मंगळवार, २१ जून, २०११

आमचे गोंय - भाग ५ - शिवकाल आणि मराठेशाही***

छत्रपति शिवाजी महाराज

इ.स. १५७० च्या सुमाराला बहामनी सत्तेचे ५ तुकडे झाले. आणि तिसवाडी, बार्देश व साळशेत हे पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेले ३ तालुके वगळून बाकीचे तालुके इस्माईल आदिलशहाच्या ताब्यात आले. इ.स. १५८० मध्ये पोर्तुगालवर स्पेनची सत्ता प्रस्थापित झाली. इथून पुढे इ.स. १६४० पर्यंत पोर्तुगालवर स्पेनची सत्ता सुरू राहिली. अर्थातच, या काळात गोव्यावर अप्रत्यक्षपणे स्पेनची सत्ता होती. या काळात पोर्तुगीज सत्ता काहीशी दुर्बल झाली होती. या काळात हॉलंड आणि स्पेन यांचं शत्रुत्व होतं. इ.स. १६०३ मध्ये वलंदेज म्हणजेच डच लोकानी मांडवीच्या मुखात ठाण मांडून गोव्याची नाकेबंदी सुरू केली. इ.स. १६०४ मध्ये पोर्तुगीजांविरुद्ध, डच आणि कालिकतचा झामोरिन यांच्यात तह झाला. डच आणि पोर्तुगीज यांच्यातल्या चकमकी सुरूच राहिल्या. इ.स. १६४० साली श्रीलंका तर इ.स. १६४१ साली मलाक्का हे दोन प्रांत डचानी पोर्तुगीजांकडून हिसकावून घेतले. समुद्रातून गोव्याची नाकेबंदी इ.स. १६४० च्या दरम्यान परत सुरू झाली. नंतर इ.स. १६६० पर्यंत हे असंच सुरू राहिलं. इ.स. १६६० मधली महत्त्वाची घटना म्हणजे कॅथरिन या राजकन्येच्या विवाहात मुंबई बेट पोर्तुगालकडून दुसर्‍या चार्ल्सला हुंडा म्हणून मिळालं आणि भारताच्या पश्चिम किनार्‍यावर इंग्रजांना एक महत्त्वाची जागा मिळाली. आता भारतात पोर्तुगीजांचं राज्य दीव-दमण, वसई, चौल आणि गोव्यातले ३ तालुके एवढ्यापुरतंच उरलं.

या दरम्यान, शिवनेरीवर एक तेजस्वी, महापराक्रमी शक्ती १९ फेब्रुवारी १६३० ला उदयाला आली होती. राजे शिवाजी स्वराज्य आणि सुराज्याची स्थापना करून त्याच्या मजबुतीचं काम करत होते. या द्रष्ट्या महापुरुषाने तेव्हाच्या कोणत्याही भारतीय शासकाने फारशा न केलेल्या अनेक गोष्टी केल्या. त्यातली एक म्हणजे आरमाराची स्थापना. भूदुर्गांबरोबरच जलदुर्गांची स्थापना. इ.स. १६५९ मध्येच शिवाजी राजांनी २० लढाऊ नौका तयार करून युरोपियन आक्रमकांना जबरदस्त आव्हान उभे केले. या आरमाराची पोर्तुगीजांनाही एवढी दहशत होती की, त्यांनी राजांच्या नौकांना आपल्या बंदरात येऊ द्यायला नकार दिला होता! संपूर्ण कोकण किनार्‍या वर महाराजांनी अनेक जलदुर्ग उभारले. पोर्तुगीजांना धडकी भरवणारा सिंधुदुर्ग इ.स. १६६४ मध्ये अस्तित्त्वात आला. सुरुवातीच्या काळात आदिलशहाच्या विरोधात लढण्यासाठी शिवाजी राजांनी पोर्तुगीजांकडे मैत्रीचा हात पुढे केला होता, पण पोर्तुगीज घाबरले आणि त्यांनी या लढ्यात गप्प राहणे पसंत केले. या काळात सावंतवाडी संस्थानात लखम सावंतची सत्ता होती. त्याने शिवाजी राजांचे आधिपत्य मान्य केले. कोकणातून राजांचे सैन्य कुडाळ जिंकून पेडण्यात उतरले. इ.स. १६६४ मध्येच डिचोली तालुका आदिलशहाकडून राजांच्या ताब्यात आला. इथे राजांनी आपला तळ उभारला. इ.स. १६६५ मध्ये राजानी ८५ युद्धनौका बरोबर घेऊन मालवणहून प्रयाण केले आणि गोव्याचा किनारा ओलांडून थेट बसरूरपर्यंत धडक मारली. तिथे अगणित लूट करून, परतीच्या रस्त्यात गोकर्ण, अंकोला आणि कारवार आदिलशहाकडून जिंकून घेतले. पोर्तुगीजांच्या उत्तर सीमेजवळ असलेल्या सिंधुदुर्गाप्रमाणेच दक्षिण सीमेवर रामाचे भूशिर इथला मूळात रामदेवरायाचा जलदुर्ग मजबूत करून घेतला. त्यानी जणूकाही पोर्तुगीजाना त्यांची सीमा आखून दिली की याच्या पुढे तुम्ही यायचं नाही.

इ.स. १६६५ मध्ये राजांना मिर्झाराजेंबरोबर तह करून आग्रा भेटीला जावं लागलं. इ.स. १६६६च्या अत्यंत थरारक अशा आग्र्याहून सुटकेनंतर राजांनी अजिबात उसंत न घेता कोकणातून गोव्यावर स्वारी केली. टाकोटाक आदिलशहाच्या ताब्यात असलेल्या फोंड्याच्या मर्दनगडाला वेढा घातला. लगेच पोर्तुगीजांनी आदिलशाही सैन्याला मदत सुरू केली. महाराजांनी तरीही हा किल्ला जिंकून घेतला. मध्यंतरीच्या काळात वाडीच्या लखम सावंत व तळकोकणातल्या इतर देसायांनी शिवाजी राजांच्या मुलखाला उपद्रव द्यायला सुरुवात केली होती. राजे कोकणात येताच हे देसाई घाबरून पोर्तुगीजांच्या ताब्यातल्या मुलखात पळून गेले. त्यांचं पारिपत्य करण्याच्या मिषाने आणि पोर्तुगीजाना जरब बसविण्यासाठी महाराजांचे सैन्य बारदेशात घुसले. आणि फिरून पोर्तुगिजाना दहशत बसली. इ.स. १६६७ साली पोर्तुगीज आणि महाराज यांच्यात तात्पुरता तह झाला. महाराजांनी पोर्तुगीजांना त्यांचे इन्क्विझिशन बंद करायला सांगितलं.

गोव्यातल्या जनतेला अभय देण्याच्या दृष्टीने या शिवभक्त राजाने कदंबांचं कुलदैवत श्री सप्तकोटीश्वर याचं मंदिर नार्वे येथे परत उभारलं. मलिक काफूर, आदिलशहा आणि पोर्तुगीज यानी ३ वेळा उद्ध्वस्त करून विजनवासात पाठवलेल्या सप्तकोटेश्वराला महाराजानी छप्पर दिलं. गोव्यातला डिचोलीचा तळ मजबूत करून महाराज परत महाराष्ट्रात गेले. इ.स. १६७० पर्यंत सुमारे ६०,००० पायदळ आणि ४०,००० घोडदळाची उभारणी करून महाराजानी मिर्झाराजे जयसिंगांबरोबरच्या तहात गमावलेला बहुतेक सगळा मुलुख परत मिळवला.

इ.स. १६७२ मध्ये महाराजांनी रामनगरच्या राजावर हल्ला चढवला, आणि तो पोर्तुगीजाना देत असलेली चौथाई आपल्याला द्यावी अशी त्यांनी मागणी केली. यावेळेला पोर्तुगीजांनी रामनगरच्या राजाला मदत केली. नंतर ६ जून १६७४ ला महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि काही काळातच महाराजांनी रामनगरच्या राजाचा पराभव करून पोर्तुगीजांकडे असलेले चौलमधले चौथाईचे हक्क मिळवले. तर आदिलशहाच्या ताब्यात गेलेले कारवार, कोल्हापूर, फोंडा-मर्दनगडही इ.स. १६७५ मध्ये परत मिळवले. ५०,००० चे सैन्य जमा करून इ.स. १६७६ मधे महाराज दक्षिण दिग्विजयासाठी बाहेर पडले. यावेळेला महाराजानी दक्षिणेतील राजांची एकजूट घडवून औरंगजेबाला टक्कर द्यायचं स्वप्न पाहिलं होतं. कुतुबशहाने महाराजांचा मैत्रीचा हात स्वीकारला, पण आदिलशहाने मात्र एवढी समजूत दाखवली नाही. प्रथम महाराजानी तामिळनाडूतील जिंजी आणि वेल्लोर जिंकून घेतले, जे भविष्यकाळात मराठी साम्राज्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अतीव महत्त्वाचे ठरले.

नंतरचा काळ स्वराज्याची घडी बसवण्यात आणि संभाजी राजांच्या काहीशा अपरिपक्व हालचालींच्या काळजीत व्यतीत होत असताना मराठी राज्याचा पाया घालणारा हा सूर्य ३ एप्रिल १६८० ला अस्तंगत झाला. पोर्तुगीजाना महाराजांची एवढी भीती होती की त्यानी महाराजांच्या ताब्यात असलेल्या मुलखावर कधीही सरळ हल्ला चढवला नाही. कोकण आणि गोव्यातल्या नद्या, जंगलं, दर्‍या, डोंगरांनी भरलेल्या दुर्गम प्रदेशात महाराजांचे गनिमी काव्याचे तंत्र अतिशय यशस्वी ठरले. त्याना थोडा अवधी मिळाला असता तर त्यांनी पोर्तुगीजांना गोव्यातून उखडून काढलं असतं हे निश्चित. पोर्तुगीज दप्तरात, महाराजांनी पोर्तुगीजांना जरब बसवण्यासाठी लिहिलेली तसेच पोर्तुगीज महाराजांना किती घाबरत असत हे दाखवणारी पत्रे उपलब्ध आहेत.

महाराजांचा काळ झाल्यानंतर एक वर्ष काहीसं गोंधळाचं गेलं. संभाजी राजांवर विषप्रयोगाचा प्रयत्न झाला. त्यांच्या अटकेचा आदेश काढला गेला आणि रायगडावर घाईघाईने लहानग्या राजारामाचा राज्याभिषेक झाला. या घटनांचं कारण म्हणजे अष्टप्रधानांपैकी काहीजण सोयराबाईला पुढे करून आपल्या महत्त्वाकांक्षेला खतपाणी घालत असावेत असं वाटतं. तसंच नवीन राज्य स्थापन करण्याच्या हेतूने संभाजी राजांनी दिलेरखानाच्या छावणीत सामिल होणं आणि शिवाजी महाराजांनी प्रयत्नपूर्वक त्यांना परत आणणं, यात महाराजांना झालेला प्रचंड मनस्ताप, यातूनच प्रधानमंडळांपैकी काहींचा संभाजी राजांवरचा विश्वास उडाला, हेही एक कारण असावं. संभाजी राजे आणि सोयराबाई यांच्या वादात सोयराबाईचे भाऊ सरनौबत हंबीरराव मोहिते यानी संभाजी राजे हेच राज्य चालवायला योग्य आहेत आणि अभिषिक्त युवराज आहेत या भूमिकेतून संभाजी राजांची बाजू घेतली. सरनौबतांच्या मदतीमुळे इ.स. १६८१ मध्ये संभाजी राजे छत्रपती झाले. त्यानी प्रथम स्वतःच्या गुन्हेगाराना कठोर शिक्षा दिल्या. पंतप्रधान मोरोपंत पिंगळे याना मात्र माफी मिळाली आणि त्यानी नंतर राजांबरोबर मोहिमेत भाग घेतला.


छत्रपति संभाजी महाराज

राज्याभिषेक होताच अवघ्या १५ दिवसात हा २३ वर्षांचा राजा मोहिमेवर निघाला. बरोबर पेशवे मोरोपंत आणि सरनौबत होते. त्यानी बुर्‍हाणपूरवर हल्ला करून २ कोटी रुपयांची लूट मिळवली. यावेळेला एका अरबी व्यापार्‍याकडून राजांनी घोडे विकत घेतले असा उल्लेख आहे. हा व्यापारी एवढा घाबरला होता की तो ते घोडे फुकट द्यायला तयार झाला होता म्हणे! पण सामान्य जनतेला त्रास देऊ नये हे शिवाजी राजांचं तत्त्व संभाजी राजांनीही अंगिकारलं असावं. यापूर्वीच म्हणजे इ.स. १६८० मधे शिवाजी महाराजांचा मृत्यु होताच औरंगजेब ५ लाख सैन्य आणि ४ लाख जनावरे घेऊन स्वतः महाराष्ट्रात दाखल झाला होता, मराठी राज्य सहज चिरडून टाकू अशा हिशेबाने तो आला असेल पण आपली गाठ कोणाशी आहे याची त्याला जराही कल्पना नव्हती! नाशिकजवळच्या रामशेजच्या एका किल्ल्यासाठी मुघल सैन्याला ७ वर्षं लढावं लागलं! तसंच पुढच्या ९ वर्षात नाव घेण्यासारखा एकही विजय मुघल सैन्याला मराठ्यांसमोर मिळवता आला नाही. संभाजी राजांच्या काही सैन्याने औरंगजेबाच्या सैन्याला गनिमी काव्याने सळो की पळो करून सोडले तर स्वतः राजे कोकणात उतरले. त्यानी प्रथम पोर्तुगीजांकडे मैत्रीचा हात पुढे केला पण पोर्तुगीजांनी मुघलांना मदत करणे पसंत केलं. आता राजांनी पोर्तुगीजांना संपविण्याचा निर्धार केला. मर्दनगडाची डागडुजी करून तिथे आणि भतग्राम (डिचोली) इथे सैन्याचे भक्कम तळ उभारले.

वयाच्या १६ व्या वर्षापासून संभाजी राजांनी थोरल्या महाराजांबरोबर गोव्याच्या आणि इतर मोहिमांमधे भाग घेतला होता, त्यावेळेला महाराजांचं युद्धतंत्र त्यांच्या पूर्ण अंगवळणी पडलं असावं. तसंच गोव्याच्या भूमीची संभाजी राजांना पूर्ण माहिती झाली होती. यामुळेच गोव्यात राजांचा सर्वत्र सहज संचार होत असे. इ.स. १६८३ मधे राजांनी चौल पोर्तुगीजांकडून घेतले तर ११ डिसेंबर १६८४ ला बार्देशवर हल्ला केला. बार्देशातील थिवी, चोपडे हे किल्ले जिंकले. साळशेत (मडगाव) घेतले. म्हैसूरच्या चिक्कदेवरायाचा पराभव केला आणि शिवाजी महाराजानी स्थापन केलेल्या राज्याचा आणखी विस्तार केला. राजे अवघ्या १ लाख सैन्यानिशी ५ लाखाचे मुघल सैन्य, जंजिर्‍या चा सिद्दी, गोव्यातले पोर्तुगीज आणि म्हैसूरचा चिक्कदेवराय एवढ्या आघाड्यांवर एकाच वेळी लढत होते. पैकी गोव्यात त्यानी बराच काळ वास्तव्य केलं. गोव्यातलं त्यांचं महत्त्वाचं कार्य म्हणजे त्यानी पोर्तुगीजांना पायबंद घातला आणि धर्मांतरित झालेल्याना परत शुद्धिकृत करून हिंदू करून घेण्याचं शिवाजी महाराजांचं कार्य त्यांच्या या पुत्रानेही पुढे चालू ठेवलं.

शिवाजी महाराजांच्या गोवा मोहिमेत इथल्या स्थानिक राणे, देसाई वगैरे मंडळीनी त्याना विरोधच केला होता. पण त्यांची मदत मिळवण्यात संभाजी राजे मात्र यशस्वी ठरले. असोळणा, कुंकोळी इथल्या मराठ्यांनी आणि साखळीच्या राणे घराण्याने राजांना खुल्या दिलाने मदत केली आणि त्यांचं राज्य स्वीकारलं. समाजातून बहिष्कृत झालेल्या राण्यांना संभाजी राजानी पंक्तिपावन करून घेतले आणि राणे राजांचे ऋणी झाले. गोकुळाष्टमीच्या रात्री संभाजी राजांनी मांडवी नदी पार करून पोर्तुगीजांवर हला करण्यासाठी नदीच्या पात्रात घोडे घातले, पण पावसात उधाण आलेल्या प्रवाहात घोड्याचा पाय घसरला आणि राजे वाहून जाऊ लागले. या वेळेला खंडो बल्लाळाने राजांना वाचवले अशी कथा स्थानिक लोकांच्या सांगण्यात येते. काही मराठी सैन्य साळशेतमधे ठाण मांडून बसले तर स्वतः राजांनी वेळ न गमावता कुंभारजुवे बेट पोर्तुगीजांकडून घेतले आणि तीन बाजूंनी पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेल्या प्रदेशावर हल्ला चढवला. आता फक्त तिसवाडीच पोर्तुगीजांच्या ताब्यात राहिली होती.

दुसर्‍या दिवशी राजे स्वतः गोवा वेल्हावर हल्ला करणार हे पोर्तुगीजांनी जाणले. आताच्या ओल्ड गोवा येथून कुंभारजुवे बेट दिसते. तिथल्या सैन्याच्या हालचाली पाहून पोर्तुगीज घाबरले. त्यांनी चर्चमधलं सेंट फ्रान्सिस झेवियरचे शव बाहेर काढलं. व्हाईसरॉय काउंट डी अल्वारिसने आपला राजदंड त्याच्या शवपेटीवर ठेवला आणि "सायबा, तूच आमचं रक्षण कर" अशी करुणा भाकली. पोर्तुगीजाना हा सायब पावला की नाही माहित नाही, पण मुघल मात्र मात्र पावले! सुमारे १ लाखाचे मुघल सैन्य कोकणात उतरल्याची खबर आली आणि जिंकत आलेली गोव्याची मोहीम अर्धवट टाकून संभाजी राजाना परत जावं लागलं.

इ.स. १६८४ मधे संभाजी राजांनी पोर्तुगीजांबरोबर तह केला. त्या अनुसार मराठ्यांनी पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेले गोव्याचे ३ तालुके त्याना सोडून दिले. तर पोर्तुगीजानी चौल इथे कर देण्याचं मान्य केलं. पण या तहाची पूर्ण अमलबजावणी झाली नाहीच! बार्देशमधले किल्ले मराठ्यांनी परत केले नाहीत. आता औरंगजेबाची वक्रदृष्टी गोव्याकडे वळली. पण पोर्तुगीजांनी गोव्यातल्या मराठा देसायांबरोबर तह केला आणि मुघल सैन्याच्या हाती काही लागले नाही. मराठा सैन्य आणि पोर्तुगीज यांच्या चकमकी सुरूच राहिल्या. पण संभाजी राजे पोर्तुगीजांना हाकलून लावण्यासाठी परत गोव्यात येऊ शकले नाहीत. ते जर झालं असतं तर आज गोवा महाराष्ट्राचा एक जिल्हा राहिला असता!

आणखी सतत ४ वर्षे मुघलाना हुलकावण्या देत जेरीला आणणारा हा शूर छत्रपती १ फेब्रुवारी १६८९ ला कपटाने कैद झाला. त्यांच्या सख्या मेव्हण्याने, गणोजी शिर्क्याने विश्वासघात केला आणि नंतर तब्बल ४० दिवस हालहाल करून शेवट औरंगजेबाने ११ मार्च १६८९ ला राजांचा वध केला. पण एवढे हाल होत असतानाही या छाव्याने औरंगजेबाचा कोणताच प्रस्ताव मानला नाही आणि वीराचे मरण पत्करले. महाराष्ट्राच्याच नाही तर गोव्याच्या इतिहासात या राजाचं स्थान अद्वितीय आहे. त्याच्या मृत्यूनंतर मराठ्यांचा झुंजण्याचा निर्धार आणखीच पक्का झाला आणि नंतर एकजुटीने पण निर्नायकी अवस्थेत मराठ्यांनी मुघलांना जी झुंज दिली तिला इतिहासात तोड नाही. पराक्रमात बापसे बेटा सवाई असलेल्या या तरूण राजाने अवघ्या ३२ वर्षांच्या आयुष्यात विजेसारखं थोड्या काळासाठी लखलखून आत्मार्पण केलं आणि सामान्य शेतकर्‍यांना औरंगजेबाशी भांडण्याचं पहाडाचं बळ दिलं. गोव्यात पोर्तुगीजांना बसलेला दणका एवढा प्रचंड होता की त्या ३ तालुक्याच्या पलिकडे आणखी प्रदेश आपल्या ताब्यात आणण्याचा प्रयत्नसुद्धा त्यानी नंतर केला नाही. एवढ्या सततच्या धामधुमीतही 'बुधभूषण' आणि इतर काही संस्कृत रचना करणार्या या तेजस्वी राजाच्या नावावरून 'वास्को द गामा' शहराचं नाव 'संभाजीनगर' करावं असा प्रस्ताव काही काळापूर्वी आला होता, पण...

छत्रपती संभाजीच्या वधानंतर महाराणी येसूबाईने राजारामाला रामचंद्रपंत अमात्यांच्या हाती सोपवून प्रतापगडावर पाठवले. रायगडावर सूर्याजी पिसाळ फितूर झाला आणि येसूबाई आणि शाहू मुघलांच्या हाती लागले. खंडो बल्लाळ राजारामाला महाराष्ट्रातून सुखरूप जिंजीला घेऊन गेला. तिथे ९ वर्षं वेढ्यात काढून गणोजी शिर्केच्या मदतीने राजाराम जिंजीहून निसटून महाराष्ट्रात परत आला. इ.स. १७०० साली राजारामाच्या मृत्यूनंतर ताराबाईने राज्याची सूत्रे हातात घेतली. आता सावंतवाडी इथे लखम सावंताचा धाकटा भाऊ फोंड सावंत याची सत्ता होती. ताराबाईच्या प्रदेशाला लागून असल्याने त्याने ताराबाईचे वर्चस्व मान्य केले. तर ताराबाईने त्याला कुडाळ, बांदा, पेडणे, साखळी, डिचोली आणि मणेरी या ६ तालुक्यांचा मोकासा लिहून दिला.

फोंड सावंताचा मुलगा खेम सावंत हे गोव्याच्या आणि सावंतवाडीच्या इतिहासातलं मोठं मजेशीर प्रकरण आहे. त्याची कारकीर्द बरीच मोठी म्हणजे इ.स. १६७५ ते इ.स. १७०९ पर्यंत. त्यानेच 'सुंदरवाडी' अर्थात 'सावंतवाडीचा' पाया घातला. त्यापूर्वी सावंतांचं प्रमुख ठाणं कुडाळ होतं. या काळात त्याने प्रथम ताराबाई नंतर शाहू महाराज, म्हणजे ज्या कोणाचं वर्चस्व दिसेल त्याची प्रभुसत्ता बिनतक्रार मान्य केली. शाहू राजानी त्याला या ६ तालुक्यांचं वतन दिलं. म्हणजेच, छत्रपती शिवाजी आणि संभाजी यांच्या काळात बंद झालेली वतनाची पद्धत शाहूच्या काळात परत सुरू झाली होती आणि हे छोटे वतनदार आपापल्या मुलुखात आपापल्या पद्धतीने सत्ता चालवीत होते. मूळ कर्नाटकातील शिरसीजवळचे, पण गोव्यात फोंडा इथे स्थायिक झालेल्या सोंदेकरांबरोबर खेम सावंताचा ३६ चा आकडा होता. जमेल तेव्हा सोंदेकरांच्या कुरापती काढण्याचे उद्योग त्याने आयुष्यभर चालू ठेवले. जिथे यश मिळणार नाही असं दिसलं तिथे सरळ माघार घेतली. मराठ्यांचं पारडं हलकं होतंय असं वाटलं की पोर्तुगीजांची मदत घेतली. हेतू साध्य होताच परत पोर्तुगीजांना अंगठा दाखवला. या सोंदेकरानीही वेगवेगळ्या वेळी मुघल, पोर्तुगीज, मराठे यांच्याबरोबर आपल्या रक्षणासाठी तह केलेले आढळून येतात. गोव्यातल्या सध्याच्या पक्षबदलांच्या राजकारणाची सुरुवात फार पूर्वी झालेली होती असं दिसतंय!

फोंड्याच्या मर्दनगडासाठी या काळात दरवर्षी एक लढाई लढली गेली. आणि किल्ल्याची मालकी आलटून पालटून कधी खेम सावंत, तर कधी सोंदेकर, कधी मराठे तर कधी मुघल अशी बदलत राहिली. पोर्तुगीजाना मराठे किंवा मुघलांसारखे प्रबळ शत्रू सीमेवर नको होते, त्यामुळे त्यानी खेम सावंत आणि सोंदेकर याना आपल्या सीमेवर राहू दिले. आणि शक्य तितके आपसात झुंजत ठेवले. अर्थातच फोंडा, डिचोली हे भाग अप्रत्यक्षपणे मराठ्यांच्याच ताब्यात राहिले.

साधारण इ.स. १७०० ते इ.स. १७०९ या ९ वर्षात खेम सावंताने गोव्यात अक्षरशः धुमाकूळ घातला. त्याने पोर्तुगीज जहाजांवर हल्ले करून लूटमार सुरू ठेवली. त्याने संधी मिळतच बार्देश, फोंडा वळवई या भागात छापे मारून लुटालूट, जाळपोळ करणे, किल्ले ताब्यात घेणे यांचे सत्र सुरू ठेवले. किल्ल्यांच्या आश्रयाने शत्रूवर हल्ला करण्याचे शिवाजी महाराजांचे तंत्र खेम सावंताने वापरले. पोर्तुगीजानी या प्रकाराला वैतागून आमोणा, डिचोली, वळवई इथले किल्ले आपल्या ताब्यात येताच पाडून टाकले. डिचोलीचा किल्ला पाडल्यानंतर पोर्तुगीज व्हॉईसरॉयने असे उद्गार काढले की,"खेम सावंताला दुसरा शिवाजी होऊ देणार नाही!" तरी खेम सावंताचे उपद्व्याप सुरूच होते. शेवटी इ.स. १७०९ साली खेम सावंत मरण पावला. त्याला ३ मुलीच होत्या. त्यामुळे त्याच्या मागून त्याचा पुतण्या फोंड सावंत गादीवर आला. यानेही खेम सावंताप्रमाणेच पोर्तुगीजांबरोबर कधी मैत्री, कधी भांडण चालू ठेवले. कान्होजी आंग्रेंच्या आरमाराबरोबर त्याच्या चकमकी सतत चालू असत. इ.स. १७२९ मधे कान्होजींचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचा मुलगा सेकोजी याने पोर्तुगीज आणि फोंड सावंताबरोबर लढाया चालू ठेवल्या.

इ.स. १७२० नंतर बाजीराव पेशव्यांच्या सरदारानी उत्तर गोव्यात हल्ले चालू ठेवले. आता फोंड सावंत बाजीरावाच्या बाजूने पोर्तुगीजांवर हल्ले करू लागला. बाजीराव आणि चिमाजी, पोर्तुगीजांविरुद्ध वसई आणि गोव्याच्या दोन्ही आघाड्यांवर लढत होते. पोर्तुगीजांनी वसईला गोव्यातून मदत पाठवू नये म्हणून इ.स. १७३९ साली दादाजी भावे नरगुंदकर, वेंकटेशराव घोरपडे आणि जिवाजी शिंदे यांनी गोव्यावर पुर्‍या ताकदीने हल्ला चढवला. राशोल आणि मार्मुगोव्याचा किल्ला सोडून उरलेला साळशेत तालुका मराठ्यांच्या ताब्यात आला. तर फोंड सावंतानंतर गादीवर आलेला त्याचा नातू रामचंद्र याने बारदेश तालुका घेतला. मराठ्यांनी फोंडा, सुपे आणि सांगे तालुके ताब्यात घेतले. संभाजी राजांनंतर परत एकदा पोर्तुगीजांच्या ताब्यात फक्त तिसवाडी राहिली. आता पोर्तुगीजांनी बाजीरावाकडे तहाची याचना केली. बाजीरावाने इन्क्विझिशन बंद करा, हिंदूंचा छळ बंद करा या आणि आणखी मागण्या पोर्तुगीजांपुढे ठेवल्या. इ.स. १७४० मध्ये चौल आणि कोर्लाईचा किल्ला देऊन पोर्तुगीजानी गोव्यात आपलं अस्तित्त्व कसंबसं राखलं. मराठ्यांनी कुंकोळी आणि असोळणा परत केले, पण रामचंद्र सावंताने बार्देश मात्र परत केला नाही! रामचंद्र सावंत आणि मराठे विरुद्ध पोर्तुगीज अशा चकमकी सुरूच राहिल्या. सोंदेकर आणि राणे यानी या वेळेला पोर्तुगीजाना मदत करायचं मान्य केलं.

इ.स. १७५६ साली पोर्तुगीज व्हॉईसरॉय कॉण्डे डी अल्वाने मराठ्यांच्या ताब्यातील मर्दनगडावर हल्ला केला. या लढाईत स्वतः व्हॉईसरॉय मरण पावला! गोंधळाचा फायदा घेत सावंतांनी पेडणे, सांगे आणि मणेरी तालुके घेतले. २४ डिसेंबर १७६१ ला तह झाला आणि पोर्तुगीजांनी सावंतांच्या ताब्यात असलेल्या सर्व प्रदेशावर सावंतांचा हक्क मान्य केला. याच सुमाराला पानिपतच्या लढाईत मराठ्यांचा पराभव झाला आणि पेशवाई दुबळी झाली. याचा फायदा घेत पोर्तुगीजांनी इ.स. १७६३ मध्ये मर्दनगड जिंकून सोंदेकरांच्या ताब्यात दिला. पण एवढ्यात म्हैसूरच्या हैदर अलीने सोंदेकरांवर हल्ला केला. सोंदेकर पळून गोव्यात पोर्तुगीजांच्या आश्रयाला आले. आता कसलीच जबाबदारी नको म्हणून सोंदेकरानी फोंडा, केंपे आणि काणकोण तालुके पोर्तुगीजांच्या हवाली केले. इ.स. १७७१ साली सोंदेकरानी गोव्यातल्या त्यांच्या ताब्यात असलेल्या प्रदेशावरचा हक्क सोडून दिला. इ.स. १७८५ साली कोल्हापूरच्या छत्रपतीनी सावंतांवर हल्ला केला. आता घाबरून सावंतानी पोर्तुगीजांकडे मदत मागितली आणि त्या मदतीची परतफेड म्हणून पेडणे तालुका पोर्तुगीजांच्या हवाली केला.

अशा प्रकारे इ.स. १७८८ मध्ये पूर्ण गोवा पोर्तुगीजांच्या सत्तेखाली आला. पोर्तुगीजांनी इ.स. १५६० साली जिंकलेल्या तिसवाडी, बार्देश आणि साळशेत (साष्टी) तालुक्याना 'जुन्या काबिजादी' तर इ.स. १७७१ आणि इ.स. १७८८ मध्ये ताब्यात आलेल्या उरलेल्या प्रदेशाला 'नव्या काबिजादी' हे नाव मिळालं.क्रमशः

**

विशेष सूचना - या लेखमालेचे स्वरूप एकंदरीतच ललित लेखनाच्या अंगाने जाणारे पण गोव्याच्या समृद्ध इतिहासाचे, आणि वर्तमानाचेही, दर्शन वाचकांना करून देणे एवढेच आहे. वाचकांना विनंती की त्यांनीही ते तेवढ्याच बेताने घ्यावे. आम्ही कोणीही इतिहासकार / इतिहासतज्ञ वगैरे नाही आहोत. पण थोडे फार वाचन करून, माहिती जमा करून इथे मांडण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे. तपशीलात अथवा आमच्या निष्कर्षात चूक / गल्लत असू शकते. पण काही चांगले लेखन यावे आणि गोव्याची रूढ कल्पना सोडून त्याहून वेगळा गोवा काय आहे हे लोकांना कळावे म्हणूनच हा सगळा लेखमालेचा उद्योग.

- टीम गोवा (ज्योति_कामत,प्रीतमोहर, बिपिन कार्यकर्ते)

बुधवार, ४ मे, २०११

आमचे गोंय - भाग ४ - पोर्तुगिज (सांस्कृतिक आक्रमण)***
धर्मसमीक्षण सभा (Inquisition)

धर्मसमीक्षण सभेचे कर्तृत्व हे युरोपच्या व ख्रिस्तीधर्माच्या इतिहासातील एक लांच्छनास्पद आणि अघोरी कृत्यांनी रक्तरंजित झालेले पृष्ठ. नास्तिक लोकांना, चेटुक करणार्‍या स्त्री-पुरुषांना शिक्षा देणे हे या धार्मिक नायालयाचे काम असे. या शिक्षा अगदी माणसांना जिवंत जाळण्यापर्यंत काहीही रूप घेत.

पोर्तुगालमध्ये ह्या न्यायालयाने स्पेनसारख्या देशातुन पळून पोर्तुगालमध्ये आलेल्या ज्यू लोकांवर 'न भूतो न भविष्यति' असे अत्याचार केले. ज्या ज्यूंनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला, त्यांनाही हे भोग चुकले नाहीत. त्यांनी भयंकर, अमानुष असे शारिरीक व मानसिक अत्याचार भोगले. छळ करणार्‍यांना हव्या तशा जबान्या घेउन या ज्यूंना जिवंत जाळण्यात येत असे. आणि त्यांची मालमत्ता सरकारजमा केली जात असे.

अशीच धर्मसमीक्षण सभा, मिशनरी 'संत' फ्रान्सिस झेवियर यांच्या आग्रहास्तव, गोव्यात स्थापण्यात आली. सन १५६० ते १८१२ पर्यंत या इन्क्विजिशनचा अनियंत्रित दुष्ट कारभार गोमांतकात बेछूटपणे चालू होता. या काळात एकुण ५ धर्मसभा बसल्या. प्रत्येक सभेत आधीचे नियम अधिक जाचक करुन हिंदूंना छळण्यासाठी नवनवे जाचक नियम बनवले जायचे. हा 'संत' फ्रांसिस झेवियर गोव्यातील हिंदू लोकांवर अनन्वित अत्याचारांची सुरुवात करून चीनमधे गेला होता. तिथे मृत्यू पावला. असं म्हणतात की तो खराच मेला याची खात्री पटविण्यासाठी त्याचं शव परत भारतात आणण्यात आलं, आणि ओल्ड गोवा इथल्या चर्चमधे लोकांना बघायला मिळावं म्हणून ठेवलं गेलं.

इन्क्विजिशनने ख्रिस्तीधर्मप्रसारासाठी गोव्यातील सर्व देवळे, मशिदी जमीनदोस्त करण्याचा, 'पाखंडी' मत नष्ट करण्याचा, हिंदुधर्मीय उत्सवास मनाईचा आणि लाकूड, माती किंवा धातू ह्यांच्या मुर्ती बनविणार्‍यास कडक शिक्षा देण्याचा हुकुम प्रसृत केला.

हिंदुंना कायद्याने सार्वजनिक अधिकाराच्या जागा वर्ज्य करण्यात आल्या. त्यांना धार्मिक आचार, विधी पालन करण्यास मनाई करण्यात आली. ह्यामध्ये यच्चयावत सगळे विधी समाविष्ट आहेत. अगदी स्त्रियांनी कुंकू लावायला मनाई करण्यात आली, तर शेंडी ठेवणार्‍या पुरुषांना शेंडीकर लावण्यात आला. पण स्थानिक लोकांची धर्मनिष्ठा जाज्वल्य होती. पोर्तुगीजांच्या अत्याचाराची जाण असतानाही ते हे कायदे मोडीत असत!!!

धर्मांतराचा सपाटा आधी तिसवाडीत सुरु झाला. तिसवाडीनंतर सासष्टीची पाळी व त्यानंतर बारदेशची पाळी आली. चोडण, करमळी यासारखी गावेच्या गावे बाटविली जाऊ लागली. अर्थात यात इन्क्विजिशनचा मुख्य हात असे!! नाहीतर एखादं गावच्या गाव का सहजपणे धर्म बदलेल? विहिरीत पाव टाकून "तुम्ही आता ख्रिश्चन झालात" असे भोळ्या गावकर्‍यांना बजावण्यात आले.

गोवा बेट किंवा आत्ताच्या जुने गोवे इथे हातकात्रा खांब नावाचा एक खांब आहे. सुरवातीच्या काळात धर्मांतराला विरोध करणारांचे इथे हात कापले जात. या सगळ्याला तत्कालीन राणी कातारीन हिचे प्रोत्साहन असे. एकामागुन एक फर्माने गोव्यात पोचत, आणि इथल्या व्हाईसरॉय व गव्हर्नर कडुन त्यांचे काटेकोरपणे पालन होई व त्यामुळे मिशनर्‍यांना जोर चढला होता.

परिणामस्वरुप गोव्याचा शांत हिंदू समाज क्रोधाविष्ट झाला. पण गोवा राज्याच्या भौगोलिक परिस्थितीमुळे, पोर्तुगीजांच्या बलवत्तर आरमारामुळे कोणीच जनतेच्या मदतीस येउ शकले नाहीत. तिसवाडी, बारदेश आणि सासष्टी वगळता इतर सर्व तालुके मराठ्यांच्या शासनाखाली होते, त्यामुळे ते अठराव्या शतकाच्या मध्यापर्यंत या अघोरी प्रकारांपासून बचावले.

हिंदुंनी आपल्या बायकामुलांना राज्याबाहेर पाठविले, व्यापार-दुकाने बंद ठेविली. शेतकर्‍यांनी भातशेतीतील बांध मोडून टाकले (चोडण बेटावर) जेणेकरुन नदीचे खारे पाणी शेतात शिरुन शेती नष्ट होईल व पोर्तुगीजांना उत्पन्न मिळणार नाही. पोर्तुगीजांनी ह्यावरही नेहमीप्रमाणे बळजबरी, इन्क्विजिशन वापरले व हे पहिले बंड मोडीत काढण्यात यश मिळविले.

हळूहळू त्यांनी आपले लक्ष ब्राह्मणांकडे जास्त वळवले, कारण ब्राह्मण हे लोकांस जागृत करीत. त्यांनी ब्राह्मणांचे वैचारिक व धार्मिक स्वातंत्र्य काढुन घेतले. ब्राह्मणांसाठी एक वेगळा कायदा काढण्यात आला. "कोणत्याही ब्राह्मणाने एखाद्या हिंदुला ख्रिश्चन होण्यापासुन परावृत्त केल्यास त्याला कैद करुन राजाच्या गलबतावर पाठविण्यात येईल व इस्टेट जप्त करुन सेंट थॉमसच्या कार्यार्थ वापरण्यात येईल."

गलबतावर पाठविण्याची शिक्षा कुणालाही नकोच असे. कारण गलबतावर पाठवणे म्हणजे गुलाम बनवुन गलबताच्या तळाशी वल्हविण्यास लावणे. गुलामांना साखळदंडांनी त्यांच्या जागी खिळवुन ठेवण्यात येत असे. कामात ढिलाई झाल्यास चाबकाचा फटकारा मिळत असे. कोणीही मेला अगर कामाला निरुपयोगी झाल्यास त्याला सरळ समुद्रात फेकुन देण्यात येत असे!!!

या काळात कित्येक सारस्वत ब्राह्मणकुटुंबानी महाराष्ट्र आणि कर्नाटकाचा रस्ता धरला. राजापूर आणि मंगलोरच्या आसपास अजूनही यांची गावे आहेत. त्यांच्या मूळ गावांची नावे काळाच्या ओघात विस्मृतीत गेली तरी, आपले कुलदैत कोण याची स्मृती त्यांनी एवढ्या शतकांनंतरही कायम ठेवली आहे. असंही म्हटलं जातं, की केंपे तालुक्यातून ब्राह्मण नामशेष झाले, त्यामुळे पर्तगाळी मठाच्या स्वामींनी काही क्षत्रियांना ब्राह्मण्याची दीक्षा देउन देवांची पूजा अर्चा चालू ठेवली.

दिवाडी बेट मूळचं दीपावती. इथे सप्तकोटेश्वराच देऊळ होतं, सुंदर तळी होती, वेदशास्त्रसंपन्न ब्राह्मण वस्ती होती. पोर्तुगीजांनी हे देऊळ उद्ध्वस्त केले. त्याआधी एकदा आदिलशाहीतही हे देऊळ उध्वस्त झाले होते. पण ते परत बांधण्यात हिंदूंना यश आले होते. जसे सोमनाथच्या सोमेश्वराचे हाल झाले तसेच दिवाडीच्या या सप्तकोटेश्वराचेही अनन्वित हाल झाले.

मूळात हे देउळ कदंबांच्या राजघराण्याचे कुलदैवत. प्रथम कदंबांनी त्यांच्या गोवापुरी या राजधानीत अंदाजे बाराव्या शतकात सप्तकोटेश्वराची स्थापना केली. इ. स. १३४६ साली हसन गंगू बहामनीने कदंबांचा पराभव केला आणि हे देऊळ धुळीला मिळवले. नंतर देवगिरीच्या यादवांनी बहामनी सुलतानाचा पराभव केला आणि दिवाडी बेटावर नव्याने देऊळ बांधले. इ. स. १५६० साली पोर्तुगीजांच्या टोळधाडीने एका दिवसात २८० देवळे पाडण्याचा "महापराक्रम" केला. त्यात या देवळाचा अग्रक्रम होता. मग देवळातील लिंग एका विहिरीची पायरी म्हणून लावण्यात आले. शेवटी छत्रपती शिवाजी महाराजानी या महादेवाचे दुर्दैवाचे दशावतार संपवले आणि इ.स. १६६८ साली नार्वे येथे भक्कम देऊळ बांधून देवाची पुनर्प्रतिष्ठापना केली. सप्तकोटेश्वराची ही हकीकत प्रातिनिधिक म्हणावी लागेल.

एवढे सगळे होऊनही ब्राह्मण धर्म बदलत नाहीत म्हणुन त्यांच्या मुलांना पळवून नेऊन त्यांचे हालहाल करु लागले. शेवटी तेही आई-बाप होते. मुलांचे हाल होऊ नये म्हणुन ख्रिस्तीधर्म स्वीकारणे त्यांच्या नशिबी आले. मग त्या पूर्ण कुटुंबाचे ख्रिस्तीकरण. अश्या १५०५ ब्राह्मणांचे ख्रिस्तीकरण झाले.

साष्टी

गोवेकर हिंदू, मिशनर्‍यांबद्दल द्वेषभावना बाळगीत. आणि त्याचा उद्रेक रायतुरच्या मिशनर्‍यांवर दगडफेक करण्यात झाला. पेरु माश्करेन्यस (मास्कारेन्हास) हा सासष्टीत गेलेला पहिला पाद्री (मिशनरी). गावकर्‍यांना त्याच्यापेक्षा त्याच्याबरोबर आलेल्या एका नवख्रिश्चनाचा जास्त राग होता. कुर्हा डीचा दांडा गोतास काळ ठरला होता तो. लोकांनी त्याचे तलवारीने तुकडे केले. हे पाहून तो मिशनरी त्याची मदत करणे वगैरे विसरुन पळून गेला. कुठ्ठाळलाही पेरु कुलासो नावाच्या मिशनर्‍यावर दगडाचा वर्षाव झाला पण त्याला त्याच्यासोबत असलेल्या नवख्रिश्चनांनी वाचविले.

इ. स. १५६६ साली मिशनर्‍यांना पराभव स्वीकारावा लागतोय हे पाहून व्हाईसरॉयने नवा हुकूम प्रसृत केला. "नवीन देऊळ बांधता कामा नये. जुन्या देवळांची डागडुजी व्हाईसरॉयच्या परवानगीशिवाय करु नये." डागडुजीच्या परवानग्या नाकारण्यात येऊ लागल्या. आणि म्हणूनच लोक आपल्या दैवतांच्या मूर्ती बैलगाडीत बसवून शेजारच्या राज्यात नेऊ लागले. देव गावात नसेल पण किमान बाटणार तरी नाही हीच भावना यामागे होती.

इ. स. १५६७ मधे लोटलीचा रामनाथ आणि आसपासच्या शेकडो देवळांचा विध्वंस करण्यात आला. वेर्णेची, म्हाडदोळ वाड्यावरच्या म्हाळसादेवीची देवराई नष्ट झाली, तिची तळी भ्रष्ट करण्यात आली, मूर्तीची अक्षरशः राख केली गेली. आणि देवळाचाही विध्वंस झाला (आज ह्या देवीचे मंदिर फोंडा तालुक्यातील म्हार्दोळ या गावी आहे). हे देऊळ सासष्टीतील सर्वात भव्य देऊळ होते. वेर्णेकरांची धर्मनिष्ठा इतकी जाज्वल्य की ते देवळाचे अवशेष जतन करुन त्यांना भजु लागले.

देऊळ पाडल्यानंतर त्यावेळच्या कायद्यानुसार देऊळ असलेली जमीन सरकारच्या मालकीची होत असे. मूळ देवळाची ती जागा परत मिळविण्याचा प्रयत्न वेर्णेच्या गावकर्‍यांनी केला. एका युरोपियनाशी त्यांनी संधान बांधले. त्याने ती जागा सरकारकडुन विकत घ्यावी व दुप्पट किमतीत एक वेर्णेकराला विकावी. मिशनरी व पोर्तुगीज सरकार यांच्या अमानुष छळाची टांगती तलवार डोक्यावर असताना हा प्रयत्न नक्कीच कौतुकास्पद होता.

पण व्हाईसरॉयला ह्याचा सुगावा लागला व ती जमीन हिंदूंना परत मिळू नये म्हणुन देवळाच्या ठिकाणी त्याने एक भव्य चर्च बांधुन घेतले व दोन क्रॉस उभारले. त्यातला एक क्रॉस चर्चच्या प्रवेशद्वारात व दुसरा तुळशीवृंदावनाच्या ठिकाणी बांधण्यात आला. हे तुळशीवृंदावन पुरुषभर उंचीचे होते.

आजच्या ओल्ड गोवा इथल्या जगप्रसिद्ध चर्चच्या जागी गोमंतेश्वराचे देऊळ होते, अशी लोकांची समजूत आहे. चर्चच्या भिंतींवर काही ठिकाणी हिंदू पद्धतीची नक्षी आहे. तर चर्चच्या आतमध्ये एक विहीरही होती, ती आता बुजविण्यात आली आहे. चर्चच्या सर्व भागात लोकांना प्रवेश दिला जात नाही, त्यामुळे या गोष्टींची सत्यता पडताळणे शक्य नाही. पण इथून अगदी जवळच, साधारण अर्धा कि.मी. अंतरावर, वायंगिणी इथे रस्त्याच्या कडेला एक अत्यंत सुबक असा नंदी आपल्या महादेवापासून दुरावून बसलेला आहे. लोकानी त्याच्या शिरावर एक घुमटी बांधून त्याला ऊन पावसापासून वाचवला आहे.

बारदेशातही असाच हैदोस घालण्यात येत होता. बारदेश हा तालुका एवढा मोट्ठा आहे की तिथल्या देवळांच्या संख्येचा फक्त अंदाजच लावू शकतो आपण. अश्या ह्या पावन बारदेशातल्या सर्व देवळांतील मूर्ती जुने गोवे येथे बिशपसमोर नेऊन त्यांचे हजार तुकडे करण्यात आले. देवळाच्या ठिकाणी चर्च बांधण्यात आले आणि देवळांचे उत्पन्न चर्चला देण्यात आले.

धर्मांतरे तर इतक्या प्रमाणात झाली की सोय नाही . गोव्यात 'जोस'वाडा नावाचा एक वाडा आहे. हा पूर्वीचा जोशीवाडा होता. असाच 'वझे'चा वाझ झाला. 'लक्षुबा'चा लुकश / लुकास झाला.

कुंकळ्ळीचा उठाव

आपला धार्मिक जाच कमी होण्यासाठी सासष्टीच्या हिंदूंनी सनदशीर मार्गाने प्रयत्न केले होते. पहिल्या धर्मसभेने लादलेली बंधने दुसर्‍या धर्मसभेने शिथिल करावी म्हणुन खूप खटपट केली. पण त्यांनी उलट जुनी बंधने अजून जाचक केलीच पण अजुन नवे कायदे आणले जसे की लग्नाच्या आधीचे विधी करु नये, नवरीला हळद लावू नये इत्यादी.

सासष्टीचे लोक तसे मानी. कुंकळ्ळीच्या गावकर्‍यांना हा अपमान सहन झाला नाही. त्यांनी सरकारी खंड भरायला बराच विलंब केला. रायतुरच्या किल्ल्यात जाणे बंद केले. गव्हर्नरने साष्टी प्रदेशातील वसुलीसाठी इश्तेव्हाव रुद्रीगीश (रॉड्रीगीज) या क्रूर अधिकार्‍याला पाठवले. तो खंडवसुलीसाठी कुंकळ्ळीत गेला व लोकांना त्रास देण्यास सुरवात केली. इथल्या प्रभुदेसाई फळ वगैरे लोकांनी त्याला व त्याच्या काही सहकार्‍यांना असोळणे येथे ठार केले.

कुंकळ्ळीची जनता सत्तेविरुद्ध उभी राहिली. त्यांनी आसपासच्या गावातील लोकांना आपल्या बाजूस वळविले व पोर्तुगीज ठाण्यांवर हल्ल्याचा सपाटा सुरु केला. सासष्टीतील सर्व भागात ख्रिश्चन लोक असुरक्षित झाले. सैनिकांच्या मदतीसाठी मिशनर्‍यांनाही सैनिकांचे काम करावे लागले.

हे बंड मोडुन काढण्यासाठी गव्हर्नरने एक पलटण पाठवली. या सैन्याने हिंदुंची नवीन बांधलेली देवळे मोडली, गावंच्या गावं जाळून भस्मसात केली आणि पुढार्‍यांना ठार केले. एवढे झाल्यानंतर त्या प्रदेशात शांतता प्रस्थापित झाली. लोकांनी राजाशी एकनिष्ठ राहण्याचे व सरकारला खंड भरण्याचे कबूल केले. पण धार्मिक आक्रमणाला विरोध करण्याचे त्यांनी मनाशी पक्के ठरविले होते. म्हणुन त्यांनी आपली देवळे पुन्हा उभारली व देवळातील सर्व धार्मिक उत्सव थाटामाटात साजरे करु लागले. जमिनीचे उत्पन्न जे पूर्वी देवळांस मिळत असे व गेल्या काही वर्षांत चर्चना देण्यात येई ते गावकर्‍यांनी पुन्हा देवळांना देण्यास सुरु केले. वसुलीस चर्चची माणसे आली तर त्यांस उत्तर मिळे "जशी तुम्हास चर्चेस तशी आम्हास देवळे. आम्ही त्यांस खंड देऊ." अशा तर्हेसने त्यांनी सरकारी नियम धाब्यावर बसविले.

हा उठाव सैन्याच्या वापराने काबूत आणण्यात आला

हे लोक जागरुक व लढवय्ये होते. त्यांनी मिशनर्‍यांस आपल्या गावात स्थिर होऊ दिले नाही. अनेकदा जाळपोळ होऊनही पोर्तुगीजांची पाठ फिरताच ते पुन्हा आपल्या गावात येऊन घरे व देवळांची पुनर्बांधणी करत.

एक अशीच घटना सांगावीशी वाटते.

कुंकळ्ळीत चर्च बांधण्याचा मिशनर्‍यांचा मानस होता. १५ जुलै १५८३ रोजी सकाळी पाद्रींनी मास म्हटला व कुंकळ्ळीकडे कूच केले. आसपासच्या नवख्रिस्तींनी त्यांच्यासाठी मंडप उभारला होता.

हिंदूंनी तातडीने ग्रामसभा बोलावुन पाद्री आले तर देवालये उद्ध्वस्त करण्याच्या दुष्कृत्याचे जनक म्हणुन त्यांच्यावर सूड उगवावा असे ठरले.

पाद्रींच्या जथ्याला गावचा १ प्रतिष्ठित हिंदू सामोरा गेला. अभिवादन करुन स्वागत केले व गावकरी जेवून भेटायला येतील व गावात आलेल्या 'संतांचा' यथोचित सत्कार करतील असे सांगितले. त्याच्या पाठोपाठ स्त्री-पुरुषांचा मोठा घोळका तिथे गेला. त्यात एक घाडी होता व तो वेड्यासारखे मोठमोठ्याने ओरडत होता. इतर लोक टेहळणी केल्यासारखे फिरत होते. घाडी एवढ्या जलद बोलत असे की ऐकणार्‍याला अर्थबोध होत नसे.

पाद्रींनी गावकर्‍यांची बरीच प्रतिक्षा केली पण कुणीच फिरकले नाही. मग त्यांनी आपले काम सुरु केले. एक चर्च बांधावे, एक क्रॉस उभारावा असे ते आपापसात बोलत होते. तेवढ्यात ज्याने पाद्रींचे स्वागत केले होते तो ऊठला व दोन काठ्या घेउन , एक उभी व दुसरी त्याच्यावर आडवी धरुन एका माडाच्या बुंध्याजवळ गेला व त्यावर धरुन म्हणाला इथे क्रॉस छान दिसेल नाही का?

ही खूण दिसताच घोळक्यातील लोक गायब झाले व घाडी मोठमोठ्याने ओरडून लोकांना जागवु लागला. जसजसा तो मोठमोठ्याने ओरडू लागला तसतसा त्याच्या ओरडण्याचा आशय पाद्रींना समजू लागला आणि त्यांच्या ऊरात धडकी भरली. त्यांनी पळून जायचे ठरवले पण त्यांना जाता येईना. कारण त्यांच्या जथ्यातील काही माणसे खाण्यापिण्याच्या वस्तू खरेदी करण्यासाठी बाजारात गेली होती. ती येईपर्यंत थांबणे त्यांना क्रमप्राप्त होते. ते लोक येईपर्यंत देवळाच्या बाजूने आरोळ्या उठल्या. लोकांचा जमाव भाले, तलवारी, धनुष्यबाण, दगड असं मिळेल ते शस्त्र हाती घेउन त्यांच्या दिशेने येत होता. "आमच्या प्रदेशाची शांतता भंग करणार्‍यांना, देवळे उद्ध्वस्त करणार्‍यांना मारून टाका, ठार करा" अशा आरोळ्या उठत होत्या.

आणि त्या पाद्रींचे देह जखमांनी विद्ध झाले. त्यांना ठार करण्यापुर्वी गावकर्‍यांनी त्यांना देवालयाभोवती दोनदा फरफटत फिरविले, नंतर देवासमोर उभे करुन नमस्कार करविला आणि मग आबालवृद्ध त्यांच्यावर तुटून पडले. मेल्यानंतर त्यांच्या रक्ताने देवाला अभिषेक घालण्यात आला.

सैन्याच्या जोरावर पोर्तुगीजांनी हे बंड मोडून काढले आणि मिळतील तेवढे लोक ख्रिश्चन करून टाकले. काही हिंदू जीव वाचवून पळाले आणि आदिलशाही मुलुखात आपापली दैवतं बरोबर घेऊन गेले. यानंतर गोव्यात स्थानिक लोकांकडून म्हणावा असा उठाव झाला नाही तो इ. स. १८५२ पर्य़ंत. याला कारण म्हणजे गोव्यात तिसवाडी, बारदेश आणि साष्टीवगळून उरलेल्या भागात आलेली मराठी सत्ता.

क्रमशः

**

विशेष सूचना - या लेखमालेचे स्वरूप एकंदरीतच ललित लेखनाच्या अंगाने जाणारे पण गोव्याच्या समृद्ध इतिहासाचे, आणि वर्तमानाचेही, दर्शन वाचकांना करून देणे एवढेच आहे. वाचकांना विनंती की त्यांनीही ते तेवढ्याच बेताने घ्यावे. आम्ही कोणीही इतिहासकार / इतिहासतज्ञ वगैरे नाही आहोत. पण थोडे फार वाचन करून, माहिती जमा करून इथे मांडण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे. तपशीलात अथवा आमच्या निष्कर्षात चूक / गल्लत असू शकते. पण काही चांगले लेखन यावे आणि गोव्याची रूढ कल्पना सोडून त्याहून वेगळा गोवा काय आहे हे लोकांना कळावे म्हणूनच हा सगळा लेखमालेचा उद्योग.

मंगळवार, २६ एप्रिल, २०११

डायरीच पान: २६ एप्रील २०११

काही दिवसांपुर्वी मला एका रिक्रुटिंग एजन्सीतुन फोन आला. ती पोरगी मला जाम पकवत होती.पण त्या पोरीला माझ्या सगळ्या डिटेल्स माहीत होत्या. मी तीला झापणारच होते एवढ्यात मेरे दिमाग की बत्ती जल गई.हिला कस बर कळल माझ्याबद्दल?ही व्यक्ती कोणी तरी ओळखीचीच असावी.पण तिने मला दाद लागु दिली नाही. अखेर थोड्या वेळाने म्हणाली "अग ओळखलीस का मला? मी प्रीती!!!"

मी दोन मिनिट स्तब्धच. अत्यानंदाने माझ्या लोंडुन शब्दच फुटेनात.माझ्या अनमोल रत्नहारातील एक हरवलेलं रत्न गवसल्याचा आनंद झाला होता मला. "अग ओळखलीस का मला? मी प्रीती!!!" हे तिचे शब्द सरळ १०-१२ वर्ष मागे घेउन गेले मला . " हॅलो, स्मिते अग ऐकतियेस ना?" " हं हं . *** ना ग तु? कशीयेस?......." मग बराच वेळ बोलुन आम्ही फोन ठेवला. खर आठवणीच्या जगातुन बाहेर यायच नव्हत मला. तिथेच रममाण झाले होते मी.माझ बालपण, माझे सवंगडी, मैत्रिणी, आमचा दंगा, मस्ती सगळ सगळ माझ्यासारखच तिनेही आठवणीत जपुन ठेवल होत. वडलांच्या बदलीमुळे दुरावलेली प्रीती मला पुन्हा गवसली होती.

मी व प्रीती अगदी "चड्डी-बड्डी"[सौजन्यः प्रीती]. सहावी पर्यंत एकत्र शिकलो. बाईंना वैताग आणला ;)
मी माझ्या आडनावाच्या विरुद्ध आहे अशी माझी प्रसिद्धी असली तरी प्रीतीसुद्धा काही कमी नव्हती. बडबड करण्यात मला सदैव टफ फाईट असायची तिची. हेहे. आम्ही दोघी वर्गात असलो की बाईंचा घसा ओरडुन दुखायचा पण आमची बडबड संपायची नाही.चुकुन माकुन एखाद दिवशी आम्ही दोघीही गैरहजर असलो तर बाई सुटकेचा नि:श्वास टाकत. आम्हा दोघींपैकी कुणालाही शोधायचे असल्यास, ज्या वर्गातुन अखंड बड्बड ऐकु येतेय ना, त्या वर्गात जा सापडतील, अश्या डायरेक्शन्स दिल्या जात !! पण एवढ्या बडबडीत अभ्याससुद्धा पुर्ण असत असे. आणि आमच्या बडबडीकडे लक्श देत असणार्‍या इतर लोकांना शिक्षा !!! .हीही आपली केमिस्ट्री कित्ती मस्त होती नै? तोंडुन बोलल नाही तरी तू इशारे समजत असस.
प्रीती सहावीनंतर तु शाळा सोडलीस.मला अन्य मित्र मैत्रिणी लाभले. पण तुझ्याएवढी जवळची कुणीच नाही ग. खूप मिस केल तुला. बर फोनचा सुकाळ नसल्याने ते माध्यमही नव्हत संपर्काच. आणि ढमे पत्ता तु दिलास नव्हता :x.

मधेच ९वीत असताना तु शाळेत आली होतीस आठवतय? मला बोलणच सुधरत नव्हत.डोळ्यातल पाणी बाहेर ओघळु न देता बोलण कठिण जात होत ग मला. तु आलीस नेहमीसारखी सर्वांना भेटलीस, बोललीस, आणि गेलीस सुद्धा परत!!!. मी मात्र शुंभासारखी बघतच राहिले. तुझा संपर्काचा पत्ताही घेतला नाही.:( पण घरी जाउन स्वतःला खूप कोसल होत मी. तिच्याशी बोललीस सुद्धा नाही . काय विचार करेल ती तुझ्याबद्दल? . पण मग जी तु गायबलीस ना, ती अश्शी गायबलीस की मला पत्ताच लागला नाही तुझा. खूप प्रयत्न केला तुला शोधायचा. पण नाही सापडलीस. मग तर मी आशाच सोडुन दिली. आणि मग शिक्षणावर लक्ष केंद्रित केल. मला वाटल तु कदाचित विसरुनही जाशील मला.

पण माझीच 'सुभद्रा' तू. शोधलसच मला. कित्ती खूश झाले मी हे शब्दात वर्णन करण अशक्य आहे. त्या दिवशीच्या कॉलनंतर तुला प्रत्यक्ष भेटायची जब्बरदस्त इच्छा होती. तु आजही माझी तीच सुभद्रा आहेस. तसुभरही फरक पडलेला नाहीये तुझ्यात. तश्शीच हसरी, मायाळु, बिनधास्त, अवखळ आणि तितकीच जबाबदार प्रीती!!

तु मला शोधल्याने मला अजुन एक रत्न परत मिळालय. Thanks ग!!!

आमचें गोंय- भाग ३ - पोर्तुगीज(राजकीय आक्रमण)
पोर्तुगिजांचा गोव्यात शिरकाव
व्हाश्कु द गामा (आंतरजालावरून साभार)

युरोपिय देशांमधे भारत तसा सुपरिचित होता. विशेषतः विजयनगर साम्राज्यामुळे आणि आशिया खंडातील सुवर्णभूमी म्हणून ओळखला जात असे. अश्या ह्या सुवर्णभूमीशी प्रत्यक्ष संबंध कोणत्या देशाला नको असतील? म्हणुन मग पोर्तुगालच्या राजाने भारतापर्यंत पोचणारी दर्यावर्दी वाट शोधण्यासाठी व्हाश्कु द गामा ह्याला पाठवले (इ. स. १४९८). व्हाश्कु द गामा भारतात यशस्वीरित्या पोचला. म्हणजे वाटेत मिळणार्‍या जहाजांची लूट, जाळपोळ, बायका मुले पळवणे, छोटे देश लुटणे, बाटवाबाटवी अशी यशस्वी कामे करत आला. कालिकतच्या राजाने आधी त्याचा सत्कार केला खरा पण नंतर त्यांचे बिनसले. १२ दिवस राहून तो परत गेला. जाण्यापुर्वी त्याने इथे एक वखार ही स्थापली. परत जाताना मलबारच्या हिंदुंना घेउन गेला, (आता तिकडे नेलं म्हणजे त्यांना ख्रिस्ती बनवणं हे तर ओघाने आलंच) आणि मग परत पाठवुन दिले. (ही पोर्तुगालच्या राजाची वसाहतविषयक धोरणांची नांदी होती.) तसाही, व्हाश्कु द गामा भारतात येण्यापुर्वीच, ख्रिस्ती धर्म बर्‍यापैकी पसरलेला होता.

यानंतर ज्या ज्या वेळेला पोर्तुगालची जहाजं / गलबतं भारतात आली ती वाटेत भेटणार्‍या यात्रेकरुंच्या गलबतांची लुटमार, जाळपोळ इ. केल्याशिवाय कधीच राहिली नाहीत.
व्हाश्कु द गामाचे जहाज (आंतरजालावरून साभार)


इ. स. १५०३ च्या ६ एप्रिलला पोर्तुगालच्या राजाने, अल्फान्सो दे आल्बुकर्क याला ४ गलबतांचा ताफा देउन भारताकडे पाठवले. कोचीननजिक किल्वा येथे उतरल्यावर त्याने तिथल्या राजाशी व्यापारासंबधी बोलणी तर केलीच पण तसा करार करताना त्याने एक मागणीही केली. पोर्तुगालतर्फे तिथे जो माणुस राहिल त्याच्याकडे तेथिल ख्रिश्चनांचे तंटे बखेडे सोडवण्याचे व न्याय देण्याचे काम सोपवावे. आधी राजा तयार झाला नाही; पण शेवटी त्याने ती मागणी मान्य केली. हा पोर्तुगालचा भारतातील पहिला व्हाइसरॉय. फ्रांसिस्कु दि आल्मेदा. ह्याची धोरणे व्यापारविषयक होती पण आल्बुकर्कची महत्वाकांक्षा सत्ता स्थापण्याची होती. पण त्याला तशी योग्य भूमी मिळत नव्हती.

ही संधी त्यांना मिळाली पण तेव्हा पोर्तुगीजांचा भारतात प्रवेश होउन ११ वर्षे लोटली होती.

गोमंतक ईस्लामी अधिपत्याखाली असताना गोमंतकीय जनतेस 'नायटे' लोकांचा फार त्रास होत असे. हे नायटे म्हणजे हिंदु स्त्रिया व मुसलमान पुरुष यांच्यापासुन झालेली मिश्र संतती. हे लोक फार क्रूर व धाडसी. चाचेगिरीत माहिर. भटकळ, होन्नावर ह्या बंदराजवळच्या भागात त्यांचे वास्तव्य असे. विजयनगर साम्राज्याचा राजा कृष्णदेवराय याला अरबस्तानातुन घोडे आणताना व्यत्यय आणल्याने त्याने त्यांचा नि:पात करायला एका मांडलिकास सांगितले. तर त्याने राजाचा हुकुम शब्दशः पाळला. जवळ जवळ दहा हजाराहून अधिक नायट्यांना ठार मारले. जे उरले सुरले नायटे बचावले त्यांनी गोव्याचा आश्रय घेतला व गोव्यातुन विजयनगर साम्राज्याला त्रास देणे सुरुच ठेवले. तर ह्या नायट्यांनी मुस्लिम राजवटीपासुन गोमांतकीयांना छळणे सुरु केले होते. त्यांना धडा शिकवावा व गोवा सोडून जाण्यास भाग पाडावे यासाठी वेर्णेच्या सरदेसायांनी त्यांच्यावर हल्ला केला व कित्येकांना मारुन टाकले. पण एवढे होउनही नायटे गोवा बेट सोडुन गेले नाहीत. तेव्हा सरदेसायांनी लोकांची तक्रार तिमोजा ह्या गोमंतकीय पण विजयनगरच्या वरिष्ठ अधिकार्‍यांच्या कानावर घातली. गोव्यावर हिंदु सत्ता स्थापन व्हावी व त्याचा सुभेदार आपण व्हावे असे तिमोजाला वाटत असे.

मग तिमोजाने होन्नावर येथे असलेल्या फ्रांसिस्कु आल्मेदा या पोर्तुगीज व्हाईसरॉय ची भेट घेतली व त्याची मदत मागितली. पुढे तिमोजा व आफोंसो दी आल्बुकर्क ची भेट झाली आणि गोव्यावर स्वारीचा बेत पक्का झाला. पोर्तुगिजांना व्यापार आणि द्रव्य पाहिजे तेवढे मिळाले की संतुष्ट होतील, गोमंतक पुन्हा विजयनगर साम्राज्याचा हिस्सा होईल व आपण सुभेदार बनू अशी तिमोजाची समजुत होती. याउलट येनकेण प्रकारेण हिंदुस्थानच्या पश्चिम किनार्‍यावर आपल्या सत्तेची भूमी असावी अशी आल्बुकर्कची ईच्छा होती. पण ती सफल होत नव्हती कारण हिंदुस्थानचे राजे भूमी हातची जाऊ न देण्याबाबत फार जागरूक होते. अशा समयी तिमोजाची कल्पना त्याच्यासाठी खूप मोट्ठी संधी होती.

हा कट शिजत असतानाच गोव्यावर राज्य करणार्‍या आदिलशहाचा मृत्यु झाला व त्याचा मुलगा ईस्माईल गादीवर बसला. आणि गोव्यात त्यांचे केवळ २०० सैनिक होते. ही संधी साधुन आल्बुकर्क ने गोव्यावर स्वारी केली व तिसवाडी सर केली. पोर्तुगीजांनी गोवा जिंकण्यापुर्वी, गोव्यावर हिंदुंचे स्वामित्व होते. इस १३५२-१३६६ व १४७२-१५१० या काळात तेवढी मुसलमानी सत्ता होती. मुसलमानी सत्ता नको म्हणुन तिमोजाने व गोमंतकीय हिंदु लढवय्यांनी आल्बुकर्कला मुक्तपणे साह्य केले.

पण झाले भलतेच.

--------------

गोवा जिंकल्यानंतर

अफोंसो द आल्बुकर्क (आंतरजालावरून साभार)

आल्बुकर्क शूर होता, तसाच धूर्त मुत्सद्दी होता. गोवा बेट जिंकल्यावर त्याने दवंडी पिटुन प्रजेस धार्मिक स्वातंत्र्य जाहीर केले. सतीची प्रथा बंद केली. पण हा त्याचा मतलबीपणा होता. त्याला पोर्तुगीज सत्ता गोव्यात स्थापायची होती. त्यासाठी पोर्तुगीज संस्कृती येथे रुजणे महत्वाचे होते. याच उद्देशाने त्याने पोर्तुगीज पुरुषांस ठार झालेल्या मुसलमानांच्या विधवांशी विवाह करण्यास प्रोत्साहन दिले. त्यांना घोडा, घर, गुरे, जमीन दिली. गोवा बेटाचे ख्रिस्तीकरण करण्याच्या मार्गात आणि ख्रिस्ती प्रजेचा विकासच्या मार्गात स्थानिक लोकांची अडगळ आल्बुकर्कला वाटली. आणि प्रसंगी त्यांना गोव्याबाहेर हाकलण्याची तयारीही होती.

आता सत्ता स्थापन झाली म्हणजे बाटवाबाटवी ,लुटालुट व त्यासाठी जनतेचा अमानुष छळ वगैरे सगळं राजरोस सुरू झालं. १ एप्रिल १५१२ ला पोर्तुगालचा राजा दों मानुएल याला लिहिलेल्या पत्रात तो म्हणतो की काही ब्राह्मणांनी व नाईकबारींनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला!!!! हे काही सुखासुखी झालं नसेल....

गोमंतकात पहिले चर्च भाणस्तारच्या किल्ल्यात बांधले गेले. त्याला नाव दिले सेंट कॅथरिन चर्च कारण ज्या दिवशी गोवा जिंकला तो दिवस सेंट कॅथरिनचा होता. दुसरे चर्च जुने गोवे (Old Goa) इथे उभारण्यात आले. हे चर्च, गोवा जिंकताना झालेल्या लढाईत ज्या स्थानावरुन मुसलमान सैन्याने पळ काढला, त्या ठिकाणी बांधण्यात आले.

आल्बुकर्कच्या गोव्यात पोर्तुगीज रक्ताची केंद्रे वाढवणे व ख्रिस्ती धर्मप्रसार यांच्या हव्यासामुळे स्त्रिया व कुमारिकांची स्थिती अत्यंत दयनिय झाली होती. एकाही मुस्लिम पुरुषाला जिवंत राहु दिले नव्हते. मग तो सैनिक असो वा साधा नागरिक!!! त्यांच्या घरच्या विधवा स्त्रिया, कुमारिका यांना कैदेत ठेवण्यात आले होते. जे कोणी पोर्तुगीज पुरुष त्यांच्याशी लग्नास राजी होत त्यांना त्या स्त्रिया पत्नी म्हणुन दिल्या जात. शिवाय घर, पैसे, कपडे, जमीनही मिळे. इतर स्त्रिया गुलाम म्हणुन जीवन कंठीत. काहींना तर पोर्तुगालला पाठवण्यात आले होते.

ईस्माईल आदिलशहाने गोवा जिंकण्याचे दोन प्रयत्न इ. स. १५१६ व इ. स. १५२० मधे केले पण त्याचा दारुण पराभव झाला आणि सासष्टी, बारदेश व अंत्रुज (आताचे फोंडा) हे तीन महाल (तालुके) त्याला पोर्तुगीजांना द्यावे लागले. आणि या विजयाने आल्बुकर्कचा आत्मविश्वास वाढला व त्याची खात्री झाली आता त्याची गोव्यातील सत्ता अबाधित आहे. आणि त्याने जोमाने ख्रिस्ती धर्मप्रचाराला सुरुवात केली.

इ. स. १५३० साली पोर्तुगालचा राजा दीं ज्युआव याने मिंगेल व्हाज नावाच्या धर्मोपदेशकास गोव्याचा धर्माधिकारी म्हणुन पाठविले. आणि धर्मांतरे सुरु झाली. हा राजा त्यावेळी केवळ १९ वर्षांचा होता.

याच सुमारास गोव्यात कॅथॉलिक बिशपची गादी स्थापन करण्यात आली.

क्रमशः

**

विशेष सूचना - या लेखमालेचे स्वरूप एकंदरीतच ललित लेखनाच्या अंगाने जाणारे पण गोव्याच्या समृद्ध इतिहासाचे, आणि वर्तमानाचेही, दर्शन वाचकांना करून देणे एवढेच आहे. वाचकांना विनंती की त्यांनीही ते तेवढ्याच बेताने घ्यावे. आम्ही कोणीही इतिहासकार / इतिहासतज्ञ वगैरे नाही आहोत. पण थोडे फार वाचन करून, माहिती जमा करून इथे मांडण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे. तपशीलात अथवा आमच्या निष्कर्षात चूक / गल्लत असू शकते. पण काही चांगले लेखन यावे आणि गोव्याची रूढ कल्पना सोडून त्याहून वेगळा गोवा काय आहे हे लोकांना कळावे म्हणूनच हा सगळा लेखमालेचा उद्योग.


- टीम गोवा

शुक्रवार, २२ एप्रिल, २०११

माका वाटता माज्या लग्नाचो विचार

आता ह्यां गाणा बगा .. सोप्प्यां आसा . बगा जमतलाच तुमका हेची माका ग्यारेंटी आसा.


चेडु: माका वाटता माज्या लग्नाचो विचार मनात येयला
म्हणानच आईन माज्या तुका चायेक बोलयला

चेडो: काय म्हटलय? परतुन एकदा सांगशीत काय

चेडु: माका वाटता माज्या लग्नाचो विचार मनात येयला
म्हणानच आईन माज्या तुका चायेक बोलयला

चेडो :पक्षी एकटो बघुन माका ह्या जाळां पसरवलां
म्हणानच आईन तुज्या माका चायेक बोलयला
काय,हय मा?

चेडु
: नाय नाय
( तु चारांच्या ठोक्यार घराकडे ये
माजो हात मागान घे, लजा नको ) -२

चेडो: सात फेरे माज्या बरोबर , सपना बगतस ..
कडकडीत उन्तात तारे बघतस
नाय गो बाये .. माका चाय प्येवची नाय

चेडुं : कित्याक? -२

चेडो: अगे माजे बाये माका माफ करुन टाक

चेडुं: अश्याच तुज्या वागण्यामुळे हाय माझा मन तुज्यावर येयला
म्हणानच आईन माज्या तुका चायेक बोलयला

चेडो: नाय ना नाय ना
पक्षी एकटो बघुन माका ह्या जाळां पसरवलां
म्हणानच आईन तुज्या माका चायेक बोलयला

चेडु
: ( मस्करी करु नको, सताव नको माका सजणा
गप्चिप हय म्हण ,तुका शपथ माझी , घरा चलना)-२

चेडो: प्राणप्रिये मान्य आसा मी तुज्यावर जीव ओवाळतंय
प्रेम बिम बरा आसा, लग्नाच्या नावान चळचळा कापतंय
लग्नाआधी सगळांच बरा वाटता
मगे सगळो जलम रडुचा लागता

चेडुं: अश्याच तुज्या वागण्यामुळे हाय माझा मन तुज्यावर येयला
म्हणानच आईन माज्या तुका चायेक बोलयला

चेडो :पक्षी एकटो बघुन माका ह्या जाळां पसरवलां
म्हणानच आईन तुज्या माका चायेक बोलयला

चेडु: तुका माझी शप्पत , येतलस मां?

चेडो
: नाय अज्जीबात येवचंय ना
हय गो , तुजी शप्पत येतलंय


बगलात कळ्ळां मा कोन्ता गाना तां?

ह्या बगा
लताबाई आनी किशोर कुमार ह्येन्नी गायलेला सौतने सिनेमातला शायद मेरी शादीका खयाल ह्या गाणां

लडकी:शायद मेरी शादी का खयाल दिल में आया है
इसीलिये मम्मी ने मेरी तुम्हे चाय पे बुलाया है

लडका:क्या कहा? फिरसे दोहराओ ना

लडकी:शायद मेरी शादी का खयाल दिल में आया है
इसीलिये मम्मी ने मेरी तुम्हे चाय पे बुलाया है

लडका: पंछी अकेला देख मुझे जाल बिछाया है
इसिलिये मम्मीने तेरी मुझे चाय पे बुलाया है
क्यों, है ना?
लडकी: नहीं- नहीं
( तुम ठीक चार बजे घर चले आना
मेरा हाथ मांग लेना, जरा न शरमाना)-२

लडका: सात फेरे संग मेरे सपने देख रही हो
खिली हुइ धूप में तारे देख रही हो
अरे नहीं बाबा चाय नही पिना

लडकी: इन्हीं अदाओं पर तो हाय अपना दिल आया है
इसीलिये मम्मी ने मेरी तुम्हे चाय पे बुलाया है

लडका: ना ना ना ना
पंछी अकेला देख मुझे जाल बिछाया है
इसिलिये मम्मीने तेरी मुझे चाय पे बुलाया है

लडकी:(दिल्लगी ना करो छेडो मत हमको सनम
हां करदो घर चलो तुमको मेरी कसम )-२
लडका: जान-ए-मन माना हम तुमपे मरते हैं
प्यार तो ठीक है शादी से डरते हैं
शादी से पहले सब अच्छा लगता है
सारी उम्रभर फिर रोना पडता है

लडकी: इन्हीं अदाओं पर तो हाय अपना दिल आया है
इसीलिये मम्मी ने मेरी तुम्हे चाय पे बुलाया है

लडका:पंछी अकेला देख मुझे जाल बिछाया है
इसिलिये मम्मीने तेरी मुझे चाय पे बुलाया है

लडकी: तुम्हें मेरी कसम आओगे ना?

लडका: नहीं बिलकुल नहीं
हां तेरी कसम आऊंगा

गुरुवार, २१ एप्रिल, २०११

काळीज कित्याक हे माजे बोबाट मारता ....

उंहुंहुं उहुं हुं उंहुंहुं उहुं हुं
काळीज कित्याक हे माजे बोबाट मारता
काळीज कित्याक हे माजे बोबाट मारता
इंगा ना , तिंगा ना, तुजाचकोडेन चलता

काळीज कित्याक हे माजे बोबाट मारता
इंगा ना , तिंगा ना, तुजाचकोडेन चलता
उंहुंहुं , ए हेहे , आहाहा ओहोहो


थोड्याच वेळान हें कितें जालें
नजरो मेळतकच , खंय शेणलें

थोड्याच वेळान हें कितें जालें
नजरो मेळतकच , खंय शेणलें

गर्दीन आसातें थंय ते लोकांच्या
आनी कितलो एकुलयो हांव फेस्तान मोगाच्या

काळीज कित्याक हे माजे बोबाट मारता
काळीज कित्याक हे माजे बोबाट मारता
इंगा ना , तिंगा ना, तुजाचकोडेन चलता


उंहुंहुं , ए हेहे , आहाहा ओहोहो

कॉमेस जाली काणी म्हजी
माज्या काळजान आयकूना गजाल माजी

कॉमेस जाली काणी म्हजी
माज्या काळजान आयकूना गजाल माजी

शीम पार करुन गेलें
आपुणुय बेजार जालें आनी म्हाकाय करुन गेलें

काळीज कित्याक हे माजे बोबाट मारता
काळीज कित्याक हे माजे बोबाट मारता
इंगा ना , तिंगा ना, तुजाचकोडेन चलता


वळकलें खंचे गाणे गुणगुणतां हांव ? वळखले जाल्यार सागांत पळोवया :)

मंगळवार, १९ एप्रिल, २०११

आमचे गोंय - भाग २ - मध्ययुग व मुसलमानी सत्ताइ. स. ९६० मध्ये हळसी चा कदंब राजा कंटकाचार्य याने शिलाहार राजा भीम याच्याकडून गोवा जिंकून घेतला. पण शिलाहारांनी त्याच्याकडून गोवा परत जिंकून घेतला. कंटकाचार्य ऊर्फ षष्ट्यदेव याची पत्नी कुंडलादेवी ही कल्याणी चालुक्यांची कन्या. आणखी साधारण २० वर्षानी षष्ट्यदेवाने अपल्या सासर्‍याचीच मदत घेऊन शिलाहारांना पराभूत केले. आणि याच सुमारास राष्ट्रकूटांचा पराभव करून कल्याणी चालुक्य कुळातील राजा जयसिंह दुसरा याची सत्ता सप्तकोकणात प्रस्थापित झाली. चालुक्यांचा मांडलिक म्हणून षष्ट्यदेव चंद्रपूर येथून दक्षिण कोकण आणि गोव्याचा कारभार पाहू लागला. भोज राजांचा काळ गोव्याच्या इतिहासात सुवर्णयुग मानला जातो, तसाच कदंब राजवटीचा सुमारे ४०० वर्षांचा हा काळ गोव्याच्या इतिहासात दुसरे सुवर्णयुग म्हणून नोंदला गेला.

कदंबांना 'कदंब' हे नाव कसं मिळालं यामागे एक कथा आहे. यांचा एक पूर्वज 'मुकण्णा' हा इ. स. च्या चौथ्या शतकात, सौंदत्ती इथे कदंब वृक्षाच्या तळी बसून तपश्चर्या करत होता, तेव्हा त्याला त्रिलोचन हरिहराचा दृष्टान्त झाला. इथून या घराण्याचे नाव कदंब असे पडले. म्हणूनच कदाचित, कदंब राजे शिवभक्त होते. कदंब राजवंशाची स्थापना 'मयूरवर्मा' या दक्षिण पल्लवांच्या अमात्याने केली असं मानलं जातं. काही काळाने त्याने पल्लवांची नोकरी सोडून हल्याळ, शिर्सी, कुमठा, कद्रा या प्रदेशात आपले स्वतंत्र राज्य स्थापन केले. काही इतिहासकारांच्या मते त्याचं मूळ नाव मयूरशर्मा असं होतं आणि राज्य स्थापन करताना क्षत्रियोचित असं मयूरवर्मा हे नाव त्याने घेतलं. काही इतिहासकारांच्या मते हे घराणं नागवंशातलं होतं, तर काही त्यांना मौर्यांचे संबंधित मानतात. काही इतिहासकार त्याना यदुवंशातलेही मानतात!

कदंब राजांची सत्ता मुळात कर्नाटकातील कुंतल प्रदेशातली. तिथे त्यांचं राजचिन्ह "हनुमान" हे होतं. गोव्यात येताच त्यानी आपलं राजचिन्ह बदलून "सिंह" हे केलं. याचं कारण म्हणजे गोव्यातील कुशवनात (आताचा केंपे तालुका) तेव्हा सिंह भरपूर प्रमाणात होते. तसंच कदंब राजे स्वतःला सिंहाप्रमाणे शूर समजत असत. गोव्याच्या स्वातंत्र्यानंतर मगो पक्षाने याच सिंहाला आपल्या पक्षाची निशाणी म्हणून स्वीकारलं, तर बसवाहतूक करणार्‍या सरकारी 'कदंब परिवहन मंडळाने' कदंबांच्या नावाबरोबर त्यांचं बोधचिन्ह 'सिंह' याचाही स्वीकार केला.

शिलाहारांच्या काळात समुद्रमार्गे होणारा व्यापार अरबांच्या हातात होता. तिसवाडी बेटवर त्यांची 'हंजमाननगर' नावाची मोठी व्यापारी वसाहत होती. त्यांना शिलाहारांनी बर्‍याच बाबतीत स्वायत्तता दिली होती. षष्ट्यदेवाचा मुलगा, कदंब राजा गुहलदेव याने या अरब व्यापार्‍यांबरोबर आपल्याला फायदेशीर होईल अशा प्रकारचा करार केला. गुहलदेवाचा मुलगा षष्ट्यदेव (दुसरा) याच्या काळात गोव्यात कदंबांची सत्ता स्थिर झाली. त्याने गोव्यावर इ.स. १००५ ते इ.स. १०५० एवढा काळ राज्य केलं. त्याच्यानंतर गोव्यात त्याचे २ मुलगे जयकेशी (पहिला) आणि वीरवर्मादेव यानी राज्य केलं. पहिल्या जयकेशीच्या काळातली महत्त्वाची घटना म्हणजे इ.स. १०५४ साली गोव्याची राजधानी 'चंद्रपूर' इथून हलवून 'गोवापुरी' (गोपकपट्टण) म्हणजे आताचं गोवा वेल्हा (थोरले गोवे) इथे गेली. याचं कारण म्हणजे कुशावती नदीचं पात्र गाळाने भरून अरुंद झालं होतं आणि तिथून गलबताना ये-जा करायला त्रास होत होता. तसंच पहिल्या जयकेशीने इ.स. १०६०-६५ च्या दरम्यान उत्तर कोकणावर स्वारी करून आपल्या राज्याचा विस्तार केला.

जयकेशीचा मुलगा गुहलदेव (दुसरा) याने राजधानी परत चंद्रपूर इथे नेली ती इ.स. १०८१ मध्ये. इ.स. १०८१ ते इ.स. ११२६ पर्यंत परत चंद्रपूर हीच गोव्याची राजधानी होती. पण गोपकपट्टण इथे कदंबांचे सामंत कारभार पाहत असत. मध्येच इ.स. १०९५ साली कोकण शिलाहार राजा अनंतपाल याने गोव्यावर हल्ला करून गुहलदेवाचा पराभव केला. गुहलदेव पळून हाळसी (खानापूर) इथे गेला, तो इ.स. ११०६ मध्ये परतला. त्याच्यानंतर त्याचा मुलगा जयकेशी (दुसरा) राज्यावर आला. त्याने आपल्या राज्याचा विस्तार पूर्ण कोकण, गोवा, धारवाड, बेळगाव, हुबळी आणि हनगल प्रांत एवढा वाढवला. इ.स. ११३८ मध्ये विक्रमादित्य चालुक्याच्या मृत्युनंतर दुसर्‍या जयकेशीने चालुक्यांचं मांडलिकत्व झुगारून दिलं. यामुळे रागावून चालुक्य राजा तिसरा सोमेश्वर याने 'अच्चुगी' नावाच्या सेनापतीला गोव्यावर स्वारी करायला सांगितलं. त्याने गोपकपट्टण जाळून भस्म केले. पण यानंतर जयकेशीने ते पूर्ववत उभे केले आणि करवीर (कोल्हापूर) वेळूग्राम (बेळगाव) हे प्रांत आपल्या राज्याला जोडले. बळंबर(हैद्राबाद)चे शिंदे, बैलहोंगलचे कदंब यांचा पराभव करून जयकेशी कोकण चक्रवर्ती बनला.
जयकेशीनंतर त्याचा मुलगा शिवचित्त परमदेव हा राजा झाला. शिवचित्त परमदेवाच्या कारकीर्दीत गोपकपट्टण इथे सप्तकोटेश्वराचे देऊळ बांधण्यात आलं. तसंच तांबडी सुर्ला इथलं महादेव मंदिर याच काळातलं आहे. या राजाची पत्नी 'कमलादेवी' ही गोव्याच्या इतिहासात प्रसिद्ध आहे. ती अतिशय धार्मिक आणि कर्तबगार होती. या कमलादेवीने स्त्रियांसाठी एक खास न्यायालय स्थापन केल्याचा उल्लेख इतिहासात सापडतो.यानंतर कदंबांच्या वंशात विष्णुचित्त विजयादित्य, तिसरा जयकेशी, वज्रदेव, स्वयंदेव आणि षष्ट्यदेव तिसरा हे राजे होऊन गेले. यापैकी काहींनी हाळशी, तर काहींनी गोपकपट्टण/चंद्रपूर इथून कारभार चालवला. कदंब राजानी दिलेले अनेक ताम्रपट अजून अनेक ठिकाणी पहायला मिळतात. त्यांनी गोव्यातल्या देवळांना उत्पन्नासाठी जमिनी दिल्या. गद्याण आणि डाक्मा ही सोन्याची नाणी काढली. कदंबपूर्व काळात देवळांमधे पूजाअर्चा स्थानिक लोक करत असत. कदंब राजांनी पंच द्रविड ब्राह्मणाना गोव्यात आणून वसवले आणि त्याना देवळांमध्ये पूजा करायला अधिकार दिले. हे 'जोशी' नावाचे ब्राह्मण होते आणि आर्यादुर्गा ही त्यांची कुलदेवता. अशा ब्राह्मणांसाठी कदंब राजांनी अनेक अग्रहार उभारले. गरीबांसाठी अनाथाश्रम उभारले. गोपकपट्टण इथे विद्यादानाचे केंद्र उभारले.
कदंबांचं राज्य उत्तर तसेच दक्षिण कोकणात पसरलेलं होतं. गोपकपट्टण हे महत्त्वाचं बंदर होतं. तिथून मोठ्या प्रमाणात व्यापार व्हायचा. सुपे, हल्याळ, बेळगावकडून चोर्लाघाट आणि रामघाटातून गोव्यात माल यायचा, आणि गोवळकोंड्याहून हिरे निर्यात करण्यासाठी यायचे, ते याच मार्गाने. तसंच परदेशातून अरबी घोडे यायचे, ते याच मार्गाने घाटावर नेले जायचे. या रस्त्यातलं मुख्य जकात केंद्र मणिग्राम म्हणजेच आमोणा हे होतं. योग्य जकात गोळा करून सरकारी खजिन्यात जमा करणारे त्या काळातले तज्ञ दलाल घराणे कदंब राजांनीच कर्नाटकातून गोव्यात केंपे इथे आणून वसवले.

तिसर्‍या षष्ट्यदेवाच्या कारकीर्दीत देवगिरीच्या कण्णर यादवाने गोव्यावर हल्ले सुरू केले. तसेच होन्नावरच्या नवाबाने आरमारी हल्ले सुरू केले. या आरमाराच नेतृत्व इब्न बतूताने केलं असा उल्लेख आहे. षष्ट्यदेवाचा मेहुणा कामदेव याने एकदा यादवांचा पराभव करून गोव्याचे राज्य षष्ट्यदेवाच्या हवाली केले. पण त्याला ते सांभाळता आलं नाही. होन्नावरच्या सैन्याने हिंदूंची अंदाधुंद कत्तल केली आणि हे यादवांच्या आदेशावरून केलं अशी मल्लीनाथी केली. उत्तर गोव्याचा भाग यादवांच्या ताब्यात गेला. पण त्यांचं राज्य नंतर लवकरच लयाला गेलं. इ.स. १३०७-०८ मधे अल्लाउद्दिन खिलजीने आपला दख्खनचा सुभेदार मलिक काफूर याला प्रचंड सैन्यानिशी दक्षिणेत पाठवले. त्याने इ.स. १३१० साली हरपालदेव या रामदेवराय यादवाच्या जावयाचा पराभव करून देवगिरीचे राज्य धुळीला मिळवले. मग त्याची वक्रदृष्टी गोव्याच्या दिशेने वळली. त्याने इ.स. १३१५ मधे गोपकपट्टणचा सत्यानाश केला. सप्तकोटेश्वराचे देऊळ उद्ध्वस्त करून अमाप संपत्ती लुटली. सप्तकोटेश्वराचे लिंग लोकानी शेतात लपवले आणि नंतर दिवाडी बेटावर नेऊन तिथे एक लहान देऊळ बांधले. इ.स. १३२० मधे वेळ्ळी आणि रामाचे भूशिर इथले सेतुबंधेश्वराचे देऊळ धुळीला मिळवले. हिंदूंच्या कत्तली केल्या. अनन्वित अत्याचार केले. यातून जीव वाचवून षष्ट्यदेवाचा वारसदार वीरवर्मा याने राजधानी परत चंद्रपूर इथे हलवली आणि इ.स. १३२४ ते इ.स. १३४६ कसाबसा राज्यकारभार चालवला.


दरम्यान, महमद तुघलकाने इ.स. १३४४ साली चंद्रपूरवर हला चढवून अमाप धन लुटून नेले. पुन्हा इ.स. १३४६ मधे जमालुद्दिनने चंद्रपूरवर हल्ला केला. चंद्रेश्वराच्या देवळाची वीट न वीट मोडून टाकली. तिथल्या मोठ्या नंदीचे शिर उडवले. अजून हा भग्न नंदी देवळाच्या अवशेषांसकट पहायला मिळतो. त्याच्या सैनिकांनी स्त्रियांवर अत्याचार केले. मग तुघलकाने जबरदस्तीने या स्त्रियांची लग्ने आपल्या सैनिकांबरोबर लावून दिली. त्यांची संतती म्हणजे "नायटे". राजा वीरवर्माला हाल होऊन मरण आले. त्याच्या वंशातील स्त्रियानी आपले अलंकार कुशावती नदीत टाकून दिले. सोने नाणे उधळून दिले आणि "अत्याचार करणार्‍यांचा सत्यानाश होवो," असा आक्रोश करत कुशावती नदीत ठाव घेतला. त्यानी चंद्रेश्वराच्या द्वारात आक्रोश करताना पाय आपटले त्याच्या खुणा पायर्‍यांवर उमटल्या अशी लोककथा आहे. इथे कदंबांचे वैभवशाली राज्य लयाला गेले, त्याचबरोबर चंद्रपूर राजधानीचाही अंत झाला. आज हे एक लहान गाव आहे. गावात हिंदू वस्ती जवळ जवळ नाही. आम्ही नंदीच्या शोधात गेलो तेव्हा बरोबर रस्ता सांगणारा भेटला त्यापूर्वी दहा जणाना विचारावं लागलं!

१३४६ मधे गोव्यात हसन गंगू बहामनीची सत्ता सुरू झाली. पण यापूर्वीच १३३६ मधे विजयनगरच्या साम्राज्याची सुरुवात हरिहर आणि बुक्करायाने विद्यारण्यांच्या आशीर्वादाने केली होती आणि सगळ्या दक्षिण भारतात आपल्या राज्याचा विस्तार सुरू केला होता. त्यांचा मंत्री, माधव याने इ.स. १३७८ मधे गोव्यात आपली सत्ता स्थिर केली आणि गोवा विजयनगर साम्राज्याचा भाग बनला. आतापर्यंत सप्तकोटेश्वराचे देऊळ ही गोव्यातल्या राज्यकर्त्यांची खूण बनली होती. या माधव मंत्र्याने हसन गंगू बहामनीने पाडलेले दिवाडी बेटावरचे सप्तकोटेश्वराचे देऊळ परत उभे केले. माधव मंत्र्यानंतर गोव्यात विजयनगरच्या साम्राज्याच्या सौंदे या शैव लिंगायत सुभेदारानी राज्यकारभार केला. त्यांचे वंशज इ.स. १७४५ पर्यंत कधी पोर्तुगीजांचे आश्रित तर कधी मराठ्यांचे आश्रित म्हणून गोव्यात टिकून होते.

इ.स. १४७१च्या फेब्रुवारीमधे महमूद गवनने तिसवाडी बेट जिंकले, आणि त्याचा सुभेदार किश्वरखान गोव्याचा कारभार पाहू लागला. इ.स. १४७२ मधे बेळगावच्या राजाने गोवा जिंकून घ्यायचा एक अयशस्वी प्रयत्न केला. त्यानंतर गोव्याचा सुभेदार गिलानी याने बंड केलं आणि इ.स. १५०१ मधे गोवा बेट आदिलशहाच्या ताब्यात आलं. गोवापुरीतल्या एका मंदिराचा विनाश करून आदिलशहाने आपला राजवाडा बांधला. त्याचं प्रवेशद्वार अजून आपल्याला जुने गोवे इथे पहायला मिळतं. आदिलशहाच्या काळात फोंडा इथे आदिलशाही मशीद बांधली असं म्हणतात. ही मशीद एखाद्या देवळासारखी दिसते. तशीच काळवत्री दगडांची. समोर दीपमाळेचे असावेत असे वाटणारे पडके खांब आहेत. बाजूला एक सुंदर दगडी बांधणीचा तलाव आहे आणि एक विशाल वटवृक्ष आहे. मशिदीच्या भिंतीत आणि तलावात महिरपी आहेत. प्रथम बघताना ते एखादं देऊळ असावं असंच मला वाटलं होतं. पण तसा, म्हणजे देवळाच्या जागी मशीद केल्याचा कुठेही उल्लेख नसल्यामुळे मी मनातली शंका मनात ठेवली!


इ.स. १४९८ मध्ये गोव्यावर दूरगामी परिणाम करणारी घटना कालिकतला घडली होती, वास्को द गामाने भारताच्या भूमीवर पाऊल ठेवले होते. आणि संपूर्ण भारत जिंकून घेण्याची स्वप्नं बघायला पोर्तुगीजांचा पहिला गव्हर्नर अफोन्सो डी अल्बुकर्क याने सुरुवात केली होती ती इ.स. १५०३ पासून.

क्रमशः

**

विशेष सूचना - या लेखमालेचे स्वरूप एकंदरीतच ललित लेखनाच्या अंगाने जाणारे पण गोव्याच्या समृद्ध इतिहासाचे, आणि वर्तमानाचेही, दर्शन वाचकांना करून देणे एवढेच आहे. वाचकांना विनंती की त्यांनीही ते तेवढ्याच बेताने घ्यावे. आम्ही कोणीही इतिहासकार / इतिहासतज्ञ वगैरे नाही आहोत. पण थोडे फार वाचन करून, माहिती जमा करून इथे मांडण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे. तपशीलात अथवा आमच्या निष्कर्षात चूक / गल्लत असू शकते. पण काही चांगले लेखन यावे आणि गोव्याची रूढ कल्पना सोडून त्याहून वेगळा गोवा काय आहे हे लोकांना कळावे म्हणूनच हा सगळा लेखमालेचा उद्योग.

मायबोली , मिसळपाव व मीमराठी वर टीम गोवा या नावाने पूर्वप्रकाशितगुरुवार, १४ एप्रिल, २०११

आमचे गोंय - भाग १ - प्राचीन इतिहास


कोकणीत गोवा म्हणजे गोंय.

ऐतिहासिक काळात गोव्याला अपरान्त, गोमंतक, गोवापुरी, गोपकपट्टण, गोवाराष्ट्र अशी नावे दिलेली आढळतात. तर अरबी व्यापारी या प्रदेशाला 'सिंदाबुर' या नावाने ओळखत असत. यापैकी अपरान्त हे नाव सर्व कोकणाला दिलेले आहे. तर 'गोमंतक' म्हणजे 'गायींनी भरलेला' असा अर्थ आहे. जरासंधाबरोबरच्या लढायांमधून जरा उसंत घ्यावी म्हणून कृष्ण आणि बलराम गोव्यात आले होते, ही कथा प्रचलित आहे. आपल्या मुलांच्या विरहाने दु:खी होऊन देवकीमाता त्यांच्यामागोमाग गोव्यात आली, आणि तिला पान्हा फुटला. तोच दूधसागर धबधबा अशी कथा गोव्यात सांगितली जाते. या आई मुलांची भेट झाली तिथे माशेलला आजही देवकी-कृष्णाचं मंदिर प्रसिद्ध आहे. 'सिंदाबुर' हे नाव 'चंद्रपूर' या कदंबांच्या राजधानीवरून आले असावे. आज ही प्राचीन राजधानी 'चांदोर' किंवा 'चांदर' म्हणून ओळखली जाते.

पण या सर्वांपेक्षाही जुने नाव म्हणजे 'गोंय'. भारतात आर्य लोक सगळीकडे पसरण्यापूर्वी प्रोटोऑस्ट्रोलॉईड / द्रविड वंशाचे लोक सर्व भारतभर पसरलेले होते. छोटा नागपूर पठारावरून कोळ, मुंड वंशाचे आदिवासी कर्नाटकमार्गे गोव्याच्या, जंगलानी भरलेल्या प्रदेशात येऊन राहिले असावेत असा काही इतिहास संशोधकांचा अंदाज आहे. त्यांच्या अतिप्राचीन मुंडारी भाषेत 'गोयंबा' म्हणजे भाताच्या लोंब्या. तर गुव्वा म्हणजे सुपारी. त्यामुळे या सुपारी आणि भाताच्या प्रदेशाला त्यानी 'गोंय' किंवा गोवा म्हटले असावे असा काही लोकांचा तर्क आहे. गोव्यातले काही स्थानिक संशोधक म्हणतात की या आदिम जमाती गोव्यातून इतरत्र गेल्या!

या आदिम लोकांच्या उगमस्थानाविषयी अनेक तर्क वितर्क असले तरी प्राचीन काळात म्हणजे अगदी मानवी संस्कृतीच्या जन्मानंतरच्या लगेचच्या काळात गोव्यात मानवी वस्ती होती हे निर्विवाद. सांगे तालुक्यात आणि सत्तरी तालुक्यात भारतीय पुरातत्त्व खात्याने केलेल्या उत्खननात अश्मयुगीन आणि अगदी प्राथमिक स्वरूपातली दगडांची ओबडधोबड हत्यारे, हातकुर्‍हाडी सापडल्या आहेत. तर सत्तरी तालुक्यात 'म्हाऊस' आणि सांगे तालुक्यात रिवण-कोळंबच्याजवळ 'उसगाळीमळ-पणसईमळ' आणि 'काजूर' इथे प्रस्तरचित्रे अर्थात 'पेट्रोग्लिफ्स' सापडले आहेत.

यापैकी उसगाळीमळ आणि काजूर इथली अश्मयुगीन दगडी रेखाचित्रे आम्ही पाहिली आणि डोळ्याचे पारणे फिटले. काजूर इथली प्रस्तरचित्रे एका काळ्या ग्रॅनाईट पाषाणावर कोरलेली आहेत. अनेक प्राण्यांचे आकार इथे सापडतात.
मानवी संस्कृतीच्या इतिहासातले आणखी एक महत्त्वाचे ठिकाण म्हणजे रिवण-कोळंब जवळचे उसगाळीमळ-पणसईमळ. पूर्वीची अघनाशिनी म्हणजेच आताची झुआरी नदी. तिची एक उपनदी कुशावती. ती सांगे तालुक्यातून वाहत येते. कोळंबजवळ तिच्या पात्रात काहीसा वर आलेला एक जांभ्या दगडाचा मोठा भाग आहे. सच्छिद्र असला तरी काहीसा सपाट. ६ महिने हा खडक पाण्यात असतो. दिवाळीनंतर पाणी कमी झालं की आपल्याला दिसतात अतिशय सुरेख असे दगडात कोरलेले आकार. प्राणी, माणसं, काही त्या लोकांच्या धार्मिक विधींशी संबंधित असावेत असे आकार. कोरीव काम करायला अतिशय कठीण अशा जांभ्या दगडावर या पूर्वजानी नक्की कशासाठी हे आकार कोरले असावेत, आज आपण काहीच सांगू शकत नाही. पण या आकृत्या इतक्या सुंदर आहेत की बस्स! रानरेडा, ससा, कोल्हा, मोर, हरिणं वगैरे आहेतच, पण बरोबर नुकतंच जन्मलेलं बाळ असलेली एक मातृदेवताही आहे. एक मोठा वर्तुळाकार आहे, त्याला स्थानिक लोक चक्रव्युह म्हणतात, तर या प्रस्तर चित्राना 'गुराख्यांची चित्रं' म्हणतात. या खडकाच्या एका बाजूने कुशावती वाहते तर जास्तीचं पाणी वाहून जावं म्हणून दुसर्‍या बाजूने एक चर खणलेला आहे. त्यात सध्या माती पानं पडून तो अर्धा बुजलाय. तिथे सरकारचा एक रखवालदार असतो असं ऐकलं पण आम्हाला काही तो भेटला नाही. या सगळ्या खडकावरची माती अद्यापही काढलेली नाही. आता साधारण १२५ आकृत्या दिसतात. माती नीट काढली तर कदाचित आणखीही काही सापडतील.

हा सगळा प्रदेश अजूनही दुर्गम आहे. सगळीकडे जंगल आहेच. कर्नाटकची सीमा जवळ आहे आणि लोहखनिजाच्या खाणींनी सगळा परिसर व्यापलेला आहे. या प्रस्तरचित्रांपासून फक्त ५०० मीटर्स अंतरावर सध्या बंद असलेली एक खाण आहे. 'ती चालू करायचं उद्या जर कोणाच्या डोक्यात आलं तर?' या विचारानेच अस्वस्थ व्हायला होतं.

या प्रस्तर चित्रांच्या जवळ, ४ ते ५ कि.मी. च्या परिसरात काजूर आणि रिवण इथे मोठ्या नैसर्गिक गुहा आहेत. इथलं नदीचं पात्र काहीसं उथळ आहे. एकूणच अश्मयुगातल्या मानवांना रहायला एकदम आदर्श परिसर आहे! ही सुंदर कोरीव चित्रं तयार करणार्‍या या आदिम रहिवाशांना जंगलातल्या विपुल प्रमाणात उपलब्ध असलेल्या प्राण्यांमुळे खाण्यापिण्याची ददात नसावी. खाणं जमा करून उरलेल्या वेळात आणि त्यांच्या काही धार्मिक रीतीरिवाजांसाठी ही चित्र खोदून काढली असावीत असा एक अंदाज आहे. सगळ्या जगभर अशा प्रकारची चित्रं सापडली आहेत, भारतातील भोपाळजवळचं भीमबेटका हे त्यातलं एक प्रमुख स्थळ. पण ही बरीचशी चित्रं ग्रॅनाईट किंवा वालुकाश्मावर आहेत. मात्र उसगाळीमळची ही चित्र जांभ्या दगडात आहेत, हे त्यांचं विशेष. कारण या दगडात लोखंडाचा अंश असतो, त्यामुळे कोरायला हा दगड अत्यंत कठीण!


अश्मयुगातला हा आदिम रहिवासी हळूहळू शेती करू लागला. प्राणीपालन करू लागला. डोंगर उतारावर पाहिजे तेवढी झाडी, गवत काढून तिथे जरूरीपुरतं भात, नाचणी पिकवायची. पुढच्या वर्षी तो तुकडा रानासाठी सोडून देऊन दुसर्‍या जागी गरजेपुरतीच शेती करायची. अशा प्रकारची शेती गोव्यातले आदिवासी आता आता पर्यंत करत होते. या शेतीला कुमेरी असं नाव आहे. वारुळं, नाग, भूमी, लिंग, जागेचे राखणदार पुरुष अशी त्यांची दैवतं होती. या वारुळांना सांतेरी असं नाव आहे. गोव्यात सगळीकडे आढळणारी सातेरी देवी म्हणजे आता 'शांतादुर्गा'. पण सांतेरी हे नाव अजूनही प्रचारात आहे. तर वेताळ, पाईकदेव, रवळनाथ हे सगळे राखणदार देव. तर लिंगदेवांना नंतर शंकर हे नाव मिळालं. या नैसर्गिक देवतांना त्यांच्या भोळ्या भक्तांनी कोणत्याही उपचारांशिवाय केलेली पूजा मानवत होती. त्यांची देवळंही कुठे नव्हती. तर वारुळं, जमिनीतून वर आलेला एखादा दगड यातच त्यांना त्यांचे देव दिसत होते. सुरुवातीचे कोळ-मुंड म्हणजे नंतरच्या काळातले कुळ-मुंडकार आणि कोळी, गावडे-गावकार हे गोव्याचे आद्य रहिवासी.

काजूर इथे असंच एक पाइकदेवाचं देऊळ दिसलं. देऊळ म्हणजे साधीशी झोपडी. तेही नंतर कधीतरी बांधलेलं आहे. पण त्याच्या समोर चपट्या दगडांची एक वर्तुळाकार पुरातन रचना आहे. त्या रचनेच्या मधोमध एक गुळगुळीत गोल दगड आहे. हे नेमकं कशासाठी, आम्हाला कोणी सांगू शकलं नाही. बहुधा ही आदिम लोकांची स्मशानभूमी असावी. त्या दगडांच्या वर्तुळाच्या मधे उभं राहिलं तर कोणी खोटं बोलू शकत नाही. खोटं बोललं तर भयंकर परिणाम होतात अशी गावकर्‍यांची श्रद्धा आहे.अंदाजे इ.स. पूर्व ६००० वर्षे या काळात समुद्राची पातळी आणखी कमी झाली, आणि किनारपट्टीला आणखी भूमी उपलब्ध झाली. गोव्यातले द्रविड, कोळ मुंड आपल्या पद्धतीने जगत असताना नंतर म्हणजे साधारण इ.स. पूर्व ५००० वर्षे, लढायांमधे हरून सुमेरियन लोक समुद्रमार्गे गोव्यात आले. त्यानी येताना आपल्याबरोबर देवळांची संस्कृती आणली. आणि ते इथल्या मूळ समाजात मिसळून गेले. यांचे वंशज म्हणजे आताचे पद्दे आणि चित्पावन ब्राह्मण असा काही इतिहास संशोधकांचा समज आहे. आणखी काही काळातच, किंवा याच्या आगेमागे, उत्तरेकडून आर्य लोक सार्‍या भारतवर्षात पसरले. त्यांनी आपली चातुर्वर्ण्य व्यवस्था इथे रुजवली. त्या व्यवस्थेत मूळचे आदिवासी असलेले गावडे आणि महार लोक शूद्र झाले असावेत. परशुरामाने इथे येणार्‍या आर्यांचे नेतृत्व केले असावे म्हणून ही भूमी परशुरामाने निर्माण केली अशा प्रकारच्या कथांचा उगम झाला. आताचं 'रिवण' म्हणजे पूर्वीचं 'ऋषिवन'. आताचं काणकोण म्हणजे पूर्वीचं 'कण्वपूर' कारण तिथे कण्व ऋषींचा आश्रम होता. अशा नावांवरून गोव्यातल्या आर्यांच्या वास्तव्याची माहिती मिळते.

हळूहळू गावगाडा चालवणारी व्यवस्था अस्तित्वात आली. आताच्या पंचमंडळांसारखी काहीतरी ही व्यवस्था असावी. म्हणूनच गोव्यात अनेक ठिकाणी 'बाराजण' नावाची ठिकाणे आहेत. कर्नाटक सीमेवरच्या जंगलातल्या लहान गावांमधे असे पंच म्हणजेच 'बुधवंत' लोक गावातल्या गोष्टींबद्दल निर्णय करतात. हे एकूण शांतताप्रेमी लोक होते. इ. स. पूर्व सुमारे ५०० वर्षांच्या काळात गोव्यात जैन आणि बौद्ध धर्माचे प्रचारक येऊन पोचले. त्यांचेही गोव्यात स्वागत झाले. त्यांच्या वास्तव्यासाठी अनेक ठिकाणी मानवनिर्मित गुहा तयार केलेल्या आहेत. साखळीजवळ हरवळे, फोंड्याजवळ खांडेपार इथे आम्ही अशा गुहा पाहिल्या. यापैकी हरवळे येथील गुहा या पूजास्थान वाटतात, कारण त्यांच्या आतमधे लिंगं आहेत. तर खांडेपार येथे केवळ रहाण्यासाठी गुहा तयार केल्या असाव्यात कारण त्यांत प्रत्येक गुहेच्या आत २ खोल्या केलेल्या आहेत.आतापर्यंत गोव्यात एकछत्री असं कोणाचं राज्य नव्हतं. जशी उत्तर भारतात आणि महाराष्ट्रात साम्राज्यं उदयाला आली, तसा त्यांचा गोव्यात हळूहळू शिरकाव झाला. गोव्याच्या इतिहासातला अशा साम्राज्याचा पहिला उल्लेख आहे, मौर्य साम्राज्याचा.

इ. स. पूर्व ३२२ मध्ये सम्राट चंद्रगुप्त मौर्य मगधाच्या नंदांचा पराभव करून राज्यावर आला. पुढील २४ वर्षांच्या काळात त्याने आपल्या राज्याला साम्राज्याचे स्वरूप दिले. त्याचा पुत्र बिंदुसार याने हे साम्राज्य दक्षिण भारतातली द्रविड राज्यं वगळता पूर्ण भारतभर वाढवले. त्याच्यानंतर त्याचा महापराक्रमी पुत्र चक्रवर्ती अशोक सम्राट झाला. त्याने इ.स. पूर्व २३२ पर्यंत म्हणजे ४० वर्षे भारतावर राज्य केले. अशोकाने अनेक ठिकाणी शिलालेख लिहून ठेवले आहेत. या सम्राटांपैकी सम्राट चंद्रगुप्ताने उत्तर आयुष्यात जैन विचारसरणीचा अवलंब केला, तर अशोकाने कलिंगाच्या लढाईनंतर बौद्ध मताचा स्वीकार केला. या सर्व काळात गोव्यात मौर्यांचे राज्य होते. या काळात जैन तसेच बौद्ध धर्माचे प्रचारक सर्व भारतभर संचार करत होते. गोव्यात हरवळे सारख्या ठिकाणी जैन बैठक आढळते, तर बौद्ध भिख्खूंच्या वास्तव्यासाठी अनेक ठिकाणी मानवनिर्मित गुहा आढळून येतात. यापैकी काही म्हणजे हरवळे, रिवण, खांडेपार इ. बर्‍याच ठिकाणी उत्खनन करताना इ. स. पूर्व दुसरे शतक ते इ. स. तिसरे शतक या काळातल्या गौतम बुद्धाच्या मूर्ती सापडल्या आहेत.

इ. स. पूर्व २३२ मध्ये अशोकाचा मृत्यू झाला. त्याच्यानंतर, त्याचे साम्राज्य फक्त ५० वर्षे टिकले. आणि यानंतर पाटलिपुत्रावर सुंग घराण्याची सत्ता आली. या काळात मौर्यांच्या साम्राज्याची शकले झाली, आणि लहान राज्ये उदयाला आली. यानंतर सुमारे साडेचारशे वर्षे पैठण अर्थात 'प्रतिष्ठान' येथील सातवाहन कुलाची महाराष्ट्राबरोबरच गोव्यात सत्ता राहिली. या कुळात शककर्ता सम्राट गौतमीपुत्र सातकर्णी अर्थात "शालिवाहन" होऊन गेला. याच्या काळात गोवा हे महत्त्वाचे बंदर म्हणून प्रसिद्ध झाले, आणि इथून कर्नाटक आणि महाराष्ट्रातल्या राजांसाठी अरबी घोडे समुद्रमार्गे आणायला सुरुवात झाली.

तिसवाडी, बारदेश आणि साष्टी या तालुक्यात ४५० वर्षे, तर इतर तालुक्यात सुमारे २०० वर्षे पोर्तुगीजांचे राज्य वगळता गोव्याचा इतिहास बराचसा महाराष्ट्राच्या इतिहासाबरोबर निगडित राहिलेला आहे. सातवाहन साम्राज्याच्या लयानंतर सुमारे २०० वर्षे गोव्यात अस्थिर परिस्थिती राहिली होती. या काळात दक्षिण भारतातील चुतु, महाराष्ट्री, हाळसीचे कदंब, कोल्हापूरचे कुरा इत्यादि घराण्यातील राजांच्या सत्ता एकामागून एक गोव्यावर येऊन गेल्या. यापैकी हाळसी-पळसिग्गे (पलाशिका) हे खानापूरजवळचे एक प्राचीन गाव. इथले कदंब घराणे गोव्याच्या दृष्टीने महत्त्वाचे. कारण याच घराण्याच्या एका शाखेने परत गोव्यावर सत्ता स्थापन केली ती इ. सनाच्या ११व्या शतकात. त्यावेळेला हे घराणे गोव्यात राहूनच गोव्यावर राज्य करत होते. आणि ती चारशे वर्षे गोव्याचा सुवर्णकाळ मानला जातो.

इ. स. ४०० च्या दरम्यान यादवकुळातल्या भोज राजांची सत्ता मध्य आणि दक्षिण गोव्यात प्रस्थापित झाली. त्यांची राजधानी चंद्रपूर अर्थात चांदोर ही होती. चांदोर इथे उत्खनन करताना अनेक पुरातन अवशेष सापडले आहेत. या राजांचा कुलदेव म्हणजे चंद्रेश्वर भूतनाथ. चांदोर इथे सापडलेल्या अवशेषांमधे मोठा नंदी, राजवाड्याचे अवशेष इत्यादि आजही पहायला मिळतात. हे भोज राजे अतिशय उदार होते. त्यांनी अनेक मोठी देवळे बांधली, आणि या देवळांच्या उत्पनासाठी अनेक गावे इनाम म्हणून लावून दिली. त्यानी दिलेले ताम्रपट आणि शिलालेख गोव्यात अनेक ठिकाणी सापडले आहेत. या काळात चंद्रपूर सार्‍या जगभर प्रसिद्ध झाले. सुमारे २०० वर्षे या राजघराण्याने गोव्याची खूप भरभराट केली आणि आपल्या राज्याचा विस्तार कारवार बेळगाव या भागातही केला. यांच्या एका चेदी या उपकुलातील काही लोकांना पुढे पोर्तुगीजांनी बळाने ख्रिश्चन केले, पण ते स्वत:ला चाड्डे म्हणवीत राहिले. आणि आपापल्या कुलदैवताना वर्षासने द्यायचेही त्यानी सुरूच ठेवले. "गोव्यातल्या प्रत्येक ख्रिश्चन माणसाला आपले हिंदू असतानाचे आडनाव माहिती आहे" असे आम्हाला रिवण येथे भेटलेल्या एका ख्रिश्चन व्यावसायिकाने सांगितले. विशेष म्हणजे हा टुरिझम मध्ये असलेला माणूस आम्हाला रिवणच्या जीवोत्तम पर्तगाळी मठात भेटला होता, आणि आसपासच्या अनेक, हिंदूंच्या दृष्टीने पवित्र, ठिकाणांची माहिती त्याने दिली होती. एवढंच नव्हे तर त्याने "पर्तगाळी मठातल्या झर्‍याच्या पाण्याने सगळे रोग बरे होतात कारण ते डोंगरावरच्या गणपतीच्या पायापासून आलं आहे" अशी माहितीही दिली! त्याशिवाय "वेताळाच्या देवळात दिवेलागणीच्या वेळी जाऊ नका, घाबराल." असा प्रेमळ सल्लाही दिला!इ. स. ५२५ मध्ये घारापुरीच्या कोकण मौर्यांनी भोजांचा पराभव केला. आणखी ५० वर्षांत बदामीच्या चालुक्यानी कोकण मौर्यांकडून गोवा जिंकून घेतला. त्यांचे राज्य सुमारे २०० वर्षे टिकले. याच काळात पुलकेशी पहिला, पुलकेशी दुसरा, कीर्तिवर्मा इ. महान राजे होऊन गेले. आणि इ.स. ७६८ मध्ये दक्षिण कोकणातल्या शिलाहारांच्या वंशातल्या शानफुल्ल नावाच्या राजाच्या मदतीने राष्ट्रकूट घराण्याच्या कृष्ण राजाने गोवा जिंकला. या शिलाहारांचे जे वंशज बाटवाबाटवीच्या काळात सक्तीने ख्रिश्चन झाले, त्यानी नाव घेतले 'सिल्व्हा'! या शिलाहारांची सत्ता गोव्यात सुमारे अडिचशे वर्षे चालली. ते राष्ट्रकूटांचे मांडलिक राहिले. याच कालावधीत खांडेपार येथे सप्तकोटेश्वराचे पूर्ण दगडी बांधणीचे पहिले देऊळ बांधण्यात आले. अगदी साधे आणि लहानसे असे हे देऊळ वैशिष्ट्यपूर्ण दिसते ते त्याच्या कळसावरील जांभ्या दगडात कोरलेल्या बैल, हत्ती या प्राण्यांमुळे. या देवळातही चौकोनी पिंडिका आढळते.


राष्ट्रकूटांच्या, कल्याणी चालुक्यानी केलेल्या पराभवांनंतर, शिलाहारांचे राज्य दुबळे झाले आणि कदंबानी गोवा जिंकून घेण्याचे प्रयत्न सुरू केले. लवकरच कल्याणी चालुक्यांनी म्हणजे दुसरा जयसिंह याने रट्टराज शिलाहाराचा पराभव करून गोव्यासकट पूर्ण सप्तकोकणावर आपली सत्ता प्रस्थापित केली, आणि इ. स. १०४२ पासून कंटकाचार्य अर्थात शष्ठदेव कदंबाने चालुक्यांचा मांडलिक म्हणून गोव्याचा कारभार पहायला सुरुवात केली. हा खर्‍या अर्थाने गोव्याच्या वैभवाचा काळ होता. हे तेच कदंब राजे, ज्यानी "श्रीसप्तकोटीश्वरलब्ध वीरवर" हे बिरूद अभिमानाने मिरविले आणि आपल्या नाण्यांवरही "श्री सप्तकोटीश्वरलब्ध वरप्रसाद" असे लिहून श्री सप्तकोटीश्वराबरोबर आपले नाव अजरामर केले.

क्रमशः

**

विशेष सूचना - या लेखमालेचे स्वरूप एकंदरीतच ललित लेखनाच्या अंगाने जाणारे पण गोव्याच्या समृद्ध इतिहासाचे, आणि वर्तमानाचेही, दर्शन वाचकांना करून देणे एवढेच आहे. वाचकांना विनंती की त्यांनीही ते तेवढ्याच बेताने घ्यावे. आम्ही कोणीही इतिहासकार / इतिहासतज्ञ वगैरे नाही आहोत. पण थोडे फार वाचन करून, माहिती जमा करून इथे मांडण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे. तपशीलात अथवा आमच्या निष्कर्षात चूक / गल्लत असू शकते. पण काही चांगले लेखन यावे आणि गोव्याची रूढ कल्पना सोडून त्याहून वेगळा गोवा काय आहे हे लोकांना कळावे म्हणूनच हा सगळा लेखमालेचा उद्योग.

मायबोली , मिसळपाव व मीमराठी वर टीम गोवा या नावाने पूर्वप्रकाशित


बुधवार, १३ एप्रिल, २०११

आमचे गोंय - प्रास्ताविक (२)

***
आमचे गोंय - प्रास्ताविक (१)
आमचे गोंय - प्रास्ताविक (२)

***

गोवा म्हणलं, की सगळ्याना आठवतो तो निळाशार समुद्र, चंदेरी वाळू, मासळीचा स्वाद दुणा... आणि बरोबरची झिंग आणणारी पेयं.

सगळेच जण यांचा आस्वाद घेण्यासाठी कधी ना कधी तरी गोव्याला भेट देतातच. पण गेली १८ वर्षं गोव्यात राहून मला एक गोष्ट कळलीय ती म्हणजे, खरा गोवा या सगळ्यात आहेच, पण या सगळ्यापलीकडे एक गंभीर पुराणपुरुष गोवा आहे, जो तुम्हा आम्हाला २ दिवसांच्या बस टूरमध्ये अजिबात दिसत नाही. त्याला भेटण्यासाठी गोव्यातल्या सांदीकोपर्‍यातल्या गावांमधे जायला हवं. जंगलं धुंडाळायला हवीत आणि गांवकार लोकांच्या पुराण्या कथा ऐकायला हव्यात. म्हणून चला तर, मी, पैसा, आणि प्रीतमोहर तुम्हाला या एका वेगळ्याच गोव्याच्या सफरीवर घेऊन जातोय.

काही दिवसांपूर्वी प्रीतमोहरने गोव्याच्या पोर्तुगीजकालीन इतिहासाबद्दल एक लेखमालिका लिहायला सुरुवात केली. अत्यंत मनोरंजक भाषेत तिने महाराष्ट्रातील बहुसंख्य लोकांना अपरिचित असलेला गोव्याचा इतिहास सांगायला सुरुवात केली होती. पहिला भाग प्रसिद्ध झाल्यानंतर बिपिनला एक छान कल्पना सुचली.

ती म्हणजे गोव्याचा संपूर्ण इतिहास मिपाकरांच्या समोर आणण्याची. त्याच्या सूचनेवरून आम्ही हे शिवधनुष्य उचलायचा प्रयत्न करतोय. मी ६ डिसेंबर १९९२ पासून गोव्यात राहते आहे. माझी मुलं तर आता गोंयकारच झाली आहेत. प्रीतमोहर गोव्यातलीच "अस्सल गोंयकार". अशा आम्ही दोघीजणी वेगवेगळ्या तर्‍हांनी गोव्याशी संबंधित. आम्ही या संपूर्ण लेखमालिकेतले लेख लिहिणार आहोत.

आमच्यात कोणीच तसा इतिहासाचा शास्त्रशुद्ध, पद्धतशीर अभ्यास केलेला नाही, पण शक्य तेवढी अधिकृत माहिती जमा करून आणि शक्य तेवढ्या ठिकाणाना भेटी देऊन, लोकांशी बोलून, काही ऐकिवातल्या गोष्टींची मदत घेऊन लेखमाला आपल्यापुढे आणत आहोत. कोणाला आणखी काही माहिती असेल तर ती या निमित्ताने सगळ्यांपुढे आणावी ही विनंती. तसंच, लेखमालिकेत जर काही चुका झाल्या, काही उणीव राहिली तर जरूर दाखवून द्या. कारण गोव्याचा इतिहास अभ्यासायचा तर मोठी अडचण म्हणजे, पोर्तुगीजांच्या पूर्वीचा फारसा इतिहास स्थानिक लोकांच्या स्मरणात नाही. देवळांशी संबंधित कथा लोकमानसात आहेत खर्‍या, पण त्या ऐकिव अशाच आहेत, आणि त्यावरून अचूक काळनिश्चिती करणं खूपच कठीण आहे.

दुसरा एक अनुभव मी प्रीतमोहरच्या लेखावर प्रतिक्रिया म्हणून लिहिला होता, की छत्रपती शिवाजी आणि संभाजी यांचा गोव्याशी खूप जवळून संबंध आला होता पण लोक त्याबद्दल फारसं बोलत नाहीत, किंवा जाणून घ्यायचा प्रयत्न करत नाहीत. पोर्तुगीजानी त्याना सोयिस्कर तेवढाच इतिहास लोकांच्या कानी पडेल याची व्यवस्था केली होती. त्यामुळे, "शिवाजी महाराज आणि संभाजी यांच्या मोहिमांमुळे अर्ध्याहून जास्त गोव्यातले लोक धर्मांतरे होण्यापासून बचावले होते." किंवा "मुघलांनी आणि आदिलशहाने शिवाजी आणि संभाजीच्या विरोधात ऐन वेळेला पोर्तुगीजाना मदत केली नसती तर गोवा आणखी साधारण ३०० वर्षे पारतंत्र्यात राहिला नसता" यासारख्या गोष्टी शोधूनच कुठेतरी वाचायला मिळतात. पोर्तुगीजानी जुने किल्ले पूर्ण उध्वस्त करून टाकले आणि सगळीकडे फक्त आपलाच ठसा राहील याची पुरेपूर काळजी घेतली होती. किंबहुना, जुना वैभवशाली इतिहास लोकांनी विसरून जावा अशीच त्यांची इच्छा असावी. त्यामुळे गोव्यातले बहुतेक ख्रिश्चन लोक हे धर्मांतरित स्थानिकच असले, तरी पोर्तुगीज राजवटीचे गोडवे ते अजूनही गातात आणि त्यांच्या दृष्टीने शिवाजी आणि संभाजी हे "भायले" लोक होते हे क्लेशकारक आहेच, पण सत्य आहे.

गोव्यात एकूणच सुशेगाद वृत्तीमुळे असेल किंवा सध्याच्या बदलत्या परिस्थितीनुसार असेल. पण इतिहासाबद्दल खूप अनास्था आहे. माहितीच्या शोधात भटकताना अगदी अर्ध्या कि.मी.च्या अंतरावर असलेल्या गोष्टींबद्दलही "माहिती नाही" हे उत्तर अनेकदा मिळालं. ऐतिहासिक स्थळांजवळ योग्य दिशादर्शक पाट्या नाहीत, माहिती विचारायला आसपास कोणी नाही असे अनुभव अनेकदा आले. पाषाणयुगीन गुहांना सरसकट "पांडवांच्या गुहा" म्हणलं जातं, असे कित्येक प्रकार अनुभवले!

या लेखमालिकेच्या निमित्ताने महाराष्ट्राचा धाकटा भाऊ असलेला जो गोवा, त्याच्या इतिहासाबद्दल, तिथल्या लोकांबद्दल, गोव्याच्या भाषेबद्दल आणि एकूणच सामाजिक / सांस्कृतिक अंगांबद्दल, तुमच्या मनात काही कुतुहल जागं झालं तरी आमचे प्रयत्न सफल झाले असं मी म्हणेन.

- पैसा(ज्योती कामत)

क्रमशः

**

;विशेष सूचना - या लेखमालेचे स्वरूप एकंदरीतच ललित लेखनाच्या अंगाने जाणारे पण गोव्याच्या समृद्ध इतिहासाचे, आणि वर्तमानाचेही, दर्शन वाचकांना करून देणे एवढेच आहे. वाचकांना विनंती की त्यांनीही ते तेवढ्याच बेताने घ्यावे. आम्ही कोणीही इतिहासकार / इतिहासतज्ञ वगैरे नाही आहोत. पण थोडे फार वाचन करून, माहिती जमा करून इथे मांडण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे. तपशीलात अथवा आमच्या निष्कर्षात चूक / गल्लत असू शकते. पण काही चांगले लेखन यावे आणि गोव्याची रूढ कल्पना सोडून त्याहून वेगळा गोवा काय आहे हे लोकांना कळावे म्हणूनच हा सगळा लेखमालेचा उद्योग.

--मायबोली , मिसळपाव व मीमराठी वर टीम गोवा या नावाने पूर्वप्रकाशित

सोमवार, ११ एप्रिल, २०११

आमचे गोंय - प्रास्ताविक (१)
***
आमचे गोंय - प्रास्ताविक (१)
आमचे गोंय - प्रास्ताविक (२)

***

खूप जुनी गोष्ट आहे. त्यावेळी टीव्ही नव्हता, म्हणजे आमच्याकडे नव्हता. करमणुकीचे साधन म्हणजे चित्रपट आणि नाटके! करमणूक घरबसल्या हवी असेल तर, रेडिओ! आमच्याकडे जुना फिलिप्सचा व्हॉल्व्हवाला रेडिओ होता. कॉलेजमधे जाणारा काका आणि थोडी मोठी आत्या त्यावर गाणी वगैरे ऐकत. मी अगदीच लहान, शाळेतही जात नसेन तेव्हा. एके दिवशी एक गाणे कानावर पडले आणि त्यानंतर चित्रपटाचे नाव पण... 'बॉम्बे टू गोवा'!

बॉम्बे तर ऐकून माहित होतं, हे गोवा काय आहे? पण ते पटकन दोन शब्दात संपणारे नाव का कोणास ठाऊक, चांगलेच लक्षात राहिले. पण तेवढेच. पुढे बरीच वर्षे हे नाव उगाचच कधीतरी आठवायचे. वर्गात एकदोन मुलं उन्हाळ्याच्या सुट्टीत गोव्याला जाणारी. त्यांच्याकडून कधीतरी उडत उडत गोव्याबद्दल ऐकलेलं. तिथली देवळं, चर्चेस, बीचेस यांची वर्णनं माफक प्रमाणात ऐकली. असंच कधीतरी मंगेशकर लोक मूळचे गोव्याचे असं वाचलं होतं.

बरीच वर्षं गोव्याचा संबंध एवढाच.

साल १९८१. अर्धवट, कळत्या न कळत्या वयात आलो होतो. अचानक एक तूफान आलं... 'एक दुजे के लिये'. सुप्परडुप्परहिट्ट सिनेमा! भयानक गाजला. आम्हाला आधी तो बघायची परमिशन नव्हती घरून. पण सिनेमा जेव्हा प्रमाणाबाहेर हिट झाला तेव्हा कशीतरी परमिशन काढून बघितला. वासू सपनाच्या प्रेमकहाणीच्या जोडीने लक्षात राहिला तो त्यात दिसलेला गोवा. हे माझं गोव्याचं प्रथम दर्शन. भन्नाटच वाटलेला गोवा तेव्हाही.

पण, गोव्याचं प्रत्यक्ष दर्शन होईपर्यंत अजून पाच वर्षं वाट बघायची होती. बारावीची परिक्षा संपली आणि रिकामपण आलं. कुठेतरी जाऊया म्हणून बाबांच्यामागे भूणभूण लावली होती. खूप पैसे खर्च करून लांब कुठेतरी जाऊ अशी परिस्थिती नव्हती. विचार चालू होता. एक दिवस बोलता बोलता बाबांनी त्यांच्या एका स्नेह्यांसमोर हा विषय काढला. गोव्यात त्यांच्या चिक्कार ओळखी होत्या. त्यांनी गोव्याला जा म्हणून सुचवलं. एवढंच नव्हे तर 'तुमची राहण्याची / खाण्याची सोय अगदी स्वस्तात आणि मस्त करून देतो' असं सांगितलं. एवढं सगळं झाल्यावर नाही वगैरे म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. निघालो आम्ही गोव्याला. आठ दहा दिवसांचं ते गोव्यातलं वास्तव्य, भटकणं, ते एक वेगळंच जग. आजही माझ्या डोळ्यासमोर त्यातला क्षणन् क्षण जिवंतपणे उभा आहे. पंचवीस वर्षं झाली, गोव्याने मनातून जागा रिकामी केली नाहीये.

माझं अजून एक भाग्य म्हणजे त्यावेळी आम्ही अगदी घरगुती वातावरणात गोव्यात सैर केली होती. त्यावेळीही गोवा म्हणजे फक्त बीचेस, तारांकित रिसॉर्टस, दारू, विदेशी पर्यटक एवढीच गोव्याची जनमान्यता होती. पण आम्ही ज्यांच्या बरोबर गोवा हिंडलो, त्यांनी या सगळ्याच्या व्यतिरिक्त असलेला, सदैव हिरव्या रंगात न्हालेला, शांत (सुशेगाऽऽऽत हा शब्द तेव्हाच ऐकलेला), देवळातून रमलेला गोवाही दाखवला. माझी तो पर्यंत गोवा म्हणजे चर्चेस, गोवा म्हणजे ख्रिश्चन संस्कृती अशी समजूत. हा दिसत असलेला गोवा मात्र थोडा तसा होता, पण बराचसा वेगळाही होता. गोवा दाखवणार्‍या काकांनी गोव्याबद्दलची खूपच माहिती दिली. जसजसे ऐकत होतो, चक्रावत होतो. गोव्याच्या इतिहासातील ठळक घटना, पोर्तुगिज राजवटीबद्दलची माहिती वगैरे प्रथमच ऐकत होतो. शाळेत नाही म्हणायला गोव्यात पोर्तुगिजांची सत्ता होती वगैरे वाचले होते, पण ते तितपतच. काकांकडून प्रत्यक्ष ऐकताना खूप काही कळले.

माझ्या मनावर अगदी खोल कोरला गेलेला प्रसंग म्हणजे आम्ही एका देवळात (बहुतेक दामोदरी का असेच काहीसे नाव होते) गेलो होतो आणि एक लग्नाची मिरवणूक आली वाजत गाजत. देवळाच्या बाहेरच थांबली. पुजारी लगबगीने बाहेर गेला. लगीनघरच्या मुख्य पुरूषाने पुजार्‍याच्या हातात काहीतरी बोचके दिले. पुजारी आत आला. त्याने ते बोचके देवाच्या पायावर घातले, एक नारळ प्रसाद म्हणून बाहेर जाऊन त्या पुरूषाला दिला. वरात चालू पडली. मला कळे ना! हे लोक देवळात आतमधे का नाही आले? कळले ते असे, ती वरात ख्रिश्चनांची होती. बाटण्याआधी त्या घराण्याचे हे कुलदैवत, अजूनही मंगलप्रसंगी कुलदैवताचा मानपान केल्याशिवाय कार्य सुरू होत नाही! पण बाटल्यामुळे देवळाच्या आत पाऊल टाकता येत नाही. देवळाच्या बाहेरूनच नमस्कार करायचा.

असलं काही मी आयुष्यात प्रथमच ऐकत / बघत होतो. गोव्याच्या ऊरात काही वेदना अगदी खोलवर असाव्यात हे तेव्हा जाणवलं होतं. (वेदना असतीलही, नसतीलही. तेव्हा मात्र एकंदरीत त्या वरातीतल्या लोकांच्या तोंडावरचा भक्तिभाव आणि बाहेरून नमस्कार करण्यातली अगतिकता जाणवली होती असे आता पुसटसे आठवते आहे.)

अशीच एक आठवण म्हणजे त्रिकाल चित्रपटात, एका ख्रिश्चन मुलाचे लग्न दुसर्‍या एका ख्रिश्चन मुलीशी होत नाही कारण तो मुलगा ब्राह्मण ख्रिश्चन असतो आणि मुलगी इतर जातीची ख्रिश्चन!!! त्रिकाल लक्षात राहिला तो असल्या सगळ्या बारकाव्यांनिशी. याच चित्रपटात मी गोव्यातील राणे आणि त्यांचे बंड हा उल्लेख प्रथम ऐकला.

गोव्याहून परत येताना गोवा माझ्याबरोबरच आला. कायम मनात राहिला. कधी मधी अचानक, गोवा असा समोर येतच गेला.

गोव्याच्या स्वातंत्र्य लढ्याचे उल्लेख वाचताना, त्या लढ्याबद्दल कुठे फुटकळ वाचताना, गोव्याच्या दैदिप्यमान लढ्याचा इतिहास कळला. पुलंच्या 'प्राचीन मराठी वाङमयाचा गाळीव इतिहास' वाचताना तर मला "जैसी हरळामाजी रत्नकिळा | रत्नामाजी हिरा नीळा | तैसी भासामाजी चोखुळा | भासा मराठी" म्हणणारा फादर स्टीफन भेटला. या बहाद्दराने तर 'ख्रिस्तपुराण' हे अस्सल भारतीय परंपरेला शोभून दिसेल असे पुराणच लिहिले ख्रिस्तावर. हा गोव्याचा, आणि ही पुराण रचना गोव्यातली. ज्या गोव्यात मराठीचा एवढा सन्मान झाला, त्याच गोव्यात मराठी विरूद्ध कोंकणी वाद उफाळला आणि मराठीवर 'भायली' असल्याचा आरोप झाला हे वर्तमानपत्रातून वाचत होतो. सुभाष भेंड्यांची 'आमचे गोंय आमका जांय' नावाची कादंबरी वाचली होती. तपशील आठवत नाहीत, पण गोव्याच्या स्वातंत्र्यलढ्याचे आणि त्याचबरोबर, 'भायले' लोकांबद्दलची एकंदरीतच नाराजी याचे चित्रण त्यात होते एवढे मात्र पुसटसे आठवत आहे.

असा हा गोवा! अजून परत जाणे झाले नाहीये. कधी होईल सांगताही येत नाहीये.

काही दिवसांपूर्वी 'प्रीत-मोहर'ने गोव्याबद्दल एक लेख लिहिला. गोव्याच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त. तेव्हा तिची ओळख झाली आणि असे वाटले की ती गोव्याबद्दल अजूनही बरेच काही लिहू शकेल. त्याच वेळेस आमची 'पैसा'बायसुद्धा गोव्याची आहे असं कळलं. तीही उत्तम लिहू शकेल असे वाटले. या सगळ्यामुळे गोव्यावर एखादी साग्रसंगीत लेखमाला का होऊन जाऊ नये? असा विचार मनात आला. अर्थात, त्या दृष्टीने माझा उपयोग शून्य! पण पैसा आणि प्रीत-मोहर यांनी कल्पना तत्काळ उचलून धरली. पैसातैने पुढाकार घेतला आणि लेखमालेची रूपरेषाही ठरवून टाकली.

या मेहनतीचं फळ म्हणजे, 'आमचे गोंय' ही लेखमाला!

या निमित्ताने एक वेगळीच लेखमाला वाचायला मिळेल म्हणून मलाही आनंद होत आहे. सर्वच वाचकांना ही लेखमाला आवडेल आणि महाराष्ट्राच्या या नितांत सुंदर लहान भावाची चहूअंगाने ओळख होईल ही आशा!

- बिपिन कार्यकर्ते

क्रमशः

**

विशेष सूचना - या लेखमालेचे स्वरूप एकंदरीतच ललित लेखनाच्या अंगाने जाणारे पण गोव्याच्या समृद्ध इतिहासाचे, आणि वर्तमानाचेही, दर्शन वाचकांना करून देणे एवढेच आहे. वाचकांना विनंती की त्यांनीही ते तेवढ्याच बेताने घ्यावे. आम्ही कोणीही इतिहासकार / इतिहासतज्ञ वगैरे नाही आहोत. पण थोडे फार वाचन करून, माहिती जमा करून इथे मांडण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे. तपशीलात अथवा आमच्या निष्कर्षात चूक / गल्लत असू शकते. पण काही चांगले लेखन यावे आणि गोव्याची रूढ कल्पना सोडून त्याहून वेगळा गोवा काय आहे हे लोकांना कळावे म्हणूनच हा सगळा लेखमालेचा उद्योग.

- मायबोली , मिसळपाव व मीमराठी वर टीम गोवा या नावाने पूर्वप्रकाशित

गुरुवार, ७ एप्रिल, २०११

कोचिंग क्लासेस- ०१

माझ्या शेजारच्या मुलांनी मला रोजच्यासारख खूप पिडल ..पण ते अभ्यासाबद्दल ...सूर्यमालेबद्दल...मग त्या संवादाच कोकणी रुपांतर करुन , व कोकणीतील जास्तीत जास्त शब्द सगळ्यांना कळतील अश्या बेतात हा दुसरा धडा लिहितेय

चुभु देउ नका घेउ नका ;)
[ वर्गान फकत्त बोवाळ चलला. भुरगीं पेपराची विमानां, खडु घेवन एकामेकाक मारतना मग्न जाल्यांत. टीचर आयिल्लीय तांका कळना....]

टीचरः आरे आरे श....................... वोगी रावात ........................वोग्गी..........आरे वोग्गी रावात.....

भुरगीं कांयच आयकुपाच्या मनस्थितीन ना....तांचो खेळ चालुच ..

टीचर : शी: शी: शी: ही भुरगीं म्हज्या तकलेर मिर्‍यां वाटपाची तितलीं उरल्यां....[पट्टी मेजार धाडायता,]

पट्ट्येच्या आवाजान भुरगी थण जातात....

टीचर किदें चललां रे हें हांगा? आँ? नुस्त्या बाजार तरी बरो.....तुमच्या बोवाळान आनी मस्त्येन म्हाका दिसाच्या उजवाडान गिरे आनी तारे दिसुंक लागले....

नाना: शक्युच ना टीचर. तु फंट सांगता .. दिसाचे खंय गिरे आनी तारे दिसता?

स्नेहा: आरे ट्युबलाईट तो वाक्प्रचार आशिल्लो...ताजो शब्दागणिक अर्थ घेंव नजो.

नाना ..हां हां ..बरें कळ्ळें म्हाका. तुवें सांगपाची गरज ना....
पुण टीचर गिरे आनी तारे म्हळ्यार सदांच मळबान दिसतात तीं नखेत्रां न्हंय?


टीचरः हम्म... हांव तुमकां मळबातल्या ह्या "नखेत्रांविशी" म्हायती सांगता

रातिच्या वेळार मळबाकडेन पळयल्यार कितलीशींच नखेत्रां आमका दिसतात. कांय लिकलिकतात तर कांय लिकलिकनात. जी लिकलिकतांत तांका तारे म्हणटात आनी लिकलिकनात तांका गिरे.

तार्‍यांक आपणालो खासा उजवाड आसता.तर गिर्‍यांक तो नासता. सूर्य होवुय एक तारो आशिल्ल्यान ताका ताजो उजवाड आसा.

प्रीतीमागीर गिरे उजवाड खंच्यान हाडटात?

टीचर गिर्‍यांक उजवाड तार्‍यांकडल्यान मेळटा. गुरु , शुक्र हे गिरे सूर्याकडल्यान मेळिल्लो उजवाड परतुन मळबान परावर्तित करतात देकुन ते तेजवंत दिसतात.

अदिती:
सूर्य, ताचे गिरे आणि उपगिरे हांच्या पंगडाक 'सूर्यमाळ' अशें म्हणटात . न्हंय टीचर?

टीचरः सामकें खरें.
आमच्या सूर्यमाळेन णव गिरे आसात. सूर्य हो आमच्या सूर्यमाळेचो केंद्रबिंदु जावन आसा. दिसाचे सूर्याच्या पर्जळित उजवाडाकलागुन हेर तारे आमकां दिसनात , जाल्यार रातीच्या वेळार सूर्याचो उजवाड नाशिल्ल्यान ते दिसतात.
अदिती: सगळे गिरे सूर्याभोवतणी घुंवतात खंय टीचर?
टीचरः हय .. गिरे सुर्याभोवतणी घुंवतात .. आनी गिर्‍यांचे उपगिरे तांच्या भोवतणी..जशी अर्थ म्हळ्यार आमची धरतरी सुर्याभोवतणी घुंवता आनी चंद्र धरतरेभोवतणी :)
गिर्‍यांच्या उपगिर्‍यांक चंद्र अशेंय म्हणटात. हे गिरे गुरुत्वाकर्शणाक्लागुन एकदाय आपलो मार्ग चुकनासतना सुर्याभोवतणी भोवतात.

पुप्या: टीचर गुरुत्वाकर्षण म्हटल्यार कितें?


टीचर
: गुरुत्वाकर्षण म्हळ्यार एका वस्तुची दुसर्‍या वस्तुक आपणाकडे वोडुन घेवपाची/ आकर्षित शक्ती. तुमी मॅग्नेट आनी लोखंड पळयला? मॅग्नेट लोखणाच्या वस्तुक आकर्षित करता तश्शेंच ... तुमी वयर मळबान जर एक फातर उडयलो जाल्यार कितें जाता?

भुरगीं : तो खाला पडटा.

टीचरः हें कित्याक घडटा?हाका गुरुत्वाकर्षण शक्त कारणीभूत.

नाना: जाल्यार चंद्र धरतरेर कित्याक पडना?

टीचरः ह्म्म हें त्या दोनुंय वस्तुंच्या वजन आणि तांच्यामदले अंतर हाचेर अवलंबुन जाता, आता म्हाका सांग फातर आम्च्यापासुन चड पयस आसा काय चंद्र?

भुरगीं :चंद्र खूब्ब पयस आसा

टीचर: बरोबर. चंद्र धरतरेमदीं कितल्याश्याच हजार किलोमीटराचे अंतर आसा. म्हण अशें घडटा
सूर्य पृथ्वीपरस सुमार १०९ पटीन व्हड आसा. पृथ्वीवेल्यान ६० किलो वजनाचो मनीस सूर्यार गेलो जायत , जाल्यार थंय ताजे वजन सुमार १६०० किलो जातले .... आनी पृथ्वील्या चंद्रार ६० किलोच्या मनशाचें वजन २२ किलो भरतलें :)

भुरगीं:
टीचर आता बाकीच्या ग्रहमालेची म्हायती सांग न्हंय ....

टीचरः
तो तुमका स्वाध्याय ....तुमी तुमका जमता ती म्हायती, चित्रां एकठाय करुन फाल्यां हाडात ...आमी वर्गान आमची सूर्यमाळ तयार करुया आनी हें करतना आमी सुर्यमाळेच्या प्रत्येक गिर्‍याबद्दल शिकुया.

बरें तर ..
चला आता सगली. आपापल्या घरा ....


प्रतिसाद दियात आनी हांवे लेख कसो बरयला तें जरुर सांगात


- प्रीमो

कठिण शब्दां अर्थ :


तकलेर मिर्‍यां वाटप : किंमत न देणे

नुस्त्या बाजार = मासळी मार्केट

नुस्तें = मासे

गिरे = ग्रह

मळब = आकाश

नखेत्र= नक्शत्र

उजवाड= प्रकाश/ उजेड

फातर = दगड

प्रीमो कोकणी क्लासेस-0

आजपासुन प्रीमो कोचिंग क्लासेस बोर्डावर सुरु करण्यात येत आहेत. आधी हा प्रकल्प माझ्या खवपुरता मयादित होता..पण काही मिपावरील आयडींच्या [डु आयडी असले तर मला ठाउक न्हाय] विनंती वरुन शिकवणी इथेही घेण्याचा विचार केला.
बाकी चुभुद्याघ्या
तर सुरवातीला काही हाय फाय नको ..

खालील घटना वाचा. तुम्हाला कळेलच अशी आशा आहे...नाहीच कळल तर समजाउन घ्या.
ढिश्क्लेमरः घटनांतील पात्र काल्पनिक नाहीएत ....फक्त घटनेतला ओरिजिनल प्रसंगाचा संदर्भ बदललाय. काही लोकांना ओरिजिनल संदर्भ कळतीलच .टीचर : नमस्कार भुरग्यांनो म्हणा श्री गणेशाय नमः|
भुरगीं: श्री गणेशाय नमः|
टीचर: गणेश बुद्दीची देवता . तो सगल्या संकटांचो विनाश करता आणि आमचे कामाक यश दिता . म्हुण आमी खंयचेंय कार्य करतना गणेशाचें नांव पयली घेता.
हं चला आता गणेश्स्तवन करात.
भुरगीं:(एका सुरान) म्हणटात .
(म्हणुन जातकीच)
टीचर : कालचो गृहपाठ कोणे कोणे केलो ना?
असुर: हांवे केलो.
नाना: हांवेय केलो.
स्नेहा, पियु, डॉन, आनी हेर भुरगीं (धमु सोडुन): आमीय करुन हाडला गृहपाठ
टीचर : हांवे कोणे केलोना तें विचारलां ..तर भुरग्यानों गृहपाठ कोणे कोणे केलो ना?धमु?
धमु: हांवे गृहपाठ केला टीचर ....
टीचर: चल तर तुजें पुस्तक दाखय
धमु: टीचर हांवे बुक हाडुंक ना....
टीचरः तु बरो आयलो मरे... खरे सांग बुक हाडलो ना काय अभ्यासुच केलो ना?.
धमु: टीचर केलो ना अभ्यास :(
तो रुद्र आसा न्ही, तो काल आयिल्लो आमगेर ...आनी तो म्हाका सतायतालो ..म्हुण हांव अभ्यास करुंक शकलो ना....सॉरी टीचर

टीचर ..सॉरी बिरी म्हाका लागना ..आता तुका शिक्षा भोगची पडटली. भुरग्यानो हाका कसली शिक्षा दिवया तुमी सांगा ?

डॉन: टीचर हो एक नंबर फटकिरो ....सदांच फटिंग उलयता..ताका गृहपाठ धा(१०) पावट करपाक सांग ( स्वगत : आता खरी मजा येतली .तोणार आसुरी हांशें ..........)
नाना: टीचर ताका एक दिस माफ करुया ...तो परा लेगित अभ्यास करीना ..ताका कोण शिक्षा कर म्हणना ..मागीर धमुकुच कित्याक ती शिक्शा?
बाकीची भुरगीं बोवाळ घालतात .....

टीचर ..वोग्गी रावात सगळी. एकदम चुप ..कोणाचोच आवाज नाकां म्हाका.
धमु एक पावट सोडतां तुका, फुडले पावट जर तुझो गृहपाठ म्हाका दिसलो ना जाल्यार धा पावट बरवपाची तयारी करच पुण तुज्या आईबाबाक हांवे शाळेन आपयलां म्हण सांग .कळलें?

धमु : ओके टीचर._/\_

टीचर : चला. आज आमी चित्रां काडुयात :)

भुरगीं वेळ-काळ विसरुन , मजा करत चित्रां काडपा लागतात .

(समाप्त )

कठिण शब्दां अर्थः
भुरगीं - मुले
हांव = मी (प्रथमा एक वचन)...उदा. हांव प्रीतमोहर = मी प्रीतमोहर आहे.
हांवे= मी (तृतीया एकवचन) उदा हांवे अभ्यास केलो = मी अभ्यास केला
जातकीच = झाल्यावर
हेर (उच्चार : हॅर) = इतर
आयिल्लो = आला होता
फटकिरो = फटिंग = खोटारडा
हाशें = हास्य
लेगित = सुद्धा
बरवप = लिहिणे

आजचो गृहपाठ आनी म्हज्या क्लासाची फी : सद्दां किमान ३ वाक्यां कोकणीन बरोवचीं