(फोटो सौजन्य : http://www.railnews.co.in या संस्थळावरुन साभार)
रविवारची सकाळ बंगळूर ला उजाडली. तिथुन AC double decker express * ने चेन्नै ला पोचेस्तोवर रात्र झाली होती. चेन्नै रामेश्वरम एक्स्प्रेस फुल असल्याने आम्ही मदुराई एक्स्प्रेस घेतली होती ,तिने मदुराई ला गेलो. मधल्या ३-४ तासात जमेल तेवढ चेन्नै फिरुन नॉस्टाल्जिक होऊन घेतल. सकाळी मदुराईला पोचल्यावर फ्रेश होउन घेतले आणि जवळ्च्या (अर्थातच तमिळी) हाटेलात जाऊन पोटपूजा आटोपली आणि मग मिनाक्षीअम्मनच्या दर्शनाला निघालो. ह्या बद्दल मी जास्त लिहिणार नाहीये. आमच्या पिरेने आधीच मस्त पैकी लिहुन ठेवलय. मी तिने केलेल्या मिनाक्षीअम्मनच्या आणि तिच्या मंदिराच्या वर्णनाला मम म्हणते!!.
पुढल्या वेळेस इथे खास वेळ काढुन येईन. मंदिर जरा घाईघाईतच बघितल कारण १२.३० ची प्याशिंजर पकडुन रामेश्वरम ला जायचे होते की मला.
रामेश्वरम तामिळनाडु राज्यातल्या रामनाथपुरम जिल्ह्यातले पंबन नावाच्या एका छोट्याश्या बेटावरचे गाव, एक ज्योतिर्लिंग असलेल स्थान. पण तेव्ह्ढच ह्या बेटाच्या वर्णनासाठी पुरेसं नाही. हे बेट भारतातल्या पहिल्या समुद्री पूलाने भारताच्या मुख्य भूभागाशी जोडले गेलेय. हा पूल जहाजांना वाट देण्यासाठी वर उचलला जातो. इथुन श्रीलंकेच मन्नार बेट फक्त ५० किमी दूर आहे म्हणतात. परत तिथे डॉ. कलामांच घर आहे!!! सुंदर अस (आता खूप कमी लोकवस्ती असलेल) धनुष्कोडी आहे.
धनुष्कोडी !!! इथे आधी वस्ती होती. स्टेशन होत. रामेश्वरम ला येणारी पॅसेंजर इथवर यायची. १९६४ साली आलेल्या वादळाने या गावाच होत्याच नव्हतं केल. एका क्षणात अख्खं गावच वाहुन नेलं. सोबत तिथे आलेली पॅसेंजर ट्रेन ही आतील माणसांसकट समुद्रार्पण. आता तिथे मच्छीमार लोक्स ठराविक काळातच राहतात. या सगळ्याच्या स्मृती अजुन जपणारे हे लोक्स. मला तर बघायचे होतेच.
पण आम्ही रामेश्वरम ला पोचता पोचत नव्हतो. आता संध्याकाळ झाली होती आणि पोटात कावळ्यांनी डिस्को डान्स सुरु केला होता. ४.४५ वाजलेत , आता स्टेशनला पोचल्यावर सगळ्यात आधी पोटोबा अस म्हणतानाच समुद्र जवळ असल्याच्या खुणा जाणवु लागल्या आणि कावळे डिस्को विसरले. मंडपम स्टेशन नंतर दूरवर खारफुटी आणि किनारा दिसत होता.
मदुराई-रामेश्वरम प्रवासात रामेश्वरम जवळ कुठेतरी |
किनारा जवळ आला!!! |
(धावत्या ट्रेन मधले फोटो आहेत आणि फटुग्राफर शिकाउ असल्याने फटुग्राफरास माफ करावे)
आलच पंबन बेट आणि पंबन पूल. . .
जुन्या पुलाचे अवषेश |
हा ब्रिज उलगडताना पहायचे होते , पण तो योग नाही जुळुन आला
रामेश्वरम चे पहिले दर्शन. पाहून डोळे निवले.!! गोव्यात राहणारी असल्याने समुद्र नवा नाही, पण इथल्या समुद्राच्या निळाईची नशाच काही और.
Add caption |
बेटावर प्रवेश करताना सर्वत्र मत्स्यावतार आणि त्याचा गंध पसरला होता.
Add caption |
स्टेशनवरुन सर्वात आधी रिक्शाने हॉटेल गाठले, फ्रेश झालो आणि उदरभरणाला बाहेर पडलो. वाजले होते ५.३०-५.४५. आता भूक जाणवायला लागली होती. चेन्नैत दिवस काढले असल्याने आणि पिराक्काचा रामेश्वरम धागा वाचला असल्याने हाय-फाय हाटिलं टाळली आणि निमुटप्णे एका मारवाड्याच्या छोट्याश्या खानावळीत जाउन पोळी भाजी खाल्ली. (हा मारवाडी आता पक्का तमिळीयन झालाय. त्याला आठवण करुन दिली की तो मारवाडी आहे तेव्हा पोळी भाजी मिळाली)
मग इकडे तिकडे बघताना लक्षात आल, की रामेश्वराच मंदिर समोरच आहे आणि मंदिर बंद व्हायला बराच अवकाश आहे आणि गर्दी दिसत नाहीये तर म्हंटल घेउच रामेश्वराची भेट. मंदिरातले कॉरिडॉर्स खूप भव्य आहेत. छतांवर स्थानिक कलकारांची सुंदर पेंटिंग आहेत. भिंतींवर ही रामायणातील दृश्ये कोरलेली वा चित्र स्वरुपात आहेत. दोन मोठे रथ आणि पालख्या पण आम्ही बघितल्या अगदी जवळून. गर्दी नसल्याचा फायदा :) पण जे इतरत्र आढळत ते इथेही, प्रेमवीरांची नावे ही या सोबत आहेत. ते एक असो.
(या मंदिराला ही ४ प्रवेशद्वारं आहेत. गोपुरं आहेत. फोटो जालावरुन साभार . मंदिरात मोबाईल आणि क्यामेरे न्यायची परवानगी नसल्याने आम्ही आतले फोटो नाही काढु शकलो)
रामेश्वरम मंदिरातला सुप्रसिद्ध भव्य कॉरिडॉर फोटो जालावरुन साभार |
उद्या आमच्या जीवाची धनुष्कोडी होणार होती. . .
क्रमशः