गुरुवार, १ जून, २०१७

अंदमान : मोअर दॅन अ होम अवे फ्रोम होम भाग २

लवकर झोपी गेल्यामुळे मला दुसर्‍या दिवशी पहाटे ४ लाच जाग आली. उठल्यावर माझं घड्याळ बिघडलय का काय झालय हे कळेचना थोडा वेळ. सुर्य उगवायला लागला होता. मग लक्षात आलं की काल ५.३० लाच अंधारुन आलं होतं!! मग काय नवरोबाला उठवला लगेच पटपट आवरलं आणि पोर्ट ब्लेअर च्या आबर्दीन जेट्टी कडे गेलो.

आम्हाला थोडक्यासाठी एक सुंदर सुर्योदय चुकला होता, म्हंटल जाऊदेत आता उद्या पाहुयाच.
बराच वेळ तिथे घालवल्यावर मग मन मारेल तस आणि रस्ता फुटतो तिथे भटकायचं ठरवलं आणि बाईक घेऊन आम्ही निघालोच. हे त्या वाटेतले काही फोटो.




आबर्दीन जेटी



हे जहाज बहुतेक हॅवलॉक कडे निघालय


हे नॉर्थ बे बेट. ह्याला तुम्ही कुठे तरी पाहिलय, आठवतय का काही?










कोर्बिन्स कोव्ह बीच ची किनारपट्टी


कोर्बिन्स कोव्ह बीच










कोंबडी

 मला नेहमी नव्या प्रदेशात गेल्यावर तिथल्या लोकांबद्दल, त्यांच्या घरांबद्दल, संस्कृतीबद्दल खूप जाणून घ्यायचं असतं .ही अंदमानमधली काही घरं. ही घरं बघितल्यावर मला "गोव्याची" सय आलीच. अंदमानी लोकही आमच्या गोवेकरांसारखे रंगांच्या प्रेमात आहेत. अंदमान अजुन एका अंगाने माझा वाटायला लागला.







पाण्याची साठवण





 ही खरंतर एका मिडल स्कूल ची इमारत आहे.  तिचं काम पाहिलत का? लाकडी आहे ती शाळा. पारंपारिक अंदमानी घरं अशीच असतात लाकडाची. ओट्यापासुन जमिनीपर्यंत सगळं लाकडाचं. सुनामीनंतर लोकं काँक्रिटची घरं बांधु लागले आहेत






अंदमानी मगरी कुठेही आढळु शकतात त्यामुळे प्रवाश्यांना त्रास होऊ नये म्हणून अश्या जाळ्या/ तारा लावल्या आहेत

इथे डाव्या बाजुला एक चौथरा दिसतोय का तुम्हाला? हे टुरिस्ट हेल्प सेंटर क्म वॉशरुम होतं. सुनामीनंतर समुद्राने आपली पातळी ओलांडली, आता ते भरतीला पुर्ण बुडतं. ओहोटीला दिसतं. तिथला खर तर सगळ्या किनारी भागातला रस्ता धुऊन गेला होता, आता समुद्राच्या नव्या मर्यादेनुसार पुन्हा व्यवस्थित बांधलाय .








ही सुद्धा एक शाळाच आहे. नो युनिफॉर्म!! इतक्या मस्त शाळेत मला आवडेल बाबा शिकायला. 








केवढाले वृक्ष!!! मी मुंगीसारखी दिसत होते तिथे. क्षुद्र अगदी




हे उगाच माझ्या क्षुद्रतेच्या अंदाजासाठी. हे मूळ आहे फक्त झाडाचं जे सुनामी मधे मुळासकट उपटुन गेलं होतं.

हे काही लॅंड्स्केप्स पाहिलेत का? हेही मला माझेच वाटु लागले. माझ्या गोव्यासारखेच डोंगर, समुद्र तर
होते इथे. पण ते खरच गोव्यासारखे होते का? खरं सांगायचं तर गोव्याहुनही खूप जास्त सुंदर !!!   होम अवे फ्रॉम होम!!


अंदमानला समुद्र इतका श्रीमंत आहे, तुम्हाला कोणत्याही किनार्‍यावर मेलेले प्रवाळ बरेचदा जिवंतही दिसु शकतात.




नंतर आम्ही चिडिया टापू भागाकडे जात होतो. हा भाग पोर्ट ब्लेअर च्या दक्षिणेला आहे. नावावरुन कळलंच असेल याला चिडिया टापू का म्हणतात. घनदाट अरण्य, वेगवेगळे पक्षी, अंगावर नाचणारी फुलपाखरं वेगवेगळे किडे अशी एक टिपीकल एवरग्रीन फॉरेस्टमधली इको सिस्टम आहे ही. पण फक्त तेवढच नाहीये, ह्या सगळ्याला समुद्र किनार्याची जोड आहे, त्यामुळे समुद्री वैभवही आहे. फोटो बघुन लक्षात येईलच. फुलपाखरं आणि पक्षी क्यामेर्यात कैद नाही करु शकले :(









वाटेत एके ठिकाणी आम्ही आमच्या शिदोर्‍या सोडुन खायला बसलो, तिथे ही पोरं मासे पकडत होती आणि कितीतरी जेलीफिश कार्टून सारखे बागडत होते. खायचं सोडून त्यांनाच बघत बसलो आम्ही.  अश्या वेळी मी नेहमी एक गोष्ट पाळते आणि इतरांनाही सांगते, माश्यांना किंवा इन जनरल कोणत्याही जंगली प्राण्याला तुमच्याकडचा खाऊ आयुष्यात देऊ नका, आणि पर्यावरणाचे /निसर्गाचे नियम पाळा. अंदमानी लोक कसोशीने हे नियम पाळतात. आपण तिथे जाऊन तिथला तोल बिघडवु नये.














मग आम्ही पुढच्या रस्त्याला लागलो तर एक बॉटॅनिकल  झूलोजिकल गार्डन लागलं. तिथे अंदमानी मगरी , घोरपडी , अस्वलं, अंदमानी पक्षी त्यांच्या हॅबिटॅट मधे स्वच्छंद बागडताना बघितले, प्रत्येक झाडावर त्याचं सायंटिफिक नाव लावलं होतं. तिथुन बाहेर पडेस्तो जोरदार पाऊस आला. खूप भिजले पावसात. अंदमानमधला पाऊस खूप बेधुंद असतो, कोणत्याही वेळी कोणत्याही दिशेने कितीही वेळ पाऊस कोसळु शकतो.  मुसळधार पाऊस म्हणजे काय ह्याचा अनुभव घेतला.   मग तिथुन अजुन थोडं पुढे मुंडा पहाड च्या पायथ्याला मुंडा पहाड बीच वर पोचलो. तिथे थोडा क्लिकक्लिकाट केला मग सुरक्षित क्षेत्रात आंघोळ केली. कपडे बदलायला आणि शावर घ्यायला सरकारने व्यवस्था केलीय लाकडी घरांची तिथे जाऊन कपडे बदलले आणि पुढल्या वाटेला लागलो.









सुनामीमधे पडलेल्या झाडांचा आता असा उपयोग केला आहे



अंघोळीसाठीचे सुरक्षित क्षेत्र जाळीने मार्क केलय


मग आम्ही जिथे गेलो ती जागा माझ्यासाठी स्वर्ग होती. त्या गावाचं नाव मंजेरी . पुर्ण रिजर्व फॉरेस्ट एरिया.  तिथे जाण्यासाठी परमिट काढावं लागतं. ही जागा महात्मा गांधी नॅशनल मरिन पार्क चा एक हिस्सा असलेल्या १५ बेटांपैकी एक आहे. फॉरेस्ट पोस्ट पासून ७-८किमी आत घनदाट जंगलात ही एक जेटी आहे.  आम्ही तिथे गेलो आणि मला परत यायचच नव्हत!! काय काय नाही पहिलं तिथे? हजारो प्रकारचे जिवंत कोरल्स, आजपर्यंत फक्त डिस्कवरी वर पाहिलेले मासे, मगरीने एका मोठ्या माशाला खातानाचा लाईव्ह शो, माश्यांचे खेळ बापरे!!! शब्दातीत अनुभव होता. दुर्दैवाने तेव्हा संध्याकाळ होत आली होती तर फोटो नीट नाही आलेत, जमले तसे फोटो टाकतेय इथे.


हे मंजेरीच्या वाटेतले आणि मंजेरीतले फोटो









इथल्या दलदलीत मगरी आहेत



At manjeri check post





At manjeri jetty

















इथुन तृप्त मनाने निघालो  तेव्हा ५ वाजले होते. लगेच सुर्यराव पश्चिमेला गुडुप होणार होते . वाटेत कुठेतरी हा सुर्यास्त टिपला आणि पोटपुजा करुन गुडुप झालो अंधारात.

क्रमशः

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा