मंगळवार, २२ जानेवारी, २०१३

आमचे गोंय - भाग ७ - स्वातंत्र्यलढा २***
गावड्यांचे शुद्धिकरण

पोर्तुगीज मिशनर्‍यांनी पोर्तुगीज सरकारच्या आश्रयाखाली आणि ख्रिश्चन जमीनदारांच्या चिथावणीने हजारो गावकर्‍यांन बाटवून ख्रिश्चन केले होते. पण या गावकर्‍यांची आपल्या मूळ हिंदुधर्मावरील निष्ठा पिढ्यान् पिढ्या अविचल राहिली होती. त्यांची नावे बदलण्यात आली होती. त्यांच्या मुलांना बाप्तिस्मा देण्यात येत असे. पण ते चर्चमधे जात नसत. आपल्या घरांमधे गुप्तपणे हिंदु धर्माचे पालन करीत.गोव्यातील युयुत्सु पुढार्‍यांनी या गावड्यांना शुद्ध करून हिंदु धर्मात परत घ्यायचे ठरवले. गावडे समाजातिल लोक सरकारी अधिकार्‍यांच्या आणि जमिनदारांच्या धाकाला भीक न घालता हिंदुधर्मात प्रवेश करण्यासाठी संघटित झाले.

बेत कृतीत आणण्यासाठी 'शुद्धिसहायक मंडळ' स्थापन करण्यात आले. मसूरच्या (सातारा) ब्रह्मचर्याश्रमाचे श्री. विनायक महाराज मसूरकर यांना त्या कार्यासाठी निमंत्रण देण्यात आले. हिंदुधर्मात परत आलेल्यांची संख्या तिसवाडीत ४८५१, अंत्रुजात २१७४, भतग्रामात २५०, सत्तरीत ३२९, आणि इतर महालांत २११ अशी एकुण ७८१५ भरते. हे कार्य चालु असताना ख्रिश्चन पाद्री, ख्रिश्चन जमीनदार व सरकारी अधिकारी यानी हा कॅथोलिक धर्मावर आघात व पर्यायाने पोर्तुगालच्या सार्वभौमत्वावर आक्रमण आहे अस आरोप लावून शुद्धिकार्याच्या कर्यकर्थ्यांस धाकधपटशा दाखवुन छळ करण्यास आरंभ केला. तसेच हिंदुधर्मात परत जाणार्‍या गावड्यांसही धाक दाखविण्यास सुरवात केली.अशा वेळी या कार्यकर्त्यांना लुइश मिनेझिस ब्रागांझ यांच्या "प्रकाश" या पोर्तुगीज द्विसाप्ताहिकाचा पूर्ण पाठिंबा मिळाला. ही केवळ धार्मिक चळवळ नव्हती. संपूर्ण स्वातंत्र्य हे ध्येय ठेवुन पोर्तुगिजांची बंधने आस्ते आस्ते तोडून टाकण्याकडे समाज प्रवृत्त होऊ लागला आणि प्रागतिक ख्रिश्चनबांधवांची त्याला साथ मिळु लागली.

गोमंतकातील हिंदुंची जागृती व भारतातील, विशेषतः महाराष्ट्रातील हिंदु समाजाचा पाठिंबा लक्षात घेऊन तत्कालीन गवर्नर जनरल मासन दे आमोरी नी आधी मसूराश्रमाच्या कार्यकर्त्यांना गोव्याबाहेर घालवले. परंतु जनमताचा जोर पाहून वरमले देखील. आणि त्यांनी धार्मिक स्वातंत्र्य मान्य केले. १९२८ च्या या चळवळीला ' गावड्यांचे शुद्धिकरण' असे म्हणतात. या चळवळीचा मोठा फायदा म्हणजे सगळीकडे विखुरलेला, दबलेला गरीब बहुजनसामाज एकत्र झाला.

वसाह्तीचा कायदा.

गोमंतकात सामाजिक आणि राजकीय जागृतीचे वारे संचारित असतानाच सालाझारच्या सरकारने १९३० मधे वसाहतीचा कायदा गोवा, दमण दीवला लागू केला. या कायद्याने सुशिक्षित गोमंतकियांचा विशेषतः 'पोर्तुगिजादु' लोकांचा पुरता तेजोभंग केला. पुर्वी गोव्यात कायदेमंडळ होते. पण सालाझारच्या या कायद्याने कायदेमंडळाचा दर्जा केवळ सल्लागार मंडळ असा केला. हे सल्लागार मंडळ १३ सदस्यीय बनवले गेले. गव्हर्नरासह ५ सरकारी अधिकारी, ३ सरकारने नेमलेले व निरनिराळ्या मतदार संघातुन ४० प्रमुख करभरुनी निवडलेले ५ सभासद अशी त्याची रचना होती.

पुढे वसाहतीची सबद निघाली. तीत गोमंतकीयांची वर्गवारी करण्यात आली. १) पोर्तुगीज २) पोर्तुगीजादु ३) देशज.

हिंदु व मुसलमान देशज होते. पण जे स्वतःला पोर्तुगीज म्हणवुन घेत असे उच्चभ्रू गोमंतकीय ख्रिश्चन पोर्तुगीजादु म्हणजे पोर्तुगीजाळलेले ठरले. सरकारने " तुम्ही पोर्तुगीज नाही, पोर्तुगीजाळलेले आहात" असे बजावले. आणि त्यांचा भ्रमनिरास झाला. आपण हिंदी आहोत ही जाणीव त्यांच्या दुखर्‍या मनाला होउ लागली.!!! आता त्यांनीही आवाज उठवायला सुरवात केली.

सन १९३३ मध्ये रोमचे पोप व सालाझार यांच्यात 'कोंकोर्दातु' करार झाला. या करारानुसार पोर्तुगीज साम्राज्याची सत्ता दृढ करणे व त्याचे वैभव वाढविणे हे ख्रिस्ती धर्ममिशनाचे कार्य ठरले.

louismenezesbraganza.jpg

श्री. लुईश मिनेझिस ब्रागांझ

धर्माधिकार्‍याच्या नेमणुकीला पोर्तुगीज राष्ट्राध्यक्श्यांची संमती आवश्यक झाली. ख्रिश्चन मिशनना खास सवलती देण्यात आल्या. मिशनर्‍यांना अधिक स्वातंत्र्य व सवलती मिळाल्या. मिशनर्‍यांकडुन धर्मांतराचे प्रयत्नही झाले. पण आता सक्तीच्या धर्मांतराला हिंदुंचा कडवा विरोध उग्र स्वरुप धारण करत होता!!

सन १९३७ मधे नागरी हक्कांचा कोंडमारा करण्यात आला. नागरीकांचे विचार-स्वातंत्र्य, उच्चार-स्वातंत्र्य हिरावुन घेण्यात आले. जाहीर सभेला गव्हर्नराची परवानगी लागू लागली. एखादे पुस्तक प्रसिद्ध करायचे झाले तर त्याच्या नावास गव्हर्नरची परवानगी लागू लागली. शिवाय त्या पुस्तकातील मजकुराची जबाबदारी घेणार्‍या एका कायदेशीर डायरेक्टरचे नाव पुस्तकावर छापावे लागू लागले.हा डायरेक्टर पोर्तुगीज उच्च-विद्याविभूषित असला पाहिजे हा दंडक घालण्यात आला.

वृत्तपत्र प्रसिद्ध करणार्‍यांना एक ठराविक रक्कम सरकारात अनामत ठेवणे भाग पडले. वृत्तपत्रात छापून येणार्‍या कोणत्याही मजकुराला प्रकाशनपूर्व सरकारची मान्यता घेणे आवश्यक झाले. जर मजकूर पोर्तुगीजेतर भाषेत असेल तर त्याचा पोर्तुगीज भाषेत अनुवाद करुन प्रसिद्धीपूर्व मान्यता घेण्यासाठी संबंधित अधिकार्‍याला देणे क्रमप्राप्त झाले. त्याचप्रमाणे त्यास ' सेन्सॉरने पास केले आहे' हे छापलेच पाहिजे अशी सक्ती करण्यात आली.

सरकारच्या या अश्या आक्रमणावर लुईश मिनेझिस ब्रागांझ यांनी सरकारी काउन्सिल मधे प्रभावी भाषण करुन निषेध नोंदविला. त्यांचे हे भाषण सालाझारच्या हुकुमशाहीला आव्हानच होते.

१० जुलै १९३८ साली रक्तदाबाच्या विकाराने ते कालवश झाले. पण त्यांच्या पार्थिव देहाला चर्चच्या सिमितरीत/ स्मशानभूमीत दफन करायला परवानगी दिली नाही. त्यांच्या पुरोगामी विचारांनी विद्ध झालेल्या लोकांनी अश्या प्रकारे त्यांच्या पार्थिवावर सूड उगविण्याचे ठरविले. त्यांचा देह खाजगी जागेत दफन करण्यात आला.

क्विट गोवा ठराव
१९४२ च्या ऑगस्ट महिन्यात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ने Quit India ठराव पास करुन ब्रिटीश सत्ता झुगारुन लावण्यासाठी प्राणपणाने लढा हा आदेश भारतीयांना दिला. या लढ्यात कारागृहात गेलेल्या अनेक लोकांमधे एक होते मुंबईतील गोवा काँग्रेस कमीटीचे एक संस्थापक पिटर आल्व्हारिश. २ वर्षानी एप्रील १९४४ साली त्यांची कारागृहातुन सुटका झाली. व त्याच धरतीवर गोवा काँग्रेसच्या खास सभेत Quit Goa ठराव पास करण्यात आला. पण हा ठराव संमत करुनही पोर्तुगीज वसाहतीवर त्याचा काहीच परिणाम झाला नाही. कारणे उघड आहेत.

ऑगस्ट १९४२ मधे जेव्हा छोडो भारत चळवळ सुरु केली तेव्हापासुन डिसेंबर १९४३ पर्यंत अवघ्या एक वर्ष ५ महिन्यात हजारो लोक कारागूहात गेले शेकडो हुतात्मे झाले. म्हणून या चले जाव ठरावाला महत्व आले. पण असे काही गोवा-दमण-दीव मधे घडले नाही. क्रांतीकारकांची संघटनाच तोपर्यंत निर्माण झाली नव्हती. शिवाय एक उत्साही, विचारी व गतिमान नेतृत्वही नव्हते. म्हणुन छोडो गोवा एक साबणाचा फुगा ठरला.

पण जनमानसावर सगळ्या घटनांचा प्रभाव पडत होता . तरुणांचे छोटेमोठे गट भारतीय पुढार्‍यांच्या त्यागाने प्रभावित होउन कार्यरत झाले होते. १९३९ पासुन शामराव मडकईकर यांचा गोमंतकीय तरुण संघ नावाचा गट मडगावात कार्यरत होता.पोर्तुगिज सत्तेशी मुकाबला करण्यासाठी एक संघटना असणे गरजेचे होते. म्हणुन ते गोवा काँग्रेसचा प्रचार करत. अशीच एक संघटना तिसवाडी तालुक्यातील करमळी गावात, पां. पुं शिरोडकर व स्र्यकांत नाईक यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत होती. दिवसा आपला व्यवसाय संभाळुन रात्री सरकारविरोधी भित्तीपत्रके चिकटविणे, पत्रके वाटणे अशी कामे स्वयंसेवक करत. ही काहीच नाव अश्या अनेक छोट्या छोट्या संघटना / संस्था स्वातंत्र्यासाठी आपापल्यापरीने प्रयत्न करत होत्या.


ppshirodkar.jpg
श्री. पांडुरंग पुंडलिक शिरोडकर

अशातच क्विट इंडिया सत्याग्रहात भाग घेतल्यामुळे तुरुंगवास झालेले डॉ राम मनोहर लोहिया यांची १९४६ साली सुटका झाली व ते काही काळ विश्रांतीसाठी डॉ ज्युलियांव मिनेझिस या आपल्या मित्राकडे १२ जून १९४६ रोजी असोळणा या गावी आले. त्यांच्या आगमनाची वार्ता कळताच ठिकठिकाणचे उत्साही तरुण त्यांना भेटावयास जाऊ लागले .त्यांच्याकडून मार्गदर्शन घेऊ लागले. या लोकांबरोबर केलेल्या चर्चांतून लोहिया यांना गोवेकरांची परिस्थिती समजली आणि पोर्तुगीजांविरुद्ध लढा देण्याची किती गरज आहे हे जाणवले.या लढ्याची पहिली पायरी म्हणुन लोकांना त्यांचे नागरी हक्क मिळवुन देणे हे ध्येय ठरवले आणि १८ जुन १९४६ हा दिवस ठरला.

१८ जुन १९४६ रोजी डॉ . लोहिया डॉ . मिनेझिस यांच्या सोबत मडगाव स्टेशनला पोचले. जय हिंद, भारत माता की जय वंदे मातरम च्या गजरात त्यांचे जोरदार स्वागत झाले.

Ram_Manohar_Lohia.jpg
श्री. राम मनोहर लोहिया
त्यांनी हॉटेल रिपब्लिका मधे थोडा वेळ आराम केला. सध्याकाळी सव्वाचारच्या सुमारास लोहिया व मिनेझिस नगरपालिका इमारतीसमोरच्या भाषणासाठीच्या नियोजित जागी जाउन भाषणबंदीच्या कायद्याला आव्हान देत भाषण द्यायला सुरु केली. तोच एक पोलीसांची गाडी सशस्त्र पोलीस घेउन तिथे पोचली. त्यांच्या साहेबाने भाषण बंद करायची आज्ञा केली. तिला न जुमानता लोहियांनी भाषण सुरुच ठेवले. पण त्याची लोहियांवर गोळीबार करायची हिम्मत झाली नाही. त्यांना अटक करुन मडगावच्या पोलीस ठाण्यात नेण्यात आले.

लोहियांच्या अटकेची वार्ता वणव्यागत पसरली आणि हजारोंच्या संख्येने लोकांचे समूह घोषणा देत मडगावात आले. त्यांनी एक प्रकारची मिरवणूक काढली. लोहियांच्या पाठोपाठ अनेक लोकांनी नागरी हक्कांवरच्या बंदीच्या कायद्याला आव्हान देत भाषण देणे, सभा घेणे सुरु केले. अनेकांना न्यायालयात शिक्षा ठोठावण्यात आली.व तुरुंगात पाठवण्यात आले. गोव्यात जणु काही वेगळच चैतन्य संचारल होत.

दुसर्‍या दिवशी लोहियांना कोले येथल्या रेलवे स्टेशनवर नेउन गोव्याबाहेर सोडण्यात आले.पण लोहियांनी तिथेच शपथ घेतली, जर गोवेकरांना त्यांचे नागरी हक्क परत मिळाले नाहीत तर ते नक्कीच गोव्यात परततील." ही चळवळ इथेच संपली नाही.गोवेकर व पोर्तुगीज पोलीसांचा संघर्ष असाच सुरु राहिला.आबालवृद्धांनी आपल्या हक्कांसाठी लढायची तयारी केली नव्हे ते लढले. डो. लोहिया आपल्या गोव्यात परतण्याच्या शब्दावर अटळ होते व ते गोव्यात सप्टेंबर १९४६ मधे परतले देखील. पण जेव्हा ते कोले रेलवे स्टेशनला पोचले तेव्हाच पोर्तुगीजांनी त्यांना अटक करुन आग्वाद किल्ल्यावरील तुरुंगात ठेवण्यात आले. आणी १० दिवसांनी त्यांना पुन्हा सरहद्दीवर सोडण्यात आले.

महात्मा गांधींनी डॉ. लोहियांचे कौतुक केले. परंतु गोवेकरांनी नागरी हक्क मिळवण्याच्या या चळवळीत जास्तीत जास्त सहभागी व्हावे असे त्यांचे मत होते स्वातंत्र्याबद्दल भारत स्वतंत्र झाल्यानंतर विचार करता येईल. त्यांनी गोवेकरांना अहिंसक मार्ग अवलंबायला सांगितले. डॉ. लोहिया म. गांधींच्या सांगण्यावरुन गोव्यात पुन्हा परतले नाहीत. परंतु त्यांनी आपला गोव्याच्या स्वातंत्र्यासाठीचा लढा बेळगावातून जारी ठेवला.
juliaomenezes.JPG
डॉ. श्री. ज्युलियांव मिनेझिस

त्यांनी गोवेकरांना सत्याग्रहाच्या मार्गने जाण्यास सुचवले. गोवेकर तरुणांचे समूह वेळोवेळी सत्याग्रह करु शकतील. प्रत्येक समूहात १० तरुण असावेत. त्यामुळे नोव्हेंबर १९४६ पर्यंत पोर्तुगीजांचे तुरुंग हजरो गोवेकरांनी भरुन जातील. पहिला सत्याग्रह १८ ऑक्टोबर १९४६ झाला. त्यापाठोपाठ ८ सत्याग्रह झाले. शेवटचा सत्याग्रह २८ डिसेंबर १९४६ ला झाला.ही १९४६ ची चळवळ जरी शांतीपूर्ण होती, तरी पोर्तुगीज सरकारने ह्या चळवळीला शमवण्यासाठी दडपशाहीचा मार्ग स्वीकारला. ह्या चळवळीचे नेते. डॉ. त्रिस्ताव ब्रागांझ कुन्हा, पांडुरंग पुरुषोत्तम शिरोडकर, पुरुषोत्तम काकोडकर व दिवाकर काकोडकर ह्यांना अटक करण्यात आली.आणि खास न्यायालयात सादर केले गेले. त्यांच्यावरची कारवाई/ खटला १९४७ मधे संपला. डॉ. टी बी कुन्हा, आणि पुरुषोत्तम काकोडकर यांना पोर्तुगालला, पां. पु. शिरोडकरांना अंगोला येथे तर दिवाकर काकोडकरांना काबो वर्दे येथे तडीपार करण्यात आले.
Purushottam Kakodkar.jpg
श्री. पुरुषोत्तम काकोडकर
१९५४-५५ चे सत्याग्रह
१९४६ च्या चळवळीचा परिणाम म्हणून लोंढा इथे नॅशनल काँग्रेस (गोवा) ची स्थापना झाली. १९५३ साली मुंबईत रहाणारे मूळचे गोव्याचे एक राजकारणी पीटर अल्वारिस यांची या काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाली. त्यानी काँग्रेसची चळवळ गोव्यात न्यायचं ठरवलं. त्यासाठी अनेक बैठका घेतल्या. त्या बैठकांना गोपाळ आपा कामत, पांडुरंग मुळगावकर, डॉ. फ्रान्सिस्को मार्टिन्स, डॉ पांडुरंग गायतोंडे हे उपस्थित रहात. अशाच एका बैठकीत गोव्यातली कार्यकारी समिती स्थापन झाली. त्यात डॉ. गायतोंडे यांची अध्यक्ष म्हणून निवड झाली, तर गोपाळ आपा कामत यांची उपाध्यक्ष म्हणून. लवकरच टी. बी. कुन्हा यांच्या नेतृत्वाखाली पोर्तुगीजांविरुद्ध लढा देण्यासाठी The Goa action committee स्थापन झाली.

या समितीने १५ ऑगस्ट १९५४ या दिवशी ४०००-६००० लोकानी गोव्यात प्रवेश करायची योजना आखली. पोर्तुगीजाना त्याबद्दल कळताच १ ऑगस्ट १९५४ ला गोव्याची बॉर्डर बंद करण्यात आली आणि इतर भारतातून गोव्यात वर्तमानपत्रं आणायला बंदी घालण्यात आली. कर्फ्यू लागू झाला. गोव्यातील पोर्तुगीज लष्कराला नागरिकांवर दिसताक्षणी गोळीबार करायचा आदेश देण्यात आला. बोरी आणि इतर काही ठिकाणचे पूल उद्ध्वस्त करण्यात आले. फेरी बोटी बंद करण्यात आल्या. खंदक खणले गेले. १५ ऑगस्ट १९५४ ला हजारो सत्याग्रहीना गोव्यात प्रवेश करायला प्रतिबंध करण्यात आला. पण तरीही प्रत्येकी १५ सत्याग्रहींच्या ३ तुकड्यानी कारवार, तेरेखोल आणि बांदा इथून गोव्यात प्रवेश मिळवलाच. तेरेखोल इथल्या किल्ल्यात सत्याग्रहीनी भारतीय ध्वज फडकवला. २४ तासात पोर्तुगीजानी तेरेखोल किल्ला परत ताब्यात घेतला आणि सत्याग्रहीना अटक केली. पोर्तुगीज सरकारच्या दडपशाहीला उत्तर म्हणून पुणे इथे 'गोवा विमोचन समिती'ची स्थापना झाली. या समितीने भारतभर अनेक बैठका घेतल्या आणि लोकांकडून आर्थिक मदतही मिळवली.

sudhatai joshi.jpg
गोवा विमोचन समितीच्या सभेत बोलताना सौ. सुधाताई महादेवशास्त्री जोशी., शेजारी पं. महादेवशास्त्री जोशी

(छायाचित्र श्रेयः https://picasaweb.google.com/ashokmjoshi )

१८ मे १९५५ ला समितीचे चिटणीस ना.ग.गोरे आणि सेनापती बापट यानी गोव्यात प्रवेश करायचा प्रयत्न केला, पण पोर्तुगीज सरकारने जमावावर गोळीबार केला आणि नेत्याना अटक केली. समितीने परत १ ऑगस्ट १९५५ ला मोठा सत्याग्रह करायचे ठरवले. या दिवशी सावंतवाडीपासून माजाळीपर्यंतच्या १६० किमी च्या गोवा सरहद्दीवर तणाव निर्माण झाला. भारताच्या सर्व भागातून सुमारे ४००० सत्याग्रहीनी गोव्यात प्रवेश करायचा प्रयत्न केला. पत्रादेवी इथे सुमारे ६०० च्या जमावाने गोव्यात प्रवेशाचा प्रयत्न केला. पोर्तुगीजानी गोळीबार केला आणि अनेकजण या ठिकाणी हुतात्मा झाले. गोवा विमोचन समितीला नॅशनल काँग्रेस गोवा ची साथ होतीच. पीटर अल्वारीस यांच्या नेतृत्त्वाखाली २६ जानेवारी १९५५ ला कॅसलरॉक इथे सत्याग्रहीनी प्रवेशाचा प्रयत्न केला. पीटर अल्वारीस याना गोवा पोलीस पकडू शकले नाहीत पण त्याना न पकडताच १८ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा फर्मावण्यात आली. गोवा नॅशनल काँग्रेसने गोव्यातल्या नागरिकाना कोणताही कर न भरण्याचे आणि कायदेभंग करण्याचे आवाहन केले.

१९५५ मध्ये मोहन रानडे यांच्या नेतृत्त्वाखाली अनेक ठिकाणी कस्टम्स आउटपोस्ट आणि पोलीस ठाणी यांच्यावर सशस्त्र हल्ले झाले. गुळेली कस्टम्स आउटपोस्ट, कलंगुट पोलीस स्टेशन, अस्नोडा रावणफोंड आणि हळदोणे पोलीस आउटपोस्ट यांच्यावर हल्ले झाले. बेती पोलीस स्टेशनवरच्या हल्ल्यात मोहन रानडे गोळी लागून जबर जखमी झाले. त्यांची प्रकृती थोडी सुधारताच त्यांच्यावर खटला चालवून २६ वर्षांच्या सश्रम कारावासाठी त्याना पोर्तुगालला पाठवून देण्यात आले. गोवा मुक्तीनंतर लोकानी मोठ्या प्रमाणात निदर्शने केल्यावर त्याना सोडून देण्यात आले.

या स्वातंत्र्यसैनिकांच्या यादीत आणखी एक महत्त्वाचे नाव म्हणजे तेलो डी मस्कारेन्हस. मार्मुगोवा इथे १८९९ मध्ये जन्म झालेल्या तेलो डी मस्कारेन्हास यांनी १९५० ते १९५९ या काळात मुंबईहून Ressurge Goa हे वृत्तपत्र चालवले. गोवा मुक्ती संग्रामात भाग घेतल्यामुले पोर्तुगीज सरकारने त्यांना अटक करून त्यांच्यावर खटला भरून पोर्तुगालला पाठवून दिले. तिथे त्यांना १९७० पर्यंत तुरुंगात खितपत पडावे लागले. १९७० साली सुटका झाल्यानंतर ते गोव्यात परत आले आणि त्यांनी आपले वृत्तपत्र परत चालू केले. तुरुंगात असताना त्यांनी महात्मा गांधींच्या आत्मचरित्राचे आणि गुरुदेव टागोरांच्या अनेक रचनांचे पोर्तुगीजमधे भाषांतर केले. हा उत्तम लेखक आणि स्वातम्त्र्यसैनिक १९७९ साली निधन पावला.

220px-Telo_de_Mascarenhas_in_1940s.jpg

ऑपरेशन विजय
गोवामुक्ति
१९५५ साली पं. नेहरूंच्या नेतृत्त्वाखालील भारत सरकारने पोर्तुगीजानी गोवा सोडून जावे या दृष्टीने गोव्याची आर्थिक नाकेबंदी करायचं ठरवलं. पण पाकिस्तानने समुद्रमार्गे मदत करून ही नाकेबंदी परिणामशून्य केली. भारत सरकारवर गोवामुक्तीसाठी सर्व भारतीय नागरिकांकडून दबाव येऊ लागला. शेवट बळाने गोवा स्वतंत्र करायची एक योजना आखण्यात आली. तिला नाव दिलं 'ऑपरेशन विजय'. या योजनेच्या यशस्वी कार्यवाहीची जबाबदारी जन. चौधरींकडे सोपवण्यात आली. ११ डिसेंबर १९६१ पर्यंत बेळगाव, वापी आणि उना इथे अनु. गोवा, दमण आणि दीव वर हल्ले करण्यासाठी भारतीय फौजा तैनात करण्यात आल्या.

गोव्यावरच्या प्रत्यक्ष लष्करी कारवाईचं नेतृत्व मेजर जन. कॅन्डेथ यांच्यावर सोपवण्यात आलं. पोर्तुगीजांचं लक्ष वळवण्यासाठी दक्षिणेकडून हला करावा आणि मुख्य हल्ला उत्तर आणि पूर्वेकडून करावा असं ठरलं. १२ डिसेंबर १९६१ ला गोव्याला इतर भारताशी जोडणारे २ मुख्य रस्ते नागरिकांना बंद करण्यात आले. हे सैन्याच्या हालचालींसाठी केलं गेलं. १८ डिसेंबर १९६१ ला दिवस उजाडतानाच प्रत्यक्ष हल्ला करावा असं ठरलं. गोव्याच्या उत्तरेकडून २ आघाड्यांवरून हल्ला सुरू झाला. ५ वाजता भारतीय सैन्याने गोव्यात प्रवेश केला अणि पिळगाव, बाणास्तरी मार्गे पणजीच्या दिशेने कूच केलं. साधारण सकाळी ६ वाजता बाणास्तरीला येताच तिथला पूल पोर्तुगीजानी उडवून दिलेला भारतीय लष्कराला आढळला.
kpcandeth.jpg
मेजर जन. के. पी. कॅन्डेथ

दुसर्‍या पलटणीने सकाळी ६.३० वाजता दोडामार्ग इथून गोव्यात प्रवेश केला. आणि अस्नोडा, थिवी, म्हापसा, बेती अशी वाटचाल केली. पोर्तुगीजानी वाटेतले पूल आणि बांध उद्ध्वस्त करून टाकले होते. जागोजागी सुरुंग पेरले होते, पण स्थानिक लोकांनी सुरुंग पेरलेल्या जागा बरोबर दाखवून भारतीय लष्कराला बहुमोल मदत केली. संध्याकाळी ५ च्या दरम्यान भारतीय लष्कर बेती इथे पोचलं. आता फक्त मांडवी नदी ओलांडली की पणजी. किंचितसे गोळीबाराचे आवाज ऐकताच संध्याकाळी ६ वाजता पणजी सेक्रेटरियट (जुना आदिलशाही राजवाडा) समोरचा पोर्तुगीज ध्वज उतरवण्यात आला आणि तहाचं, शरणागतीचं पांढरं निशाण फडकवण्यात आलं. १९ डिसेंबर १९६१ ला सकाळी ७.३० वाजता भारतीय सैन्याने फेरीबोटीच्या धक्क्यावर पणजीत प्रवेश केला. बाणास्तरी इथला पूल उडवून दिलेला असल्याने भारतीय सैनिक नदीतून पोहून पल्याड आले आणि ८.३० च्या दरम्यान पणजी इथे पोचले. मे. जन. कॅन्डेथ यानी सकाळी १०.३० वाजता भारताचा तिरंगा सेक्रेटरियटसमोर फडकवला.

पूर्वेकडून गोव्यात प्रवेश केलेल्या पलटणीने प्रथम फोंडा गाठलं. मग बोरी मार्गे मडगावकडे प्रस्थान ठेवलं. भारतीय सैन्याचं स्वागत करण्यासाठी मडगावचे रस्ते लोकांनी फुलून गेले होते. वातावरण आनंदाने भरून गेलं होतं आणि उत्साहाच्या आणि राष्ट्रीय घोषणांनी भारून गेलं होतं. तिथून भारतीय सैन्याने वास्को द गामा, आणि मार्मुगोवा बंदराकडे वेर्णा, दाबोळी मार्गाने प्रस्थान केलं. संध्याकाळी ४.३० वाजता मार्मुगोवा (मुरगाव) भारतीय सैन्याच्या ताब्यात आलं. आदल्या दिवशी काणकोण ताब्यात घेणारी सैन्याची तुकडी दुसर्‍या दिवशी सकाळी मडगावला पोचली. त्यानी शहरात शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित केली. तसंच सगळ्या सरकारी इमारती, पोस्ट ऑफिस, बँका, पोलीस स्टेशन्स इ ताब्यात घेतले. याच दिवशी दमण आणि दीव इथल्या पोर्तुगीज तुकड्यानी कोणताच लढा न देता शरणागती पत्करली. तसंच भारताच्या नौसेनेने गोव्याजवळच्या अंजदीव बेटावर कब्जा केला.

शरणागतीचे अधिकृत पत्र पोर्तुगीज गव्हर्नर जन. वासालु इ सिल्व्हा यानी वास्को द गामा इथल्या एका रस्त्यावर गाडीचे हेडलाईट्स लावून त्या उजेडात सही करून ७.३० वाजता मेजर के. एस. धिल्लाँ यांच्याकडे सुपूर्त केले. आणि १५६० पासून ३ तालुक्यांमधे, तर १७८१ पासून उर्वरित गोव्यात अनिर्बंधपणे चालू असलेली पोर्तुगीजांची सत्ता संपुष्टात आली. आणि १९ डिसेंबर १९६१ ला संध्याकाळी ऑपरेशन विजयची यशस्वी सांगता झाली.

क्रमशः

***

विशेष सूचना - या लेखमालेचे स्वरूप एकंदरीतच ललित लेखनाच्या अंगाने जाणारे पण गोव्याच्या समृद्ध इतिहासाचे, आणि वर्तमानाचेही, दर्शन वाचकांना करून देणे एवढेच आहे. वाचकांना विनंती की त्यांनीही ते तेवढ्याच बेताने घ्यावे. आम्ही कोणीही इतिहासकार / इतिहासतज्ञ वगैरे नाही आहोत. पण थोडे फार वाचन करून, माहिती जमा करून इथे मांडण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे. तपशीलात अथवा आमच्या निष्कर्षात चूक / गल्लत असू शकते. पण काही चांगले लेखन यावे आणि गोव्याची रूढ कल्पना सोडून त्याहून वेगळा गोवा काय आहे हे लोकांना कळावे म्हणूनच हा सगळा लेखमालेचा उद्योग.

- टीम गोवा (ज्योति कामत, प्रीतमोहर, बिपिन कार्यकर्ते )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा