मंगळवार, १७ मे, २०१६

सरप्राइज सहल

सरप्राइज सहल
मला आणि नवर्‍याला भटकायची खूप आवड आहे. त्यात नवरा एकदम रेल्वेने भारावलेला आहे. अगदी एन्सायक्लोपीडिया म्हणायला हरकत नाही त्याला. आणि एवढ्या वर्षांच्या सहवासात आता ते वेड मलाही लागलंय. त्यामुळे वर्षातून एक मोट्ठी आणि किंवा २-४ छोट्या सहली ह्या होतातच आमच्या. एखाद्या ठिकाणी जाताना तिथली "टूरिस्ट अट्रॅक्शन्स" पाहतोच पण वेगळ्या/अनवट जागा पाहणे, त्या लोकांशी संवाद साधणे किंवा असच निसर्गाच्या सानिध्यात "टूरिस्ट अट्रॅक्शन्स" सोडूनच्या जागांमध्ये साधे चालणेही खूप आनंद देऊन जाते. त्यामुळे आम्ही जिथे कुठे फिरायला जातो तिथे थोडं गिरकीच्या मिस्टरी कुकिंग टाइप "सरप्राइज सहल" करतो. त्यामुळे आम्ही शक्यतो गाइडेड टूर्स करत नाही. सारं काही स्वतःच्या मनाप्रमाणे मन मानेल तसं भ ट का य चं.
सरप्राइज सहल आळीपाळीने ठरवली जाते. म्हणजे प्रवास कसा करायचा, काय पाहायचं वगैरे प्रत्येक सहलीला आमच्यापैकी एकजण ठरवतो व दुसर्‍याला ते शेवटच्या क्षणी सांगतो. घडाभर तेल ओतत नाही, डायरेक्ट माझा अनुभवच सांगते. म्हणजे बघा हं, आम्ही २-३ वर्षापूर्वी उटीला गेलो होतो तर तिथली सरप्राइज ट्रेल मी ठरवली होती. हॉटेलातून काहीही न ठरवता पायी पायी भटकलो होतो उटी.. असंच भटकत भटकत तिथल्या छान छान चर्चेस पाहिल्या होत्या, तिथली शेकडो वर्ष जुनी सिमितरी, आजूबाजूची घनदाट झाडी, तिथली शांतता ही मुख्य शहरातील कोलाहलापेक्षा खूप आवडली होती. तिथली घरही किती सुंदर!!!! घराभोवती फुलबागा पाहून डोळे निवलेच होते अगदी.

ऊटीतील काही जुन्या इमारती (आता शासकीय कार्यालये आहेत या इमारतीमध्ये)


building1
building2
building3

उटीतील शेकडो वर्ष जुनी ईगर्ज(चर्च) आणि सिमितरी

church1

हौशीने बांधलेली घरे आणि निगुतीने सजवलेल्या बागा!!

घरे
haushine sajavleli bag
haushine sajavleli bag2

त्यानंतरच्या वर्षी मैसूर-बंगळूर केलं. तेव्हा नवर्‍याने ठरवली होती ट्रेल. मैसूर स्टेशन ला चामराजनगर ची तिकिटं काढताना कळलं की कुठे जातोय. चामराजनगर मैसूरपासुन अंदाजे ६० किमी दूर आहे. मैसूर चे महाराज चामराज वडेयार -९ यांच्या नावावरून या गावाचे नामाभिधान झालेय. मैसूरहून लोकल ने इथे पोचायला सुमारे २ तास लागतात. अनेक पाहण्यासारखी ठिकाणे या गावापासून जवळ आहेत. लोकलमधला प्रवास ही मस्तच होता. आल्हाददायक वातावरणातली गाव, तिथली शेती आणि लोक हे सगळं पाहता आलं. चामराजनगर ला पोचल्यावर चामराजेश्वराच दर्शन घेतलं अन बाकी काही न पाहता नवर्‍याच्या आदेशाप्रमाणे तिथल्या बस स्टॅण्डला गेलो.

चामराजेश्वराच मंदिर आणि आवार.

chamarajeshvar temple
awar

मंदिराच्या आवारातल्या लाकडी प्रतिमा. जाणकारांनी याबद्दल जास्ती माहिती द्यावी.

kartikey

स्टॅंड वर बी. आर. हिल्स ची तिकिटं काटली. मधल्या काळात नेट मरत मरत का होईना थोडाफार जीव धरून होत. त्या जीवावर थोडं गुगलिंग केलं तर कळलं की बी. आर. हिल्स म्हणजे बिलिगिरी रंगनाथ हिल्स हे एक अभयारण्य आहे. तिथे आधी बुकिंग करूनच जावं लागतं आणि आम्ही तर कोणतंही बुकिंग केलं नव्हतं. म्हटलं बघू काय प्लान आहे तो. बस प्रवास सुरू झाल्यावर रेंज मेलीच. बेस्टच झालं एकदम. दोन्ही बाजूला गर्द हिरवी झाडी. मधूनच दर्शन देणारे वन्य प्राणी अस सुंदर दृश्य होत सार. मध्येच केम्मन्गुडी किंवा के.गुडी नावाची जागा लागली तिथे उतरलो.

अहो स्वर्गतुल्य जागा होती ही...

फोटो पहा बरं.

K GUDI1
K GUDI2
K GUDI3

हत्ती, हरिण असे प्राणी फिरत होते तिथे. जंगल ट्रेल मात्र बंद ठेवली होती त्यांनी. इतकं माणसांची भिती न वाटणारी तरीही न माणसाळलेली जनावर पहिल्यांदीच पाहिली. जनावरांच्या जवळ जायचं नव्हत. तरीही मी हरिणाच्या पाडसाला हात लावून जीवाची के. गुडी केली.

harin2

तिथल्या रिसॉर्ट मध्ये जेवण केलं आणि खूप भटकलो त्या जंगलात. असंख्य आठवणी आणि वेगळाच अनुभव जवळ घेऊन आम्ही जायच्या तयारीत होतो. पण अहो तिथे बस चे येणे जाणे काही खरे नव्हते. बस येते तेव्हा खरं. पण मग तिथे एक स्वामींचं मंदिर होत त्या पारावर बसून बस ची वाट पाहणं ही एन्जॉय केलं. पुढल्या वेळेस ह्या भागात टायगर सफारीला नक्की येऊ अस ठरवून बस पकडून परतलो. श्रींरगपट्टण मधल्या रंगनाथाच मंदिर पाहणं ह्याच्याइतकाच किंबहुना अधिकच आवडला हा ही अनुभव :)

माझ्या सासूबाईंचं आजोळ यल्लापूरला आहे. यल्लापूर हे कर्नाटकच्या उत्तर कन्नड जिल्ह्यातलं तालुक्याच ठिकाण. काही ना काही कारणामुळे आमचं तिकडे जाणं होतच असत. दरवेळेस आम्ही नॅशनल हायवे - १३ - अरबैल घाटमार्गे यल्लापूर ला जातो. एकदा असच पणजीसाबांना भेटायला जात होतो तर हेरंब रूट बदलून घेऊन गेला. तसाही अरबैल घाट महाबोर आहे त्यात त्या रस्त्यात भरपूर ट्राफिक असते हेवी लोडेड वाहनांची. म्हटलं बघू. तर हा इतका नयनरम्य रस्ता होता!!! काळी नदी रस्त्याला समांतर वाहते कदरा पर्यंत. कदरा गावात एक महामाया देवीच मंदिर आहे. मंदिर भव्य वगैरे नाही पण इथली एक पद्धत मात्र रोचक आहेत. इथे काम होण्यासाठी देवीच्या दारात तोरणं/कमान बांधण्याचा नवस बोलतात. आणि यामुळे या देवीच्या दारात खूप सारी तोरणं आहेत.

toran2

थोडंसं पुढे गेल्यावर काली नदीवर बांधलेलं कदरा धरण आणि जलविद्युत वीज प्रकल्प आहे.

reservoir1
dam1
reservoir 3

कदरा प्रकल्प जरासा मागे जात नाही तोवर कैगा आणि NPCI ( Nuclear Power Corporation of India) ची हद्द सुरू होते.
kaiga

तिथल्या गेटवरचे फोटो काढू दिले नाही सुरक्षा रक्षकाने. KGS समोरच्या छोटुश्या पोलीस चौकीत रीतसर तपासणी आणि नोंदी होऊन गाडीला पुढे जाऊ देतात. मग समोरचा घाट चढल्यावर एक पॉइंट येतो जेथून अणू ऊर्जा प्रकल्प अगदी नीट दिसतो आणि ठीक तुमच्या डोक्यावरून हाय टेन्शन पावर ट्रान्स्मिशन केबल जातो त्यावर मॉइश्चर असेल तर एक क्रॅकिंग आवाज येतो तोही मस्त वाटतो ऐकायला.

kaigaprakalp

रस्त्यात अनेक छोटे मोठे धबधबे लागतात.
waterfall

अरुंद घाटरस्ता.

arund ghatrasta

यल्लापुर च्या छोट्या खेड्यात. (नाव विचारू नका बॉ. नाही समजत अजून)

gaav1

गावातल्या वीरभद्र मंदिरातील मूर्ती

virabhadra mandir
nandi
koli
kusakid

आवारातला जुनाट खांब. आता पाण्याच्या नळाचा आधार झालाय.

junat khaMba

साबांच्या आजोळच्या घरच्या दरवाज्यावरची कलाकुसर.

darwaja
tambyacha sathavanukicha bhanda

यल्लापुरला यक्षगान नावाचा एक लोकनाट्याचा प्रकार प्रसिद्ध आहे. दिवाळी आधी ८ दिवस तिथे यक्षगानाचा उत्सव असतो. आज्जेसासरे अगदी सत्तरीतही यक्षगानात काम करायचे. त्यांची खूप जुनी सामग्री.
हे नैसर्गिक रंगांनी रंगवून खांद्याला बांधतात

khaaMdala bandhatat

हे गळ्यातलं.

galyatla

हे मनगटाला बांधायचं. हे तिरफळाच्या झाडाच्या काट्यांपासून बनवतात.

mangatala bandhaych

ही सांस्कृतिक शिदोरी आणि अनुभव यांनी समृद्ध होऊन घरी आले त्या ट्रीप मधून.

हल्लीच म्हणजे गेल्या सप्टेंबरात अमृतसरात जाणं झालं. ह्याला कारणीभूत सर्वसाक्षी काकांचा हा धागा. हा धागा आल्यापासून प्लॅन बनवून फायनली आम्ही अमृतसरात पोचलो. इथली सरप्राइज सहल मी ठरवणार होते. म्हणजे भटकंती + खादाडी + खरेदी असा जंगी प्लान मनात ठरवूनच आले होते मी. मस्त निवांत अमृतसर पाहून, सुवर्णमंदिरात माथा टेकून आणि मुख्य म्हणजे खरेदी आटोपून आम्ही हॉटेलवर परततच होतो की एका सायकलरिक्षावाल्याला सायकलरिक्षा चालवण्यासाठी रस्ता पुरेनासा झाल्याने माझ्या नवर्‍याच्या पायावर सायकलरिक्षा घालावी लागली. याला चालता येईनासे झाले. मग कसेबसे डॉककडे जाऊन आलो. महान डॉक ने फ्रॅक्चर बिक्चर नाही असे सांगितले. मलमपट्टी केली, पेन किलर्स दिल्या अन २४ तास रेस्ट घ्या म्हणाले. तरच वाघा बॉर्डर ला जाऊ शकाल. माझे मनचे मांडे मनातच उरले अन सगळी इतर भटकंती रद्द केली. किमानपक्षी अटारी-वाघा बॉर्डर बघून यावे ही इच्छा होती.

मग नवर्‍याला संचारबंदी लागू करून मी अजून थोडी खरेदी केली ;) . मी येईस्तोवर इकडे "बदला" घ्यायचे ठरले होते म्हणून दुसर्‍या दिवशी मी लागू केलेली संचारबंदी रद्दबातल ठरवून मला लोकल ने फिरायचंय आणि आपण जायचं असा खलिता माझ्यापर्यंत आला. मी विचार केला स्टेशनपर्यंत कारने जाऊ, काय ते लोकलने फिरू अन परत कार ने वापस. पायाला कमीतकमी त्रास. घाटे का सौदा नही हय. म्हणून मग हा प्रस्ताव मान्य करण्यात आला.

स्टेशनवर याने डेरा बाबा नानक ची तिकिटे काढली आणि लोकलमध्ये बसून आणि लोकल सुटल्यावर मला दाखवली. पायाला भिंगरी लागलेला हा माणूस माझं न ऐकूनही माझं ऐकणार होता आणि मला फक्त याच्या पायाच्या चिंतेमुळे नको होत. असो. आता उपायच नव्हता. गाडी सुटली होती. तर मग हा माझाच प्लान असल्याचे त्याच्यापासून लपविण्याचे ठरवून मी प्रवास एन्जॉय करायचे ठरवले.

डेरा बाबा नानक ला पोचेस्तोवर ही लांबच्या लांब भातशेती, त्याचा एक वेगळाच ओळखीचा सुगंध आणि गर्द नीलगिरीची झाडी पाहून डोळे गार्गार होतात.

bhatsheti१

ही रेलवे लाइन (अमृतसर-पठाणकोट लाइन) ब्रिटिशकालीन आहे. फाळणी नंतर डेरा बाबा नानक ला स्टेशन बनवण्यात आलं.

fattehgadhchoodiya
shet2
nilgiri

डेरा बाबा नानक मधील संध्याकाळ
dbn sandhyakal    /></p>
<p>आम्ही स्टेशनला उतरून इकडे तिकडे बघेस्तोवर तिथली एकुलती एक ऑटो खच्चून भरून निघालीसुद्धा. मग आम्ही आमच्या पायांना कामाला लावून असच एका पायवाटेने फिरत जाऊ लागलो. दूरवरून लोक आम्हाला पाहत होते आणि आम्हाला ते विचित्र वाटत होत. मग एक आजोबा आम्हाला त्या वाटेत भेटले म्हणाले

गावातले काही प्रचि
gav1
dbn madhil flowersheti

तिथे पोहोचेपर्यंत हेरंबचा पाय ऑलमोस्ट डब्बल सुजला होता आणि तरीही या बाबाला आराम करायचा नव्हता. गुरुद्वारात माथा टेकवून त्याला हट्टाने तिथेच बसवून आजूबाजूला काही वाहन दिसते का याचा मी शोध घेतला तर त्याचा ही पत्ता नव्हता. शेवटी एका दुकानात एक पंजाबी मुंडा होता, त्याने त्याच्या लहानग्या बहिणीची सायकल दिली. त्या सायकल लाही ब्रेक नव्हते. पण काही तरी साधन मिळाल होतं. प्रत्येक क्षणाला हा प्रवास अजून उत्कंठावर्धक होत होता.

(त्या सायकल आणि त्या वीरजीचे फोटो वगैरे काढायचं सुचलंच नाही :( ) ह्या सायकल ने आम्ही डेरा श्री चोलपूर पर्यंत गेलो. बॉर्डर जवळ खाजगी वाहन नेऊन देत नाही. चालत जावे लागते. पण BSF चे जवानांनी आमची स्पेशली हेरंबची हालत पाहून आम्हाला थेट बॉर्डरपर्यंत सायकल नेऊ दिली. मी पाहिलेली पहिली भारत-पाक सीमा!!!! BSF च्या एका जवानाने आम्हाला (त्याच्या) बायनोक्युलर ने पलीकडे पाहू देखील दिले. अंगावर नुसते काटे आले. नक्की काय वाटलं हे शब्दातीत आहे.

आपल्याकडलं

aplyakadla
aplyakadla1
aplyakadla2

पलीकडलं

palikadla1
palikadla2

फाळणीच्या वेळी, भारत-पाक सीमेजवळ ३ गुरुद्वारा होते ज्यांना ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व होत. त्यातील २ आज भारतात आहेत तर एक पाकिस्तानात. ह्या पाकिस्तानातील गुरुद्वारात गुरु नानक देवांनी त्यांच्या आयुष्यातील अखेरची काही वर्षे व्यतीत केली. डेरा बाबा नानक आणि डेरा चोलसाहिब ह्या २ गुरुद्वारा भारतात आहेत. श्री करतारपूरसाहिब ही गुरुद्वारा करतारपूर ह्या पाकिस्तानातल्या गावात असून, Army ने ही गुरुद्वारा किमान पाहता यावी म्हणून डेरा बाबा नानक-करतारपूर बोर्डर वर १९९८ साली एक viewpoint उभारून दिलंय. अनेक भाविक येतात आता दर्शन घेण्यासाठी.

करतारपूरसाहिब ला माथा टेकवला, आणि श्री चोलसाहिब ला आलो. तिथून बाहेर पडताना तिथल्या १-२ काकांशी बोलणं झालं. त्यातून त्या लोकांचे आणि BSF चे एकमेकांशी किती छान संबंध आहेत हे कळलं. त्या काकालोक्स नी आम्हाला मस्त चिडवून घेतलं आणि आम्ही परतीला निघालो. पुढची स्टोरी नाही सांगत, पण यार आपली BSF आणि जवान खूप काही करतात सीमांचं आणि लोकांच संरक्षण करण्यासाठी हॅट्स ऑफ... (या स्टोरीज एका जवान मित्रामुळे समजल्या. त्या कुठेही पब्लीश / स्प्रेड न करण्याच्या अटीवर सांगितल्या असल्याने मी इथे लिहीत नाहीये)

हा अत्युच्च क्षण होता माझ्यासाठी त्याला तसाच ठेवण्यासाठी माझं सहलपुराण इथेच थांबवते. पुढली सहल कुठे घडते ते बघूच.

(नवर्‍याच्या पायाला फ्रॅक्चर होत हे घरी आल्यावर पुन्हा चेकप केलं तेव्हा कळलं. त्यामुळे ह्या आणि एकूणच ट्रीप चं पूर्णं श्रेय हे हेरंबला आणि म्हणून हा लेख हेरंबला आणि त्याच्या सोशिकपणाला डेडिकेटेड. )

शनिवार, १९ मार्च, २०१६

माजे मामात्यांच्यो गजाली

नमस्कार

मिसळपाव.कॉम "मराठी भाषा दिन २०१६" चे निमित्तान मराठी बोलीभाषा सप्ताह साजरो करीतसे, अणि हें सप्ताहांत माज्या बोली भाषांत कितां तरी ल्हेंणार हें येवजोनीच आंगावर काटो फुलसे. पण एठा माजो हो चित्पावनी भाशांतलो पयलोच लेख म्हणटकत ह्या भाशाबद्दल थोडांसाच ल्हेंणार असां मनात सलां पण आदी ठरयलां माजे पणजीआज्याबद्दल ल्हेन पण त्याचेबद्दल में महिलादिन अंकात ल्हेला से मराठ्यांत तशी मग दिसलां माजे मामात्यांच्यो गजाली तुमला सांगेव्यो. तसां तुमी बालकांड वाचलां सेल ते तुमला थोडो नमुनो बघे गावलो सनार. तुमला हो लेख आवडलो जाले अजुनीय ल्हेंव शकसां.

 हो लेख माज्या स्व. पणज्याच्या स्मृत्याला अर्पण. केंथीनतरी ती माला बघीत सनारच.

धन्यवाद.

माजे मामात्यांच्यो गजाली 

चित्पावनी भाशा ही आमची चित्पावन ब्राह्मणांची भाशा. आमचे पुर्वजांना खे भगवान परशुरामान चितात्थीन पावन केलेले म्हणीं आमी चित्पावन अणि आमी बोलसों ती भाशा चित्पावनी. चित्पावनीला लोक मराठीची बोली भाशा म्हणसत , विकिपीडिया कोकणीची बोलीभाशा म्हणसे खे, पण आमला शेंटभरय फरक पडत नाय. आमी त्याला वेगळी भाशा मानसों अणि त्याला पुढल्या पिढ्यापावत न्हेनार.

 चित्पावनांचा मुळ स्थान कोकण. पण कोकणात कार्रोय जरी सोदे गेलात तर चित्पावनी येत सलेलां एकय बोडुक गाववेचां नाय तुमला. मात त्याहांथीन स्थलांतर करनी भायेर सरलेले लोकांनी मात्र बहुत करनी आपल्या भाशाला जपलेनी. आमचे गोवेंत, कर्नाटकांत, त्या हिमाचलांत, मध्य प्रदेशांत हेंच कितेला सातां समुद्रापेलतडीसुद्दा लोक आपली भाशा जपोनी सत. माजेच खूप मित्र सत मा़जेशी ह्या भाषांत बोलणारे. माजी एक चुलत सासू शिरश्याची. त्याला कन्नड येयल हें मत्यांत सलां. पण ही चित्पावनी बोलेल म्हणी में येवजलाच नतलां अणि त्याणीय बी चितलां नाय माला चित्पावनी येयल म्हणीं. त्याचेशीं भटी भाशांतच बोलत सल्यां पूरी दोन वर्खां. गेले डिसेंबरांत त्याची आई आमचेत्यां आयली सली. त्यो दोघी चित्पावनी बोलों लागतकच कांखांतलो कळसो गावलो असां जालां माला. एतां आमी दोघीय चित्पावनीतच बोलसों. ती कर्नाटक वर्जनांत अणि में गोवेंचें वेष्टनांत. :) बघितलां नी, सांगनार सल्यां कितां अणि पावल्यां कें ती?

तर आज में माज्या मामात्यांच्यों गजाली सांगनार सां. पण ही हरदासाची कथा कारीय पावली जाले मूळपदावर हाडा हां.

मामात्यां जाणां हो जास्तीसे भुरगेंच्या ल्हानपणातलो एक आनंदाचो भाग ससे. माज्याय सलो- अजुनीय से. आईन खे माजी नाळ मामाचे दारातले पायर्‍यांत पुरलीन से म्हणीं बाकीचे लोकांपेक्षा माजो मामाहारीं जास्ती ओढो असां आजी म्हणसे. मामान तां घर विकूनी नवा घर बांधलान तांही चखोट से पण मामाचां घर म्हणतकच जुनां घरच येसे पुढेंत.

मामाचां घर सह्याद्रीचे कुशीत वसलेल्या सुंदरसे गावांत से. गावांतले एका टोकाला , भटवाड्यांत आमचां घर. रस्तेवेल्ल्यां खालतो उतरुं लागलो का एक कौलारू घर दिससे. नळेंवर कांबी घालनी बेडे सुके घायले सत. पुढेंत मोठांसा सारयलेला खळां. तेचे मेराला तरातरांची फुलझाडां. अणि खळेवर माटव. माटवावर सुकवणां. त्याहांच बाजूला मोठ्या पेड्याचां तुळशी वृंदावन . तेला लागोनी प्राजक्त. सकाळी पुढां तेचो पडणारो सडो अणि तीं फुलां वेचणार्‍यो दोन चेडी. में अणि शुभुताई - माजी मावसभेणिश. खळेपुढां विहीर अणि तेला लागोनीच न्हाणी अणि लाकडां थेव्वेचो मांगर/ खोप. घराचे उजव्या वाटान थंडगार ठिकाण. माजे आज्यान, दादान, मावश्यान अणि आईन कसलेलां!!!!

हें घरात केडलाच गरमी हत नाय. एक तर नित्यानि शिपणी हत सलेलां ठिकाण अणि दुसरा म्हणजे नित्यानि शेण-पाणी केलेली जमीन.घरांत भीतर सरताना डाव्या वाटाला लांबच्यालांब पडवी लागसे. मग मुख्य साल, तेलाच लागोनी जेववेचां साल अणि मग तेला लागोनी अणि दोन सालां अणि आत्वार. मागीलदारा सुंदर स्वच्छ गोठो. तेंत मायान पोसलेली गोरवां. अणि असे हे घरांतली मायाळू मनशां.

  में शाळाची रजा सुरू हयवेचे आधी आईबाबांशी हट्ट करनी मामात्यां जाववेची तारीख आधी पक्की करनी घेव्वेची अणि मग धूम ठोकेची मामात्यां. बशीत्थीन प्रवास करताना ते दोन तास केडला एकदा सोपसत असां हत सलां. घराशी पावतकच आद्दी पयली आज्याचे कुशीत जाववेचां मग खायल्या खोल्यांत पणजीआजीशीं. आजी-दादा (दादा म्हणजे माजो मोठो भाउश बी न्हूय हां, माज्या आईशीचो बापूय तो) कडथीन "राणी" आणि पणजीआजीचे तोंडात्थीन "आयलीस का गो गंगू" अशी साद आईकतकच कान निवोनी जात.

 मग आजीन केलेली गुळेणी - चपाती नाय ते खोबरेची कापां असां कितांयतरी आजी स्पेशल खाणां खायवेचीं , माजरां, कुत्रीं गोरवां हेंचेबराबर बागडेचा. शुभुताई र्‍हेव्वे आयली का मग भातुकली , लपाछपी, क्रिकेट, नाटक असले कसलेय खेळ खेळेचेच पण सक्काळी केर-वारो जालेनंतर प्राजक्ताचीं फुलां पुंजावनी रांगोळी घालतानाय मजाच येत सली. मामात्यांची सकाळ उजाडे मनुमुळां. मनु आमचो बोकलो. ६ वाजलेउप्रांत निदव्वेच देत नसे. मग उठोनी तोंड-पाणी धोवनी पणजी आजीकडा जावनी बेसेचां. ती चित्पावनीत माला गजाली सांगे, माला खूप ल्हान सताना चित्पावनी येत नतली. आई-बाबा मराठीत बोलत सलीं माजेशी. पण ती जां कितां बोले तां कसां कोण जाणे समजत सलां अणि में मराठीत उत्तरां देत सयन. हळू हळू त्याचे कडा बोलनी बोलनी माला चित्पावनी येंव लागली. सद्या हो मुद्दो नाय म्हणे सो तेडा. सांगत कितां सल्यां में? पणजी आजी तिच्यो गोष्टी सांगे, कई त्याची जीवनकथाय सांगे. त्या वयावर कळत नतलां पण एतां मोठी होतकच कळसे ती केडला कितां अणि कितेला सांगत सली तां. मग खाववेची वेळ होतकच तांदळाची भाकरी, नासणेंची भाकरी, गव्हांची भाकरी, जोंधळेंची भाकरी अणि तेचे बरोबर भाजी किंवा दहीं किंवा लोणचां असां किंतायतरी अथवा उसळे, पानगे, पहु असां कितातरी खावनी घरचे जाणटे लोक कामाला जात. आमीयबी तेंचेबरोबर ठिकाणात जाले ठिकाणात नायते काजीनी.

ठिकाणात माड्यो, नारळ, पणस, आंबे, पेरां ,भिंडां, हेंचेबराबर जायफळ , वेलची, मिरवेली, पानवेली, तरातराच्यो जास्वंदी, गोकर्णां, अगस्त अणि अनेक औषधी झाडांय सली. तेंचो उपयोग आमचो दादा जाणे सलो. कोणालाय कितांय जाला जाले प्रथमोपचार करताना पयली लोक दादाशीं येय. दादान सांगलेली ओखदां करनी लोकांना गुण पडे. दादान सांगलान अमके एका रोगाला माजेलागी ओखद नाय जाले लोक रोग्याला हास्पीटलांत न्हेत.

मे मासाचे सुट्यांत चंगळ हय. माणकुराद आंबे, घोंटा, मुट्टे, पणस, काण्णां असो तरातराचो रानमेवो खायवे मिळे , मज्जाही खूप करे गावे. एरवी चवतीशीं नायते नाताळाची सुटी रोकडीच सरोनी जासे .

साधारण बारा वरांवर आजी आमला न्हावनी घ्या म्हणी पाठी लागी. आमला आमचे ठिकाणातले कोंडींत न्हाववे जाववे आवडे पण ह्याला काळजी पोरांना कितांय जालां जाले? तोरेचां पाणी बादलां जाले? मग ती जांव देत नतली . ती शापच आईकत नाय जाली जाले मग स्प्रिंक्लरांचे पाण्यान न्हाव्वेची मांडवली हवनी आमी ठिकाणात न्हात सलों. २-३ तास आरामात पाण्यात मजा करेची, मग थाळीशी जांवनी गरम पाण्यान न्हावनी घरांत सरेचां. जर नशीब बरां सेल जाले बांदावर न्हाव्वे गावे, तेडला मज्जाच मज्जा. (बाबु) मामा, बाबीमाउ, शुभु ताई, बाबु अणि में इतकी सगळी जणां बांदातले कोंडीत खेळत सलों. मामान ह्या कोंडीतच पव्वे शिकयलान माला. :)

दुपारी आजी बरांसा रांधोनी थेवी अणि आमला गरम गरम वाढी. बरांसा रांधी म्हणजे हाय-फाय खाणां न्हूय हां. जां सामान घरात से तेचां साबांरा-भात भाजी रांधेची. त्याचे हातांत त्याच्या आईची चव से. त्याणीन पाण्याला जरी फोडणी दिली अणी तां पाणी सांबारा म्हणी घेतलां जाले अप्रतिम लागनार असां माला दिससे. जेवतकच सगळेंनी ओग्गी निदववेचां तासभर. तो तास सोपतच नसे. मग सगळीं निदवलीं काय हळूच भायेर सरोनी खळेंत खेळेंचा. केडला केडला ठिकाणांत लोकाची गोरवां बी येत सली शक्यतो चिचाहारली वय मोडणी. मग घरातलेंना जागी करनी गोरवांना आंबडे धाव्वेचीं सगळींच. मग सरली नीज सगळेंची. सांचे मायतेन ती वय कुडोनी घेव्वेची. मग घराशी येसों जाले पणजी आजीचे दोणे, पानां, वाती वेगवेगळे वेष्टनांनी बांधनी तयार तेंना सकाळी बाजाराला धाडेची तयारी ती. मग हात-पाय धोवनी परवचा म्हणेची. मग आजीकडथीन काणी आयकत आयकत जेयताना ताट केडला निवळ हय अणि नीज केडला येय हेंच कळत नसे. दुसरे दिवसाच जागी हवनी "अरे केडला निदवल्यां मे? बाबु तू जागो सलोस रे सगळी काणी सोपेसर?" बाबुय निदवलो खे. आजीची काणी इतके लांब!! सोपतच नतली केडला. केंथीन हाडी ती इतक्यो काण्यो म्हणी नकळे. ते काण्यांनी गाणीं सत सलीं. एक दोन गाणी अजुनीय येवजसत. एतां ती ८० वर्खांची आजी माजे मामाचे ५ वर्खांचे बोड्येना सांगसे काण्यो.

एतां हे दिवसांची आठवण येसे, कारण तां घर एतां आमचां नाय हें एक जाला अणि नोकरी -घर संभाळनी मामात्यां खूप खेपो हत नाय. पण पणजीआजी, आज्जी-दादाची आजन्म ऋणी सां तेंचेमुळां इतके मजाचां बालपण मिळ्ळां माला.

 कठीण शब्दांचे अर्थः
सलां = होतं.
सांगेव्यो= सांगाव्यात
सनार=असणार
शकसां= शकेन
केंथीन=कुठुन
कार्रोय =कुठेही
सत =आहेत
शिरश्याची=शिरशीची(शिरशी या गावची)
येवजलाच नतलां = विचारच केला नव्हता
वर्खां=वर्षे
आमचेत्यां = आमच्याकडे, त्याचप्रमाणे मामात्यां=मामाकडे, तुमचेत्यां = तुमच्याकडे इ.
 हाडा =आणा बे
डे=सुपार्‍या
खळां= अंगण
माटव=मांडव
भेणिश=बहिण
भाऊश=भाउ
आत्वार=स्वैपाकघर
सोपसत =संपतात
र्‍हेव्वे =रहायला  त्याचप्रमाणे ल्हेव्वे=लिहायला, खायवे=खायला, जेववे/जेव्वे = जेवायला, पव्वे=पोहायला केडला = कधी
तेला =त्याला, तसच हेला=ह्याला. माला=मला
खायल्या =खालच्या
सयन=असेन
कई =कधीतरी
कितां =काय
पहु=पोहे
ठिकाण=कुळागर
माड्यो=माडी च बहुवचन. माडी=पोफळीच झाड
पणस=फणस पेरां= पेरू भिंडा=कोकम
ओखद्=औषध
तोरेचां पाणी = गोड्या पाण्यात मासेमारी करताना एक प्रकारची फळ वापरतात. त्यामुळे ती फळं वापरली की पाणी बाधत. तश्या पाण्याला तोरेचां पाणी म्हणतात
सांबारां=आमटी
चिचाहारली = चिंचेकडली __हारी=__कडे वय =झाड्या-काट्या-कुट्यांच कुंपण आंबडणे=हाकलणे बोड्यो=मुलगा

शुक्रवार, ३० ऑक्टोबर, २०१५

आमच्या गोंयची दिवाळी

सामान्य गोवेकर तसा उत्सवप्रिय. गोव्यातली हिंदू जनता आपल्या एका आगळ्यावेगळ्या 'गोंयकारपणाने' वर्षभर अनेक सण साजरे करते. ह्या सणवारांमध्ये स्थानिक जत्रा, पालखी उत्सवसुद्धा समाविष्ट आहेत, जे शतकानुशतकं साजरे केले जातात. देवाचे उत्सव साजरे करणं आणि त्यात सहपरिवार भाग घेणं हे इथल्या लोकांच्या संस्कृतीचा एक भाग आहे.

बर्‍याचदा देवाच्या/देवीच्या जत्रांना (किंवा अगदी घरातल्या पूजा वगैरेचं आमंत्रण दिल्यावर) ख्रिश्चन जनताही भक्तिभावाने देवाचे आशीर्वाद घ्यायला जाते. फातर्प्याच्या शांतादुर्गेच्या देवळात किंवा शिरगावच्या लईराईच्या जत्रेला किंवा म्हापश्याच्या मिलाग्रीच्या फेस्ताला हिंदू आणि ख्रिश्चन तीच श्रद्धा घेऊन जाताना दिसतात.
गणेशचतुर्थी, गुढीपाडवा, दसरा, दिवाळी, होळी, रामनवमी, रक्षाबंधन, कृष्णजन्माष्टमी असे अनेक सण इथे साजरे होतात. अर्थात गणेशचतुर्थीचा म्हणजे चवथीचा नंबर अगदी वरचा असतो. सगळ्यांचं सगळ्यात आवडतं दैवत आणि सण. अगदी देश-विदेशात असलेला गोवेकर चवथीला घरी पोहोचायचं बघतो आणि मग घरांना घरपण आणि गावांना गावपण येतं. चवथ-माटोळी, करंज्या-मोदक वगैरे धम्माल असते. मग येते दिवाळी.

दिवाळी - प्रकाशाचा उत्सव!!! 'अंधाराकडून उजेडाकडे जा' असं सांगणारा. वाइटावर चांगल्याच्या विजयाचं प्रतीक असणारा हा सण. श्रीकॄष्णाने नरकासुराचा वध करून लोकांना राक्षसी राजवटीतून मुक्त केलं, म्हणून हा सण साजरा करतात. हाही सण एका वेगळ्याच प्रकारे इथे साजरा होतो. दसरा झाल्यावर दिवाळीचे वेध लागू लागतात, कारण वेगवेगळा फराळ बनवणं ह्याच सुमाराला सुरू होतं. चकल्या, लाडू, चवडे, चिरोटे, चिवडा, कोहळ्याच्या, बिटाच्या, गाजराच्या, डाळीच्या अशा वेगवेगळ्या (गोड) वड्या असा जंगी फराळ बनवणं सुरू असतं, तिथे पोरं-सोरं दुसरीकडे नरकासुराच्या प्रतिमा बनवण्यात मग्न असतात. दिवाळीच्या आदल्या रात्री ह्या प्रतिमेची आणि श्रीकृष्णाच्या मूर्तीची गावात मिरवणूक असते आणि पहाटे आम्ही त्याचं दहन करतो. ठिकठिकाणी नरकासुर आणि श्रीकृष्ण प्रतिमांच्या स्पर्धासुद्धा असतात, त्याही बघायला मज्जा येते. लहानपणी आईबाबा मला नेहमी घेऊन जात या स्पर्धा पाहायला. ते एक असो. दिवाळीच्या आदल्या दिवशी न्हाणीघर खास धुतलं-पुसलं जातं. *'थाळी'वरच्या **'भाणा'ला उतरवून त्याची काळोखी घासली जाते. त्याच्या गळ्यात झेंडू अन कारीटांची माळ घातली जाते. त्यावर चंदनाचे पट्टे ओढून त्याला पुन्हा न्हाणीवर ठेवून सभोवती माती लिंपली जाते. न्हाणीघराला आंब्याच्या पानांचं तोरण चढतं.

narakaasur
* जालावरून साभार
(narkasur goa असं गुगलून पाहिल्यास असंख्य फोटो दिसतील, ज्यात नरकासुर बनण्याच्या प्रत्येक स्टेप्सचे फोटे असतील)

नरकासुर दहन करून घरी आल्यावर आम्ही आकाशदिवे लावतो आणि पणत्यांनी घर-अंगण-तुळस उजळवतो. थोडं उजाडल्यावर घरच्या पुरुषांना आणि लहानांना त्यांच्या आया आणि बायका तेल-उटण्याचं मालिश करतात आणि मग सगळे आंघोळ करतात. घरच्या बायका जरा लवकरच आंघोळ करून तयार होतात. मग आरती होते आणि बायकांना नवरे छानशी ओवाळणी देतात. यानंतर घरचा प्रत्येक सदस्य कारीट पायाच्या अंगठ्याने फोडतो अन दोन बिया स्वतःच्या पोटात घालतो.

इथे दिवाळीला कृष्णाचे आवडते पोहे खायची आणि खिलवायची पद्धत आहे. पोह्यांचे किमान पाचतरी प्रकार हवेतच. बाकी तुम्ही काहीही केलंत तरी चालेल. आपल्या घरी पोहे खायचे आणि दुसर्‍या घरी खायला जायचे. माझ्या माहेरी आमची दोन आवळीजावळी गावं आहेत. आपसात ठरवून एका गावात एका दिवशी, तर दुसर्‍या गावात दुसर्‍या दिवशी पोहे असतात. दोन्ही गावचे लोक दोन्ही गावच्या प्रत्येक घरात पोहे खातात. आमच्या गावात आमच्या घरापासून पोहे खायची सुरुवात होते. आम्ही ताट-पान, पाणी, रांगोळी, सुपारी सगळं करून तयार असतो. ग्रामदेवी भूमिकामायेचा कळस कौल देऊन जातो अन मग पोहे सुरू. वाढल्यावर लोक पानावर बसतात. मग सगळ्या पंगतीची आरती होते. पोहे खाल्ले जातात आणि सगळे दुसर्‍या घरी पोहे खायला जातात. दिवसभर नुसते पोहे!!!!
paan
फोटो: माझ्या सासरचं गेल्या वर्षीच्या दिवाळीचं पान. (हे दु:खाच्या दिवाळीतलं असल्याने फक्त १५-१६ प्रकार असतील.)

माझ्या सासरी थोडंसं वेगळं आहे. आमच्या वाड्यावर इन मीन सात घरं. मग आम्ही सगळे दसर्‍यानंतर ठरवतो की यंदा दिवाळी कुठे वाढायची. घर फायनल झालं की प्रत्येक जण आपापला जिन्नस फायनल करतो. दोन वर्षांपूर्वी माझी लग्नानंतरची पहिली दिवाळी होती, तर पानात तब्बल ३५ वेगवेगळे पदार्थ होते!!! या पदार्थांमध्ये थोडे पारंपरिक, थोडे स्वतःच एक्स्पीरिमेंटिंग करून बनवलेले असे भ आणि र आणि पू आणि र पदार्थ असतात. काहीच पदार्थ सांगते हं - म्हणजे गोडाचे फोव, तिखशे फोव, ताकाचे फोव, कडीचे फोव, फोण्णे फोव, पाकातले फोव, फोंवा खीर, रोसा फोव, फोवा चिवडो, काकडीचा कायरस (कोशिंबीर), कच्च्या केळ्याचं पंचामृत, झालंच तर इतर गोड फराळ - जिलबी, गुलाबजाम वगैरे. आणि वाटला अंबाडा नाही हं विसरायचा. हां हां, ही अंबाड्याची पालेभाजी नाहीये बरं का, अंबाडा हे एक आंबट फळ आहे. आणि मग सरतेशेवटी जिरवणीला लसणाशिवायची सोलकढी.

हे असं सगळं दिवसभर तब्येतीने खाल्ल्यावर असली झोप येते म्हणून सांगू महाराजा! मग 'जरा' पडणं होतं आणि मग आहेच लक्ष्मीपूजन आणि इतर दिवाळी. पण मुख्य आकर्षण पोहेच!!!!.


*थाळी - न्हाणीघरातली आंघोळीचं पाणी तापवण्याची मोठी चूल.
**भाण - थाळीवर पाणी तापवण्यासाठी वापरायचा भलामोठा हंडा.
***फोव = पोहे


बरं, रेसिप्या हव्यात का?
घ्या बरं लिहून..


गोडा फोव
साहित्य :
लाल गावठी पोहे १ वाटी
तूप १/४ वाटी
गूळ १/४ वाटी
ओलं खोबरं बचकभर
चवीपुरतं मीठ
कृती
सर्वात आधी गुळाचा पाक करून घ्यावा. पाक साधारण होत आला की पोहे धुऊन निथळून घ्यावेत. पाक झाल्यावर हे धुतलेले पोहे त्या पाकात घालावे आणि परतून घ्यावे. ओलं खोबरं, तूप घालावं आणि पुन्हा परतून घ्यावं. सरतेशेवटी चवीपुरतं मीठ घालून नीट ढवळून घेऊन पाकृ गॅसवरून उतरावी.
ताकाचे फोव
साहित्य :
लाल/ पांढरे गावठी पोहे १ वाटी
ओलं खोबरं १ वाटी
ओल्या मिरच्या २
आलं अर्धा इंच
जिरे १/४ चहाचा चमचा
हिरवी मिरी ४-५
दही २ वाट्या
मीठ चवीपुरतं
साखर चवीपुरती
sahitya

कृती :
पोहे धुऊन घ्यावे. ओलं खोबरं, मिरच्या, आलं, जिरं, मिरी मिक्सरमधून बारीक आणि दाटसर वाटून घ्यावं. हे वाटण पोह्यात घालावं. चवीपुरती मीठ-साखर घालावी आणि व्यवस्थित मिश्रण करून घ्यावं आणि आपल्या आवडीप्रमाणे त्यात दही घालावं. मला ह्या रेसिपीत खूप दही आवडतं.
tayar

रोसातले फॉव
साहित्यः
पांढरे पोहे १ वाटी
गूळ १ वाटी
वेलची दाणे ६-७
ओलं खोबरं१ वाटी
मीठ चवीपुरतं
कृती :
पोहे धुऊन घ्यावे व थोडा वेळ निथळत ठेवावे. ओल्या खोबर्‍यात वाटीभर पाणी घालून त्याचं दाट नारळाचं दूध काढून घ्यावं.
आता ह्या दुधात गूळ विरघळवून घ्यावा आणि वेलदोड्यांची पूड करून त्यात घालावी (ताजी असल्यास जास्त छान वास येतो).
आता पोह्यात थोडं पाणी घालून ते मध्यम आचेवर शिजवून घ्यावेत. ह्यात गूळमिश्रित नारळाचं दूध घालावं व दोन मिनिटं शिजू द्यावं. चवीपुरतं मीठ घालून पोहे गॅसवरून उतरवावे आणि सर्व्ह करावे. रसातले पोहे :)
** नारळाचा रस असलेले पदार्थ जास्त वेळ शिजवू नये. दूध फाटण्याची शक्यता असते.

वाटला अंबाडा
अंबाडे १०
ओलं खोबरं १ वाटी
हिरव्या मिरच्या २-३
हिंग १/४ चहाचा चमचा
गूळ सुपारीएवढा
मीठ चवीपुरतं.
अंबाडे
aMbade

कृती :
अंबाडे शिजवून घ्यावे. ते शिजत असताना एकीकडे ओलं खोबरं, मिरच्या, हिंग, गूळ यांचं दाट पण बारीक वाटण करून घ्यावं. शिजवलेल्या अंबाड्यांत हे वाटण आणि मीठ खालून आंबाडे थोडेसे मुरडून घ्यावे आणि थोडा वेळ ठेवून मग सर्व्ह करावं. अंबाडे मुरडताना : अंबाड्याला काथा असतो, त्यामुळे सांभाळून.. फक्त वरची साल असते, ती एडिबल असते आणि ती थोडी थोडी साल वाटणात मिक्स व्हावी अशा पद्धतीने मुरडावं.
vaTalaa aMbaaDaa

मंगळवार, २२ जानेवारी, २०१३

आमचे गोंय - भाग ७ - स्वातंत्र्यलढा २



***
गावड्यांचे शुद्धिकरण

पोर्तुगीज मिशनर्‍यांनी पोर्तुगीज सरकारच्या आश्रयाखाली आणि ख्रिश्चन जमीनदारांच्या चिथावणीने हजारो गावकर्‍यांन बाटवून ख्रिश्चन केले होते. पण या गावकर्‍यांची आपल्या मूळ हिंदुधर्मावरील निष्ठा पिढ्यान् पिढ्या अविचल राहिली होती. त्यांची नावे बदलण्यात आली होती. त्यांच्या मुलांना बाप्तिस्मा देण्यात येत असे. पण ते चर्चमधे जात नसत. आपल्या घरांमधे गुप्तपणे हिंदु धर्माचे पालन करीत.गोव्यातील युयुत्सु पुढार्‍यांनी या गावड्यांना शुद्ध करून हिंदु धर्मात परत घ्यायचे ठरवले. गावडे समाजातिल लोक सरकारी अधिकार्‍यांच्या आणि जमिनदारांच्या धाकाला भीक न घालता हिंदुधर्मात प्रवेश करण्यासाठी संघटित झाले.

बेत कृतीत आणण्यासाठी 'शुद्धिसहायक मंडळ' स्थापन करण्यात आले. मसूरच्या (सातारा) ब्रह्मचर्याश्रमाचे श्री. विनायक महाराज मसूरकर यांना त्या कार्यासाठी निमंत्रण देण्यात आले. हिंदुधर्मात परत आलेल्यांची संख्या तिसवाडीत ४८५१, अंत्रुजात २१७४, भतग्रामात २५०, सत्तरीत ३२९, आणि इतर महालांत २११ अशी एकुण ७८१५ भरते. हे कार्य चालु असताना ख्रिश्चन पाद्री, ख्रिश्चन जमीनदार व सरकारी अधिकारी यानी हा कॅथोलिक धर्मावर आघात व पर्यायाने पोर्तुगालच्या सार्वभौमत्वावर आक्रमण आहे अस आरोप लावून शुद्धिकार्याच्या कर्यकर्थ्यांस धाकधपटशा दाखवुन छळ करण्यास आरंभ केला. तसेच हिंदुधर्मात परत जाणार्‍या गावड्यांसही धाक दाखविण्यास सुरवात केली.अशा वेळी या कार्यकर्त्यांना लुइश मिनेझिस ब्रागांझ यांच्या "प्रकाश" या पोर्तुगीज द्विसाप्ताहिकाचा पूर्ण पाठिंबा मिळाला. ही केवळ धार्मिक चळवळ नव्हती. संपूर्ण स्वातंत्र्य हे ध्येय ठेवुन पोर्तुगिजांची बंधने आस्ते आस्ते तोडून टाकण्याकडे समाज प्रवृत्त होऊ लागला आणि प्रागतिक ख्रिश्चनबांधवांची त्याला साथ मिळु लागली.

गोमंतकातील हिंदुंची जागृती व भारतातील, विशेषतः महाराष्ट्रातील हिंदु समाजाचा पाठिंबा लक्षात घेऊन तत्कालीन गवर्नर जनरल मासन दे आमोरी नी आधी मसूराश्रमाच्या कार्यकर्त्यांना गोव्याबाहेर घालवले. परंतु जनमताचा जोर पाहून वरमले देखील. आणि त्यांनी धार्मिक स्वातंत्र्य मान्य केले. १९२८ च्या या चळवळीला ' गावड्यांचे शुद्धिकरण' असे म्हणतात. या चळवळीचा मोठा फायदा म्हणजे सगळीकडे विखुरलेला, दबलेला गरीब बहुजनसामाज एकत्र झाला.

वसाह्तीचा कायदा.

गोमंतकात सामाजिक आणि राजकीय जागृतीचे वारे संचारित असतानाच सालाझारच्या सरकारने १९३० मधे वसाहतीचा कायदा गोवा, दमण दीवला लागू केला. या कायद्याने सुशिक्षित गोमंतकियांचा विशेषतः 'पोर्तुगिजादु' लोकांचा पुरता तेजोभंग केला. पुर्वी गोव्यात कायदेमंडळ होते. पण सालाझारच्या या कायद्याने कायदेमंडळाचा दर्जा केवळ सल्लागार मंडळ असा केला. हे सल्लागार मंडळ १३ सदस्यीय बनवले गेले. गव्हर्नरासह ५ सरकारी अधिकारी, ३ सरकारने नेमलेले व निरनिराळ्या मतदार संघातुन ४० प्रमुख करभरुनी निवडलेले ५ सभासद अशी त्याची रचना होती.

पुढे वसाहतीची सबद निघाली. तीत गोमंतकीयांची वर्गवारी करण्यात आली. १) पोर्तुगीज २) पोर्तुगीजादु ३) देशज.

हिंदु व मुसलमान देशज होते. पण जे स्वतःला पोर्तुगीज म्हणवुन घेत असे उच्चभ्रू गोमंतकीय ख्रिश्चन पोर्तुगीजादु म्हणजे पोर्तुगीजाळलेले ठरले. सरकारने " तुम्ही पोर्तुगीज नाही, पोर्तुगीजाळलेले आहात" असे बजावले. आणि त्यांचा भ्रमनिरास झाला. आपण हिंदी आहोत ही जाणीव त्यांच्या दुखर्‍या मनाला होउ लागली.!!! आता त्यांनीही आवाज उठवायला सुरवात केली.

सन १९३३ मध्ये रोमचे पोप व सालाझार यांच्यात 'कोंकोर्दातु' करार झाला. या करारानुसार पोर्तुगीज साम्राज्याची सत्ता दृढ करणे व त्याचे वैभव वाढविणे हे ख्रिस्ती धर्ममिशनाचे कार्य ठरले.

louismenezesbraganza.jpg

श्री. लुईश मिनेझिस ब्रागांझ

धर्माधिकार्‍याच्या नेमणुकीला पोर्तुगीज राष्ट्राध्यक्श्यांची संमती आवश्यक झाली. ख्रिश्चन मिशनना खास सवलती देण्यात आल्या. मिशनर्‍यांना अधिक स्वातंत्र्य व सवलती मिळाल्या. मिशनर्‍यांकडुन धर्मांतराचे प्रयत्नही झाले. पण आता सक्तीच्या धर्मांतराला हिंदुंचा कडवा विरोध उग्र स्वरुप धारण करत होता!!

सन १९३७ मधे नागरी हक्कांचा कोंडमारा करण्यात आला. नागरीकांचे विचार-स्वातंत्र्य, उच्चार-स्वातंत्र्य हिरावुन घेण्यात आले. जाहीर सभेला गव्हर्नराची परवानगी लागू लागली. एखादे पुस्तक प्रसिद्ध करायचे झाले तर त्याच्या नावास गव्हर्नरची परवानगी लागू लागली. शिवाय त्या पुस्तकातील मजकुराची जबाबदारी घेणार्‍या एका कायदेशीर डायरेक्टरचे नाव पुस्तकावर छापावे लागू लागले.हा डायरेक्टर पोर्तुगीज उच्च-विद्याविभूषित असला पाहिजे हा दंडक घालण्यात आला.

वृत्तपत्र प्रसिद्ध करणार्‍यांना एक ठराविक रक्कम सरकारात अनामत ठेवणे भाग पडले. वृत्तपत्रात छापून येणार्‍या कोणत्याही मजकुराला प्रकाशनपूर्व सरकारची मान्यता घेणे आवश्यक झाले. जर मजकूर पोर्तुगीजेतर भाषेत असेल तर त्याचा पोर्तुगीज भाषेत अनुवाद करुन प्रसिद्धीपूर्व मान्यता घेण्यासाठी संबंधित अधिकार्‍याला देणे क्रमप्राप्त झाले. त्याचप्रमाणे त्यास ' सेन्सॉरने पास केले आहे' हे छापलेच पाहिजे अशी सक्ती करण्यात आली.

सरकारच्या या अश्या आक्रमणावर लुईश मिनेझिस ब्रागांझ यांनी सरकारी काउन्सिल मधे प्रभावी भाषण करुन निषेध नोंदविला. त्यांचे हे भाषण सालाझारच्या हुकुमशाहीला आव्हानच होते.

१० जुलै १९३८ साली रक्तदाबाच्या विकाराने ते कालवश झाले. पण त्यांच्या पार्थिव देहाला चर्चच्या सिमितरीत/ स्मशानभूमीत दफन करायला परवानगी दिली नाही. त्यांच्या पुरोगामी विचारांनी विद्ध झालेल्या लोकांनी अश्या प्रकारे त्यांच्या पार्थिवावर सूड उगविण्याचे ठरविले. त्यांचा देह खाजगी जागेत दफन करण्यात आला.

क्विट गोवा ठराव
१९४२ च्या ऑगस्ट महिन्यात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ने Quit India ठराव पास करुन ब्रिटीश सत्ता झुगारुन लावण्यासाठी प्राणपणाने लढा हा आदेश भारतीयांना दिला. या लढ्यात कारागृहात गेलेल्या अनेक लोकांमधे एक होते मुंबईतील गोवा काँग्रेस कमीटीचे एक संस्थापक पिटर आल्व्हारिश. २ वर्षानी एप्रील १९४४ साली त्यांची कारागृहातुन सुटका झाली. व त्याच धरतीवर गोवा काँग्रेसच्या खास सभेत Quit Goa ठराव पास करण्यात आला. पण हा ठराव संमत करुनही पोर्तुगीज वसाहतीवर त्याचा काहीच परिणाम झाला नाही. कारणे उघड आहेत.

ऑगस्ट १९४२ मधे जेव्हा छोडो भारत चळवळ सुरु केली तेव्हापासुन डिसेंबर १९४३ पर्यंत अवघ्या एक वर्ष ५ महिन्यात हजारो लोक कारागूहात गेले शेकडो हुतात्मे झाले. म्हणून या चले जाव ठरावाला महत्व आले. पण असे काही गोवा-दमण-दीव मधे घडले नाही. क्रांतीकारकांची संघटनाच तोपर्यंत निर्माण झाली नव्हती. शिवाय एक उत्साही, विचारी व गतिमान नेतृत्वही नव्हते. म्हणुन छोडो गोवा एक साबणाचा फुगा ठरला.

पण जनमानसावर सगळ्या घटनांचा प्रभाव पडत होता . तरुणांचे छोटेमोठे गट भारतीय पुढार्‍यांच्या त्यागाने प्रभावित होउन कार्यरत झाले होते. १९३९ पासुन शामराव मडकईकर यांचा गोमंतकीय तरुण संघ नावाचा गट मडगावात कार्यरत होता.पोर्तुगिज सत्तेशी मुकाबला करण्यासाठी एक संघटना असणे गरजेचे होते. म्हणुन ते गोवा काँग्रेसचा प्रचार करत. अशीच एक संघटना तिसवाडी तालुक्यातील करमळी गावात, पां. पुं शिरोडकर व स्र्यकांत नाईक यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत होती. दिवसा आपला व्यवसाय संभाळुन रात्री सरकारविरोधी भित्तीपत्रके चिकटविणे, पत्रके वाटणे अशी कामे स्वयंसेवक करत. ही काहीच नाव अश्या अनेक छोट्या छोट्या संघटना / संस्था स्वातंत्र्यासाठी आपापल्यापरीने प्रयत्न करत होत्या.


ppshirodkar.jpg
श्री. पांडुरंग पुंडलिक शिरोडकर

अशातच क्विट इंडिया सत्याग्रहात भाग घेतल्यामुळे तुरुंगवास झालेले डॉ राम मनोहर लोहिया यांची १९४६ साली सुटका झाली व ते काही काळ विश्रांतीसाठी डॉ ज्युलियांव मिनेझिस या आपल्या मित्राकडे १२ जून १९४६ रोजी असोळणा या गावी आले. त्यांच्या आगमनाची वार्ता कळताच ठिकठिकाणचे उत्साही तरुण त्यांना भेटावयास जाऊ लागले .त्यांच्याकडून मार्गदर्शन घेऊ लागले. या लोकांबरोबर केलेल्या चर्चांतून लोहिया यांना गोवेकरांची परिस्थिती समजली आणि पोर्तुगीजांविरुद्ध लढा देण्याची किती गरज आहे हे जाणवले.या लढ्याची पहिली पायरी म्हणुन लोकांना त्यांचे नागरी हक्क मिळवुन देणे हे ध्येय ठरवले आणि १८ जुन १९४६ हा दिवस ठरला.

१८ जुन १९४६ रोजी डॉ . लोहिया डॉ . मिनेझिस यांच्या सोबत मडगाव स्टेशनला पोचले. जय हिंद, भारत माता की जय वंदे मातरम च्या गजरात त्यांचे जोरदार स्वागत झाले.

Ram_Manohar_Lohia.jpg
श्री. राम मनोहर लोहिया
त्यांनी हॉटेल रिपब्लिका मधे थोडा वेळ आराम केला. सध्याकाळी सव्वाचारच्या सुमारास लोहिया व मिनेझिस नगरपालिका इमारतीसमोरच्या भाषणासाठीच्या नियोजित जागी जाउन भाषणबंदीच्या कायद्याला आव्हान देत भाषण द्यायला सुरु केली. तोच एक पोलीसांची गाडी सशस्त्र पोलीस घेउन तिथे पोचली. त्यांच्या साहेबाने भाषण बंद करायची आज्ञा केली. तिला न जुमानता लोहियांनी भाषण सुरुच ठेवले. पण त्याची लोहियांवर गोळीबार करायची हिम्मत झाली नाही. त्यांना अटक करुन मडगावच्या पोलीस ठाण्यात नेण्यात आले.

लोहियांच्या अटकेची वार्ता वणव्यागत पसरली आणि हजारोंच्या संख्येने लोकांचे समूह घोषणा देत मडगावात आले. त्यांनी एक प्रकारची मिरवणूक काढली. लोहियांच्या पाठोपाठ अनेक लोकांनी नागरी हक्कांवरच्या बंदीच्या कायद्याला आव्हान देत भाषण देणे, सभा घेणे सुरु केले. अनेकांना न्यायालयात शिक्षा ठोठावण्यात आली.व तुरुंगात पाठवण्यात आले. गोव्यात जणु काही वेगळच चैतन्य संचारल होत.

दुसर्‍या दिवशी लोहियांना कोले येथल्या रेलवे स्टेशनवर नेउन गोव्याबाहेर सोडण्यात आले.पण लोहियांनी तिथेच शपथ घेतली, जर गोवेकरांना त्यांचे नागरी हक्क परत मिळाले नाहीत तर ते नक्कीच गोव्यात परततील." ही चळवळ इथेच संपली नाही.गोवेकर व पोर्तुगीज पोलीसांचा संघर्ष असाच सुरु राहिला.आबालवृद्धांनी आपल्या हक्कांसाठी लढायची तयारी केली नव्हे ते लढले. डो. लोहिया आपल्या गोव्यात परतण्याच्या शब्दावर अटळ होते व ते गोव्यात सप्टेंबर १९४६ मधे परतले देखील. पण जेव्हा ते कोले रेलवे स्टेशनला पोचले तेव्हाच पोर्तुगीजांनी त्यांना अटक करुन आग्वाद किल्ल्यावरील तुरुंगात ठेवण्यात आले. आणी १० दिवसांनी त्यांना पुन्हा सरहद्दीवर सोडण्यात आले.

महात्मा गांधींनी डॉ. लोहियांचे कौतुक केले. परंतु गोवेकरांनी नागरी हक्क मिळवण्याच्या या चळवळीत जास्तीत जास्त सहभागी व्हावे असे त्यांचे मत होते स्वातंत्र्याबद्दल भारत स्वतंत्र झाल्यानंतर विचार करता येईल. त्यांनी गोवेकरांना अहिंसक मार्ग अवलंबायला सांगितले. डॉ. लोहिया म. गांधींच्या सांगण्यावरुन गोव्यात पुन्हा परतले नाहीत. परंतु त्यांनी आपला गोव्याच्या स्वातंत्र्यासाठीचा लढा बेळगावातून जारी ठेवला.
juliaomenezes.JPG
डॉ. श्री. ज्युलियांव मिनेझिस

त्यांनी गोवेकरांना सत्याग्रहाच्या मार्गने जाण्यास सुचवले. गोवेकर तरुणांचे समूह वेळोवेळी सत्याग्रह करु शकतील. प्रत्येक समूहात १० तरुण असावेत. त्यामुळे नोव्हेंबर १९४६ पर्यंत पोर्तुगीजांचे तुरुंग हजरो गोवेकरांनी भरुन जातील. पहिला सत्याग्रह १८ ऑक्टोबर १९४६ झाला. त्यापाठोपाठ ८ सत्याग्रह झाले. शेवटचा सत्याग्रह २८ डिसेंबर १९४६ ला झाला.ही १९४६ ची चळवळ जरी शांतीपूर्ण होती, तरी पोर्तुगीज सरकारने ह्या चळवळीला शमवण्यासाठी दडपशाहीचा मार्ग स्वीकारला. ह्या चळवळीचे नेते. डॉ. त्रिस्ताव ब्रागांझ कुन्हा, पांडुरंग पुरुषोत्तम शिरोडकर, पुरुषोत्तम काकोडकर व दिवाकर काकोडकर ह्यांना अटक करण्यात आली.आणि खास न्यायालयात सादर केले गेले. त्यांच्यावरची कारवाई/ खटला १९४७ मधे संपला. डॉ. टी बी कुन्हा, आणि पुरुषोत्तम काकोडकर यांना पोर्तुगालला, पां. पु. शिरोडकरांना अंगोला येथे तर दिवाकर काकोडकरांना काबो वर्दे येथे तडीपार करण्यात आले.
Purushottam Kakodkar.jpg
श्री. पुरुषोत्तम काकोडकर
१९५४-५५ चे सत्याग्रह
१९४६ च्या चळवळीचा परिणाम म्हणून लोंढा इथे नॅशनल काँग्रेस (गोवा) ची स्थापना झाली. १९५३ साली मुंबईत रहाणारे मूळचे गोव्याचे एक राजकारणी पीटर अल्वारिस यांची या काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाली. त्यानी काँग्रेसची चळवळ गोव्यात न्यायचं ठरवलं. त्यासाठी अनेक बैठका घेतल्या. त्या बैठकांना गोपाळ आपा कामत, पांडुरंग मुळगावकर, डॉ. फ्रान्सिस्को मार्टिन्स, डॉ पांडुरंग गायतोंडे हे उपस्थित रहात. अशाच एका बैठकीत गोव्यातली कार्यकारी समिती स्थापन झाली. त्यात डॉ. गायतोंडे यांची अध्यक्ष म्हणून निवड झाली, तर गोपाळ आपा कामत यांची उपाध्यक्ष म्हणून. लवकरच टी. बी. कुन्हा यांच्या नेतृत्वाखाली पोर्तुगीजांविरुद्ध लढा देण्यासाठी The Goa action committee स्थापन झाली.

या समितीने १५ ऑगस्ट १९५४ या दिवशी ४०००-६००० लोकानी गोव्यात प्रवेश करायची योजना आखली. पोर्तुगीजाना त्याबद्दल कळताच १ ऑगस्ट १९५४ ला गोव्याची बॉर्डर बंद करण्यात आली आणि इतर भारतातून गोव्यात वर्तमानपत्रं आणायला बंदी घालण्यात आली. कर्फ्यू लागू झाला. गोव्यातील पोर्तुगीज लष्कराला नागरिकांवर दिसताक्षणी गोळीबार करायचा आदेश देण्यात आला. बोरी आणि इतर काही ठिकाणचे पूल उद्ध्वस्त करण्यात आले. फेरी बोटी बंद करण्यात आल्या. खंदक खणले गेले. १५ ऑगस्ट १९५४ ला हजारो सत्याग्रहीना गोव्यात प्रवेश करायला प्रतिबंध करण्यात आला. पण तरीही प्रत्येकी १५ सत्याग्रहींच्या ३ तुकड्यानी कारवार, तेरेखोल आणि बांदा इथून गोव्यात प्रवेश मिळवलाच. तेरेखोल इथल्या किल्ल्यात सत्याग्रहीनी भारतीय ध्वज फडकवला. २४ तासात पोर्तुगीजानी तेरेखोल किल्ला परत ताब्यात घेतला आणि सत्याग्रहीना अटक केली. पोर्तुगीज सरकारच्या दडपशाहीला उत्तर म्हणून पुणे इथे 'गोवा विमोचन समिती'ची स्थापना झाली. या समितीने भारतभर अनेक बैठका घेतल्या आणि लोकांकडून आर्थिक मदतही मिळवली.

sudhatai joshi.jpg
गोवा विमोचन समितीच्या सभेत बोलताना सौ. सुधाताई महादेवशास्त्री जोशी., शेजारी पं. महादेवशास्त्री जोशी

(छायाचित्र श्रेयः https://picasaweb.google.com/ashokmjoshi )

१८ मे १९५५ ला समितीचे चिटणीस ना.ग.गोरे आणि सेनापती बापट यानी गोव्यात प्रवेश करायचा प्रयत्न केला, पण पोर्तुगीज सरकारने जमावावर गोळीबार केला आणि नेत्याना अटक केली. समितीने परत १ ऑगस्ट १९५५ ला मोठा सत्याग्रह करायचे ठरवले. या दिवशी सावंतवाडीपासून माजाळीपर्यंतच्या १६० किमी च्या गोवा सरहद्दीवर तणाव निर्माण झाला. भारताच्या सर्व भागातून सुमारे ४००० सत्याग्रहीनी गोव्यात प्रवेश करायचा प्रयत्न केला. पत्रादेवी इथे सुमारे ६०० च्या जमावाने गोव्यात प्रवेशाचा प्रयत्न केला. पोर्तुगीजानी गोळीबार केला आणि अनेकजण या ठिकाणी हुतात्मा झाले. गोवा विमोचन समितीला नॅशनल काँग्रेस गोवा ची साथ होतीच. पीटर अल्वारीस यांच्या नेतृत्त्वाखाली २६ जानेवारी १९५५ ला कॅसलरॉक इथे सत्याग्रहीनी प्रवेशाचा प्रयत्न केला. पीटर अल्वारीस याना गोवा पोलीस पकडू शकले नाहीत पण त्याना न पकडताच १८ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा फर्मावण्यात आली. गोवा नॅशनल काँग्रेसने गोव्यातल्या नागरिकाना कोणताही कर न भरण्याचे आणि कायदेभंग करण्याचे आवाहन केले.

१९५५ मध्ये मोहन रानडे यांच्या नेतृत्त्वाखाली अनेक ठिकाणी कस्टम्स आउटपोस्ट आणि पोलीस ठाणी यांच्यावर सशस्त्र हल्ले झाले. गुळेली कस्टम्स आउटपोस्ट, कलंगुट पोलीस स्टेशन, अस्नोडा रावणफोंड आणि हळदोणे पोलीस आउटपोस्ट यांच्यावर हल्ले झाले. बेती पोलीस स्टेशनवरच्या हल्ल्यात मोहन रानडे गोळी लागून जबर जखमी झाले. त्यांची प्रकृती थोडी सुधारताच त्यांच्यावर खटला चालवून २६ वर्षांच्या सश्रम कारावासाठी त्याना पोर्तुगालला पाठवून देण्यात आले. गोवा मुक्तीनंतर लोकानी मोठ्या प्रमाणात निदर्शने केल्यावर त्याना सोडून देण्यात आले.

या स्वातंत्र्यसैनिकांच्या यादीत आणखी एक महत्त्वाचे नाव म्हणजे तेलो डी मस्कारेन्हस. मार्मुगोवा इथे १८९९ मध्ये जन्म झालेल्या तेलो डी मस्कारेन्हास यांनी १९५० ते १९५९ या काळात मुंबईहून Ressurge Goa हे वृत्तपत्र चालवले. गोवा मुक्ती संग्रामात भाग घेतल्यामुले पोर्तुगीज सरकारने त्यांना अटक करून त्यांच्यावर खटला भरून पोर्तुगालला पाठवून दिले. तिथे त्यांना १९७० पर्यंत तुरुंगात खितपत पडावे लागले. १९७० साली सुटका झाल्यानंतर ते गोव्यात परत आले आणि त्यांनी आपले वृत्तपत्र परत चालू केले. तुरुंगात असताना त्यांनी महात्मा गांधींच्या आत्मचरित्राचे आणि गुरुदेव टागोरांच्या अनेक रचनांचे पोर्तुगीजमधे भाषांतर केले. हा उत्तम लेखक आणि स्वातम्त्र्यसैनिक १९७९ साली निधन पावला.

220px-Telo_de_Mascarenhas_in_1940s.jpg

ऑपरेशन विजय
गोवामुक्ति
१९५५ साली पं. नेहरूंच्या नेतृत्त्वाखालील भारत सरकारने पोर्तुगीजानी गोवा सोडून जावे या दृष्टीने गोव्याची आर्थिक नाकेबंदी करायचं ठरवलं. पण पाकिस्तानने समुद्रमार्गे मदत करून ही नाकेबंदी परिणामशून्य केली. भारत सरकारवर गोवामुक्तीसाठी सर्व भारतीय नागरिकांकडून दबाव येऊ लागला. शेवट बळाने गोवा स्वतंत्र करायची एक योजना आखण्यात आली. तिला नाव दिलं 'ऑपरेशन विजय'. या योजनेच्या यशस्वी कार्यवाहीची जबाबदारी जन. चौधरींकडे सोपवण्यात आली. ११ डिसेंबर १९६१ पर्यंत बेळगाव, वापी आणि उना इथे अनु. गोवा, दमण आणि दीव वर हल्ले करण्यासाठी भारतीय फौजा तैनात करण्यात आल्या.

गोव्यावरच्या प्रत्यक्ष लष्करी कारवाईचं नेतृत्व मेजर जन. कॅन्डेथ यांच्यावर सोपवण्यात आलं. पोर्तुगीजांचं लक्ष वळवण्यासाठी दक्षिणेकडून हला करावा आणि मुख्य हल्ला उत्तर आणि पूर्वेकडून करावा असं ठरलं. १२ डिसेंबर १९६१ ला गोव्याला इतर भारताशी जोडणारे २ मुख्य रस्ते नागरिकांना बंद करण्यात आले. हे सैन्याच्या हालचालींसाठी केलं गेलं. १८ डिसेंबर १९६१ ला दिवस उजाडतानाच प्रत्यक्ष हल्ला करावा असं ठरलं. गोव्याच्या उत्तरेकडून २ आघाड्यांवरून हल्ला सुरू झाला. ५ वाजता भारतीय सैन्याने गोव्यात प्रवेश केला अणि पिळगाव, बाणास्तरी मार्गे पणजीच्या दिशेने कूच केलं. साधारण सकाळी ६ वाजता बाणास्तरीला येताच तिथला पूल पोर्तुगीजानी उडवून दिलेला भारतीय लष्कराला आढळला.
kpcandeth.jpg
मेजर जन. के. पी. कॅन्डेथ

दुसर्‍या पलटणीने सकाळी ६.३० वाजता दोडामार्ग इथून गोव्यात प्रवेश केला. आणि अस्नोडा, थिवी, म्हापसा, बेती अशी वाटचाल केली. पोर्तुगीजानी वाटेतले पूल आणि बांध उद्ध्वस्त करून टाकले होते. जागोजागी सुरुंग पेरले होते, पण स्थानिक लोकांनी सुरुंग पेरलेल्या जागा बरोबर दाखवून भारतीय लष्कराला बहुमोल मदत केली. संध्याकाळी ५ च्या दरम्यान भारतीय लष्कर बेती इथे पोचलं. आता फक्त मांडवी नदी ओलांडली की पणजी. किंचितसे गोळीबाराचे आवाज ऐकताच संध्याकाळी ६ वाजता पणजी सेक्रेटरियट (जुना आदिलशाही राजवाडा) समोरचा पोर्तुगीज ध्वज उतरवण्यात आला आणि तहाचं, शरणागतीचं पांढरं निशाण फडकवण्यात आलं. १९ डिसेंबर १९६१ ला सकाळी ७.३० वाजता भारतीय सैन्याने फेरीबोटीच्या धक्क्यावर पणजीत प्रवेश केला. बाणास्तरी इथला पूल उडवून दिलेला असल्याने भारतीय सैनिक नदीतून पोहून पल्याड आले आणि ८.३० च्या दरम्यान पणजी इथे पोचले. मे. जन. कॅन्डेथ यानी सकाळी १०.३० वाजता भारताचा तिरंगा सेक्रेटरियटसमोर फडकवला.

पूर्वेकडून गोव्यात प्रवेश केलेल्या पलटणीने प्रथम फोंडा गाठलं. मग बोरी मार्गे मडगावकडे प्रस्थान ठेवलं. भारतीय सैन्याचं स्वागत करण्यासाठी मडगावचे रस्ते लोकांनी फुलून गेले होते. वातावरण आनंदाने भरून गेलं होतं आणि उत्साहाच्या आणि राष्ट्रीय घोषणांनी भारून गेलं होतं. तिथून भारतीय सैन्याने वास्को द गामा, आणि मार्मुगोवा बंदराकडे वेर्णा, दाबोळी मार्गाने प्रस्थान केलं. संध्याकाळी ४.३० वाजता मार्मुगोवा (मुरगाव) भारतीय सैन्याच्या ताब्यात आलं. आदल्या दिवशी काणकोण ताब्यात घेणारी सैन्याची तुकडी दुसर्‍या दिवशी सकाळी मडगावला पोचली. त्यानी शहरात शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित केली. तसंच सगळ्या सरकारी इमारती, पोस्ट ऑफिस, बँका, पोलीस स्टेशन्स इ ताब्यात घेतले. याच दिवशी दमण आणि दीव इथल्या पोर्तुगीज तुकड्यानी कोणताच लढा न देता शरणागती पत्करली. तसंच भारताच्या नौसेनेने गोव्याजवळच्या अंजदीव बेटावर कब्जा केला.

शरणागतीचे अधिकृत पत्र पोर्तुगीज गव्हर्नर जन. वासालु इ सिल्व्हा यानी वास्को द गामा इथल्या एका रस्त्यावर गाडीचे हेडलाईट्स लावून त्या उजेडात सही करून ७.३० वाजता मेजर के. एस. धिल्लाँ यांच्याकडे सुपूर्त केले. आणि १५६० पासून ३ तालुक्यांमधे, तर १७८१ पासून उर्वरित गोव्यात अनिर्बंधपणे चालू असलेली पोर्तुगीजांची सत्ता संपुष्टात आली. आणि १९ डिसेंबर १९६१ ला संध्याकाळी ऑपरेशन विजयची यशस्वी सांगता झाली.

क्रमशः

***

विशेष सूचना - या लेखमालेचे स्वरूप एकंदरीतच ललित लेखनाच्या अंगाने जाणारे पण गोव्याच्या समृद्ध इतिहासाचे, आणि वर्तमानाचेही, दर्शन वाचकांना करून देणे एवढेच आहे. वाचकांना विनंती की त्यांनीही ते तेवढ्याच बेताने घ्यावे. आम्ही कोणीही इतिहासकार / इतिहासतज्ञ वगैरे नाही आहोत. पण थोडे फार वाचन करून, माहिती जमा करून इथे मांडण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे. तपशीलात अथवा आमच्या निष्कर्षात चूक / गल्लत असू शकते. पण काही चांगले लेखन यावे आणि गोव्याची रूढ कल्पना सोडून त्याहून वेगळा गोवा काय आहे हे लोकांना कळावे म्हणूनच हा सगळा लेखमालेचा उद्योग.

- टीम गोवा (ज्योति कामत, प्रीतमोहर, बिपिन कार्यकर्ते )

सोमवार, १४ जानेवारी, २०१३

आमचे गोंय - भाग ६ - स्वातंत्र्यलढा १




***

मराठी सत्तेच्या लयानंतर पोर्तुगीज सत्तेला पहिला प्रथम गोव्यातून जबरदस्त विरोध जर कुणी केला असेल तर तो सत्तरीच्या राणेंनी. सत्तरी गोव्याच्या ईशान्येलाआहे. लहान मोठ्या पर्वतांचा हा प्रदेश. सह्याद्रीच्या हाताची बोटे जणू या प्रदेशात विसावली आहेत.या डोंगर दर्‍यांत राहणारे लोक वाघासारखे शूर व सशासारखे चपळ आहेत. इमान हा त्यांचा स्थायीभाव. इमानापुढे इनाम कस्पटासमान मानणे ही यांची वृत्ती. विश्वासाला पात्र असे हे लोक दिलेल्या वचनाला जागतात, पण कोणी विश्वासघात केला तर हे लोक प्रक्षुब्ध होतात आणि प्रतिकाराला हात उंचावतात. आणि तेव्हा प्रतिस्पर्ध्याच्या सामर्थ्याचा विचारही त्यांच्या मनात येत नाही. सडपातळ अंगलटीचे हे लोक दिसतात गरीब पण आहेत एखाद्या माडाप्रमाणे ताठ मानेने जगणारे. मोडेन पण वाकणार नाहीत वृत्तीचे. पोर्तुगीजांच्या अन्यायाविरुद्ध यांनी कितीतरी वेळा बंडाचे निशाण उभारले. पोर्तुगीज सरकारने त्यांना बलप्रयोगाने झोडपले, कापून काढले. पण अन्यायाचा प्रतिकार करण्याचे सतीचे वाण घेतलेल्या सत्तरकर गोमंतकीयांनी ते व्रत निष्ठेने प्रत्येक पिढीत पाळले.

सत्तरी प्रदेशात राणे राजासारखे होते. सन १७४० मधे पोर्तुगीजांनी सत्तरी तालुका जिंकला. वाडीकर भोसल्यांनी राणेंना जे हक्क दिले होते ते चालू ठेवण्याचे त्यांनी आश्वासनही दिले होते. पण पुढे ते त्यांनी पाळले नाही.सन १७५५ मधे मोट्ठा उठाव झाला. राणेंनी व रयतेने आपण स्वतंत्र असल्याचे घोषित केले. १७५५ ते सन १८५५ ह्या कालखंडात एकुण २२ वेळा बंडे झाली. बडे नसुन खर तर ही युद्धेच होती. आणि ह्या एवढ्या कालावधीत राणे घराण्याच्या ४ पिढ्यांनी लढा निकराने चालु ठेवला. २२ वेळा युद्ध होउनही स्वातंत्र्य न मिळाल्याच कारण म्हणजे चांगल्या नेतृत्वाचा अभाव. यातल्या उल्लेखनीय युद्धांपैकी एक आहे दीपाजी राणेंचे लढलेले युद्ध.

सन १८५१ च्या जानेवारी मधे व्हिश्कोंदि द व्हील बॉव्ह द औरें हा विजरेई झाला. त्याने राणे सरदेसायंचे मोकाशे, इनामे खालसा करण्याचा प्रयत्न केला. काल्सोरियु नावाचा जाहिरनामा काढला गेला. त्या जाहिरनामे पुरुषांना विजार खालण्याची व स्त्रियांना चोळी घालण्याची सक्ती करण्यात आली. त्या काळात हिंदु पुरुष धोतर नेसत, सत्तरीतील गरीब लोक तर पंचा नेसत. आणि बायका लुगडी नेसत. ह्या जाहिरनाम्याने विजार न घालण्यार्‍या पुरुषांना व चोळी न घालणार्‍या स्त्रियांना कैद करण्याची मोकळीक दिली. हे कारण देउन पाखल्यांनी (युरोपियन लोक) स्त्रियांना पकडण्याचा व त्यांच्यावर बलात्कार करण्याचा सपाटा लावला. असल्या अत्त्याचारी, अन्यायी अमानुष राजवटीने रयत गांजली. व परिणामस्वरुप दीपाजी राणे सरदेसाई यांनी २६ जानेवारी १८५२ रोजी पोर्तुगीज सत्तेच्या प्रतिकाराला दंड थोपटले.

दीपाजीनी म्हादई नदीच्या किनार्‍यावरील नाणुसचा किल्ला प्रथम ताब्यात घेतला. त्या किल्ल्यात पोर्तुगीजांचा दारुगोळा व शस्त्रांचा मोठा साठा होता. तो दीपाजींना मिळाला. त्यानी नाणुसच्या किल्ल्याला आपले मुख्य ठाणे केले. तेथुन गनिमी काव्याने सरकारी कचेर्‍या, सैनिकांच्या चौक्या यांवर हल्ले करुन पोर्तुगीजांना सत्तरीतुन पळता भुई थोडी केली. सत्तरीवर राण्यांचे राज्य सुरु केले. दीपाजींचा हा पराक्रम पाहुन सत्तरीतील व आजुबाजुच्या प्रदेशातील देसाई, गावकर वगैरे वतनदार लोक आपापल्या रयतेसह त्यांना येउन मिळाले. सत्तरीतील ही उलथापालथ शांत करण्यासाठी विजेरईने लियांव नावाच्या युरोपियन कॅप्टनला ४० युरोपियन सैनिक देउन पाठवले. त्याला परिस्थितीची योग्य जाण नसावी. पहिल्याच झटपटीत त्याचे १ आल्फेरीश, ४ सैनिक जखमी झाले व एक काव ठार झाला. मग लियांव ने माघार घेतली. व उरलेल्या सैन्यासह साखळीच्या कोटाचा आश्रय घेतला. फोंड्याहुन ३० सैनिकांची अजुन १ तुकडी साखळीला कॅप्टन लियांवच्या मदतीला चालली होती. दीपाजीनी तिच्यावर गांजे येथे हल्ला केले व त्यांचा पराभव केला. तिथल्या आसपासच्या गावांतील चौक्याही लुटल्या.

इतके झाल्यावर विरजेई चे डोळे उघडले फेब्रुवारीच्या सुरवातीला लेफ्ट. कर्नल ज्युअंव मेमंदेस्स याच्या नेतृत्वाखाली पायदल सैनिकांची एक बटालियन तसेच मेजर ज्युआंव द सिल्व्ह ह्याच्या अधिकाराखाली तिरंदाजांची १ बटालियन व ५५० शिपई सत्तरीवर पाठविले. या सैन्याचा दारुण पराभव झाला. सत्तरीच्या जंगलातुन अचुक गोळ्या येउन फिरंगी सैनिक पटापट जमिनीवर कोसळले. फिरंग्यांना दीपाजीचे सैनिक तर कोठेच दिसत नसत . नुसते हवेतुन बार मारल्यागत गोळ्या त्यांना लागत. त्या घनदाट अरण्यात फिरंग्यांचे हाल हाल झाले. मग विजेरेइ ने दीपाजींशी समेट करावयास त्याना निमंत्रण दिले. परंतु दीपाजींनी विजेरईवर विश्वास ठेवला नाही व युद्ध चालूच राहिले.

दीपाजींच्या लोकांनी सरकारी सैन्याला चांगल्याच हुलकावण्या दिल्या. ज्या प्रदेशात सरकारी सैन्य घुसत असे तिथे दीपाजींचा एकही माणूस दिसत नसे. पण त्या प्रदेशापासुन दूरच्या ठिकाणी सर्वत्र दीपाजींचे लोक दिसत असत . दीपाजींचे धारिष्ठ्य इतके की राजधानीवरुन अवघ्या ७ किमी वर असलेल्या कुंभारजुवे बेटावर त्यांनी धाडी घातल्या. इथे सुखवस्तु , श्रीमंत लोकांची वस्ती होती. केंकरे, धुमे,सरदेसाई, भांडारे, घोडेकर, खाजनिये यांचे मोठमोठे वाडे तिथे होते. कुंभारजुवे हे छोटे बेट राजधानीजवळ असल्याने बंडखोर इथे येणर नाहीत अशी त्यांची समजूत होती.

२६ मे ला दीपाजींनी कुभारजुव्यावर धाड घालुन तिथल्या धनिकांकडुन खंडणी वसूल केली. नंतर त्यांच्या सैन्याने केपे, काणकोण, सांगे, हेमाडबार्से, भतग्राम (आताची डिचोली) या भागातुन पोर्तुगीजांस हाकलून लावले. पोर्तुगीज सरकार ने ७ जून ला डिचोली, फोंडें , सत्तरी व हेमाडबार्से इथे मार्शल लॉ पुकारला. जनतेची फूस व सहकार्य असल्याशिवाय दीपाजींना हे विजय मिळू शकत नव्हते. असे पोर्तुगीजांचे म्हणणे होते . व ते खरेही होते. दीपाजी पैशासाठी सरकारी तिजोर्‍या फोडीत व धनिकांकडून पैसे उकळीत, पण गरीबांना त्यांनी त्रास दिला नाही. त्यांच्या सैन्यात सामील झालेल्या लोकांच्या कुटुंबाचे पालन पोषण ते करीत. व त्यामुळे जनतेचे संपूर्ण सहकार्य त्यांना मिळत असे.

सरकारची तिजोरी या युद्धामुळे रिकामी झाली होती. दि. २ जुलै रोजी ३ टक्के व्याजदराने सहा लाख असुर्प्यांचे कर्जरोखे काढले पण कोणीही ते घेईना. दि १० सप्टें. ला सैन्याच्या धाकाने ते रोखे विकत घ्यायला लावले. ४ ऑक्टों. ला विजेरई स्वतः ३००० युरोपियन सैनिक व १००० शिपाई घेउन सत्तरीवर चालून गेला. त्याने नाणुसचा किल्ला ताब्यात घेतला. पण दीपाजीनी आधीच आपली माणसे, शस्त्रास्त्रे व दारुगोळा घेउन तिथून पोबारा केल्याने त्याला काहीच मिळाले नाही. त्यांनी करझोळ या दुर्गम ठिकाणी आपला मुक्काम हलविला.

अश्या प्रकारे दोन अडीच वर्षे (सन १८५२-सन १८५४ ) गेली. पोर्तुगीजांना विजय मिळण्याचे चिन्ह दिसेना. मग विजेरईने पुन्हा एकदा समेटाचा प्रस्ताव मांडला. पोर्तुगीज सैन्यातील एक माजी अधिकारी जुझे पावलु द ओलिव्हैर पेगादु दीपाजींचा मित्र होता. सन १८५४ च्या मार्च महिन्याच्या सुरवातीला त्याला विजेरईने दीपाजींकडे पाठविले. त्याने विजेरईचा निरोप दीपाजींना पेश केला. विजेरई ने त्यांना पणजीच्या भूशिरावरील काबो राजप्रासादात भेटायला येण्याचे आमंत्रण दिले होते. दीपाजींनी आमंत्रण स्वीकारले. पण ते चांगलेच मुत्सद्दी होते. काबो राजनिवासात काही दगाफटका होऊ नये म्हणुन त्यांनी पेगादाचे ३ मुलगे गांजे येथे ओलीस ठेउन घेतले. त्यापैकी एक सैन्यात होता. . ४ मार्चला ते राजनिवासात जाणार होते. ११ पर्यंत पोचले नाहेत तर त्या तिघांनाही प्राण गमवावे लागले असते.

दीपाजी राणे सरदेसाई जेत्याच्या दिमाखाने पणजीत प्रवेश करते झाले. ते होडीतुन उतरताच त्यांच्या लोकांनी शिंग फुंकुन त्यांच्या आगमनाची वार्ता दिली .तेथुन ते काबो राजनिवासात गेले पण विजेरईने भेट घेतली नाही. दीपाजींनी आपल्या महत्वपूर्ण साथीदारांसकट यावे मगच मी भेट घेइन असा निरोप दिला. हा प्रसंग विजेरईचा हेतु निर्मळ नव्हता हेच सिद्ध करतो.

खाशे दीपाजी राणे

पण शेवटी २८ मे १८५५ रोजी पोर्तुगीज सरकारने जाहीर केलेल्या वटहुकुमावर सही करुन दीपाजींनी व त्यांच्या साथीदारांनी सरकारशी तह केला. या वटहुकुमाची भाषा 'पराभूत झालो तरी तंगडी वर.' अश्या पद्धतीची आहे. वटहुकुम म्हणतो की दीपाजी राणे व सत्तरीतील इतर वतनदार पोर्तुगीज सरकारकडे आपला गुन्हा कबुल करुन दयेची भीक मागत आहेत आणि दारिद्र्यात मरु नये म्हणुन थोडे तरी द्रव्यसाहाय्य मागत आहेत. पोर्तुगीज भाषा अवगत नसल्याने दीपाजींनी या वटहुकुमावर अंगठा उठवला नाहीतर.....

दीपाजींचे बंड तलवारीच्या धारेवर व बंदुकीच्या गोळ्यांनी थंड करण्याचे प्रयत्न सरकारने सतत ३ वर्षे केले. पण त्यात अपयश आले. दीपाजींच्या सैन्यात फंदफितूरी झाली नाही. जनतेने त्याना योग्य साथ दिली.यातच त्यांचे श्रेष्ठत्व. त्यांचे बंड हे जनतेच्या कैवारातुन व त्यांच्या स्वतःच्या हंकावर केलेल्या आघातातुन स्फुरले होते. ते सर्वार्थाने जनतेचे बंड होते.

आजही जनता राणे सरदेसाई व त्यांच्या वंशजांना मान देते. त्यांच्या घराण्याला खाशे ही मानाची पदवी देउन. सत्तरीतील क्षत्रीय देसाई, राणे यांना त्यांच्या नावाने कोणीच पुकारत नाही ते आमचे मानाचे खाशे आहेत !!!

दीपाजींच्या बंडानंतर गोव्यात स्थानिक पातळीवर लहान लहान उठाव झाले. पण एखादा नाव घेण्यासारखा प्रयत्न झाला नाही. या वेळेला इतर भारतातही इंग्रजांविरुद्ध लोक हळूहळू उठाव करत होते, आणि गोव्यातील जनता या सगळ्या प्रयत्नांकडे पाहत होती.

१८९५ साली शिपायांचे बंड झाले. सन १८९४ मधे पूर्व आफ्रिकेतील मोझांबिक या पोर्तुगीज वसाहतीतील निग्रो लोकांनी बंड केले होते. हे बंड शमविण्यासाठी गोव्यातील शिपायांच्या तुकड्या ३० सप्टें. १८९५ ला आफिकेत पाठवायचा पोर्तुगाल सरकारचा हुकुम २६ ऑगस्ट्ला सुटला. त्यात भर म्हणून शिपायांना नविन पद्धतीची काडतुसे देन्यात येत होती. ती दातांनी उघडावी लागत. त्या काडतुसांना गाईची व डुकराची चरबी लावलेली असते अशी अफवा पसरली. आपणाला आफ्रिकेत पाठवुन बाटवणार असा शिपायांचा समज झाला. वळवईच्या बंडाचा (सन १८७०) समेट करताना सरकारने वचन दिले होते की, सैनिकांच्या इच्छेविरुद्ध त्यांना भारताबाहेर पाठविण्यात येणार नाही. पण ते वचन मोडल जात होत. यामुळे हिंदु-मुसलमान सैनिक बिथरले. १३ सप्टेंबरच्या रात्री २ वाजता शिपाई आपापली शस्त्रे व दारुगोळा घेउन बाहेर पडले आणि त्यांनी सत्तरीची वाट धरली.गव्हर्नरला हे बंड शमविण्यासाठी शिपायांच्या मागण्या मान्य कराव्याच लागल्या.

लोकशाहीचा उदय

विसावे शतक उगवले. पोर्तुगीज सत्तेविरुद्ध ४ शतके गोमंतकीय जनता झुंजत होती.पण आक्रमणाशी मुकाबला करताना त्याच्या सामर्थ्याचा , आयुधांचा अभ्यास करावा लागतो. म्हणुन गोमंतकीय हिंदू पोर्तुगीज शिक्षणाकडे वळले. या शतकाच्या सुरवातीला गोमंतकातील उच्च शिक्षणाची शाळा 'लिसेव', यात शिक्षण घेणार्‍या हिंदुंची संख्या २०-२५ च्या आत होती व हा कोर्स पुरा केलेले विद्यार्थी तुरळकच. वकील, डॉक्टर ह्यांची संख्या १-२ पेक्षा जास्त नव्हती.

सन १९०७ मधे सरकारने प्राथमिक शिक्षणात "ख्रिश्चन डॉक्ट्रिन" हा विषय अंतर्भूत केला आणि हिंदूंना सरकारी शाळेत शिक्षक होण्यास बंदी घातली. तोपर्यंत गोव्यात सरकारी प्राथमिक शिक्षकांपैकी फार थोडे हिंदू होते. ही बंदी म्हणजे आपल्यावरील हक्कांवरचे आक्रमण याची जाणीव त्यांना झाली. त्यांनी एकजूटीने आवाज उठविला गोमंतकीय जागृत होत असल्याची ती निशाणी होती. ही बंदी १९१० मधे पोर्तुगालात प्रजासत्ताक राज्य स्थापन होईपर्यंत चालू राहिली.

१९०८ मधे उर्वरित भारतात व गोव्यातही अनेक वैशिष्ट्यपुर्ण घटना घडल्या.

मुजफ्फराबाद येथे पहिला बाँब टाकण्यात आला, खुदीराम बोस व प्रफुल्लकुमार चाकी यांनी जस्टिस किंग्ज्फॉर्डची गाडी समजून तीवर बाँब फेकला. पण तो त्यात नसल्याने बचावला. त्यातल्या २ गोर्‍या स्त्रिया ठार झाल्या. या बाँबफेकीची तरफदारी करुन लेख लिहिले म्हणुन लो. टिळकांना पकडुन त्यांना ६ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगायला मंडालेस पाठविण्यात आले.

याच वर्षी पोर्तुगालात फेब्रुवारी महिन्यात राजा दो कार्लुश, व युवराज दों फिलीप ह्यांना गोळ्या झाडुन ठार करण्यात आले. राजपुत्र दो मानुएल राजमातेमुळे थोडक्यात बचावला. व नंतर राजा बनला.

या घटनांचा परिणाम गोमंतकीय तरुणांवर झाला गोमंतकात शिवजयंतीसारखे उत्सव साजरे होऊ लागले. जिवबादादा केरकर यांची पुण्यतिथी मार्गशीर्ष वद्य १३ सुद्धा साजरी केली जाऊ लागली. भारतात क्रांतीकारी संघटना निर्माण झाल्या. त्यांना ब्रिटीश सरकार पकडण्याची शर्थ करु लागले. त्यातील काही क्रांतीकारक भूमिगत होउन गोव्यात आले.. केरीचे रामचंद्र पांडुरंग वैद्य उर्फ दादा वैद्य यांनी शाळा उघडून त्यांना शिक्षक म्हणून नेमले. ही शाळा म्हणजे फोंड्यातले आजचे ए जे डी आल्मेदा हायस्कूल. २०१० मधे ह्या शाळेने आपला शतकपूर्ती महोत्सव साजरा केला.



प्राणाचार्य दादा वैद्य.

एवढे सगळे होत असताना पोर्तुगीज सरकार झोपले नव्हते. भारतातील चळवळीचे लोण गोव्यात शिरु नये म्हणुन गोव्यातील कार्यकर्त्यांवर त्यांनी कडक नजर ठेवली होती. अशा पार्श्वभूमीवर १९१० साल उजाडले. ४ ओक्टोबरच्या मध्यरात्री क्रांतीकारकांनी दों मानुएल च्या राजवाड्यावर सैनीकांच्या मदतीने हल्ला केला. राजा व त्याचे कुटुंब कसेबसे निसटुन पळुन गेले. दुसर्‍या दिवशी ५ ऑक्टोबर रोजी पोर्तुगाल प्रजासत्ताक राज्य झाल्याचे घोषित केले गेले. गोमंतकातील हिंदूंचे कैवारी म्हणुन ख्याती असलेले आंतानियु जुझे द आल्मैद मंत्रिमंडळात गेले. ते गृहमंत्री बनले.


दों मानुएल

गोमंतकात या घटनेचे उत्स्फुर्त स्वागत झाले. विशेषतः हिंदू समाजाच्या आनंदाला उधाण आले. ४०० वर्ष राजकिय व सांस्कृतिक आक्रमणाचा प्रतिकार करीत जो छळ सोसला होता,त्याचा अंत होईल म्हणुन जनता आनंदित होती. हिंदुंन केवळ आनंदच झाला नाही तर त्यांनी आपली प्रगती करण्यासाठी कंबर कसली. या प्रयत्नांचे दृश्य स्वरुप ४ क्षेत्रांत प्रकर्षाने दिसुन आले.

१) नियतकालिके २) शैक्षणिक संस्था ३) सांस्कृतिक संस्था ४) राजकिय पक्ष

नियतकालिके

गोमंतकियांना जागृत करुन कार्यप्रवृत्त करण्यात नियतकालिकांचा सिंहाचा वाटा आहे. आत्माराम सुखटणकरांच्या देशसुधारणेच्छुने मराठी माध्यमातुन शिक्षणाच्या धोरणाचा पाठपुरावा व पोर्तुगीजांच्या राजकीय धोरणावर टीकासत्र आरंभ केले. गोवा-मित्र (संपादक- सुब्राय नायक-मडगांव), journal daa Novas Conquistaa (संपादक गोविंद भास्कर पार्सेकर- पेडणे) यासरखी मराठी-पोर्तुगीज नियतकालिके १८८० च्या सुमारास लोकजागृती करत असत. मराठीतुन हिंदुंना जागविणे व पोर्तुगीजमधुन हिंदुंच्या भावना स्थानिक ख्रिश्चन व युरोपियनांपर्यंत पोचविण्याचे काम ही नियतकालिके करत. गोवा-मित्र वर १८८३ मधे बंदी आणली. मग म्हापश्यातुन आर्यबंधु व गोवा पंच , मडगावातुन गोवात्माही नियतकालिके सुरु झाले ३-६ महिनेच टिकली. दरम्यान दादा वैद्य पथ्यबोध नावाचे आरोग्यविषयक नियतकालिक चालवत.

१८८९ पासुन अजुन भर पडतच गेली न्यायचक्षु, गोमंतक सुविचार्, अशी मराठी तर A voz do Povo( जनतेचा आवाज),Mandovy (मांडवी) सारखी पोर्तुगीज नियतकालिके सुरु झाली.१८९४ मधे अतिशय जहाल असे साप्ताहिक पणजी शहरात प्रसिद्ध होऊ लागले. त्याचे नाव O Brado Indiano. म्हणजे भारतियांनी मारलेली दु:खाची आरोळी.हे साप्ताहिक पोर्तुगीजांवर जहाल टीका करत असे. या साप्ताहिकाचे संस्थापक व प्रेरणाशक्ती फादर आल्व्हरिश होते. पाद्री आल्वारिश यांच्या अंगी राष्ट्रीय वृत्ती पुरी भिनली होती. स्वदेशीचा पुरस्कार करण्याची संकल्पना लाल-बाल-पाल त्रिमुर्तींनी देण्याआधी दहा वर्षे त्यांनी सुरु केली होती. ह्या साप्ताहिकाला केवळ १० महिन्याचे आयुष्य लाभले परंतु तेवढ्यात परक्या फिरंग्यांबदल जनतेच्या मनात क्षोभ निर्माण करण्यात ब्रादु इन्दियानु यशस्वी ठरला.

१९०० मध O Heraldo नामक पोर्तुगिज दैनिक पणजीत निघु लागले. हे गोमंतकातील पहिले दैनिक त्याच्या संपादक मंडळात त्यावेळचे विचारवंत, तेजस्वी तरुण मंडळी होती. आपल्या देशाला अवनतीच्या गर्तेतुन वर काढण्यासाठी हे तरुण एकत्र आले होते. लोकजागृतीचे व समाजप्रभोधनाचे कार्य या दैनिकातुन मोठ्या तडफेने होऊ लागले. या तरुणांच्या धडपडीकडे सरकारचे लक्ष गेले नसते तरच नवल . येराल्डो हे संपादक डॉ. आंतानियु कुन्य(कुन्हा) यांना अटक झाली. व आग्वादच्या किल्ल्यावर पाठविण्यात आले.

सांस्कृतिक पुनरज्जीवनाच्या काळात स्त्रियाही मागे राहिल्या नाहीत. हळदकुंकु व सौभाग्यसंभार नावाची मासिके बायका चालवत. याच्या संपादिका होत्या सौ. सरुबाई रामचंद्र वैद्य. (दादा वैद्यांच्या पत्नी)



शैक्षणिक संस्था

गोमंतकीयांमधे राष्ट्रप्रेम रुजविण्याच्या, जोपासण्याच्या व वृद्धिंगत करण्याच्या कामात मराठी शाळांचा व शाळामास्तरांचा सिंहाचा वाटा आहे. गोमंतकातील मराठी नष्ट करण्याचे प्रयत्न पोर्तुगीज सरकारने केले.पण हिंदुंनी जशी आपली दैवते जपुन ठेविली, तशी मराठी भाषा व संस्कृती जीवापाड जतन केली. देवळांच्या अग्रशाळांमधे व धनिकांच्या घरात पंतोजी मराठीचे वर्ग चालवित असत. शिक्षणाची संधी सार्वत्रिक नव्हती. औव्यवस्थित अभ्यासक्रम असलेली पहिली मराठी शाळा म्हापसा शहरात १८८५ साली रामचंद्र दत्ताजी आजरेकर यांनी स्थापन केली. आजुबाजुच्या गावांमधेही २०-२५ शाळा त्यांनी सुरु केल्या.

पणजीत त्याच सुमारास एक शाळा सुरु होती. तिला धेप्यांची शाळा म्हटले जाई कारण त्या शाळेचा खर्च श्रीमंत धेंपे करीत शाळेला संस्थेचे रुप देऊन तिचे नामकरण करण्याची प्रथा १९०५ नंतर सुरु झाली.५ ऑक्टोबर १९०८ रोजी पणजीत मुष्टीफंड संस्था स्थापन झाली. ह्या संस्थेचे उच्चविद्याविभूषित स्वयंसेवक खांकेला झोळी लावुन दारोदार फिरत. प्रत्येक घरातुन मूठ-दोन मूठी तांदुळ त्यांच्या झोळीत पडे . या तांदळांच्या विक्रीतुन येणार्‍या पैशाने श्री महालक्ष्मी विद्यालय व सरस्वती विद्यालय या दोन मराठी शाळा संस्थेने सुरु केल्या. २००८ साली ह्या शाळेचा शतकपूर्ती महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. चर्चच्या आवारात पाद्रीही शाळा चालवत. को़कणी भाषेत, ज्या भाषेत गोव्याचे दैनंदिन व्यवहार चालत त्या भाषेत. फक्त त्यांनी कोकणीला रोमन भाषेचा साज चढविला.

मुष्टीफंड संस्थेची जुनी इमारत.

मुष्टीफंड संस्थेची आत्ताची इमारत.

गोमंतकात मराठी पुनर्जीवित करण्यात जनतेने केलेले प्रयत्न कौतुकास्पद व अभिमानास्पद आहेत. त्यांनी स्थापलेल्या विद्यालयांना अनुदान मिळत नसे.फीचे उत्पन्न तुटपुंजे असे. मासिक तीन आणे किंवा चार आणे. त्यातही गरिबांना सूट. केवळ देणग्यांवर त्या शाळा चालत. शिक्षकांच्या जेवणाखाण्याची जबाबदारी गावातील सुखवस्तु लोक पत्करीत.पण शाळेच्या इमारतीसाठी, शैक्षणिक उपकरणांसाठी पैसा लागेच. तो भिक्षां देहि करुन मिळवायचा.

मुलींच्या शिक्षणासाठी मडगावला महिला व नुतन विद्यालय, आदर्श वनिता विद्यालय, कन्याशाळा पणजी इत्यादी शाळा स्थापल्या गेल्या.

सांस्कृतिक संस्थांचे कार्य

पुनरुज्जीवनाच्या काळात शैक्षणिक संस्थांसोबतच चर्चामंदिरे व वाचनमंदिरेही उघडण्यात आली.१९०० च्या सुमारास गोवा हिंदु पुस्तकालय पणजी, रामनाथ दामोदर वाचन मंदिर मडगाव, सरस्वती वाचनमंदिर पणजी, शारदा वाचनमंदिर कुंभारजुवे. अशी पेडणेपासुन काणकोणपर्यंतच्या गावागावात वाचनमंदिरे सुरु केली गेली. अनेक राष्ट्रीय नियतकालिके तिथे वाचण्यास मिळत व राष्ट्रीय विचारांचा प्रसार तेथुन होत असे.

१९१० मधे लोकशाही प्रस्थापित झाल्याने हिंदुंना धार्मिक स्वातंत्र्य मिळाले देवालयांत जाहिररीत्या भजने, कीर्तने होऊ लागली. महाराष्ट्रातील उत्तमोत्तम कीर्तनकारांना आग्रहाने आमंत्रण करुन काणण्यात येऊ लागले. ही कीर्तने धार्मिक स्वरुपासोबत राष्ट्रीय स्वरूपाचीदेखील होती. ज्यांना लिहितावाचता येत नव्हते अश्या लोकांना ही कीर्तने राष्ट्रीय धारेस जोडीत.

गोमंतकीयांचे नाट्यप्रेमही हिंदुंची राष्ट्रभक्ती उद्दीपीत करण्यात उपयोगी पडले. ज्या गावात वर्षातुन किमान ३-४ नाटके होत नाही असे गाव गोव्यात विरळच. गोमंतकात दर वर्षी सुमारे दोन हजार मराठी नाटकांचे प्रयोग होतात. पुर्वीही होत असत. पुर्वी ती ऐतिहासिक व पौराणिक असत. त्या नाटकांनी तरुणांचे देशप्रेम बळकट केले.त्यांचे मानसिक दौर्बल्य नष्ट करुन त्यंना धीरोदात्त बनविले.

हुकुमशहाचा उदय

पोर्तुगालातील पर्यायाने गोवा, दमण दीव मधली लोकशाही सन १९१० ते सन १९२६ अशी सोळा वर्षे टिकली. या १६ वर्षात स्थिर सरकार नव्हते. आर्थिक स्थिती खालावत होती. मंत्रीमंडळे गडगडत होती. दि. ९-६-१९२६ रोजी पार्लमेंट बरखास्त करण्यात आले. जनरल कार्मोना ह्यांनी राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली. व ऑलीव्हैर सालाझार पोर्तुगालचे पंतप्रधान झाले. सैन्यावर हुकुमत गाजवण्यासाठी सेनाधिपती नेमला गेला पण खरे सर्वाधिकारी डॉ. सालाझार होते. कट्टर धर्मनिष्ठ, साधी राहणी,दुसर्‍यावर छाप पाडणारे व्यक्तीमत्व, उत्तम वक्तृत्व ,वाक्पटुता, कावेबाजपणा ही त्यांची वैशिष्ट्ये होती. युरोपातील इतर हुकुमशहाप्रमाणेच त्यांची एकपक्षीय हुकुमशाही होती. पण इतर हुकुमशहांप्रमाणे त्यांनी आपल्या विरोधकांचे शिरकाण केले नाही. पोर्तुगीज कायद्यात देहांताची शिक्षा नाही. देहांत शिक्षेचा कायदा करुन वा इतर मार्गाने विरोधकांस ठार केल्यास आपले राजकारण जागतिक चर्चेचा विषय बनेल ह्याची त्यांना जाणीव होती.विरोधकांना नेस्तनाबुत करण्याचे त्यांचे तंत्र वेगळॅ होते. विरोधकांना राष्ट्रविघातक ठरवुन न्यायालयातर्फे त्यांना जन्मठेपेची शिक्षा देण्याची व्यवस्था सरकारने केली होती. अश्या या विरोधकांना पश्चिम आफ्रिकेतील व आसोरीशमधील तुरुंगात जन्मभर खितपत टाकले होते.

सालाझार

गोवा कोंग्रेस कमीटी

सन १९२८ साली त्रिस्तांव ब्रागांझ कुन्य (कुन्हा) [टी. बी. कुन्हा] या गोमंतकाच्या सुपुत्राने 'गोवा कोंग्रेस कमिटी' स्थापन केली. व ती भारतीय काँग्रेसला जोडली. भारतातील पोर्तुगीज सत्तेचे उच्चाटन करुन गोचा, दमण ,दीव या प्रदेशांना स्वातंत्र्य मिळवून देणे हे या कमिटीचे उद्दिष्ट होते. म. गांधींच्या आदेशाप्रमाणे वागून राष्ट्रीय काँग्रेस मार्फतच स्वातंत्र्य मिळेल ही टी. बी. कुन्हांची धारणा होती. ही कमिटी गोव्यात गुप्तपणे काम करु लागली.

डॉ. त्रिस्तांव ब्रागांझ कुन्हा

१९३५ च्या अधिवेशनात काँग्रेसने ठरविले की आपले कार्यक्षेत्र ब्रिटीश हिंदुस्थानापुरतेच मर्यादित ठेवावे. म्हणुन गोवा काँग्रेस बंद करण्यात आली. याच सुमारास पोर्तुगीजांनाही या संघटनेची माहिती मिळाली. व त्यांनी कार्यकर्त्यांच्या धरपकडीचे सत्र आरंभले.

गोवा काँग्रेस बंद पडली म्हणुन कुन्हा डगमगले नाहीत. ते मुंबईला गेले व तिथुन आपले कार्य सुरुच ठेवले.

  क्रमशः

**
विशेष सूचना - या लेखमालेचे स्वरूप एकंदरीतच ललित लेखनाच्या अंगाने जाणारे पण गोव्याच्या समृद्ध इतिहासाचे, आणि वर्तमानाचेही, दर्शन वाचकांना करून देणे एवढेच आहे. वाचकांना विनंती की त्यांनीही ते तेवढ्याच बेताने घ्यावे. आम्ही कोणीही इतिहासकार / इतिहासतज्ञ वगैरे नाही आहोत. पण थोडे फार वाचन करून, माहिती जमा करून इथे मांडण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे. तपशीलात अथवा आमच्या निष्कर्षात चूक / गल्लत असू शकते. पण काही चांगले लेखन यावे आणि गोव्याची रूढ कल्पना सोडून त्याहून वेगळा गोवा काय आहे हे लोकांना कळावे म्हणूनच हा सगळा लेखमालेचा उद्योग.

- टीम गोवा: ज्योती कामत, प्रीत-मोहर, बिपिन कार्यकर्ते