंडी ठेवणार्‍या पुरुषांना शेंडीकर लावण्यात आला. पण स्थानिक लोकांची धर्मनिष्ठा जाज्वल्य होती. पोर्तुगीजांच्या अत्याचाराची जाण असतानाही ते हे कायदे मोडीत असत!!!

धर्मांतराचा सपाटा आधी तिसवाडीत सुरु झाला. तिसवाडीनंतर सासष्टीची पाळी व त्यानंतर बारदेशची पाळी आली. चोडण, करमळी यासारखी गावेच्या गावे बाटविली जाऊ लागली. अर्थात यात इन्क्विजिशनचा मुख्य हात असे!! नाहीतर एखादं गावच्या गाव का सहजपणे धर्म बदलेल? विहिरीत पाव टाकून "तुम्ही आता ख्रिश्चन झालात" असे भोळ्या गावकर्‍यांना बजावण्यात आले.

गोवा बेट किंवा आत्ताच्या जुने गोवे इथे हातकात्रा खांब नावाचा एक खांब आहे. सुरवातीच्या काळात धर्मांतराला विरोध करणारांचे इथे हात कापले जात. या सगळ्याला तत्कालीन राणी कातारीन हिचे प्रोत्साहन असे. एकामागुन एक फर्माने गोव्यात पोचत, आणि इथल्या व्हाईसरॉय व गव्हर्नर कडुन त्यांचे काटेकोरपणे पालन होई व त्यामुळे मिशनर्‍यांना जोर चढला होता.

परिणामस्वरुप गोव्याचा शांत हिंदू समाज क्रोधाविष्ट झाला. पण गोवा राज्याच्या भौगोलिक परिस्थितीमुळे, पोर्तुगीजांच्या बलवत्तर आरमारामुळे कोणीच जनतेच्या मदतीस येउ शकले नाहीत. तिसवाडी, बारदेश आणि सासष्टी वगळता इतर सर्व तालुके मराठ्यांच्या शासनाखाली होते, त्यामुळे ते अठराव्या शतकाच्या मध्यापर्यंत या अघोरी प्रकारांपासून बचावले.

हिंदुंनी आपल्या बायकामुलांना राज्याबाहेर पाठविले, व्यापार-दुकाने बंद ठेविली. शेतकर्‍यांनी भातशेतीतील बांध मोडून टाकले (चोडण बेटावर) जेणेकरुन नदीचे खारे पाणी शेतात शिरुन शेती नष्ट होईल व पोर्तुगीजांना उत्पन्न मिळणार नाही. पोर्तुगीजांनी ह्यावरही नेहमीप्रमाणे बळजबरी, इन्क्विजिशन वापरले व हे पहिले बंड मोडीत काढण्यात यश मिळविले.

हळूहळू त्यांनी आपले लक्ष ब्राह्मणांकडे जास्त वळवले, कारण ब्राह्मण हे लोकांस जागृत करीत. त्यांनी ब्राह्मणांचे वैचारिक व धार्मिक स्वातंत्र्य काढुन घेतले. ब्राह्मणांसाठी एक वेगळा कायदा काढण्यात आला. "कोणत्याही ब्राह्मणाने एखाद्या हिंदुला ख्रिश्चन होण्यापासुन परावृत्त केल्यास त्याला कैद करुन राजाच्या गलबतावर पाठविण्यात येईल व इस्टेट जप्त करुन सेंट थॉमसच्या कार्यार्थ वापरण्यात येईल."

गलबतावर पाठविण्याची शिक्षा कुणालाही नकोच असे. कारण गलबतावर पाठवणे म्हणजे गुलाम बनवुन गलबताच्या तळाशी वल्हविण्यास लावणे. गुलामांना साखळदंडांनी त्यांच्या जागी खिळवुन ठेवण्यात येत असे. कामात ढिलाई झाल्यास चाबकाचा फटकारा मिळत असे. कोणीही मेला अगर कामाला निरुपयोगी झाल्यास त्याला सरळ समुद्रात फेकुन देण्यात येत असे!!!

या काळात कित्येक सारस्वत ब्राह्मणकुटुंबानी महाराष्ट्र आणि कर्नाटकाचा रस्ता धरला. राजापूर आणि मंगलोरच्या आसपास अजूनही यांची गावे आहेत. त्यांच्या मूळ गावांची नावे काळाच्या ओघात विस्मृतीत गेली तरी, आपले कुलदैत कोण याची स्मृती त्यांनी एवढ्या शतकांनंतरही कायम ठेवली आहे. असंही म्हटलं जातं, की केंपे तालुक्यातून ब्राह्मण नामशेष झाले, त्यामुळे पर्तगाळी मठाच्या स्वामींनी काही क्षत्रियांना ब्राह्मण्याची दीक्षा देउन देवांची पूजा अर्चा चालू ठेवली.

दिवाडी बेट मूळचं दीपावती. इथे सप्तकोटेश्वराच देऊळ होतं, सुंदर तळी होती, वेदशास्त्रसंपन्न ब्राह्मण वस्ती होती. पोर्तुगीजांनी हे देऊळ उद्ध्वस्त केले. त्याआधी एकदा आदिलशाहीतही हे देऊळ उध्वस्त झाले होते. पण ते परत बांधण्यात हिंदूंना यश आले होते. जसे सोमनाथच्या सोमेश्वराचे हाल झाले तसेच दिवाडीच्या या सप्तकोटेश्वराचेही अनन्वित हाल झाले.

मूळात हे देउळ कदंबांच्या राजघराण्याचे कुलदैवत. प्रथम कदंबांनी त्यांच्या गोवापुरी या राजधानीत अंदाजे बाराव्या शतकात सप्तकोटेश्वराची स्थापना केली. इ. स. १३४६ साली हसन गंगू बहामनीने कदंबांचा पराभव केला आणि हे देऊळ धुळीला मिळवले. नंतर देवगिरीच्या यादवांनी बहामनी सुलतानाचा पराभव केला आणि दिवाडी बेटावर नव्याने देऊळ बांधले. इ. स. १५६० साली पोर्तुगीजांच्या टोळधाडीने एका दिवसात २८० देवळे पाडण्याचा "महापराक्रम" केला. त्यात या देवळाचा अग्रक्रम होता. मग देवळातील लिंग एका विहिरीची पायरी म्हणून लावण्यात आले. शेवटी छत्रपती शिवाजी महाराजानी या महादेवाचे दुर्दैवाचे दशावतार संपवले आणि इ.स. १६६८ साली नार्वे येथे भक्कम देऊळ बांधून देवाची पुनर्प्रतिष्ठापना केली. सप्तकोटेश्वराची ही हकीकत प्रातिनिधिक म्हणावी लागेल.

एवढे सगळे होऊनही ब्राह्मण धर्म बदलत नाहीत म्हणुन त्यांच्या मुलांना पळवून नेऊन त्यांचे हालहाल करु लागले. शेवटी तेही आई-बाप होते. मुलांचे हाल होऊ नये म्हणुन ख्रिस्तीधर्म स्वीकारणे त्यांच्या नशिबी आले. मग त्या पूर्ण कुटुंबाचे ख्रिस्तीकरण. अश्या १५०५ ब्राह्मणांचे ख्रिस्तीकरण झाले.

साष्टी

गोवेकर हिंदू, मिशनर्‍यांबद्दल द्वेषभावना बाळगीत. आणि त्याचा उद्रेक रायतुरच्या मिशनर्‍यांवर दगडफेक करण्यात झाला. पेरु माश्करेन्यस (मास्कारेन्हास) हा सासष्टीत गेलेला पहिला पाद्री (मिशनरी). गावकर्‍यांना त्याच्यापेक्षा त्याच्याबरोबर आलेल्या एका नवख्रिश्चनाचा जास्त राग होता. कुर्हा डीचा दांडा गोतास काळ ठरला होता तो. लोकांनी त्याचे तलवारीने तुकडे केले. हे पाहून तो मिशनरी त्याची मदत करणे वगैरे विसरुन पळून गेला. कुठ्ठाळलाही पेरु कुलासो नावाच्या मिशनर्‍यावर दगडाचा वर्षाव झाला पण त्याला त्याच्यासोबत असलेल्या नवख्रिश्चनांनी वाचविले.

इ. स. १५६६ साली मिशनर्‍यांना पराभव स्वीकारावा लागतोय हे पाहून व्हाईसरॉयने नवा हुकूम प्रसृत केला. "नवीन देऊळ बांधता कामा नये. जुन्या देवळांची डागडुजी व्हाईसरॉयच्या परवानगीशिवाय करु नये." डागडुजीच्या परवानग्या नाकारण्यात येऊ लागल्या. आणि म्हणूनच लोक आपल्या दैवतांच्या मूर्ती बैलगाडीत बसवून शेजारच्या राज्यात नेऊ लागले. देव गावात नसेल पण किमान बाटणार तरी नाही हीच भावना यामागे होती.

इ. स. १५६७ मधे लोटलीचा रामनाथ आणि आसपासच्या शेकडो देवळांचा विध्वंस करण्यात आला. वेर्णेची, म्हाडदोळ वाड्यावरच्या म्हाळसादेवीची देवराई नष्ट झाली, तिची तळी भ्रष्ट करण्यात आली, मूर्तीची अक्षरशः राख केली गेली. आणि देवळाचाही विध्वंस झाला (आज ह्या देवीचे मंदिर फोंडा तालुक्यातील म्हार्दोळ या गावी आहे). हे देऊळ सासष्टीतील सर्वात भव्य देऊळ होते. वेर्णेकरांची धर्मनिष्ठा इतकी जाज्वल्य की ते देवळाचे अवशेष जतन करुन त्यांना भजु लागले.

देऊळ पाडल्यानंतर त्यावेळच्या कायद्यानुसार देऊळ असलेली जमीन सरकारच्या मालकीची होत असे. मूळ देवळाची ती जागा परत मिळविण्याचा प्रयत्न वेर्णेच्या गावकर्‍यांनी केला. एका युरोपियनाशी त्यांनी संधान बांधले. त्याने ती जागा सरकारकडुन विकत घ्यावी व दुप्पट किमतीत एक वेर्णेकराला विकावी. मिशनरी व पोर्तुगीज सरकार यांच्या अमानुष छळाची टांगती तलवार डोक्यावर असताना हा प्रयत्न नक्कीच कौतुकास्पद होता.

पण व्हाईसरॉयला ह्याचा सुगावा लागला व ती जमीन हिंदूंना परत मिळू नये म्हणुन देवळाच्या ठिकाणी त्याने एक भव्य चर्च बांधुन घेतले व दोन क्रॉस उभारले. त्यातला एक क्रॉस चर्चच्या प्रवेशद्वारात व दुसरा तुळशीवृंदावनाच्या ठिकाणी बांधण्यात आला. हे तुळशीवृंदावन पुरुषभर उंचीचे होते.

आजच्या ओल्ड गोवा इथल्या जगप्रसिद्ध चर्चच्या जागी गोमंतेश्वराचे देऊळ होते, अशी लोकांची समजूत आहे. चर्चच्या भिंतींवर काही ठिकाणी हिंदू पद्धतीची नक्षी आहे. तर चर्चच्या आतमध्ये एक विहीरही होती, ती आता बुजविण्यात आली आहे. चर्चच्या सर्व भागात लोकांना प्रवेश दिला जात नाही, त्यामुळे या गोष्टींची सत्यता पडताळणे शक्य नाही. पण इथून अगदी जवळच, साधारण अर्धा कि.मी. अंतरावर, वायंगिणी इथे रस्त्याच्या कडेला एक अत्यंत सुबक असा नंदी आपल्या महादेवापासून दुरावून बसलेला आहे. लोकानी त्याच्या शिरावर एक घुमटी बांधून त्याला ऊन पावसापासून वाचवला आहे.

बारदेशातही असाच हैदोस घालण्यात येत होता. बारदेश हा तालुका एवढा मोट्ठा आहे की तिथल्या देवळांच्या संख्येचा फक्त अंदाजच लावू शकतो आपण. अश्या ह्या पावन बारदेशातल्या सर्व देवळांतील मूर्ती जुने गोवे येथे बिशपसमोर नेऊन त्यांचे हजार तुकडे करण्यात आले. देवळाच्या ठिकाणी चर्च बांधण्यात आले आणि देवळांचे उत्पन्न चर्चला देण्यात आले.

धर्मांतरे तर इतक्या प्रमाणात झाली की सोय नाही . गोव्यात 'जोस'वाडा नावाचा एक वाडा आहे. हा पूर्वीचा जोशीवाडा होता. असाच 'वझे'चा वाझ झाला. 'लक्षुबा'चा लुकश / लुकास झाला.

कुंकळ्ळीचा उठाव

आपला धार्मिक जाच कमी होण्यासाठी सासष्टीच्या हिंदूंनी सनदशीर मार्गाने प्रयत्न केले होते. पहिल्या धर्मसभेने लादलेली बंधने दुसर्‍या धर्मसभेने शिथिल करावी म्हणुन खूप खटपट केली. पण त्यांनी उलट जुनी बंधने अजून जाचक केलीच पण अजुन नवे कायदे आणले जसे की लग्नाच्या आधीचे विधी करु नये, नवरीला हळद लावू नये इत्यादी.

सासष्टीचे लोक तसे मानी. कुंकळ्ळीच्या गावकर्‍यांना हा अपमान सहन झाला नाही. त्यांनी सरकारी खंड भरायला बराच विलंब केला. रायतुरच्या किल्ल्यात जाणे बंद केले. गव्हर्नरने साष्टी प्रदेशातील वसुलीसाठी इश्तेव्हाव रुद्रीगीश (रॉड्रीगीज) या क्रूर अधिकार्‍याला पाठवले. तो खंडवसुलीसाठी कुंकळ्ळीत गेला व लोकांना त्रास देण्यास सुरवात केली. इथल्या प्रभुदेसाई फळ वगैरे लोकांनी त्याला व त्याच्या काही सहकार्‍यांना असोळणे येथे ठार केले.

कुंकळ्ळीची जनता सत्तेविरुद्ध उभी राहिली. त्यांनी आसपासच्या गावातील लोकांना आपल्या बाजूस वळविले व पोर्तुगीज ठाण्यांवर हल्ल्याचा सपाटा सुरु केला. सासष्टीतील सर्व भागात ख्रिश्चन लोक असुरक्षित झाले. सैनिकांच्या मदतीसाठी मिशनर्‍यांनाही सैनिकांचे काम करावे लागले.

हे बंड मोडुन काढण्यासाठी गव्हर्नरने एक पलटण पाठवली. या सैन्याने हिंदुंची नवीन बांधलेली देवळे मोडली, गावंच्या गावं जाळून भस्मसात केली आणि पुढार्‍यांना ठार केले. एवढे झाल्यानंतर त्या प्रदेशात शांतता प्रस्थापित झाली. लोकांनी राजाशी एकनिष्ठ राहण्याचे व सरकारला खंड भरण्याचे कबूल केले. पण धार्मिक आक्रमणाला विरोध करण्याचे त्यांनी मनाशी पक्के ठरविले होते. म्हणुन त्यांनी आपली देवळे पुन्हा उभारली व देवळातील सर्व धार्मिक उत्सव थाटामाटात साजरे करु लागले. जमिनीचे उत्पन्न जे पूर्वी देवळांस मिळत असे व गेल्या काही वर्षांत चर्चना देण्यात येई ते गावकर्‍यांनी पुन्हा देवळांना देण्यास सुरु केले. वसुलीस चर्चची माणसे आली तर त्यांस उत्तर मिळे "जशी तुम्हास चर्चेस तशी आम्हास देवळे. आम्ही त्यांस खंड देऊ." अशा तर्हेसने त्यांनी सरकारी नियम धाब्यावर बसविले.

हा उठाव सैन्याच्या वापराने काबूत आणण्यात आला

हे लोक जागरुक व लढवय्ये होते. त्यांनी मिशनर्‍यांस आपल्या गावात स्थिर होऊ दिले नाही. अनेकदा जाळपोळ होऊनही पोर्तुगीजांची पाठ फिरताच ते पुन्हा आपल्या गावात येऊन घरे व देवळांची पुनर्बांधणी करत.

एक अशीच घटना सांगावीशी वाटते.

कुंकळ्ळीत चर्च बांधण्याचा मिशनर्‍यांचा मानस होता. १५ जुलै १५८३ रोजी सकाळी पाद्रींनी मास म्हटला व कुंकळ्ळीकडे कूच केले. आसपासच्या नवख्रिस्तींनी त्यांच्यासाठी मंडप उभारला होता.

हिंदूंनी तातडीने ग्रामसभा बोलावुन पाद्री आले तर देवालये उद्ध्वस्त करण्याच्या दुष्कृत्याचे जनक म्हणुन त्यांच्यावर सूड उगवावा असे ठरले.

पाद्रींच्या जथ्याला गावचा १ प्रतिष्ठित हिंदू सामोरा गेला. अभिवादन करुन स्वागत केले व गावकरी जेवून भेटायला येतील व गावात आलेल्या 'संतांचा' यथोचित सत्कार करतील असे सांगितले. त्याच्या पाठोपाठ स्त्री-पुरुषांचा मोठा घोळका तिथे गेला. त्यात एक घाडी होता व तो वेड्यासारखे मोठमोठ्याने ओरडत होता. इतर लोक टेहळणी केल्यासारखे फिरत होते. घाडी एवढ्या जलद बोलत असे की ऐकणार्‍याला अर्थबोध होत नसे.

पाद्रींनी गावकर्‍यांची बरीच प्रतिक्षा केली पण कुणीच फिरकले नाही. मग त्यांनी आपले काम सुरु केले. एक चर्च बांधावे, एक क्रॉस उभारावा असे ते आपापसात बोलत होते. तेवढ्यात ज्याने पाद्रींचे स्वागत केले होते तो ऊठला व दोन काठ्या घेउन , एक उभी व दुसरी त्याच्यावर आडवी धरुन एका माडाच्या बुंध्याजवळ गेला व त्यावर धरुन म्हणाला इथे क्रॉस छान दिसेल नाही का?

ही खूण दिसताच घोळक्यातील लोक गायब झाले व घाडी मोठमोठ्याने ओरडून लोकांना जागवु लागला. जसजसा तो मोठमोठ्याने ओरडू लागला तसतसा त्याच्या ओरडण्याचा आशय पाद्रींना समजू लागला आणि त्यांच्या ऊरात धडकी भरली. त्यांनी पळून जायचे ठरवले पण त्यांना जाता येईना. कारण त्यांच्या जथ्यातील काही माणसे खाण्यापिण्याच्या वस्तू खरेदी करण्यासाठी बाजारात गेली होती. ती येईपर्यंत थांबणे त्यांना क्रमप्राप्त होते. ते लोक येईपर्यंत देवळाच्या बाजूने आरोळ्या उठल्या. लोकांचा जमाव भाले, तलवारी, धनुष्यबाण, दगड असं मिळेल ते शस्त्र हाती घेउन त्यांच्या दिशेने येत होता. "आमच्या प्रदेशाची शांतता भंग करणार्‍यांना, देवळे उद्ध्वस्त करणार्‍यांना मारून टाका, ठार करा" अशा आरोळ्या उठत होत्या.

आणि त्या पाद्रींचे देह जखमांनी विद्ध झाले. त्यांना ठार करण्यापुर्वी गावकर्‍यांनी त्यांना देवालयाभोवती दोनदा फरफटत फिरविले, नंतर देवासमोर उभे करुन नमस्कार करविला आणि मग आबालवृद्ध त्यांच्यावर तुटून पडले. मेल्यानंतर त्यांच्या रक्ताने देवाला अभिषेक घालण्यात आला.

सैन्याच्या जोरावर पोर्तुगीजांनी हे बंड मोडून काढले आणि मिळतील तेवढे लोक ख्रिश्चन करून टाकले. काही हिंदू जीव वाचवून पळाले आणि आदिलशाही मुलुखात आपापली दैवतं बरोबर घेऊन गेले. यानंतर गोव्यात स्थानिक लोकांकडून म्हणावा असा उठाव झाला नाही तो इ. स. १८५२ पर्य़ंत. याला कारण म्हणजे गोव्यात तिसवाडी, बारदेश आणि साष्टीवगळून उरलेल्या भागात आलेली मराठी सत्ता.

क्रमशः

**

विशेष सूचना - या लेखमालेचे स्वरूप एकंदरीतच ललित लेखनाच्या अंगाने जाणारे पण गोव्याच्या समृद्ध इतिहासाचे, आणि वर्तमानाचेही, दर्शन वाचकांना करून देणे एवढेच आहे. वाचकांना विनंती की त्यांनीही ते तेवढ्याच बेताने घ्यावे. आम्ही कोणीही इतिहासकार / इतिहासतज्ञ वगैरे नाही आहोत. पण थोडे फार वाचन करून, माहिती जमा करून इथे मांडण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे. तपशीलात अथवा आमच्या निष्कर्षात चूक / गल्लत असू शकते. पण काही चांगले लेखन यावे आणि गोव्याची रूढ कल्पना सोडून त्याहून वेगळा गोवा काय आहे हे लोकांना कळावे म्हणूनच हा सगळा लेखमालेचा उद्योग.