शनिवार, १९ मार्च, २०१६

माजे मामात्यांच्यो गजाली

नमस्कार

मिसळपाव.कॉम "मराठी भाषा दिन २०१६" चे निमित्तान मराठी बोलीभाषा सप्ताह साजरो करीतसे, अणि हें सप्ताहांत माज्या बोली भाषांत कितां तरी ल्हेंणार हें येवजोनीच आंगावर काटो फुलसे. पण एठा माजो हो चित्पावनी भाशांतलो पयलोच लेख म्हणटकत ह्या भाशाबद्दल थोडांसाच ल्हेंणार असां मनात सलां पण आदी ठरयलां माजे पणजीआज्याबद्दल ल्हेन पण त्याचेबद्दल में महिलादिन अंकात ल्हेला से मराठ्यांत तशी मग दिसलां माजे मामात्यांच्यो गजाली तुमला सांगेव्यो. तसां तुमी बालकांड वाचलां सेल ते तुमला थोडो नमुनो बघे गावलो सनार. तुमला हो लेख आवडलो जाले अजुनीय ल्हेंव शकसां.

 हो लेख माज्या स्व. पणज्याच्या स्मृत्याला अर्पण. केंथीनतरी ती माला बघीत सनारच.

धन्यवाद.

माजे मामात्यांच्यो गजाली 

चित्पावनी भाशा ही आमची चित्पावन ब्राह्मणांची भाशा. आमचे पुर्वजांना खे भगवान परशुरामान चितात्थीन पावन केलेले म्हणीं आमी चित्पावन अणि आमी बोलसों ती भाशा चित्पावनी. चित्पावनीला लोक मराठीची बोली भाशा म्हणसत , विकिपीडिया कोकणीची बोलीभाशा म्हणसे खे, पण आमला शेंटभरय फरक पडत नाय. आमी त्याला वेगळी भाशा मानसों अणि त्याला पुढल्या पिढ्यापावत न्हेनार.

 चित्पावनांचा मुळ स्थान कोकण. पण कोकणात कार्रोय जरी सोदे गेलात तर चित्पावनी येत सलेलां एकय बोडुक गाववेचां नाय तुमला. मात त्याहांथीन स्थलांतर करनी भायेर सरलेले लोकांनी मात्र बहुत करनी आपल्या भाशाला जपलेनी. आमचे गोवेंत, कर्नाटकांत, त्या हिमाचलांत, मध्य प्रदेशांत हेंच कितेला सातां समुद्रापेलतडीसुद्दा लोक आपली भाशा जपोनी सत. माजेच खूप मित्र सत मा़जेशी ह्या भाषांत बोलणारे. माजी एक चुलत सासू शिरश्याची. त्याला कन्नड येयल हें मत्यांत सलां. पण ही चित्पावनी बोलेल म्हणी में येवजलाच नतलां अणि त्याणीय बी चितलां नाय माला चित्पावनी येयल म्हणीं. त्याचेशीं भटी भाशांतच बोलत सल्यां पूरी दोन वर्खां. गेले डिसेंबरांत त्याची आई आमचेत्यां आयली सली. त्यो दोघी चित्पावनी बोलों लागतकच कांखांतलो कळसो गावलो असां जालां माला. एतां आमी दोघीय चित्पावनीतच बोलसों. ती कर्नाटक वर्जनांत अणि में गोवेंचें वेष्टनांत. :) बघितलां नी, सांगनार सल्यां कितां अणि पावल्यां कें ती?

तर आज में माज्या मामात्यांच्यों गजाली सांगनार सां. पण ही हरदासाची कथा कारीय पावली जाले मूळपदावर हाडा हां.

मामात्यां जाणां हो जास्तीसे भुरगेंच्या ल्हानपणातलो एक आनंदाचो भाग ससे. माज्याय सलो- अजुनीय से. आईन खे माजी नाळ मामाचे दारातले पायर्‍यांत पुरलीन से म्हणीं बाकीचे लोकांपेक्षा माजो मामाहारीं जास्ती ओढो असां आजी म्हणसे. मामान तां घर विकूनी नवा घर बांधलान तांही चखोट से पण मामाचां घर म्हणतकच जुनां घरच येसे पुढेंत.

मामाचां घर सह्याद्रीचे कुशीत वसलेल्या सुंदरसे गावांत से. गावांतले एका टोकाला , भटवाड्यांत आमचां घर. रस्तेवेल्ल्यां खालतो उतरुं लागलो का एक कौलारू घर दिससे. नळेंवर कांबी घालनी बेडे सुके घायले सत. पुढेंत मोठांसा सारयलेला खळां. तेचे मेराला तरातरांची फुलझाडां. अणि खळेवर माटव. माटवावर सुकवणां. त्याहांच बाजूला मोठ्या पेड्याचां तुळशी वृंदावन . तेला लागोनी प्राजक्त. सकाळी पुढां तेचो पडणारो सडो अणि तीं फुलां वेचणार्‍यो दोन चेडी. में अणि शुभुताई - माजी मावसभेणिश. खळेपुढां विहीर अणि तेला लागोनीच न्हाणी अणि लाकडां थेव्वेचो मांगर/ खोप. घराचे उजव्या वाटान थंडगार ठिकाण. माजे आज्यान, दादान, मावश्यान अणि आईन कसलेलां!!!!

हें घरात केडलाच गरमी हत नाय. एक तर नित्यानि शिपणी हत सलेलां ठिकाण अणि दुसरा म्हणजे नित्यानि शेण-पाणी केलेली जमीन.घरांत भीतर सरताना डाव्या वाटाला लांबच्यालांब पडवी लागसे. मग मुख्य साल, तेलाच लागोनी जेववेचां साल अणि मग तेला लागोनी अणि दोन सालां अणि आत्वार. मागीलदारा सुंदर स्वच्छ गोठो. तेंत मायान पोसलेली गोरवां. अणि असे हे घरांतली मायाळू मनशां.

  में शाळाची रजा सुरू हयवेचे आधी आईबाबांशी हट्ट करनी मामात्यां जाववेची तारीख आधी पक्की करनी घेव्वेची अणि मग धूम ठोकेची मामात्यां. बशीत्थीन प्रवास करताना ते दोन तास केडला एकदा सोपसत असां हत सलां. घराशी पावतकच आद्दी पयली आज्याचे कुशीत जाववेचां मग खायल्या खोल्यांत पणजीआजीशीं. आजी-दादा (दादा म्हणजे माजो मोठो भाउश बी न्हूय हां, माज्या आईशीचो बापूय तो) कडथीन "राणी" आणि पणजीआजीचे तोंडात्थीन "आयलीस का गो गंगू" अशी साद आईकतकच कान निवोनी जात.

 मग आजीन केलेली गुळेणी - चपाती नाय ते खोबरेची कापां असां कितांयतरी आजी स्पेशल खाणां खायवेचीं , माजरां, कुत्रीं गोरवां हेंचेबराबर बागडेचा. शुभुताई र्‍हेव्वे आयली का मग भातुकली , लपाछपी, क्रिकेट, नाटक असले कसलेय खेळ खेळेचेच पण सक्काळी केर-वारो जालेनंतर प्राजक्ताचीं फुलां पुंजावनी रांगोळी घालतानाय मजाच येत सली. मामात्यांची सकाळ उजाडे मनुमुळां. मनु आमचो बोकलो. ६ वाजलेउप्रांत निदव्वेच देत नसे. मग उठोनी तोंड-पाणी धोवनी पणजी आजीकडा जावनी बेसेचां. ती चित्पावनीत माला गजाली सांगे, माला खूप ल्हान सताना चित्पावनी येत नतली. आई-बाबा मराठीत बोलत सलीं माजेशी. पण ती जां कितां बोले तां कसां कोण जाणे समजत सलां अणि में मराठीत उत्तरां देत सयन. हळू हळू त्याचे कडा बोलनी बोलनी माला चित्पावनी येंव लागली. सद्या हो मुद्दो नाय म्हणे सो तेडा. सांगत कितां सल्यां में? पणजी आजी तिच्यो गोष्टी सांगे, कई त्याची जीवनकथाय सांगे. त्या वयावर कळत नतलां पण एतां मोठी होतकच कळसे ती केडला कितां अणि कितेला सांगत सली तां. मग खाववेची वेळ होतकच तांदळाची भाकरी, नासणेंची भाकरी, गव्हांची भाकरी, जोंधळेंची भाकरी अणि तेचे बरोबर भाजी किंवा दहीं किंवा लोणचां असां किंतायतरी अथवा उसळे, पानगे, पहु असां कितातरी खावनी घरचे जाणटे लोक कामाला जात. आमीयबी तेंचेबरोबर ठिकाणात जाले ठिकाणात नायते काजीनी.

ठिकाणात माड्यो, नारळ, पणस, आंबे, पेरां ,भिंडां, हेंचेबराबर जायफळ , वेलची, मिरवेली, पानवेली, तरातराच्यो जास्वंदी, गोकर्णां, अगस्त अणि अनेक औषधी झाडांय सली. तेंचो उपयोग आमचो दादा जाणे सलो. कोणालाय कितांय जाला जाले प्रथमोपचार करताना पयली लोक दादाशीं येय. दादान सांगलेली ओखदां करनी लोकांना गुण पडे. दादान सांगलान अमके एका रोगाला माजेलागी ओखद नाय जाले लोक रोग्याला हास्पीटलांत न्हेत.

मे मासाचे सुट्यांत चंगळ हय. माणकुराद आंबे, घोंटा, मुट्टे, पणस, काण्णां असो तरातराचो रानमेवो खायवे मिळे , मज्जाही खूप करे गावे. एरवी चवतीशीं नायते नाताळाची सुटी रोकडीच सरोनी जासे .

साधारण बारा वरांवर आजी आमला न्हावनी घ्या म्हणी पाठी लागी. आमला आमचे ठिकाणातले कोंडींत न्हाववे जाववे आवडे पण ह्याला काळजी पोरांना कितांय जालां जाले? तोरेचां पाणी बादलां जाले? मग ती जांव देत नतली . ती शापच आईकत नाय जाली जाले मग स्प्रिंक्लरांचे पाण्यान न्हाव्वेची मांडवली हवनी आमी ठिकाणात न्हात सलों. २-३ तास आरामात पाण्यात मजा करेची, मग थाळीशी जांवनी गरम पाण्यान न्हावनी घरांत सरेचां. जर नशीब बरां सेल जाले बांदावर न्हाव्वे गावे, तेडला मज्जाच मज्जा. (बाबु) मामा, बाबीमाउ, शुभु ताई, बाबु अणि में इतकी सगळी जणां बांदातले कोंडीत खेळत सलों. मामान ह्या कोंडीतच पव्वे शिकयलान माला. :)

दुपारी आजी बरांसा रांधोनी थेवी अणि आमला गरम गरम वाढी. बरांसा रांधी म्हणजे हाय-फाय खाणां न्हूय हां. जां सामान घरात से तेचां साबांरा-भात भाजी रांधेची. त्याचे हातांत त्याच्या आईची चव से. त्याणीन पाण्याला जरी फोडणी दिली अणी तां पाणी सांबारा म्हणी घेतलां जाले अप्रतिम लागनार असां माला दिससे. जेवतकच सगळेंनी ओग्गी निदववेचां तासभर. तो तास सोपतच नसे. मग सगळीं निदवलीं काय हळूच भायेर सरोनी खळेंत खेळेंचा. केडला केडला ठिकाणांत लोकाची गोरवां बी येत सली शक्यतो चिचाहारली वय मोडणी. मग घरातलेंना जागी करनी गोरवांना आंबडे धाव्वेचीं सगळींच. मग सरली नीज सगळेंची. सांचे मायतेन ती वय कुडोनी घेव्वेची. मग घराशी येसों जाले पणजी आजीचे दोणे, पानां, वाती वेगवेगळे वेष्टनांनी बांधनी तयार तेंना सकाळी बाजाराला धाडेची तयारी ती. मग हात-पाय धोवनी परवचा म्हणेची. मग आजीकडथीन काणी आयकत आयकत जेयताना ताट केडला निवळ हय अणि नीज केडला येय हेंच कळत नसे. दुसरे दिवसाच जागी हवनी "अरे केडला निदवल्यां मे? बाबु तू जागो सलोस रे सगळी काणी सोपेसर?" बाबुय निदवलो खे. आजीची काणी इतके लांब!! सोपतच नतली केडला. केंथीन हाडी ती इतक्यो काण्यो म्हणी नकळे. ते काण्यांनी गाणीं सत सलीं. एक दोन गाणी अजुनीय येवजसत. एतां ती ८० वर्खांची आजी माजे मामाचे ५ वर्खांचे बोड्येना सांगसे काण्यो.

एतां हे दिवसांची आठवण येसे, कारण तां घर एतां आमचां नाय हें एक जाला अणि नोकरी -घर संभाळनी मामात्यां खूप खेपो हत नाय. पण पणजीआजी, आज्जी-दादाची आजन्म ऋणी सां तेंचेमुळां इतके मजाचां बालपण मिळ्ळां माला.

 कठीण शब्दांचे अर्थः
सलां = होतं.
सांगेव्यो= सांगाव्यात
सनार=असणार
शकसां= शकेन
केंथीन=कुठुन
कार्रोय =कुठेही
सत =आहेत
शिरश्याची=शिरशीची(शिरशी या गावची)
येवजलाच नतलां = विचारच केला नव्हता
वर्खां=वर्षे
आमचेत्यां = आमच्याकडे, त्याचप्रमाणे मामात्यां=मामाकडे, तुमचेत्यां = तुमच्याकडे इ.
 हाडा =आणा बे
डे=सुपार्‍या
खळां= अंगण
माटव=मांडव
भेणिश=बहिण
भाऊश=भाउ
आत्वार=स्वैपाकघर
सोपसत =संपतात
र्‍हेव्वे =रहायला  त्याचप्रमाणे ल्हेव्वे=लिहायला, खायवे=खायला, जेववे/जेव्वे = जेवायला, पव्वे=पोहायला केडला = कधी
तेला =त्याला, तसच हेला=ह्याला. माला=मला
खायल्या =खालच्या
सयन=असेन
कई =कधीतरी
कितां =काय
पहु=पोहे
ठिकाण=कुळागर
माड्यो=माडी च बहुवचन. माडी=पोफळीच झाड
पणस=फणस पेरां= पेरू भिंडा=कोकम
ओखद्=औषध
तोरेचां पाणी = गोड्या पाण्यात मासेमारी करताना एक प्रकारची फळ वापरतात. त्यामुळे ती फळं वापरली की पाणी बाधत. तश्या पाण्याला तोरेचां पाणी म्हणतात
सांबारां=आमटी
चिचाहारली = चिंचेकडली __हारी=__कडे वय =झाड्या-काट्या-कुट्यांच कुंपण आंबडणे=हाकलणे बोड्यो=मुलगा

शुक्रवार, ३० ऑक्टोबर, २०१५

आमच्या गोंयची दिवाळी

सामान्य गोवेकर तसा उत्सवप्रिय. गोव्यातली हिंदू जनता आपल्या एका आगळ्यावेगळ्या 'गोंयकारपणाने' वर्षभर अनेक सण साजरे करते. ह्या सणवारांमध्ये स्थानिक जत्रा, पालखी उत्सवसुद्धा समाविष्ट आहेत, जे शतकानुशतकं साजरे केले जातात. देवाचे उत्सव साजरे करणं आणि त्यात सहपरिवार भाग घेणं हे इथल्या लोकांच्या संस्कृतीचा एक भाग आहे.

बर्‍याचदा देवाच्या/देवीच्या जत्रांना (किंवा अगदी घरातल्या पूजा वगैरेचं आमंत्रण दिल्यावर) ख्रिश्चन जनताही भक्तिभावाने देवाचे आशीर्वाद घ्यायला जाते. फातर्प्याच्या शांतादुर्गेच्या देवळात किंवा शिरगावच्या लईराईच्या जत्रेला किंवा म्हापश्याच्या मिलाग्रीच्या फेस्ताला हिंदू आणि ख्रिश्चन तीच श्रद्धा घेऊन जाताना दिसतात.
गणेशचतुर्थी, गुढीपाडवा, दसरा, दिवाळी, होळी, रामनवमी, रक्षाबंधन, कृष्णजन्माष्टमी असे अनेक सण इथे साजरे होतात. अर्थात गणेशचतुर्थीचा म्हणजे चवथीचा नंबर अगदी वरचा असतो. सगळ्यांचं सगळ्यात आवडतं दैवत आणि सण. अगदी देश-विदेशात असलेला गोवेकर चवथीला घरी पोहोचायचं बघतो आणि मग घरांना घरपण आणि गावांना गावपण येतं. चवथ-माटोळी, करंज्या-मोदक वगैरे धम्माल असते. मग येते दिवाळी.

दिवाळी - प्रकाशाचा उत्सव!!! 'अंधाराकडून उजेडाकडे जा' असं सांगणारा. वाइटावर चांगल्याच्या विजयाचं प्रतीक असणारा हा सण. श्रीकॄष्णाने नरकासुराचा वध करून लोकांना राक्षसी राजवटीतून मुक्त केलं, म्हणून हा सण साजरा करतात. हाही सण एका वेगळ्याच प्रकारे इथे साजरा होतो. दसरा झाल्यावर दिवाळीचे वेध लागू लागतात, कारण वेगवेगळा फराळ बनवणं ह्याच सुमाराला सुरू होतं. चकल्या, लाडू, चवडे, चिरोटे, चिवडा, कोहळ्याच्या, बिटाच्या, गाजराच्या, डाळीच्या अशा वेगवेगळ्या (गोड) वड्या असा जंगी फराळ बनवणं सुरू असतं, तिथे पोरं-सोरं दुसरीकडे नरकासुराच्या प्रतिमा बनवण्यात मग्न असतात. दिवाळीच्या आदल्या रात्री ह्या प्रतिमेची आणि श्रीकृष्णाच्या मूर्तीची गावात मिरवणूक असते आणि पहाटे आम्ही त्याचं दहन करतो. ठिकठिकाणी नरकासुर आणि श्रीकृष्ण प्रतिमांच्या स्पर्धासुद्धा असतात, त्याही बघायला मज्जा येते. लहानपणी आईबाबा मला नेहमी घेऊन जात या स्पर्धा पाहायला. ते एक असो. दिवाळीच्या आदल्या दिवशी न्हाणीघर खास धुतलं-पुसलं जातं. *'थाळी'वरच्या **'भाणा'ला उतरवून त्याची काळोखी घासली जाते. त्याच्या गळ्यात झेंडू अन कारीटांची माळ घातली जाते. त्यावर चंदनाचे पट्टे ओढून त्याला पुन्हा न्हाणीवर ठेवून सभोवती माती लिंपली जाते. न्हाणीघराला आंब्याच्या पानांचं तोरण चढतं.

narakaasur
* जालावरून साभार
(narkasur goa असं गुगलून पाहिल्यास असंख्य फोटो दिसतील, ज्यात नरकासुर बनण्याच्या प्रत्येक स्टेप्सचे फोटे असतील)

नरकासुर दहन करून घरी आल्यावर आम्ही आकाशदिवे लावतो आणि पणत्यांनी घर-अंगण-तुळस उजळवतो. थोडं उजाडल्यावर घरच्या पुरुषांना आणि लहानांना त्यांच्या आया आणि बायका तेल-उटण्याचं मालिश करतात आणि मग सगळे आंघोळ करतात. घरच्या बायका जरा लवकरच आंघोळ करून तयार होतात. मग आरती होते आणि बायकांना नवरे छानशी ओवाळणी देतात. यानंतर घरचा प्रत्येक सदस्य कारीट पायाच्या अंगठ्याने फोडतो अन दोन बिया स्वतःच्या पोटात घालतो.

इथे दिवाळीला कृष्णाचे आवडते पोहे खायची आणि खिलवायची पद्धत आहे. पोह्यांचे किमान पाचतरी प्रकार हवेतच. बाकी तुम्ही काहीही केलंत तरी चालेल. आपल्या घरी पोहे खायचे आणि दुसर्‍या घरी खायला जायचे. माझ्या माहेरी आमची दोन आवळीजावळी गावं आहेत. आपसात ठरवून एका गावात एका दिवशी, तर दुसर्‍या गावात दुसर्‍या दिवशी पोहे असतात. दोन्ही गावचे लोक दोन्ही गावच्या प्रत्येक घरात पोहे खातात. आमच्या गावात आमच्या घरापासून पोहे खायची सुरुवात होते. आम्ही ताट-पान, पाणी, रांगोळी, सुपारी सगळं करून तयार असतो. ग्रामदेवी भूमिकामायेचा कळस कौल देऊन जातो अन मग पोहे सुरू. वाढल्यावर लोक पानावर बसतात. मग सगळ्या पंगतीची आरती होते. पोहे खाल्ले जातात आणि सगळे दुसर्‍या घरी पोहे खायला जातात. दिवसभर नुसते पोहे!!!!
paan
फोटो: माझ्या सासरचं गेल्या वर्षीच्या दिवाळीचं पान. (हे दु:खाच्या दिवाळीतलं असल्याने फक्त १५-१६ प्रकार असतील.)

माझ्या सासरी थोडंसं वेगळं आहे. आमच्या वाड्यावर इन मीन सात घरं. मग आम्ही सगळे दसर्‍यानंतर ठरवतो की यंदा दिवाळी कुठे वाढायची. घर फायनल झालं की प्रत्येक जण आपापला जिन्नस फायनल करतो. दोन वर्षांपूर्वी माझी लग्नानंतरची पहिली दिवाळी होती, तर पानात तब्बल ३५ वेगवेगळे पदार्थ होते!!! या पदार्थांमध्ये थोडे पारंपरिक, थोडे स्वतःच एक्स्पीरिमेंटिंग करून बनवलेले असे भ आणि र आणि पू आणि र पदार्थ असतात. काहीच पदार्थ सांगते हं - म्हणजे गोडाचे फोव, तिखशे फोव, ताकाचे फोव, कडीचे फोव, फोण्णे फोव, पाकातले फोव, फोंवा खीर, रोसा फोव, फोवा चिवडो, काकडीचा कायरस (कोशिंबीर), कच्च्या केळ्याचं पंचामृत, झालंच तर इतर गोड फराळ - जिलबी, गुलाबजाम वगैरे. आणि वाटला अंबाडा नाही हं विसरायचा. हां हां, ही अंबाड्याची पालेभाजी नाहीये बरं का, अंबाडा हे एक आंबट फळ आहे. आणि मग सरतेशेवटी जिरवणीला लसणाशिवायची सोलकढी.

हे असं सगळं दिवसभर तब्येतीने खाल्ल्यावर असली झोप येते म्हणून सांगू महाराजा! मग 'जरा' पडणं होतं आणि मग आहेच लक्ष्मीपूजन आणि इतर दिवाळी. पण मुख्य आकर्षण पोहेच!!!!.


*थाळी - न्हाणीघरातली आंघोळीचं पाणी तापवण्याची मोठी चूल.
**भाण - थाळीवर पाणी तापवण्यासाठी वापरायचा भलामोठा हंडा.
***फोव = पोहे


बरं, रेसिप्या हव्यात का?
घ्या बरं लिहून..


गोडा फोव
साहित्य :
लाल गावठी पोहे १ वाटी
तूप १/४ वाटी
गूळ १/४ वाटी
ओलं खोबरं बचकभर
चवीपुरतं मीठ
कृती
सर्वात आधी गुळाचा पाक करून घ्यावा. पाक साधारण होत आला की पोहे धुऊन निथळून घ्यावेत. पाक झाल्यावर हे धुतलेले पोहे त्या पाकात घालावे आणि परतून घ्यावे. ओलं खोबरं, तूप घालावं आणि पुन्हा परतून घ्यावं. सरतेशेवटी चवीपुरतं मीठ घालून नीट ढवळून घेऊन पाकृ गॅसवरून उतरावी.
ताकाचे फोव
साहित्य :
लाल/ पांढरे गावठी पोहे १ वाटी
ओलं खोबरं १ वाटी
ओल्या मिरच्या २
आलं अर्धा इंच
जिरे १/४ चहाचा चमचा
हिरवी मिरी ४-५
दही २ वाट्या
मीठ चवीपुरतं
साखर चवीपुरती
sahitya

कृती :
पोहे धुऊन घ्यावे. ओलं खोबरं, मिरच्या, आलं, जिरं, मिरी मिक्सरमधून बारीक आणि दाटसर वाटून घ्यावं. हे वाटण पोह्यात घालावं. चवीपुरती मीठ-साखर घालावी आणि व्यवस्थित मिश्रण करून घ्यावं आणि आपल्या आवडीप्रमाणे त्यात दही घालावं. मला ह्या रेसिपीत खूप दही आवडतं.
tayar

रोसातले फॉव
साहित्यः
पांढरे पोहे १ वाटी
गूळ १ वाटी
वेलची दाणे ६-७
ओलं खोबरं१ वाटी
मीठ चवीपुरतं
कृती :
पोहे धुऊन घ्यावे व थोडा वेळ निथळत ठेवावे. ओल्या खोबर्‍यात वाटीभर पाणी घालून त्याचं दाट नारळाचं दूध काढून घ्यावं.
आता ह्या दुधात गूळ विरघळवून घ्यावा आणि वेलदोड्यांची पूड करून त्यात घालावी (ताजी असल्यास जास्त छान वास येतो).
आता पोह्यात थोडं पाणी घालून ते मध्यम आचेवर शिजवून घ्यावेत. ह्यात गूळमिश्रित नारळाचं दूध घालावं व दोन मिनिटं शिजू द्यावं. चवीपुरतं मीठ घालून पोहे गॅसवरून उतरवावे आणि सर्व्ह करावे. रसातले पोहे :)
** नारळाचा रस असलेले पदार्थ जास्त वेळ शिजवू नये. दूध फाटण्याची शक्यता असते.

वाटला अंबाडा
अंबाडे १०
ओलं खोबरं १ वाटी
हिरव्या मिरच्या २-३
हिंग १/४ चहाचा चमचा
गूळ सुपारीएवढा
मीठ चवीपुरतं.
अंबाडे
aMbade

कृती :
अंबाडे शिजवून घ्यावे. ते शिजत असताना एकीकडे ओलं खोबरं, मिरच्या, हिंग, गूळ यांचं दाट पण बारीक वाटण करून घ्यावं. शिजवलेल्या अंबाड्यांत हे वाटण आणि मीठ खालून आंबाडे थोडेसे मुरडून घ्यावे आणि थोडा वेळ ठेवून मग सर्व्ह करावं. अंबाडे मुरडताना : अंबाड्याला काथा असतो, त्यामुळे सांभाळून.. फक्त वरची साल असते, ती एडिबल असते आणि ती थोडी थोडी साल वाटणात मिक्स व्हावी अशा पद्धतीने मुरडावं.
vaTalaa aMbaaDaa

मंगळवार, २२ जानेवारी, २०१३

आमचे गोंय - भाग ७ - स्वातंत्र्यलढा २



***
गावड्यांचे शुद्धिकरण

पोर्तुगीज मिशनर्‍यांनी पोर्तुगीज सरकारच्या आश्रयाखाली आणि ख्रिश्चन जमीनदारांच्या चिथावणीने हजारो गावकर्‍यांन बाटवून ख्रिश्चन केले होते. पण या गावकर्‍यांची आपल्या मूळ हिंदुधर्मावरील निष्ठा पिढ्यान् पिढ्या अविचल राहिली होती. त्यांची नावे बदलण्यात आली होती. त्यांच्या मुलांना बाप्तिस्मा देण्यात येत असे. पण ते चर्चमधे जात नसत. आपल्या घरांमधे गुप्तपणे हिंदु धर्माचे पालन करीत.गोव्यातील युयुत्सु पुढार्‍यांनी या गावड्यांना शुद्ध करून हिंदु धर्मात परत घ्यायचे ठरवले. गावडे समाजातिल लोक सरकारी अधिकार्‍यांच्या आणि जमिनदारांच्या धाकाला भीक न घालता हिंदुधर्मात प्रवेश करण्यासाठी संघटित झाले.

बेत कृतीत आणण्यासाठी 'शुद्धिसहायक मंडळ' स्थापन करण्यात आले. मसूरच्या (सातारा) ब्रह्मचर्याश्रमाचे श्री. विनायक महाराज मसूरकर यांना त्या कार्यासाठी निमंत्रण देण्यात आले. हिंदुधर्मात परत आलेल्यांची संख्या तिसवाडीत ४८५१, अंत्रुजात २१७४, भतग्रामात २५०, सत्तरीत ३२९, आणि इतर महालांत २११ अशी एकुण ७८१५ भरते. हे कार्य चालु असताना ख्रिश्चन पाद्री, ख्रिश्चन जमीनदार व सरकारी अधिकारी यानी हा कॅथोलिक धर्मावर आघात व पर्यायाने पोर्तुगालच्या सार्वभौमत्वावर आक्रमण आहे अस आरोप लावून शुद्धिकार्याच्या कर्यकर्थ्यांस धाकधपटशा दाखवुन छळ करण्यास आरंभ केला. तसेच हिंदुधर्मात परत जाणार्‍या गावड्यांसही धाक दाखविण्यास सुरवात केली.अशा वेळी या कार्यकर्त्यांना लुइश मिनेझिस ब्रागांझ यांच्या "प्रकाश" या पोर्तुगीज द्विसाप्ताहिकाचा पूर्ण पाठिंबा मिळाला. ही केवळ धार्मिक चळवळ नव्हती. संपूर्ण स्वातंत्र्य हे ध्येय ठेवुन पोर्तुगिजांची बंधने आस्ते आस्ते तोडून टाकण्याकडे समाज प्रवृत्त होऊ लागला आणि प्रागतिक ख्रिश्चनबांधवांची त्याला साथ मिळु लागली.

गोमंतकातील हिंदुंची जागृती व भारतातील, विशेषतः महाराष्ट्रातील हिंदु समाजाचा पाठिंबा लक्षात घेऊन तत्कालीन गवर्नर जनरल मासन दे आमोरी नी आधी मसूराश्रमाच्या कार्यकर्त्यांना गोव्याबाहेर घालवले. परंतु जनमताचा जोर पाहून वरमले देखील. आणि त्यांनी धार्मिक स्वातंत्र्य मान्य केले. १९२८ च्या या चळवळीला ' गावड्यांचे शुद्धिकरण' असे म्हणतात. या चळवळीचा मोठा फायदा म्हणजे सगळीकडे विखुरलेला, दबलेला गरीब बहुजनसामाज एकत्र झाला.

वसाह्तीचा कायदा.

गोमंतकात सामाजिक आणि राजकीय जागृतीचे वारे संचारित असतानाच सालाझारच्या सरकारने १९३० मधे वसाहतीचा कायदा गोवा, दमण दीवला लागू केला. या कायद्याने सुशिक्षित गोमंतकियांचा विशेषतः 'पोर्तुगिजादु' लोकांचा पुरता तेजोभंग केला. पुर्वी गोव्यात कायदेमंडळ होते. पण सालाझारच्या या कायद्याने कायदेमंडळाचा दर्जा केवळ सल्लागार मंडळ असा केला. हे सल्लागार मंडळ १३ सदस्यीय बनवले गेले. गव्हर्नरासह ५ सरकारी अधिकारी, ३ सरकारने नेमलेले व निरनिराळ्या मतदार संघातुन ४० प्रमुख करभरुनी निवडलेले ५ सभासद अशी त्याची रचना होती.

पुढे वसाहतीची सबद निघाली. तीत गोमंतकीयांची वर्गवारी करण्यात आली. १) पोर्तुगीज २) पोर्तुगीजादु ३) देशज.

हिंदु व मुसलमान देशज होते. पण जे स्वतःला पोर्तुगीज म्हणवुन घेत असे उच्चभ्रू गोमंतकीय ख्रिश्चन पोर्तुगीजादु म्हणजे पोर्तुगीजाळलेले ठरले. सरकारने " तुम्ही पोर्तुगीज नाही, पोर्तुगीजाळलेले आहात" असे बजावले. आणि त्यांचा भ्रमनिरास झाला. आपण हिंदी आहोत ही जाणीव त्यांच्या दुखर्‍या मनाला होउ लागली.!!! आता त्यांनीही आवाज उठवायला सुरवात केली.

सन १९३३ मध्ये रोमचे पोप व सालाझार यांच्यात 'कोंकोर्दातु' करार झाला. या करारानुसार पोर्तुगीज साम्राज्याची सत्ता दृढ करणे व त्याचे वैभव वाढविणे हे ख्रिस्ती धर्ममिशनाचे कार्य ठरले.

louismenezesbraganza.jpg

श्री. लुईश मिनेझिस ब्रागांझ

धर्माधिकार्‍याच्या नेमणुकीला पोर्तुगीज राष्ट्राध्यक्श्यांची संमती आवश्यक झाली. ख्रिश्चन मिशनना खास सवलती देण्यात आल्या. मिशनर्‍यांना अधिक स्वातंत्र्य व सवलती मिळाल्या. मिशनर्‍यांकडुन धर्मांतराचे प्रयत्नही झाले. पण आता सक्तीच्या धर्मांतराला हिंदुंचा कडवा विरोध उग्र स्वरुप धारण करत होता!!

सन १९३७ मधे नागरी हक्कांचा कोंडमारा करण्यात आला. नागरीकांचे विचार-स्वातंत्र्य, उच्चार-स्वातंत्र्य हिरावुन घेण्यात आले. जाहीर सभेला गव्हर्नराची परवानगी लागू लागली. एखादे पुस्तक प्रसिद्ध करायचे झाले तर त्याच्या नावास गव्हर्नरची परवानगी लागू लागली. शिवाय त्या पुस्तकातील मजकुराची जबाबदारी घेणार्‍या एका कायदेशीर डायरेक्टरचे नाव पुस्तकावर छापावे लागू लागले.हा डायरेक्टर पोर्तुगीज उच्च-विद्याविभूषित असला पाहिजे हा दंडक घालण्यात आला.

वृत्तपत्र प्रसिद्ध करणार्‍यांना एक ठराविक रक्कम सरकारात अनामत ठेवणे भाग पडले. वृत्तपत्रात छापून येणार्‍या कोणत्याही मजकुराला प्रकाशनपूर्व सरकारची मान्यता घेणे आवश्यक झाले. जर मजकूर पोर्तुगीजेतर भाषेत असेल तर त्याचा पोर्तुगीज भाषेत अनुवाद करुन प्रसिद्धीपूर्व मान्यता घेण्यासाठी संबंधित अधिकार्‍याला देणे क्रमप्राप्त झाले. त्याचप्रमाणे त्यास ' सेन्सॉरने पास केले आहे' हे छापलेच पाहिजे अशी सक्ती करण्यात आली.

सरकारच्या या अश्या आक्रमणावर लुईश मिनेझिस ब्रागांझ यांनी सरकारी काउन्सिल मधे प्रभावी भाषण करुन निषेध नोंदविला. त्यांचे हे भाषण सालाझारच्या हुकुमशाहीला आव्हानच होते.

१० जुलै १९३८ साली रक्तदाबाच्या विकाराने ते कालवश झाले. पण त्यांच्या पार्थिव देहाला चर्चच्या सिमितरीत/ स्मशानभूमीत दफन करायला परवानगी दिली नाही. त्यांच्या पुरोगामी विचारांनी विद्ध झालेल्या लोकांनी अश्या प्रकारे त्यांच्या पार्थिवावर सूड उगविण्याचे ठरविले. त्यांचा देह खाजगी जागेत दफन करण्यात आला.

क्विट गोवा ठराव
१९४२ च्या ऑगस्ट महिन्यात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ने Quit India ठराव पास करुन ब्रिटीश सत्ता झुगारुन लावण्यासाठी प्राणपणाने लढा हा आदेश भारतीयांना दिला. या लढ्यात कारागृहात गेलेल्या अनेक लोकांमधे एक होते मुंबईतील गोवा काँग्रेस कमीटीचे एक संस्थापक पिटर आल्व्हारिश. २ वर्षानी एप्रील १९४४ साली त्यांची कारागृहातुन सुटका झाली. व त्याच धरतीवर गोवा काँग्रेसच्या खास सभेत Quit Goa ठराव पास करण्यात आला. पण हा ठराव संमत करुनही पोर्तुगीज वसाहतीवर त्याचा काहीच परिणाम झाला नाही. कारणे उघड आहेत.

ऑगस्ट १९४२ मधे जेव्हा छोडो भारत चळवळ सुरु केली तेव्हापासुन डिसेंबर १९४३ पर्यंत अवघ्या एक वर्ष ५ महिन्यात हजारो लोक कारागूहात गेले शेकडो हुतात्मे झाले. म्हणून या चले जाव ठरावाला महत्व आले. पण असे काही गोवा-दमण-दीव मधे घडले नाही. क्रांतीकारकांची संघटनाच तोपर्यंत निर्माण झाली नव्हती. शिवाय एक उत्साही, विचारी व गतिमान नेतृत्वही नव्हते. म्हणुन छोडो गोवा एक साबणाचा फुगा ठरला.

पण जनमानसावर सगळ्या घटनांचा प्रभाव पडत होता . तरुणांचे छोटेमोठे गट भारतीय पुढार्‍यांच्या त्यागाने प्रभावित होउन कार्यरत झाले होते. १९३९ पासुन शामराव मडकईकर यांचा गोमंतकीय तरुण संघ नावाचा गट मडगावात कार्यरत होता.पोर्तुगिज सत्तेशी मुकाबला करण्यासाठी एक संघटना असणे गरजेचे होते. म्हणुन ते गोवा काँग्रेसचा प्रचार करत. अशीच एक संघटना तिसवाडी तालुक्यातील करमळी गावात, पां. पुं शिरोडकर व स्र्यकांत नाईक यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत होती. दिवसा आपला व्यवसाय संभाळुन रात्री सरकारविरोधी भित्तीपत्रके चिकटविणे, पत्रके वाटणे अशी कामे स्वयंसेवक करत. ही काहीच नाव अश्या अनेक छोट्या छोट्या संघटना / संस्था स्वातंत्र्यासाठी आपापल्यापरीने प्रयत्न करत होत्या.


ppshirodkar.jpg
श्री. पांडुरंग पुंडलिक शिरोडकर

अशातच क्विट इंडिया सत्याग्रहात भाग घेतल्यामुळे तुरुंगवास झालेले डॉ राम मनोहर लोहिया यांची १९४६ साली सुटका झाली व ते काही काळ विश्रांतीसाठी डॉ ज्युलियांव मिनेझिस या आपल्या मित्राकडे १२ जून १९४६ रोजी असोळणा या गावी आले. त्यांच्या आगमनाची वार्ता कळताच ठिकठिकाणचे उत्साही तरुण त्यांना भेटावयास जाऊ लागले .त्यांच्याकडून मार्गदर्शन घेऊ लागले. या लोकांबरोबर केलेल्या चर्चांतून लोहिया यांना गोवेकरांची परिस्थिती समजली आणि पोर्तुगीजांविरुद्ध लढा देण्याची किती गरज आहे हे जाणवले.या लढ्याची पहिली पायरी म्हणुन लोकांना त्यांचे नागरी हक्क मिळवुन देणे हे ध्येय ठरवले आणि १८ जुन १९४६ हा दिवस ठरला.

१८ जुन १९४६ रोजी डॉ . लोहिया डॉ . मिनेझिस यांच्या सोबत मडगाव स्टेशनला पोचले. जय हिंद, भारत माता की जय वंदे मातरम च्या गजरात त्यांचे जोरदार स्वागत झाले.

Ram_Manohar_Lohia.jpg
श्री. राम मनोहर लोहिया
त्यांनी हॉटेल रिपब्लिका मधे थोडा वेळ आराम केला. सध्याकाळी सव्वाचारच्या सुमारास लोहिया व मिनेझिस नगरपालिका इमारतीसमोरच्या भाषणासाठीच्या नियोजित जागी जाउन भाषणबंदीच्या कायद्याला आव्हान देत भाषण द्यायला सुरु केली. तोच एक पोलीसांची गाडी सशस्त्र पोलीस घेउन तिथे पोचली. त्यांच्या साहेबाने भाषण बंद करायची आज्ञा केली. तिला न जुमानता लोहियांनी भाषण सुरुच ठेवले. पण त्याची लोहियांवर गोळीबार करायची हिम्मत झाली नाही. त्यांना अटक करुन मडगावच्या पोलीस ठाण्यात नेण्यात आले.

लोहियांच्या अटकेची वार्ता वणव्यागत पसरली आणि हजारोंच्या संख्येने लोकांचे समूह घोषणा देत मडगावात आले. त्यांनी एक प्रकारची मिरवणूक काढली. लोहियांच्या पाठोपाठ अनेक लोकांनी नागरी हक्कांवरच्या बंदीच्या कायद्याला आव्हान देत भाषण देणे, सभा घेणे सुरु केले. अनेकांना न्यायालयात शिक्षा ठोठावण्यात आली.व तुरुंगात पाठवण्यात आले. गोव्यात जणु काही वेगळच चैतन्य संचारल होत.

दुसर्‍या दिवशी लोहियांना कोले येथल्या रेलवे स्टेशनवर नेउन गोव्याबाहेर सोडण्यात आले.पण लोहियांनी तिथेच शपथ घेतली, जर गोवेकरांना त्यांचे नागरी हक्क परत मिळाले नाहीत तर ते नक्कीच गोव्यात परततील." ही चळवळ इथेच संपली नाही.गोवेकर व पोर्तुगीज पोलीसांचा संघर्ष असाच सुरु राहिला.आबालवृद्धांनी आपल्या हक्कांसाठी लढायची तयारी केली नव्हे ते लढले. डो. लोहिया आपल्या गोव्यात परतण्याच्या शब्दावर अटळ होते व ते गोव्यात सप्टेंबर १९४६ मधे परतले देखील. पण जेव्हा ते कोले रेलवे स्टेशनला पोचले तेव्हाच पोर्तुगीजांनी त्यांना अटक करुन आग्वाद किल्ल्यावरील तुरुंगात ठेवण्यात आले. आणी १० दिवसांनी त्यांना पुन्हा सरहद्दीवर सोडण्यात आले.

महात्मा गांधींनी डॉ. लोहियांचे कौतुक केले. परंतु गोवेकरांनी नागरी हक्क मिळवण्याच्या या चळवळीत जास्तीत जास्त सहभागी व्हावे असे त्यांचे मत होते स्वातंत्र्याबद्दल भारत स्वतंत्र झाल्यानंतर विचार करता येईल. त्यांनी गोवेकरांना अहिंसक मार्ग अवलंबायला सांगितले. डॉ. लोहिया म. गांधींच्या सांगण्यावरुन गोव्यात पुन्हा परतले नाहीत. परंतु त्यांनी आपला गोव्याच्या स्वातंत्र्यासाठीचा लढा बेळगावातून जारी ठेवला.
juliaomenezes.JPG
डॉ. श्री. ज्युलियांव मिनेझिस

त्यांनी गोवेकरांना सत्याग्रहाच्या मार्गने जाण्यास सुचवले. गोवेकर तरुणांचे समूह वेळोवेळी सत्याग्रह करु शकतील. प्रत्येक समूहात १० तरुण असावेत. त्यामुळे नोव्हेंबर १९४६ पर्यंत पोर्तुगीजांचे तुरुंग हजरो गोवेकरांनी भरुन जातील. पहिला सत्याग्रह १८ ऑक्टोबर १९४६ झाला. त्यापाठोपाठ ८ सत्याग्रह झाले. शेवटचा सत्याग्रह २८ डिसेंबर १९४६ ला झाला.ही १९४६ ची चळवळ जरी शांतीपूर्ण होती, तरी पोर्तुगीज सरकारने ह्या चळवळीला शमवण्यासाठी दडपशाहीचा मार्ग स्वीकारला. ह्या चळवळीचे नेते. डॉ. त्रिस्ताव ब्रागांझ कुन्हा, पांडुरंग पुरुषोत्तम शिरोडकर, पुरुषोत्तम काकोडकर व दिवाकर काकोडकर ह्यांना अटक करण्यात आली.आणि खास न्यायालयात सादर केले गेले. त्यांच्यावरची कारवाई/ खटला १९४७ मधे संपला. डॉ. टी बी कुन्हा, आणि पुरुषोत्तम काकोडकर यांना पोर्तुगालला, पां. पु. शिरोडकरांना अंगोला येथे तर दिवाकर काकोडकरांना काबो वर्दे येथे तडीपार करण्यात आले.
Purushottam Kakodkar.jpg
श्री. पुरुषोत्तम काकोडकर
१९५४-५५ चे सत्याग्रह
१९४६ च्या चळवळीचा परिणाम म्हणून लोंढा इथे नॅशनल काँग्रेस (गोवा) ची स्थापना झाली. १९५३ साली मुंबईत रहाणारे मूळचे गोव्याचे एक राजकारणी पीटर अल्वारिस यांची या काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाली. त्यानी काँग्रेसची चळवळ गोव्यात न्यायचं ठरवलं. त्यासाठी अनेक बैठका घेतल्या. त्या बैठकांना गोपाळ आपा कामत, पांडुरंग मुळगावकर, डॉ. फ्रान्सिस्को मार्टिन्स, डॉ पांडुरंग गायतोंडे हे उपस्थित रहात. अशाच एका बैठकीत गोव्यातली कार्यकारी समिती स्थापन झाली. त्यात डॉ. गायतोंडे यांची अध्यक्ष म्हणून निवड झाली, तर गोपाळ आपा कामत यांची उपाध्यक्ष म्हणून. लवकरच टी. बी. कुन्हा यांच्या नेतृत्वाखाली पोर्तुगीजांविरुद्ध लढा देण्यासाठी The Goa action committee स्थापन झाली.

या समितीने १५ ऑगस्ट १९५४ या दिवशी ४०००-६००० लोकानी गोव्यात प्रवेश करायची योजना आखली. पोर्तुगीजाना त्याबद्दल कळताच १ ऑगस्ट १९५४ ला गोव्याची बॉर्डर बंद करण्यात आली आणि इतर भारतातून गोव्यात वर्तमानपत्रं आणायला बंदी घालण्यात आली. कर्फ्यू लागू झाला. गोव्यातील पोर्तुगीज लष्कराला नागरिकांवर दिसताक्षणी गोळीबार करायचा आदेश देण्यात आला. बोरी आणि इतर काही ठिकाणचे पूल उद्ध्वस्त करण्यात आले. फेरी बोटी बंद करण्यात आल्या. खंदक खणले गेले. १५ ऑगस्ट १९५४ ला हजारो सत्याग्रहीना गोव्यात प्रवेश करायला प्रतिबंध करण्यात आला. पण तरीही प्रत्येकी १५ सत्याग्रहींच्या ३ तुकड्यानी कारवार, तेरेखोल आणि बांदा इथून गोव्यात प्रवेश मिळवलाच. तेरेखोल इथल्या किल्ल्यात सत्याग्रहीनी भारतीय ध्वज फडकवला. २४ तासात पोर्तुगीजानी तेरेखोल किल्ला परत ताब्यात घेतला आणि सत्याग्रहीना अटक केली. पोर्तुगीज सरकारच्या दडपशाहीला उत्तर म्हणून पुणे इथे 'गोवा विमोचन समिती'ची स्थापना झाली. या समितीने भारतभर अनेक बैठका घेतल्या आणि लोकांकडून आर्थिक मदतही मिळवली.

sudhatai joshi.jpg
गोवा विमोचन समितीच्या सभेत बोलताना सौ. सुधाताई महादेवशास्त्री जोशी., शेजारी पं. महादेवशास्त्री जोशी

(छायाचित्र श्रेयः https://picasaweb.google.com/ashokmjoshi )

१८ मे १९५५ ला समितीचे चिटणीस ना.ग.गोरे आणि सेनापती बापट यानी गोव्यात प्रवेश करायचा प्रयत्न केला, पण पोर्तुगीज सरकारने जमावावर गोळीबार केला आणि नेत्याना अटक केली. समितीने परत १ ऑगस्ट १९५५ ला मोठा सत्याग्रह करायचे ठरवले. या दिवशी सावंतवाडीपासून माजाळीपर्यंतच्या १६० किमी च्या गोवा सरहद्दीवर तणाव निर्माण झाला. भारताच्या सर्व भागातून सुमारे ४००० सत्याग्रहीनी गोव्यात प्रवेश करायचा प्रयत्न केला. पत्रादेवी इथे सुमारे ६०० च्या जमावाने गोव्यात प्रवेशाचा प्रयत्न केला. पोर्तुगीजानी गोळीबार केला आणि अनेकजण या ठिकाणी हुतात्मा झाले. गोवा विमोचन समितीला नॅशनल काँग्रेस गोवा ची साथ होतीच. पीटर अल्वारीस यांच्या नेतृत्त्वाखाली २६ जानेवारी १९५५ ला कॅसलरॉक इथे सत्याग्रहीनी प्रवेशाचा प्रयत्न केला. पीटर अल्वारीस याना गोवा पोलीस पकडू शकले नाहीत पण त्याना न पकडताच १८ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा फर्मावण्यात आली. गोवा नॅशनल काँग्रेसने गोव्यातल्या नागरिकाना कोणताही कर न भरण्याचे आणि कायदेभंग करण्याचे आवाहन केले.

१९५५ मध्ये मोहन रानडे यांच्या नेतृत्त्वाखाली अनेक ठिकाणी कस्टम्स आउटपोस्ट आणि पोलीस ठाणी यांच्यावर सशस्त्र हल्ले झाले. गुळेली कस्टम्स आउटपोस्ट, कलंगुट पोलीस स्टेशन, अस्नोडा रावणफोंड आणि हळदोणे पोलीस आउटपोस्ट यांच्यावर हल्ले झाले. बेती पोलीस स्टेशनवरच्या हल्ल्यात मोहन रानडे गोळी लागून जबर जखमी झाले. त्यांची प्रकृती थोडी सुधारताच त्यांच्यावर खटला चालवून २६ वर्षांच्या सश्रम कारावासाठी त्याना पोर्तुगालला पाठवून देण्यात आले. गोवा मुक्तीनंतर लोकानी मोठ्या प्रमाणात निदर्शने केल्यावर त्याना सोडून देण्यात आले.

या स्वातंत्र्यसैनिकांच्या यादीत आणखी एक महत्त्वाचे नाव म्हणजे तेलो डी मस्कारेन्हस. मार्मुगोवा इथे १८९९ मध्ये जन्म झालेल्या तेलो डी मस्कारेन्हास यांनी १९५० ते १९५९ या काळात मुंबईहून Ressurge Goa हे वृत्तपत्र चालवले. गोवा मुक्ती संग्रामात भाग घेतल्यामुले पोर्तुगीज सरकारने त्यांना अटक करून त्यांच्यावर खटला भरून पोर्तुगालला पाठवून दिले. तिथे त्यांना १९७० पर्यंत तुरुंगात खितपत पडावे लागले. १९७० साली सुटका झाल्यानंतर ते गोव्यात परत आले आणि त्यांनी आपले वृत्तपत्र परत चालू केले. तुरुंगात असताना त्यांनी महात्मा गांधींच्या आत्मचरित्राचे आणि गुरुदेव टागोरांच्या अनेक रचनांचे पोर्तुगीजमधे भाषांतर केले. हा उत्तम लेखक आणि स्वातम्त्र्यसैनिक १९७९ साली निधन पावला.

220px-Telo_de_Mascarenhas_in_1940s.jpg

ऑपरेशन विजय
गोवामुक्ति
१९५५ साली पं. नेहरूंच्या नेतृत्त्वाखालील भारत सरकारने पोर्तुगीजानी गोवा सोडून जावे या दृष्टीने गोव्याची आर्थिक नाकेबंदी करायचं ठरवलं. पण पाकिस्तानने समुद्रमार्गे मदत करून ही नाकेबंदी परिणामशून्य केली. भारत सरकारवर गोवामुक्तीसाठी सर्व भारतीय नागरिकांकडून दबाव येऊ लागला. शेवट बळाने गोवा स्वतंत्र करायची एक योजना आखण्यात आली. तिला नाव दिलं 'ऑपरेशन विजय'. या योजनेच्या यशस्वी कार्यवाहीची जबाबदारी जन. चौधरींकडे सोपवण्यात आली. ११ डिसेंबर १९६१ पर्यंत बेळगाव, वापी आणि उना इथे अनु. गोवा, दमण आणि दीव वर हल्ले करण्यासाठी भारतीय फौजा तैनात करण्यात आल्या.

गोव्यावरच्या प्रत्यक्ष लष्करी कारवाईचं नेतृत्व मेजर जन. कॅन्डेथ यांच्यावर सोपवण्यात आलं. पोर्तुगीजांचं लक्ष वळवण्यासाठी दक्षिणेकडून हला करावा आणि मुख्य हल्ला उत्तर आणि पूर्वेकडून करावा असं ठरलं. १२ डिसेंबर १९६१ ला गोव्याला इतर भारताशी जोडणारे २ मुख्य रस्ते नागरिकांना बंद करण्यात आले. हे सैन्याच्या हालचालींसाठी केलं गेलं. १८ डिसेंबर १९६१ ला दिवस उजाडतानाच प्रत्यक्ष हल्ला करावा असं ठरलं. गोव्याच्या उत्तरेकडून २ आघाड्यांवरून हल्ला सुरू झाला. ५ वाजता भारतीय सैन्याने गोव्यात प्रवेश केला अणि पिळगाव, बाणास्तरी मार्गे पणजीच्या दिशेने कूच केलं. साधारण सकाळी ६ वाजता बाणास्तरीला येताच तिथला पूल पोर्तुगीजानी उडवून दिलेला भारतीय लष्कराला आढळला.
kpcandeth.jpg
मेजर जन. के. पी. कॅन्डेथ

दुसर्‍या पलटणीने सकाळी ६.३० वाजता दोडामार्ग इथून गोव्यात प्रवेश केला. आणि अस्नोडा, थिवी, म्हापसा, बेती अशी वाटचाल केली. पोर्तुगीजानी वाटेतले पूल आणि बांध उद्ध्वस्त करून टाकले होते. जागोजागी सुरुंग पेरले होते, पण स्थानिक लोकांनी सुरुंग पेरलेल्या जागा बरोबर दाखवून भारतीय लष्कराला बहुमोल मदत केली. संध्याकाळी ५ च्या दरम्यान भारतीय लष्कर बेती इथे पोचलं. आता फक्त मांडवी नदी ओलांडली की पणजी. किंचितसे गोळीबाराचे आवाज ऐकताच संध्याकाळी ६ वाजता पणजी सेक्रेटरियट (जुना आदिलशाही राजवाडा) समोरचा पोर्तुगीज ध्वज उतरवण्यात आला आणि तहाचं, शरणागतीचं पांढरं निशाण फडकवण्यात आलं. १९ डिसेंबर १९६१ ला सकाळी ७.३० वाजता भारतीय सैन्याने फेरीबोटीच्या धक्क्यावर पणजीत प्रवेश केला. बाणास्तरी इथला पूल उडवून दिलेला असल्याने भारतीय सैनिक नदीतून पोहून पल्याड आले आणि ८.३० च्या दरम्यान पणजी इथे पोचले. मे. जन. कॅन्डेथ यानी सकाळी १०.३० वाजता भारताचा तिरंगा सेक्रेटरियटसमोर फडकवला.

पूर्वेकडून गोव्यात प्रवेश केलेल्या पलटणीने प्रथम फोंडा गाठलं. मग बोरी मार्गे मडगावकडे प्रस्थान ठेवलं. भारतीय सैन्याचं स्वागत करण्यासाठी मडगावचे रस्ते लोकांनी फुलून गेले होते. वातावरण आनंदाने भरून गेलं होतं आणि उत्साहाच्या आणि राष्ट्रीय घोषणांनी भारून गेलं होतं. तिथून भारतीय सैन्याने वास्को द गामा, आणि मार्मुगोवा बंदराकडे वेर्णा, दाबोळी मार्गाने प्रस्थान केलं. संध्याकाळी ४.३० वाजता मार्मुगोवा (मुरगाव) भारतीय सैन्याच्या ताब्यात आलं. आदल्या दिवशी काणकोण ताब्यात घेणारी सैन्याची तुकडी दुसर्‍या दिवशी सकाळी मडगावला पोचली. त्यानी शहरात शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित केली. तसंच सगळ्या सरकारी इमारती, पोस्ट ऑफिस, बँका, पोलीस स्टेशन्स इ ताब्यात घेतले. याच दिवशी दमण आणि दीव इथल्या पोर्तुगीज तुकड्यानी कोणताच लढा न देता शरणागती पत्करली. तसंच भारताच्या नौसेनेने गोव्याजवळच्या अंजदीव बेटावर कब्जा केला.

शरणागतीचे अधिकृत पत्र पोर्तुगीज गव्हर्नर जन. वासालु इ सिल्व्हा यानी वास्को द गामा इथल्या एका रस्त्यावर गाडीचे हेडलाईट्स लावून त्या उजेडात सही करून ७.३० वाजता मेजर के. एस. धिल्लाँ यांच्याकडे सुपूर्त केले. आणि १५६० पासून ३ तालुक्यांमधे, तर १७८१ पासून उर्वरित गोव्यात अनिर्बंधपणे चालू असलेली पोर्तुगीजांची सत्ता संपुष्टात आली. आणि १९ डिसेंबर १९६१ ला संध्याकाळी ऑपरेशन विजयची यशस्वी सांगता झाली.

क्रमशः

***

विशेष सूचना - या लेखमालेचे स्वरूप एकंदरीतच ललित लेखनाच्या अंगाने जाणारे पण गोव्याच्या समृद्ध इतिहासाचे, आणि वर्तमानाचेही, दर्शन वाचकांना करून देणे एवढेच आहे. वाचकांना विनंती की त्यांनीही ते तेवढ्याच बेताने घ्यावे. आम्ही कोणीही इतिहासकार / इतिहासतज्ञ वगैरे नाही आहोत. पण थोडे फार वाचन करून, माहिती जमा करून इथे मांडण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे. तपशीलात अथवा आमच्या निष्कर्षात चूक / गल्लत असू शकते. पण काही चांगले लेखन यावे आणि गोव्याची रूढ कल्पना सोडून त्याहून वेगळा गोवा काय आहे हे लोकांना कळावे म्हणूनच हा सगळा लेखमालेचा उद्योग.

- टीम गोवा (ज्योति कामत, प्रीतमोहर, बिपिन कार्यकर्ते )

सोमवार, १४ जानेवारी, २०१३

आमचे गोंय - भाग ६ - स्वातंत्र्यलढा १




***

मराठी सत्तेच्या लयानंतर पोर्तुगीज सत्तेला पहिला प्रथम गोव्यातून जबरदस्त विरोध जर कुणी केला असेल तर तो सत्तरीच्या राणेंनी. सत्तरी गोव्याच्या ईशान्येलाआहे. लहान मोठ्या पर्वतांचा हा प्रदेश. सह्याद्रीच्या हाताची बोटे जणू या प्रदेशात विसावली आहेत.या डोंगर दर्‍यांत राहणारे लोक वाघासारखे शूर व सशासारखे चपळ आहेत. इमान हा त्यांचा स्थायीभाव. इमानापुढे इनाम कस्पटासमान मानणे ही यांची वृत्ती. विश्वासाला पात्र असे हे लोक दिलेल्या वचनाला जागतात, पण कोणी विश्वासघात केला तर हे लोक प्रक्षुब्ध होतात आणि प्रतिकाराला हात उंचावतात. आणि तेव्हा प्रतिस्पर्ध्याच्या सामर्थ्याचा विचारही त्यांच्या मनात येत नाही. सडपातळ अंगलटीचे हे लोक दिसतात गरीब पण आहेत एखाद्या माडाप्रमाणे ताठ मानेने जगणारे. मोडेन पण वाकणार नाहीत वृत्तीचे. पोर्तुगीजांच्या अन्यायाविरुद्ध यांनी कितीतरी वेळा बंडाचे निशाण उभारले. पोर्तुगीज सरकारने त्यांना बलप्रयोगाने झोडपले, कापून काढले. पण अन्यायाचा प्रतिकार करण्याचे सतीचे वाण घेतलेल्या सत्तरकर गोमंतकीयांनी ते व्रत निष्ठेने प्रत्येक पिढीत पाळले.

सत्तरी प्रदेशात राणे राजासारखे होते. सन १७४० मधे पोर्तुगीजांनी सत्तरी तालुका जिंकला. वाडीकर भोसल्यांनी राणेंना जे हक्क दिले होते ते चालू ठेवण्याचे त्यांनी आश्वासनही दिले होते. पण पुढे ते त्यांनी पाळले नाही.सन १७५५ मधे मोट्ठा उठाव झाला. राणेंनी व रयतेने आपण स्वतंत्र असल्याचे घोषित केले. १७५५ ते सन १८५५ ह्या कालखंडात एकुण २२ वेळा बंडे झाली. बडे नसुन खर तर ही युद्धेच होती. आणि ह्या एवढ्या कालावधीत राणे घराण्याच्या ४ पिढ्यांनी लढा निकराने चालु ठेवला. २२ वेळा युद्ध होउनही स्वातंत्र्य न मिळाल्याच कारण म्हणजे चांगल्या नेतृत्वाचा अभाव. यातल्या उल्लेखनीय युद्धांपैकी एक आहे दीपाजी राणेंचे लढलेले युद्ध.

सन १८५१ च्या जानेवारी मधे व्हिश्कोंदि द व्हील बॉव्ह द औरें हा विजरेई झाला. त्याने राणे सरदेसायंचे मोकाशे, इनामे खालसा करण्याचा प्रयत्न केला. काल्सोरियु नावाचा जाहिरनामा काढला गेला. त्या जाहिरनामे पुरुषांना विजार खालण्याची व स्त्रियांना चोळी घालण्याची सक्ती करण्यात आली. त्या काळात हिंदु पुरुष धोतर नेसत, सत्तरीतील गरीब लोक तर पंचा नेसत. आणि बायका लुगडी नेसत. ह्या जाहिरनाम्याने विजार न घालण्यार्‍या पुरुषांना व चोळी न घालणार्‍या स्त्रियांना कैद करण्याची मोकळीक दिली. हे कारण देउन पाखल्यांनी (युरोपियन लोक) स्त्रियांना पकडण्याचा व त्यांच्यावर बलात्कार करण्याचा सपाटा लावला. असल्या अत्त्याचारी, अन्यायी अमानुष राजवटीने रयत गांजली. व परिणामस्वरुप दीपाजी राणे सरदेसाई यांनी २६ जानेवारी १८५२ रोजी पोर्तुगीज सत्तेच्या प्रतिकाराला दंड थोपटले.

दीपाजीनी म्हादई नदीच्या किनार्‍यावरील नाणुसचा किल्ला प्रथम ताब्यात घेतला. त्या किल्ल्यात पोर्तुगीजांचा दारुगोळा व शस्त्रांचा मोठा साठा होता. तो दीपाजींना मिळाला. त्यानी नाणुसच्या किल्ल्याला आपले मुख्य ठाणे केले. तेथुन गनिमी काव्याने सरकारी कचेर्‍या, सैनिकांच्या चौक्या यांवर हल्ले करुन पोर्तुगीजांना सत्तरीतुन पळता भुई थोडी केली. सत्तरीवर राण्यांचे राज्य सुरु केले. दीपाजींचा हा पराक्रम पाहुन सत्तरीतील व आजुबाजुच्या प्रदेशातील देसाई, गावकर वगैरे वतनदार लोक आपापल्या रयतेसह त्यांना येउन मिळाले. सत्तरीतील ही उलथापालथ शांत करण्यासाठी विजेरईने लियांव नावाच्या युरोपियन कॅप्टनला ४० युरोपियन सैनिक देउन पाठवले. त्याला परिस्थितीची योग्य जाण नसावी. पहिल्याच झटपटीत त्याचे १ आल्फेरीश, ४ सैनिक जखमी झाले व एक काव ठार झाला. मग लियांव ने माघार घेतली. व उरलेल्या सैन्यासह साखळीच्या कोटाचा आश्रय घेतला. फोंड्याहुन ३० सैनिकांची अजुन १ तुकडी साखळीला कॅप्टन लियांवच्या मदतीला चालली होती. दीपाजीनी तिच्यावर गांजे येथे हल्ला केले व त्यांचा पराभव केला. तिथल्या आसपासच्या गावांतील चौक्याही लुटल्या.

इतके झाल्यावर विरजेई चे डोळे उघडले फेब्रुवारीच्या सुरवातीला लेफ्ट. कर्नल ज्युअंव मेमंदेस्स याच्या नेतृत्वाखाली पायदल सैनिकांची एक बटालियन तसेच मेजर ज्युआंव द सिल्व्ह ह्याच्या अधिकाराखाली तिरंदाजांची १ बटालियन व ५५० शिपई सत्तरीवर पाठविले. या सैन्याचा दारुण पराभव झाला. सत्तरीच्या जंगलातुन अचुक गोळ्या येउन फिरंगी सैनिक पटापट जमिनीवर कोसळले. फिरंग्यांना दीपाजीचे सैनिक तर कोठेच दिसत नसत . नुसते हवेतुन बार मारल्यागत गोळ्या त्यांना लागत. त्या घनदाट अरण्यात फिरंग्यांचे हाल हाल झाले. मग विजेरेइ ने दीपाजींशी समेट करावयास त्याना निमंत्रण दिले. परंतु दीपाजींनी विजेरईवर विश्वास ठेवला नाही व युद्ध चालूच राहिले.

दीपाजींच्या लोकांनी सरकारी सैन्याला चांगल्याच हुलकावण्या दिल्या. ज्या प्रदेशात सरकारी सैन्य घुसत असे तिथे दीपाजींचा एकही माणूस दिसत नसे. पण त्या प्रदेशापासुन दूरच्या ठिकाणी सर्वत्र दीपाजींचे लोक दिसत असत . दीपाजींचे धारिष्ठ्य इतके की राजधानीवरुन अवघ्या ७ किमी वर असलेल्या कुंभारजुवे बेटावर त्यांनी धाडी घातल्या. इथे सुखवस्तु , श्रीमंत लोकांची वस्ती होती. केंकरे, धुमे,सरदेसाई, भांडारे, घोडेकर, खाजनिये यांचे मोठमोठे वाडे तिथे होते. कुंभारजुवे हे छोटे बेट राजधानीजवळ असल्याने बंडखोर इथे येणर नाहीत अशी त्यांची समजूत होती.

२६ मे ला दीपाजींनी कुभारजुव्यावर धाड घालुन तिथल्या धनिकांकडुन खंडणी वसूल केली. नंतर त्यांच्या सैन्याने केपे, काणकोण, सांगे, हेमाडबार्से, भतग्राम (आताची डिचोली) या भागातुन पोर्तुगीजांस हाकलून लावले. पोर्तुगीज सरकार ने ७ जून ला डिचोली, फोंडें , सत्तरी व हेमाडबार्से इथे मार्शल लॉ पुकारला. जनतेची फूस व सहकार्य असल्याशिवाय दीपाजींना हे विजय मिळू शकत नव्हते. असे पोर्तुगीजांचे म्हणणे होते . व ते खरेही होते. दीपाजी पैशासाठी सरकारी तिजोर्‍या फोडीत व धनिकांकडून पैसे उकळीत, पण गरीबांना त्यांनी त्रास दिला नाही. त्यांच्या सैन्यात सामील झालेल्या लोकांच्या कुटुंबाचे पालन पोषण ते करीत. व त्यामुळे जनतेचे संपूर्ण सहकार्य त्यांना मिळत असे.

सरकारची तिजोरी या युद्धामुळे रिकामी झाली होती. दि. २ जुलै रोजी ३ टक्के व्याजदराने सहा लाख असुर्प्यांचे कर्जरोखे काढले पण कोणीही ते घेईना. दि १० सप्टें. ला सैन्याच्या धाकाने ते रोखे विकत घ्यायला लावले. ४ ऑक्टों. ला विजेरई स्वतः ३००० युरोपियन सैनिक व १००० शिपाई घेउन सत्तरीवर चालून गेला. त्याने नाणुसचा किल्ला ताब्यात घेतला. पण दीपाजीनी आधीच आपली माणसे, शस्त्रास्त्रे व दारुगोळा घेउन तिथून पोबारा केल्याने त्याला काहीच मिळाले नाही. त्यांनी करझोळ या दुर्गम ठिकाणी आपला मुक्काम हलविला.

अश्या प्रकारे दोन अडीच वर्षे (सन १८५२-सन १८५४ ) गेली. पोर्तुगीजांना विजय मिळण्याचे चिन्ह दिसेना. मग विजेरईने पुन्हा एकदा समेटाचा प्रस्ताव मांडला. पोर्तुगीज सैन्यातील एक माजी अधिकारी जुझे पावलु द ओलिव्हैर पेगादु दीपाजींचा मित्र होता. सन १८५४ च्या मार्च महिन्याच्या सुरवातीला त्याला विजेरईने दीपाजींकडे पाठविले. त्याने विजेरईचा निरोप दीपाजींना पेश केला. विजेरई ने त्यांना पणजीच्या भूशिरावरील काबो राजप्रासादात भेटायला येण्याचे आमंत्रण दिले होते. दीपाजींनी आमंत्रण स्वीकारले. पण ते चांगलेच मुत्सद्दी होते. काबो राजनिवासात काही दगाफटका होऊ नये म्हणुन त्यांनी पेगादाचे ३ मुलगे गांजे येथे ओलीस ठेउन घेतले. त्यापैकी एक सैन्यात होता. . ४ मार्चला ते राजनिवासात जाणार होते. ११ पर्यंत पोचले नाहेत तर त्या तिघांनाही प्राण गमवावे लागले असते.

दीपाजी राणे सरदेसाई जेत्याच्या दिमाखाने पणजीत प्रवेश करते झाले. ते होडीतुन उतरताच त्यांच्या लोकांनी शिंग फुंकुन त्यांच्या आगमनाची वार्ता दिली .तेथुन ते काबो राजनिवासात गेले पण विजेरईने भेट घेतली नाही. दीपाजींनी आपल्या महत्वपूर्ण साथीदारांसकट यावे मगच मी भेट घेइन असा निरोप दिला. हा प्रसंग विजेरईचा हेतु निर्मळ नव्हता हेच सिद्ध करतो.

खाशे दीपाजी राणे

पण शेवटी २८ मे १८५५ रोजी पोर्तुगीज सरकारने जाहीर केलेल्या वटहुकुमावर सही करुन दीपाजींनी व त्यांच्या साथीदारांनी सरकारशी तह केला. या वटहुकुमाची भाषा 'पराभूत झालो तरी तंगडी वर.' अश्या पद्धतीची आहे. वटहुकुम म्हणतो की दीपाजी राणे व सत्तरीतील इतर वतनदार पोर्तुगीज सरकारकडे आपला गुन्हा कबुल करुन दयेची भीक मागत आहेत आणि दारिद्र्यात मरु नये म्हणुन थोडे तरी द्रव्यसाहाय्य मागत आहेत. पोर्तुगीज भाषा अवगत नसल्याने दीपाजींनी या वटहुकुमावर अंगठा उठवला नाहीतर.....

दीपाजींचे बंड तलवारीच्या धारेवर व बंदुकीच्या गोळ्यांनी थंड करण्याचे प्रयत्न सरकारने सतत ३ वर्षे केले. पण त्यात अपयश आले. दीपाजींच्या सैन्यात फंदफितूरी झाली नाही. जनतेने त्याना योग्य साथ दिली.यातच त्यांचे श्रेष्ठत्व. त्यांचे बंड हे जनतेच्या कैवारातुन व त्यांच्या स्वतःच्या हंकावर केलेल्या आघातातुन स्फुरले होते. ते सर्वार्थाने जनतेचे बंड होते.

आजही जनता राणे सरदेसाई व त्यांच्या वंशजांना मान देते. त्यांच्या घराण्याला खाशे ही मानाची पदवी देउन. सत्तरीतील क्षत्रीय देसाई, राणे यांना त्यांच्या नावाने कोणीच पुकारत नाही ते आमचे मानाचे खाशे आहेत !!!

दीपाजींच्या बंडानंतर गोव्यात स्थानिक पातळीवर लहान लहान उठाव झाले. पण एखादा नाव घेण्यासारखा प्रयत्न झाला नाही. या वेळेला इतर भारतातही इंग्रजांविरुद्ध लोक हळूहळू उठाव करत होते, आणि गोव्यातील जनता या सगळ्या प्रयत्नांकडे पाहत होती.

१८९५ साली शिपायांचे बंड झाले. सन १८९४ मधे पूर्व आफ्रिकेतील मोझांबिक या पोर्तुगीज वसाहतीतील निग्रो लोकांनी बंड केले होते. हे बंड शमविण्यासाठी गोव्यातील शिपायांच्या तुकड्या ३० सप्टें. १८९५ ला आफिकेत पाठवायचा पोर्तुगाल सरकारचा हुकुम २६ ऑगस्ट्ला सुटला. त्यात भर म्हणून शिपायांना नविन पद्धतीची काडतुसे देन्यात येत होती. ती दातांनी उघडावी लागत. त्या काडतुसांना गाईची व डुकराची चरबी लावलेली असते अशी अफवा पसरली. आपणाला आफ्रिकेत पाठवुन बाटवणार असा शिपायांचा समज झाला. वळवईच्या बंडाचा (सन १८७०) समेट करताना सरकारने वचन दिले होते की, सैनिकांच्या इच्छेविरुद्ध त्यांना भारताबाहेर पाठविण्यात येणार नाही. पण ते वचन मोडल जात होत. यामुळे हिंदु-मुसलमान सैनिक बिथरले. १३ सप्टेंबरच्या रात्री २ वाजता शिपाई आपापली शस्त्रे व दारुगोळा घेउन बाहेर पडले आणि त्यांनी सत्तरीची वाट धरली.गव्हर्नरला हे बंड शमविण्यासाठी शिपायांच्या मागण्या मान्य कराव्याच लागल्या.

लोकशाहीचा उदय

विसावे शतक उगवले. पोर्तुगीज सत्तेविरुद्ध ४ शतके गोमंतकीय जनता झुंजत होती.पण आक्रमणाशी मुकाबला करताना त्याच्या सामर्थ्याचा , आयुधांचा अभ्यास करावा लागतो. म्हणुन गोमंतकीय हिंदू पोर्तुगीज शिक्षणाकडे वळले. या शतकाच्या सुरवातीला गोमंतकातील उच्च शिक्षणाची शाळा 'लिसेव', यात शिक्षण घेणार्‍या हिंदुंची संख्या २०-२५ च्या आत होती व हा कोर्स पुरा केलेले विद्यार्थी तुरळकच. वकील, डॉक्टर ह्यांची संख्या १-२ पेक्षा जास्त नव्हती.

सन १९०७ मधे सरकारने प्राथमिक शिक्षणात "ख्रिश्चन डॉक्ट्रिन" हा विषय अंतर्भूत केला आणि हिंदूंना सरकारी शाळेत शिक्षक होण्यास बंदी घातली. तोपर्यंत गोव्यात सरकारी प्राथमिक शिक्षकांपैकी फार थोडे हिंदू होते. ही बंदी म्हणजे आपल्यावरील हक्कांवरचे आक्रमण याची जाणीव त्यांना झाली. त्यांनी एकजूटीने आवाज उठविला गोमंतकीय जागृत होत असल्याची ती निशाणी होती. ही बंदी १९१० मधे पोर्तुगालात प्रजासत्ताक राज्य स्थापन होईपर्यंत चालू राहिली.

१९०८ मधे उर्वरित भारतात व गोव्यातही अनेक वैशिष्ट्यपुर्ण घटना घडल्या.

मुजफ्फराबाद येथे पहिला बाँब टाकण्यात आला, खुदीराम बोस व प्रफुल्लकुमार चाकी यांनी जस्टिस किंग्ज्फॉर्डची गाडी समजून तीवर बाँब फेकला. पण तो त्यात नसल्याने बचावला. त्यातल्या २ गोर्‍या स्त्रिया ठार झाल्या. या बाँबफेकीची तरफदारी करुन लेख लिहिले म्हणुन लो. टिळकांना पकडुन त्यांना ६ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगायला मंडालेस पाठविण्यात आले.

याच वर्षी पोर्तुगालात फेब्रुवारी महिन्यात राजा दो कार्लुश, व युवराज दों फिलीप ह्यांना गोळ्या झाडुन ठार करण्यात आले. राजपुत्र दो मानुएल राजमातेमुळे थोडक्यात बचावला. व नंतर राजा बनला.

या घटनांचा परिणाम गोमंतकीय तरुणांवर झाला गोमंतकात शिवजयंतीसारखे उत्सव साजरे होऊ लागले. जिवबादादा केरकर यांची पुण्यतिथी मार्गशीर्ष वद्य १३ सुद्धा साजरी केली जाऊ लागली. भारतात क्रांतीकारी संघटना निर्माण झाल्या. त्यांना ब्रिटीश सरकार पकडण्याची शर्थ करु लागले. त्यातील काही क्रांतीकारक भूमिगत होउन गोव्यात आले.. केरीचे रामचंद्र पांडुरंग वैद्य उर्फ दादा वैद्य यांनी शाळा उघडून त्यांना शिक्षक म्हणून नेमले. ही शाळा म्हणजे फोंड्यातले आजचे ए जे डी आल्मेदा हायस्कूल. २०१० मधे ह्या शाळेने आपला शतकपूर्ती महोत्सव साजरा केला.



प्राणाचार्य दादा वैद्य.

एवढे सगळे होत असताना पोर्तुगीज सरकार झोपले नव्हते. भारतातील चळवळीचे लोण गोव्यात शिरु नये म्हणुन गोव्यातील कार्यकर्त्यांवर त्यांनी कडक नजर ठेवली होती. अशा पार्श्वभूमीवर १९१० साल उजाडले. ४ ओक्टोबरच्या मध्यरात्री क्रांतीकारकांनी दों मानुएल च्या राजवाड्यावर सैनीकांच्या मदतीने हल्ला केला. राजा व त्याचे कुटुंब कसेबसे निसटुन पळुन गेले. दुसर्‍या दिवशी ५ ऑक्टोबर रोजी पोर्तुगाल प्रजासत्ताक राज्य झाल्याचे घोषित केले गेले. गोमंतकातील हिंदूंचे कैवारी म्हणुन ख्याती असलेले आंतानियु जुझे द आल्मैद मंत्रिमंडळात गेले. ते गृहमंत्री बनले.


दों मानुएल

गोमंतकात या घटनेचे उत्स्फुर्त स्वागत झाले. विशेषतः हिंदू समाजाच्या आनंदाला उधाण आले. ४०० वर्ष राजकिय व सांस्कृतिक आक्रमणाचा प्रतिकार करीत जो छळ सोसला होता,त्याचा अंत होईल म्हणुन जनता आनंदित होती. हिंदुंन केवळ आनंदच झाला नाही तर त्यांनी आपली प्रगती करण्यासाठी कंबर कसली. या प्रयत्नांचे दृश्य स्वरुप ४ क्षेत्रांत प्रकर्षाने दिसुन आले.

१) नियतकालिके २) शैक्षणिक संस्था ३) सांस्कृतिक संस्था ४) राजकिय पक्ष

नियतकालिके

गोमंतकियांना जागृत करुन कार्यप्रवृत्त करण्यात नियतकालिकांचा सिंहाचा वाटा आहे. आत्माराम सुखटणकरांच्या देशसुधारणेच्छुने मराठी माध्यमातुन शिक्षणाच्या धोरणाचा पाठपुरावा व पोर्तुगीजांच्या राजकीय धोरणावर टीकासत्र आरंभ केले. गोवा-मित्र (संपादक- सुब्राय नायक-मडगांव), journal daa Novas Conquistaa (संपादक गोविंद भास्कर पार्सेकर- पेडणे) यासरखी मराठी-पोर्तुगीज नियतकालिके १८८० च्या सुमारास लोकजागृती करत असत. मराठीतुन हिंदुंना जागविणे व पोर्तुगीजमधुन हिंदुंच्या भावना स्थानिक ख्रिश्चन व युरोपियनांपर्यंत पोचविण्याचे काम ही नियतकालिके करत. गोवा-मित्र वर १८८३ मधे बंदी आणली. मग म्हापश्यातुन आर्यबंधु व गोवा पंच , मडगावातुन गोवात्माही नियतकालिके सुरु झाले ३-६ महिनेच टिकली. दरम्यान दादा वैद्य पथ्यबोध नावाचे आरोग्यविषयक नियतकालिक चालवत.

१८८९ पासुन अजुन भर पडतच गेली न्यायचक्षु, गोमंतक सुविचार्, अशी मराठी तर A voz do Povo( जनतेचा आवाज),Mandovy (मांडवी) सारखी पोर्तुगीज नियतकालिके सुरु झाली.१८९४ मधे अतिशय जहाल असे साप्ताहिक पणजी शहरात प्रसिद्ध होऊ लागले. त्याचे नाव O Brado Indiano. म्हणजे भारतियांनी मारलेली दु:खाची आरोळी.हे साप्ताहिक पोर्तुगीजांवर जहाल टीका करत असे. या साप्ताहिकाचे संस्थापक व प्रेरणाशक्ती फादर आल्व्हरिश होते. पाद्री आल्वारिश यांच्या अंगी राष्ट्रीय वृत्ती पुरी भिनली होती. स्वदेशीचा पुरस्कार करण्याची संकल्पना लाल-बाल-पाल त्रिमुर्तींनी देण्याआधी दहा वर्षे त्यांनी सुरु केली होती. ह्या साप्ताहिकाला केवळ १० महिन्याचे आयुष्य लाभले परंतु तेवढ्यात परक्या फिरंग्यांबदल जनतेच्या मनात क्षोभ निर्माण करण्यात ब्रादु इन्दियानु यशस्वी ठरला.

१९०० मध O Heraldo नामक पोर्तुगिज दैनिक पणजीत निघु लागले. हे गोमंतकातील पहिले दैनिक त्याच्या संपादक मंडळात त्यावेळचे विचारवंत, तेजस्वी तरुण मंडळी होती. आपल्या देशाला अवनतीच्या गर्तेतुन वर काढण्यासाठी हे तरुण एकत्र आले होते. लोकजागृतीचे व समाजप्रभोधनाचे कार्य या दैनिकातुन मोठ्या तडफेने होऊ लागले. या तरुणांच्या धडपडीकडे सरकारचे लक्ष गेले नसते तरच नवल . येराल्डो हे संपादक डॉ. आंतानियु कुन्य(कुन्हा) यांना अटक झाली. व आग्वादच्या किल्ल्यावर पाठविण्यात आले.

सांस्कृतिक पुनरज्जीवनाच्या काळात स्त्रियाही मागे राहिल्या नाहीत. हळदकुंकु व सौभाग्यसंभार नावाची मासिके बायका चालवत. याच्या संपादिका होत्या सौ. सरुबाई रामचंद्र वैद्य. (दादा वैद्यांच्या पत्नी)



शैक्षणिक संस्था

गोमंतकीयांमधे राष्ट्रप्रेम रुजविण्याच्या, जोपासण्याच्या व वृद्धिंगत करण्याच्या कामात मराठी शाळांचा व शाळामास्तरांचा सिंहाचा वाटा आहे. गोमंतकातील मराठी नष्ट करण्याचे प्रयत्न पोर्तुगीज सरकारने केले.पण हिंदुंनी जशी आपली दैवते जपुन ठेविली, तशी मराठी भाषा व संस्कृती जीवापाड जतन केली. देवळांच्या अग्रशाळांमधे व धनिकांच्या घरात पंतोजी मराठीचे वर्ग चालवित असत. शिक्षणाची संधी सार्वत्रिक नव्हती. औव्यवस्थित अभ्यासक्रम असलेली पहिली मराठी शाळा म्हापसा शहरात १८८५ साली रामचंद्र दत्ताजी आजरेकर यांनी स्थापन केली. आजुबाजुच्या गावांमधेही २०-२५ शाळा त्यांनी सुरु केल्या.

पणजीत त्याच सुमारास एक शाळा सुरु होती. तिला धेप्यांची शाळा म्हटले जाई कारण त्या शाळेचा खर्च श्रीमंत धेंपे करीत शाळेला संस्थेचे रुप देऊन तिचे नामकरण करण्याची प्रथा १९०५ नंतर सुरु झाली.५ ऑक्टोबर १९०८ रोजी पणजीत मुष्टीफंड संस्था स्थापन झाली. ह्या संस्थेचे उच्चविद्याविभूषित स्वयंसेवक खांकेला झोळी लावुन दारोदार फिरत. प्रत्येक घरातुन मूठ-दोन मूठी तांदुळ त्यांच्या झोळीत पडे . या तांदळांच्या विक्रीतुन येणार्‍या पैशाने श्री महालक्ष्मी विद्यालय व सरस्वती विद्यालय या दोन मराठी शाळा संस्थेने सुरु केल्या. २००८ साली ह्या शाळेचा शतकपूर्ती महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. चर्चच्या आवारात पाद्रीही शाळा चालवत. को़कणी भाषेत, ज्या भाषेत गोव्याचे दैनंदिन व्यवहार चालत त्या भाषेत. फक्त त्यांनी कोकणीला रोमन भाषेचा साज चढविला.

मुष्टीफंड संस्थेची जुनी इमारत.

मुष्टीफंड संस्थेची आत्ताची इमारत.

गोमंतकात मराठी पुनर्जीवित करण्यात जनतेने केलेले प्रयत्न कौतुकास्पद व अभिमानास्पद आहेत. त्यांनी स्थापलेल्या विद्यालयांना अनुदान मिळत नसे.फीचे उत्पन्न तुटपुंजे असे. मासिक तीन आणे किंवा चार आणे. त्यातही गरिबांना सूट. केवळ देणग्यांवर त्या शाळा चालत. शिक्षकांच्या जेवणाखाण्याची जबाबदारी गावातील सुखवस्तु लोक पत्करीत.पण शाळेच्या इमारतीसाठी, शैक्षणिक उपकरणांसाठी पैसा लागेच. तो भिक्षां देहि करुन मिळवायचा.

मुलींच्या शिक्षणासाठी मडगावला महिला व नुतन विद्यालय, आदर्श वनिता विद्यालय, कन्याशाळा पणजी इत्यादी शाळा स्थापल्या गेल्या.

सांस्कृतिक संस्थांचे कार्य

पुनरुज्जीवनाच्या काळात शैक्षणिक संस्थांसोबतच चर्चामंदिरे व वाचनमंदिरेही उघडण्यात आली.१९०० च्या सुमारास गोवा हिंदु पुस्तकालय पणजी, रामनाथ दामोदर वाचन मंदिर मडगाव, सरस्वती वाचनमंदिर पणजी, शारदा वाचनमंदिर कुंभारजुवे. अशी पेडणेपासुन काणकोणपर्यंतच्या गावागावात वाचनमंदिरे सुरु केली गेली. अनेक राष्ट्रीय नियतकालिके तिथे वाचण्यास मिळत व राष्ट्रीय विचारांचा प्रसार तेथुन होत असे.

१९१० मधे लोकशाही प्रस्थापित झाल्याने हिंदुंना धार्मिक स्वातंत्र्य मिळाले देवालयांत जाहिररीत्या भजने, कीर्तने होऊ लागली. महाराष्ट्रातील उत्तमोत्तम कीर्तनकारांना आग्रहाने आमंत्रण करुन काणण्यात येऊ लागले. ही कीर्तने धार्मिक स्वरुपासोबत राष्ट्रीय स्वरूपाचीदेखील होती. ज्यांना लिहितावाचता येत नव्हते अश्या लोकांना ही कीर्तने राष्ट्रीय धारेस जोडीत.

गोमंतकीयांचे नाट्यप्रेमही हिंदुंची राष्ट्रभक्ती उद्दीपीत करण्यात उपयोगी पडले. ज्या गावात वर्षातुन किमान ३-४ नाटके होत नाही असे गाव गोव्यात विरळच. गोमंतकात दर वर्षी सुमारे दोन हजार मराठी नाटकांचे प्रयोग होतात. पुर्वीही होत असत. पुर्वी ती ऐतिहासिक व पौराणिक असत. त्या नाटकांनी तरुणांचे देशप्रेम बळकट केले.त्यांचे मानसिक दौर्बल्य नष्ट करुन त्यंना धीरोदात्त बनविले.

हुकुमशहाचा उदय

पोर्तुगालातील पर्यायाने गोवा, दमण दीव मधली लोकशाही सन १९१० ते सन १९२६ अशी सोळा वर्षे टिकली. या १६ वर्षात स्थिर सरकार नव्हते. आर्थिक स्थिती खालावत होती. मंत्रीमंडळे गडगडत होती. दि. ९-६-१९२६ रोजी पार्लमेंट बरखास्त करण्यात आले. जनरल कार्मोना ह्यांनी राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली. व ऑलीव्हैर सालाझार पोर्तुगालचे पंतप्रधान झाले. सैन्यावर हुकुमत गाजवण्यासाठी सेनाधिपती नेमला गेला पण खरे सर्वाधिकारी डॉ. सालाझार होते. कट्टर धर्मनिष्ठ, साधी राहणी,दुसर्‍यावर छाप पाडणारे व्यक्तीमत्व, उत्तम वक्तृत्व ,वाक्पटुता, कावेबाजपणा ही त्यांची वैशिष्ट्ये होती. युरोपातील इतर हुकुमशहाप्रमाणेच त्यांची एकपक्षीय हुकुमशाही होती. पण इतर हुकुमशहांप्रमाणे त्यांनी आपल्या विरोधकांचे शिरकाण केले नाही. पोर्तुगीज कायद्यात देहांताची शिक्षा नाही. देहांत शिक्षेचा कायदा करुन वा इतर मार्गाने विरोधकांस ठार केल्यास आपले राजकारण जागतिक चर्चेचा विषय बनेल ह्याची त्यांना जाणीव होती.विरोधकांना नेस्तनाबुत करण्याचे त्यांचे तंत्र वेगळॅ होते. विरोधकांना राष्ट्रविघातक ठरवुन न्यायालयातर्फे त्यांना जन्मठेपेची शिक्षा देण्याची व्यवस्था सरकारने केली होती. अश्या या विरोधकांना पश्चिम आफ्रिकेतील व आसोरीशमधील तुरुंगात जन्मभर खितपत टाकले होते.

सालाझार

गोवा कोंग्रेस कमीटी

सन १९२८ साली त्रिस्तांव ब्रागांझ कुन्य (कुन्हा) [टी. बी. कुन्हा] या गोमंतकाच्या सुपुत्राने 'गोवा कोंग्रेस कमिटी' स्थापन केली. व ती भारतीय काँग्रेसला जोडली. भारतातील पोर्तुगीज सत्तेचे उच्चाटन करुन गोचा, दमण ,दीव या प्रदेशांना स्वातंत्र्य मिळवून देणे हे या कमिटीचे उद्दिष्ट होते. म. गांधींच्या आदेशाप्रमाणे वागून राष्ट्रीय काँग्रेस मार्फतच स्वातंत्र्य मिळेल ही टी. बी. कुन्हांची धारणा होती. ही कमिटी गोव्यात गुप्तपणे काम करु लागली.

डॉ. त्रिस्तांव ब्रागांझ कुन्हा

१९३५ च्या अधिवेशनात काँग्रेसने ठरविले की आपले कार्यक्षेत्र ब्रिटीश हिंदुस्थानापुरतेच मर्यादित ठेवावे. म्हणुन गोवा काँग्रेस बंद करण्यात आली. याच सुमारास पोर्तुगीजांनाही या संघटनेची माहिती मिळाली. व त्यांनी कार्यकर्त्यांच्या धरपकडीचे सत्र आरंभले.

गोवा काँग्रेस बंद पडली म्हणुन कुन्हा डगमगले नाहीत. ते मुंबईला गेले व तिथुन आपले कार्य सुरुच ठेवले.

  क्रमशः

**
विशेष सूचना - या लेखमालेचे स्वरूप एकंदरीतच ललित लेखनाच्या अंगाने जाणारे पण गोव्याच्या समृद्ध इतिहासाचे, आणि वर्तमानाचेही, दर्शन वाचकांना करून देणे एवढेच आहे. वाचकांना विनंती की त्यांनीही ते तेवढ्याच बेताने घ्यावे. आम्ही कोणीही इतिहासकार / इतिहासतज्ञ वगैरे नाही आहोत. पण थोडे फार वाचन करून, माहिती जमा करून इथे मांडण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे. तपशीलात अथवा आमच्या निष्कर्षात चूक / गल्लत असू शकते. पण काही चांगले लेखन यावे आणि गोव्याची रूढ कल्पना सोडून त्याहून वेगळा गोवा काय आहे हे लोकांना कळावे म्हणूनच हा सगळा लेखमालेचा उद्योग.

- टीम गोवा: ज्योती कामत, प्रीत-मोहर, बिपिन कार्यकर्ते

शुक्रवार, ३० मार्च, २०१२

नव्या वर्साच्या पयल्या किरणा..

नव्या वर्साच्या पयल्या किरणा..
मागता तुका एकुच मागणे
तुज्या आंगच्या रंगावरी
सोबीत जांवचे सगळ्यांचे "जगणे"

सगळ्यांची मती शुद्ध जावची
म्हज्या भुयेची कीर्ती दिगंतरान जावची
आवयची म्हज्या पोखरण थामची
पाचव्या शालवान आवय म्हजी हासची.

आयज जाता त्या फायद्याखातीर , फुडार इबाडु नजो
गोंयकारा तुज्या पावला-पावलार पेरलेलो आसा उजो.
सारके येंवजुन फुडाराचे, आयज पावल उखल
आयच्या तुज्या निर्णयान पिडग्यांचो सत्यानाश नासो.
--प्रीमो

मंगळवार, २१ जून, २०११

आमचे गोंय - भाग ५ - शिवकाल आणि मराठेशाही



***

छत्रपति शिवाजी महाराज

इ.स. १५७० च्या सुमाराला बहामनी सत्तेचे ५ तुकडे झाले. आणि तिसवाडी, बार्देश व साळशेत हे पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेले ३ तालुके वगळून बाकीचे तालुके इस्माईल आदिलशहाच्या ताब्यात आले. इ.स. १५८० मध्ये पोर्तुगालवर स्पेनची सत्ता प्रस्थापित झाली. इथून पुढे इ.स. १६४० पर्यंत पोर्तुगालवर स्पेनची सत्ता सुरू राहिली. अर्थातच, या काळात गोव्यावर अप्रत्यक्षपणे स्पेनची सत्ता होती. या काळात पोर्तुगीज सत्ता काहीशी दुर्बल झाली होती. या काळात हॉलंड आणि स्पेन यांचं शत्रुत्व होतं. इ.स. १६०३ मध्ये वलंदेज म्हणजेच डच लोकानी मांडवीच्या मुखात ठाण मांडून गोव्याची नाकेबंदी सुरू केली. इ.स. १६०४ मध्ये पोर्तुगीजांविरुद्ध, डच आणि कालिकतचा झामोरिन यांच्यात तह झाला. डच आणि पोर्तुगीज यांच्यातल्या चकमकी सुरूच राहिल्या. इ.स. १६४० साली श्रीलंका तर इ.स. १६४१ साली मलाक्का हे दोन प्रांत डचानी पोर्तुगीजांकडून हिसकावून घेतले. समुद्रातून गोव्याची नाकेबंदी इ.स. १६४० च्या दरम्यान परत सुरू झाली. नंतर इ.स. १६६० पर्यंत हे असंच सुरू राहिलं. इ.स. १६६० मधली महत्त्वाची घटना म्हणजे कॅथरिन या राजकन्येच्या विवाहात मुंबई बेट पोर्तुगालकडून दुसर्‍या चार्ल्सला हुंडा म्हणून मिळालं आणि भारताच्या पश्चिम किनार्‍यावर इंग्रजांना एक महत्त्वाची जागा मिळाली. आता भारतात पोर्तुगीजांचं राज्य दीव-दमण, वसई, चौल आणि गोव्यातले ३ तालुके एवढ्यापुरतंच उरलं.

या दरम्यान, शिवनेरीवर एक तेजस्वी, महापराक्रमी शक्ती १९ फेब्रुवारी १६३० ला उदयाला आली होती. राजे शिवाजी स्वराज्य आणि सुराज्याची स्थापना करून त्याच्या मजबुतीचं काम करत होते. या द्रष्ट्या महापुरुषाने तेव्हाच्या कोणत्याही भारतीय शासकाने फारशा न केलेल्या अनेक गोष्टी केल्या. त्यातली एक म्हणजे आरमाराची स्थापना. भूदुर्गांबरोबरच जलदुर्गांची स्थापना. इ.स. १६५९ मध्येच शिवाजी राजांनी २० लढाऊ नौका तयार करून युरोपियन आक्रमकांना जबरदस्त आव्हान उभे केले. या आरमाराची पोर्तुगीजांनाही एवढी दहशत होती की, त्यांनी राजांच्या नौकांना आपल्या बंदरात येऊ द्यायला नकार दिला होता! संपूर्ण कोकण किनार्‍या वर महाराजांनी अनेक जलदुर्ग उभारले. पोर्तुगीजांना धडकी भरवणारा सिंधुदुर्ग इ.स. १६६४ मध्ये अस्तित्त्वात आला. सुरुवातीच्या काळात आदिलशहाच्या विरोधात लढण्यासाठी शिवाजी राजांनी पोर्तुगीजांकडे मैत्रीचा हात पुढे केला होता, पण पोर्तुगीज घाबरले आणि त्यांनी या लढ्यात गप्प राहणे पसंत केले. या काळात सावंतवाडी संस्थानात लखम सावंतची सत्ता होती. त्याने शिवाजी राजांचे आधिपत्य मान्य केले. कोकणातून राजांचे सैन्य कुडाळ जिंकून पेडण्यात उतरले. इ.स. १६६४ मध्येच डिचोली तालुका आदिलशहाकडून राजांच्या ताब्यात आला. इथे राजांनी आपला तळ उभारला. इ.स. १६६५ मध्ये राजानी ८५ युद्धनौका बरोबर घेऊन मालवणहून प्रयाण केले आणि गोव्याचा किनारा ओलांडून थेट बसरूरपर्यंत धडक मारली. तिथे अगणित लूट करून, परतीच्या रस्त्यात गोकर्ण, अंकोला आणि कारवार आदिलशहाकडून जिंकून घेतले. पोर्तुगीजांच्या उत्तर सीमेजवळ असलेल्या सिंधुदुर्गाप्रमाणेच दक्षिण सीमेवर रामाचे भूशिर इथला मूळात रामदेवरायाचा जलदुर्ग मजबूत करून घेतला. त्यानी जणूकाही पोर्तुगीजाना त्यांची सीमा आखून दिली की याच्या पुढे तुम्ही यायचं नाही.

इ.स. १६६५ मध्ये राजांना मिर्झाराजेंबरोबर तह करून आग्रा भेटीला जावं लागलं. इ.स. १६६६च्या अत्यंत थरारक अशा आग्र्याहून सुटकेनंतर राजांनी अजिबात उसंत न घेता कोकणातून गोव्यावर स्वारी केली. टाकोटाक आदिलशहाच्या ताब्यात असलेल्या फोंड्याच्या मर्दनगडाला वेढा घातला. लगेच पोर्तुगीजांनी आदिलशाही सैन्याला मदत सुरू केली. महाराजांनी तरीही हा किल्ला जिंकून घेतला. मध्यंतरीच्या काळात वाडीच्या लखम सावंत व तळकोकणातल्या इतर देसायांनी शिवाजी राजांच्या मुलखाला उपद्रव द्यायला सुरुवात केली होती. राजे कोकणात येताच हे देसाई घाबरून पोर्तुगीजांच्या ताब्यातल्या मुलखात पळून गेले. त्यांचं पारिपत्य करण्याच्या मिषाने आणि पोर्तुगीजाना जरब बसविण्यासाठी महाराजांचे सैन्य बारदेशात घुसले. आणि फिरून पोर्तुगिजाना दहशत बसली. इ.स. १६६७ साली पोर्तुगीज आणि महाराज यांच्यात तात्पुरता तह झाला. महाराजांनी पोर्तुगीजांना त्यांचे इन्क्विझिशन बंद करायला सांगितलं.

गोव्यातल्या जनतेला अभय देण्याच्या दृष्टीने या शिवभक्त राजाने कदंबांचं कुलदैवत श्री सप्तकोटीश्वर याचं मंदिर नार्वे येथे परत उभारलं. मलिक काफूर, आदिलशहा आणि पोर्तुगीज यानी ३ वेळा उद्ध्वस्त करून विजनवासात पाठवलेल्या सप्तकोटेश्वराला महाराजानी छप्पर दिलं. गोव्यातला डिचोलीचा तळ मजबूत करून महाराज परत महाराष्ट्रात गेले. इ.स. १६७० पर्यंत सुमारे ६०,००० पायदळ आणि ४०,००० घोडदळाची उभारणी करून महाराजानी मिर्झाराजे जयसिंगांबरोबरच्या तहात गमावलेला बहुतेक सगळा मुलुख परत मिळवला.

इ.स. १६७२ मध्ये महाराजांनी रामनगरच्या राजावर हल्ला चढवला, आणि तो पोर्तुगीजाना देत असलेली चौथाई आपल्याला द्यावी अशी त्यांनी मागणी केली. यावेळेला पोर्तुगीजांनी रामनगरच्या राजाला मदत केली. नंतर ६ जून १६७४ ला महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि काही काळातच महाराजांनी रामनगरच्या राजाचा पराभव करून पोर्तुगीजांकडे असलेले चौलमधले चौथाईचे हक्क मिळवले. तर आदिलशहाच्या ताब्यात गेलेले कारवार, कोल्हापूर, फोंडा-मर्दनगडही इ.स. १६७५ मध्ये परत मिळवले. ५०,००० चे सैन्य जमा करून इ.स. १६७६ मधे महाराज दक्षिण दिग्विजयासाठी बाहेर पडले. यावेळेला महाराजानी दक्षिणेतील राजांची एकजूट घडवून औरंगजेबाला टक्कर द्यायचं स्वप्न पाहिलं होतं. कुतुबशहाने महाराजांचा मैत्रीचा हात स्वीकारला, पण आदिलशहाने मात्र एवढी समजूत दाखवली नाही. प्रथम महाराजानी तामिळनाडूतील जिंजी आणि वेल्लोर जिंकून घेतले, जे भविष्यकाळात मराठी साम्राज्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अतीव महत्त्वाचे ठरले.

नंतरचा काळ स्वराज्याची घडी बसवण्यात आणि संभाजी राजांच्या काहीशा अपरिपक्व हालचालींच्या काळजीत व्यतीत होत असताना मराठी राज्याचा पाया घालणारा हा सूर्य ३ एप्रिल १६८० ला अस्तंगत झाला. पोर्तुगीजाना महाराजांची एवढी भीती होती की त्यानी महाराजांच्या ताब्यात असलेल्या मुलखावर कधीही सरळ हल्ला चढवला नाही. कोकण आणि गोव्यातल्या नद्या, जंगलं, दर्‍या, डोंगरांनी भरलेल्या दुर्गम प्रदेशात महाराजांचे गनिमी काव्याचे तंत्र अतिशय यशस्वी ठरले. त्याना थोडा अवधी मिळाला असता तर त्यांनी पोर्तुगीजांना गोव्यातून उखडून काढलं असतं हे निश्चित. पोर्तुगीज दप्तरात, महाराजांनी पोर्तुगीजांना जरब बसवण्यासाठी लिहिलेली तसेच पोर्तुगीज महाराजांना किती घाबरत असत हे दाखवणारी पत्रे उपलब्ध आहेत.

महाराजांचा काळ झाल्यानंतर एक वर्ष काहीसं गोंधळाचं गेलं. संभाजी राजांवर विषप्रयोगाचा प्रयत्न झाला. त्यांच्या अटकेचा आदेश काढला गेला आणि रायगडावर घाईघाईने लहानग्या राजारामाचा राज्याभिषेक झाला. या घटनांचं कारण म्हणजे अष्टप्रधानांपैकी काहीजण सोयराबाईला पुढे करून आपल्या महत्त्वाकांक्षेला खतपाणी घालत असावेत असं वाटतं. तसंच नवीन राज्य स्थापन करण्याच्या हेतूने संभाजी राजांनी दिलेरखानाच्या छावणीत सामिल होणं आणि शिवाजी महाराजांनी प्रयत्नपूर्वक त्यांना परत आणणं, यात महाराजांना झालेला प्रचंड मनस्ताप, यातूनच प्रधानमंडळांपैकी काहींचा संभाजी राजांवरचा विश्वास उडाला, हेही एक कारण असावं. संभाजी राजे आणि सोयराबाई यांच्या वादात सोयराबाईचे भाऊ सरनौबत हंबीरराव मोहिते यानी संभाजी राजे हेच राज्य चालवायला योग्य आहेत आणि अभिषिक्त युवराज आहेत या भूमिकेतून संभाजी राजांची बाजू घेतली. सरनौबतांच्या मदतीमुळे इ.स. १६८१ मध्ये संभाजी राजे छत्रपती झाले. त्यानी प्रथम स्वतःच्या गुन्हेगाराना कठोर शिक्षा दिल्या. पंतप्रधान मोरोपंत पिंगळे याना मात्र माफी मिळाली आणि त्यानी नंतर राजांबरोबर मोहिमेत भाग घेतला.


छत्रपति संभाजी महाराज

राज्याभिषेक होताच अवघ्या १५ दिवसात हा २३ वर्षांचा राजा मोहिमेवर निघाला. बरोबर पेशवे मोरोपंत आणि सरनौबत होते. त्यानी बुर्‍हाणपूरवर हल्ला करून २ कोटी रुपयांची लूट मिळवली. यावेळेला एका अरबी व्यापार्‍याकडून राजांनी घोडे विकत घेतले असा उल्लेख आहे. हा व्यापारी एवढा घाबरला होता की तो ते घोडे फुकट द्यायला तयार झाला होता म्हणे! पण सामान्य जनतेला त्रास देऊ नये हे शिवाजी राजांचं तत्त्व संभाजी राजांनीही अंगिकारलं असावं. यापूर्वीच म्हणजे इ.स. १६८० मधे शिवाजी महाराजांचा मृत्यु होताच औरंगजेब ५ लाख सैन्य आणि ४ लाख जनावरे घेऊन स्वतः महाराष्ट्रात दाखल झाला होता, मराठी राज्य सहज चिरडून टाकू अशा हिशेबाने तो आला असेल पण आपली गाठ कोणाशी आहे याची त्याला जराही कल्पना नव्हती! नाशिकजवळच्या रामशेजच्या एका किल्ल्यासाठी मुघल सैन्याला ७ वर्षं लढावं लागलं! तसंच पुढच्या ९ वर्षात नाव घेण्यासारखा एकही विजय मुघल सैन्याला मराठ्यांसमोर मिळवता आला नाही. संभाजी राजांच्या काही सैन्याने औरंगजेबाच्या सैन्याला गनिमी काव्याने सळो की पळो करून सोडले तर स्वतः राजे कोकणात उतरले. त्यानी प्रथम पोर्तुगीजांकडे मैत्रीचा हात पुढे केला पण पोर्तुगीजांनी मुघलांना मदत करणे पसंत केलं. आता राजांनी पोर्तुगीजांना संपविण्याचा निर्धार केला. मर्दनगडाची डागडुजी करून तिथे आणि भतग्राम (डिचोली) इथे सैन्याचे भक्कम तळ उभारले.

वयाच्या १६ व्या वर्षापासून संभाजी राजांनी थोरल्या महाराजांबरोबर गोव्याच्या आणि इतर मोहिमांमधे भाग घेतला होता, त्यावेळेला महाराजांचं युद्धतंत्र त्यांच्या पूर्ण अंगवळणी पडलं असावं. तसंच गोव्याच्या भूमीची संभाजी राजांना पूर्ण माहिती झाली होती. यामुळेच गोव्यात राजांचा सर्वत्र सहज संचार होत असे. इ.स. १६८३ मधे राजांनी चौल पोर्तुगीजांकडून घेतले तर ११ डिसेंबर १६८४ ला बार्देशवर हल्ला केला. बार्देशातील थिवी, चोपडे हे किल्ले जिंकले. साळशेत (मडगाव) घेतले. म्हैसूरच्या चिक्कदेवरायाचा पराभव केला आणि शिवाजी महाराजानी स्थापन केलेल्या राज्याचा आणखी विस्तार केला. राजे अवघ्या १ लाख सैन्यानिशी ५ लाखाचे मुघल सैन्य, जंजिर्‍या चा सिद्दी, गोव्यातले पोर्तुगीज आणि म्हैसूरचा चिक्कदेवराय एवढ्या आघाड्यांवर एकाच वेळी लढत होते. पैकी गोव्यात त्यानी बराच काळ वास्तव्य केलं. गोव्यातलं त्यांचं महत्त्वाचं कार्य म्हणजे त्यानी पोर्तुगीजांना पायबंद घातला आणि धर्मांतरित झालेल्याना परत शुद्धिकृत करून हिंदू करून घेण्याचं शिवाजी महाराजांचं कार्य त्यांच्या या पुत्रानेही पुढे चालू ठेवलं.

शिवाजी महाराजांच्या गोवा मोहिमेत इथल्या स्थानिक राणे, देसाई वगैरे मंडळीनी त्याना विरोधच केला होता. पण त्यांची मदत मिळवण्यात संभाजी राजे मात्र यशस्वी ठरले. असोळणा, कुंकोळी इथल्या मराठ्यांनी आणि साखळीच्या राणे घराण्याने राजांना खुल्या दिलाने मदत केली आणि त्यांचं राज्य स्वीकारलं. समाजातून बहिष्कृत झालेल्या राण्यांना संभाजी राजानी पंक्तिपावन करून घेतले आणि राणे राजांचे ऋणी झाले. गोकुळाष्टमीच्या रात्री संभाजी राजांनी मांडवी नदी पार करून पोर्तुगीजांवर हला करण्यासाठी नदीच्या पात्रात घोडे घातले, पण पावसात उधाण आलेल्या प्रवाहात घोड्याचा पाय घसरला आणि राजे वाहून जाऊ लागले. या वेळेला खंडो बल्लाळाने राजांना वाचवले अशी कथा स्थानिक लोकांच्या सांगण्यात येते. काही मराठी सैन्य साळशेतमधे ठाण मांडून बसले तर स्वतः राजांनी वेळ न गमावता कुंभारजुवे बेट पोर्तुगीजांकडून घेतले आणि तीन बाजूंनी पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेल्या प्रदेशावर हल्ला चढवला. आता फक्त तिसवाडीच पोर्तुगीजांच्या ताब्यात राहिली होती.

दुसर्‍या दिवशी राजे स्वतः गोवा वेल्हावर हल्ला करणार हे पोर्तुगीजांनी जाणले. आताच्या ओल्ड गोवा येथून कुंभारजुवे बेट दिसते. तिथल्या सैन्याच्या हालचाली पाहून पोर्तुगीज घाबरले. त्यांनी चर्चमधलं सेंट फ्रान्सिस झेवियरचे शव बाहेर काढलं. व्हाईसरॉय काउंट डी अल्वारिसने आपला राजदंड त्याच्या शवपेटीवर ठेवला आणि "सायबा, तूच आमचं रक्षण कर" अशी करुणा भाकली. पोर्तुगीजाना हा सायब पावला की नाही माहित नाही, पण मुघल मात्र मात्र पावले! सुमारे १ लाखाचे मुघल सैन्य कोकणात उतरल्याची खबर आली आणि जिंकत आलेली गोव्याची मोहीम अर्धवट टाकून संभाजी राजाना परत जावं लागलं.

इ.स. १६८४ मधे संभाजी राजांनी पोर्तुगीजांबरोबर तह केला. त्या अनुसार मराठ्यांनी पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेले गोव्याचे ३ तालुके त्याना सोडून दिले. तर पोर्तुगीजानी चौल इथे कर देण्याचं मान्य केलं. पण या तहाची पूर्ण अमलबजावणी झाली नाहीच! बार्देशमधले किल्ले मराठ्यांनी परत केले नाहीत. आता औरंगजेबाची वक्रदृष्टी गोव्याकडे वळली. पण पोर्तुगीजांनी गोव्यातल्या मराठा देसायांबरोबर तह केला आणि मुघल सैन्याच्या हाती काही लागले नाही. मराठा सैन्य आणि पोर्तुगीज यांच्या चकमकी सुरूच राहिल्या. पण संभाजी राजे पोर्तुगीजांना हाकलून लावण्यासाठी परत गोव्यात येऊ शकले नाहीत. ते जर झालं असतं तर आज गोवा महाराष्ट्राचा एक जिल्हा राहिला असता!

आणखी सतत ४ वर्षे मुघलाना हुलकावण्या देत जेरीला आणणारा हा शूर छत्रपती १ फेब्रुवारी १६८९ ला कपटाने कैद झाला. त्यांच्या सख्या मेव्हण्याने, गणोजी शिर्क्याने विश्वासघात केला आणि नंतर तब्बल ४० दिवस हालहाल करून शेवट औरंगजेबाने ११ मार्च १६८९ ला राजांचा वध केला. पण एवढे हाल होत असतानाही या छाव्याने औरंगजेबाचा कोणताच प्रस्ताव मानला नाही आणि वीराचे मरण पत्करले. महाराष्ट्राच्याच नाही तर गोव्याच्या इतिहासात या राजाचं स्थान अद्वितीय आहे. त्याच्या मृत्यूनंतर मराठ्यांचा झुंजण्याचा निर्धार आणखीच पक्का झाला आणि नंतर एकजुटीने पण निर्नायकी अवस्थेत मराठ्यांनी मुघलांना जी झुंज दिली तिला इतिहासात तोड नाही. पराक्रमात बापसे बेटा सवाई असलेल्या या तरूण राजाने अवघ्या ३२ वर्षांच्या आयुष्यात विजेसारखं थोड्या काळासाठी लखलखून आत्मार्पण केलं आणि सामान्य शेतकर्‍यांना औरंगजेबाशी भांडण्याचं पहाडाचं बळ दिलं. गोव्यात पोर्तुगीजांना बसलेला दणका एवढा प्रचंड होता की त्या ३ तालुक्याच्या पलिकडे आणखी प्रदेश आपल्या ताब्यात आणण्याचा प्रयत्नसुद्धा त्यानी नंतर केला नाही. एवढ्या सततच्या धामधुमीतही 'बुधभूषण' आणि इतर काही संस्कृत रचना करणार्या या तेजस्वी राजाच्या नावावरून 'वास्को द गामा' शहराचं नाव 'संभाजीनगर' करावं असा प्रस्ताव काही काळापूर्वी आला होता, पण...

छत्रपती संभाजीच्या वधानंतर महाराणी येसूबाईने राजारामाला रामचंद्रपंत अमात्यांच्या हाती सोपवून प्रतापगडावर पाठवले. रायगडावर सूर्याजी पिसाळ फितूर झाला आणि येसूबाई आणि शाहू मुघलांच्या हाती लागले. खंडो बल्लाळ राजारामाला महाराष्ट्रातून सुखरूप जिंजीला घेऊन गेला. तिथे ९ वर्षं वेढ्यात काढून गणोजी शिर्केच्या मदतीने राजाराम जिंजीहून निसटून महाराष्ट्रात परत आला. इ.स. १७०० साली राजारामाच्या मृत्यूनंतर ताराबाईने राज्याची सूत्रे हातात घेतली. आता सावंतवाडी इथे लखम सावंताचा धाकटा भाऊ फोंड सावंत याची सत्ता होती. ताराबाईच्या प्रदेशाला लागून असल्याने त्याने ताराबाईचे वर्चस्व मान्य केले. तर ताराबाईने त्याला कुडाळ, बांदा, पेडणे, साखळी, डिचोली आणि मणेरी या ६ तालुक्यांचा मोकासा लिहून दिला.

फोंड सावंताचा मुलगा खेम सावंत हे गोव्याच्या आणि सावंतवाडीच्या इतिहासातलं मोठं मजेशीर प्रकरण आहे. त्याची कारकीर्द बरीच मोठी म्हणजे इ.स. १६७५ ते इ.स. १७०९ पर्यंत. त्यानेच 'सुंदरवाडी' अर्थात 'सावंतवाडीचा' पाया घातला. त्यापूर्वी सावंतांचं प्रमुख ठाणं कुडाळ होतं. या काळात त्याने प्रथम ताराबाई नंतर शाहू महाराज, म्हणजे ज्या कोणाचं वर्चस्व दिसेल त्याची प्रभुसत्ता बिनतक्रार मान्य केली. शाहू राजानी त्याला या ६ तालुक्यांचं वतन दिलं. म्हणजेच, छत्रपती शिवाजी आणि संभाजी यांच्या काळात बंद झालेली वतनाची पद्धत शाहूच्या काळात परत सुरू झाली होती आणि हे छोटे वतनदार आपापल्या मुलुखात आपापल्या पद्धतीने सत्ता चालवीत होते. मूळ कर्नाटकातील शिरसीजवळचे, पण गोव्यात फोंडा इथे स्थायिक झालेल्या सोंदेकरांबरोबर खेम सावंताचा ३६ चा आकडा होता. जमेल तेव्हा सोंदेकरांच्या कुरापती काढण्याचे उद्योग त्याने आयुष्यभर चालू ठेवले. जिथे यश मिळणार नाही असं दिसलं तिथे सरळ माघार घेतली. मराठ्यांचं पारडं हलकं होतंय असं वाटलं की पोर्तुगीजांची मदत घेतली. हेतू साध्य होताच परत पोर्तुगीजांना अंगठा दाखवला. या सोंदेकरानीही वेगवेगळ्या वेळी मुघल, पोर्तुगीज, मराठे यांच्याबरोबर आपल्या रक्षणासाठी तह केलेले आढळून येतात. गोव्यातल्या सध्याच्या पक्षबदलांच्या राजकारणाची सुरुवात फार पूर्वी झालेली होती असं दिसतंय!

फोंड्याच्या मर्दनगडासाठी या काळात दरवर्षी एक लढाई लढली गेली. आणि किल्ल्याची मालकी आलटून पालटून कधी खेम सावंत, तर कधी सोंदेकर, कधी मराठे तर कधी मुघल अशी बदलत राहिली. पोर्तुगीजाना मराठे किंवा मुघलांसारखे प्रबळ शत्रू सीमेवर नको होते, त्यामुळे त्यानी खेम सावंत आणि सोंदेकर याना आपल्या सीमेवर राहू दिले. आणि शक्य तितके आपसात झुंजत ठेवले. अर्थातच फोंडा, डिचोली हे भाग अप्रत्यक्षपणे मराठ्यांच्याच ताब्यात राहिले.

साधारण इ.स. १७०० ते इ.स. १७०९ या ९ वर्षात खेम सावंताने गोव्यात अक्षरशः धुमाकूळ घातला. त्याने पोर्तुगीज जहाजांवर हल्ले करून लूटमार सुरू ठेवली. त्याने संधी मिळतच बार्देश, फोंडा वळवई या भागात छापे मारून लुटालूट, जाळपोळ करणे, किल्ले ताब्यात घेणे यांचे सत्र सुरू ठेवले. किल्ल्यांच्या आश्रयाने शत्रूवर हल्ला करण्याचे शिवाजी महाराजांचे तंत्र खेम सावंताने वापरले. पोर्तुगीजानी या प्रकाराला वैतागून आमोणा, डिचोली, वळवई इथले किल्ले आपल्या ताब्यात येताच पाडून टाकले. डिचोलीचा किल्ला पाडल्यानंतर पोर्तुगीज व्हॉईसरॉयने असे उद्गार काढले की,"खेम सावंताला दुसरा शिवाजी होऊ देणार नाही!" तरी खेम सावंताचे उपद्व्याप सुरूच होते. शेवटी इ.स. १७०९ साली खेम सावंत मरण पावला. त्याला ३ मुलीच होत्या. त्यामुळे त्याच्या मागून त्याचा पुतण्या फोंड सावंत गादीवर आला. यानेही खेम सावंताप्रमाणेच पोर्तुगीजांबरोबर कधी मैत्री, कधी भांडण चालू ठेवले. कान्होजी आंग्रेंच्या आरमाराबरोबर त्याच्या चकमकी सतत चालू असत. इ.स. १७२९ मधे कान्होजींचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचा मुलगा सेकोजी याने पोर्तुगीज आणि फोंड सावंताबरोबर लढाया चालू ठेवल्या.

इ.स. १७२० नंतर बाजीराव पेशव्यांच्या सरदारानी उत्तर गोव्यात हल्ले चालू ठेवले. आता फोंड सावंत बाजीरावाच्या बाजूने पोर्तुगीजांवर हल्ले करू लागला. बाजीराव आणि चिमाजी, पोर्तुगीजांविरुद्ध वसई आणि गोव्याच्या दोन्ही आघाड्यांवर लढत होते. पोर्तुगीजांनी वसईला गोव्यातून मदत पाठवू नये म्हणून इ.स. १७३९ साली दादाजी भावे नरगुंदकर, वेंकटेशराव घोरपडे आणि जिवाजी शिंदे यांनी गोव्यावर पुर्‍या ताकदीने हल्ला चढवला. राशोल आणि मार्मुगोव्याचा किल्ला सोडून उरलेला साळशेत तालुका मराठ्यांच्या ताब्यात आला. तर फोंड सावंतानंतर गादीवर आलेला त्याचा नातू रामचंद्र याने बारदेश तालुका घेतला. मराठ्यांनी फोंडा, सुपे आणि सांगे तालुके ताब्यात घेतले. संभाजी राजांनंतर परत एकदा पोर्तुगीजांच्या ताब्यात फक्त तिसवाडी राहिली. आता पोर्तुगीजांनी बाजीरावाकडे तहाची याचना केली. बाजीरावाने इन्क्विझिशन बंद करा, हिंदूंचा छळ बंद करा या आणि आणखी मागण्या पोर्तुगीजांपुढे ठेवल्या. इ.स. १७४० मध्ये चौल आणि कोर्लाईचा किल्ला देऊन पोर्तुगीजानी गोव्यात आपलं अस्तित्त्व कसंबसं राखलं. मराठ्यांनी कुंकोळी आणि असोळणा परत केले, पण रामचंद्र सावंताने बार्देश मात्र परत केला नाही! रामचंद्र सावंत आणि मराठे विरुद्ध पोर्तुगीज अशा चकमकी सुरूच राहिल्या. सोंदेकर आणि राणे यानी या वेळेला पोर्तुगीजाना मदत करायचं मान्य केलं.

इ.स. १७५६ साली पोर्तुगीज व्हॉईसरॉय कॉण्डे डी अल्वाने मराठ्यांच्या ताब्यातील मर्दनगडावर हल्ला केला. या लढाईत स्वतः व्हॉईसरॉय मरण पावला! गोंधळाचा फायदा घेत सावंतांनी पेडणे, सांगे आणि मणेरी तालुके घेतले. २४ डिसेंबर १७६१ ला तह झाला आणि पोर्तुगीजांनी सावंतांच्या ताब्यात असलेल्या सर्व प्रदेशावर सावंतांचा हक्क मान्य केला. याच सुमाराला पानिपतच्या लढाईत मराठ्यांचा पराभव झाला आणि पेशवाई दुबळी झाली. याचा फायदा घेत पोर्तुगीजांनी इ.स. १७६३ मध्ये मर्दनगड जिंकून सोंदेकरांच्या ताब्यात दिला. पण एवढ्यात म्हैसूरच्या हैदर अलीने सोंदेकरांवर हल्ला केला. सोंदेकर पळून गोव्यात पोर्तुगीजांच्या आश्रयाला आले. आता कसलीच जबाबदारी नको म्हणून सोंदेकरानी फोंडा, केंपे आणि काणकोण तालुके पोर्तुगीजांच्या हवाली केले. इ.स. १७७१ साली सोंदेकरानी गोव्यातल्या त्यांच्या ताब्यात असलेल्या प्रदेशावरचा हक्क सोडून दिला. इ.स. १७८५ साली कोल्हापूरच्या छत्रपतीनी सावंतांवर हल्ला केला. आता घाबरून सावंतानी पोर्तुगीजांकडे मदत मागितली आणि त्या मदतीची परतफेड म्हणून पेडणे तालुका पोर्तुगीजांच्या हवाली केला.

अशा प्रकारे इ.स. १७८८ मध्ये पूर्ण गोवा पोर्तुगीजांच्या सत्तेखाली आला. पोर्तुगीजांनी इ.स. १५६० साली जिंकलेल्या तिसवाडी, बार्देश आणि साळशेत (साष्टी) तालुक्याना 'जुन्या काबिजादी' तर इ.स. १७७१ आणि इ.स. १७८८ मध्ये ताब्यात आलेल्या उरलेल्या प्रदेशाला 'नव्या काबिजादी' हे नाव मिळालं.



क्रमशः

**

विशेष सूचना - या लेखमालेचे स्वरूप एकंदरीतच ललित लेखनाच्या अंगाने जाणारे पण गोव्याच्या समृद्ध इतिहासाचे, आणि वर्तमानाचेही, दर्शन वाचकांना करून देणे एवढेच आहे. वाचकांना विनंती की त्यांनीही ते तेवढ्याच बेताने घ्यावे. आम्ही कोणीही इतिहासकार / इतिहासतज्ञ वगैरे नाही आहोत. पण थोडे फार वाचन करून, माहिती जमा करून इथे मांडण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे. तपशीलात अथवा आमच्या निष्कर्षात चूक / गल्लत असू शकते. पण काही चांगले लेखन यावे आणि गोव्याची रूढ कल्पना सोडून त्याहून वेगळा गोवा काय आहे हे लोकांना कळावे म्हणूनच हा सगळा लेखमालेचा उद्योग.

- टीम गोवा (ज्योति_कामत,प्रीतमोहर, बिपिन कार्यकर्ते)

बुधवार, ४ मे, २०११

आमचे गोंय - भाग ४ - पोर्तुगिज (सांस्कृतिक आक्रमण)



***
धर्मसमीक्षण सभा (Inquisition)

धर्मसमीक्षण सभेचे कर्तृत्व हे युरोपच्या व ख्रिस्तीधर्माच्या इतिहासातील एक लांच्छनास्पद आणि अघोरी कृत्यांनी रक्तरंजित झालेले पृष्ठ. नास्तिक लोकांना, चेटुक करणार्‍या स्त्री-पुरुषांना शिक्षा देणे हे या धार्मिक नायालयाचे काम असे. या शिक्षा अगदी माणसांना जिवंत जाळण्यापर्यंत काहीही रूप घेत.

पोर्तुगालमध्ये ह्या न्यायालयाने स्पेनसारख्या देशातुन पळून पोर्तुगालमध्ये आलेल्या ज्यू लोकांवर 'न भूतो न भविष्यति' असे अत्याचार केले. ज्या ज्यूंनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला, त्यांनाही हे भोग चुकले नाहीत. त्यांनी भयंकर, अमानुष असे शारिरीक व मानसिक अत्याचार भोगले. छळ करणार्‍यांना हव्या तशा जबान्या घेउन या ज्यूंना जिवंत जाळण्यात येत असे. आणि त्यांची मालमत्ता सरकारजमा केली जात असे.

अशीच धर्मसमीक्षण सभा, मिशनरी 'संत' फ्रान्सिस झेवियर यांच्या आग्रहास्तव, गोव्यात स्थापण्यात आली. सन १५६० ते १८१२ पर्यंत या इन्क्विजिशनचा अनियंत्रित दुष्ट कारभार गोमांतकात बेछूटपणे चालू होता. या काळात एकुण ५ धर्मसभा बसल्या. प्रत्येक सभेत आधीचे नियम अधिक जाचक करुन हिंदूंना छळण्यासाठी नवनवे जाचक नियम बनवले जायचे. हा 'संत' फ्रांसिस झेवियर गोव्यातील हिंदू लोकांवर अनन्वित अत्याचारांची सुरुवात करून चीनमधे गेला होता. तिथे मृत्यू पावला. असं म्हणतात की तो खराच मेला याची खात्री पटविण्यासाठी त्याचं शव परत भारतात आणण्यात आलं, आणि ओल्ड गोवा इथल्या चर्चमधे लोकांना बघायला मिळावं म्हणून ठेवलं गेलं.

इन्क्विजिशनने ख्रिस्तीधर्मप्रसारासाठी गोव्यातील सर्व देवळे, मशिदी जमीनदोस्त करण्याचा, 'पाखंडी' मत नष्ट करण्याचा, हिंदुधर्मीय उत्सवास मनाईचा आणि लाकूड, माती किंवा धातू ह्यांच्या मुर्ती बनविणार्‍यास कडक शिक्षा देण्याचा हुकुम प्रसृत केला.

हिंदुंना कायद्याने सार्वजनिक अधिकाराच्या जागा वर्ज्य करण्यात आल्या. त्यांना धार्मिक आचार, विधी पालन करण्यास मनाई करण्यात आली. ह्यामध्ये यच्चयावत सगळे विधी समाविष्ट आहेत. अगदी स्त्रियांनी कुंकू लावायला मनाई करण्यात आली, तर शेंडी ठेवणार्‍या पुरुषांना शेंडीकर लावण्यात आला. पण स्थानिक लोकांची धर्मनिष्ठा जाज्वल्य होती. पोर्तुगीजांच्या अत्याचाराची जाण असतानाही ते हे कायदे मोडीत असत!!!

धर्मांतराचा सपाटा आधी तिसवाडीत सुरु झाला. तिसवाडीनंतर सासष्टीची पाळी व त्यानंतर बारदेशची पाळी आली. चोडण, करमळी यासारखी गावेच्या गावे बाटविली जाऊ लागली. अर्थात यात इन्क्विजिशनचा मुख्य हात असे!! नाहीतर एखादं गावच्या गाव का सहजपणे धर्म बदलेल? विहिरीत पाव टाकून "तुम्ही आता ख्रिश्चन झालात" असे भोळ्या गावकर्‍यांना बजावण्यात आले.

गोवा बेट किंवा आत्ताच्या जुने गोवे इथे हातकात्रा खांब नावाचा एक खांब आहे. सुरवातीच्या काळात धर्मांतराला विरोध करणारांचे इथे हात कापले जात. या सगळ्याला तत्कालीन राणी कातारीन हिचे प्रोत्साहन असे. एकामागुन एक फर्माने गोव्यात पोचत, आणि इथल्या व्हाईसरॉय व गव्हर्नर कडुन त्यांचे काटेकोरपणे पालन होई व त्यामुळे मिशनर्‍यांना जोर चढला होता.

परिणामस्वरुप गोव्याचा शांत हिंदू समाज क्रोधाविष्ट झाला. पण गोवा राज्याच्या भौगोलिक परिस्थितीमुळे, पोर्तुगीजांच्या बलवत्तर आरमारामुळे कोणीच जनतेच्या मदतीस येउ शकले नाहीत. तिसवाडी, बारदेश आणि सासष्टी वगळता इतर सर्व तालुके मराठ्यांच्या शासनाखाली होते, त्यामुळे ते अठराव्या शतकाच्या मध्यापर्यंत या अघोरी प्रकारांपासून बचावले.

हिंदुंनी आपल्या बायकामुलांना राज्याबाहेर पाठविले, व्यापार-दुकाने बंद ठेविली. शेतकर्‍यांनी भातशेतीतील बांध मोडून टाकले (चोडण बेटावर) जेणेकरुन नदीचे खारे पाणी शेतात शिरुन शेती नष्ट होईल व पोर्तुगीजांना उत्पन्न मिळणार नाही. पोर्तुगीजांनी ह्यावरही नेहमीप्रमाणे बळजबरी, इन्क्विजिशन वापरले व हे पहिले बंड मोडीत काढण्यात यश मिळविले.

हळूहळू त्यांनी आपले लक्ष ब्राह्मणांकडे जास्त वळवले, कारण ब्राह्मण हे लोकांस जागृत करीत. त्यांनी ब्राह्मणांचे वैचारिक व धार्मिक स्वातंत्र्य काढुन घेतले. ब्राह्मणांसाठी एक वेगळा कायदा काढण्यात आला. "कोणत्याही ब्राह्मणाने एखाद्या हिंदुला ख्रिश्चन होण्यापासुन परावृत्त केल्यास त्याला कैद करुन राजाच्या गलबतावर पाठविण्यात येईल व इस्टेट जप्त करुन सेंट थॉमसच्या कार्यार्थ वापरण्यात येईल."

गलबतावर पाठविण्याची शिक्षा कुणालाही नकोच असे. कारण गलबतावर पाठवणे म्हणजे गुलाम बनवुन गलबताच्या तळाशी वल्हविण्यास लावणे. गुलामांना साखळदंडांनी त्यांच्या जागी खिळवुन ठेवण्यात येत असे. कामात ढिलाई झाल्यास चाबकाचा फटकारा मिळत असे. कोणीही मेला अगर कामाला निरुपयोगी झाल्यास त्याला सरळ समुद्रात फेकुन देण्यात येत असे!!!

या काळात कित्येक सारस्वत ब्राह्मणकुटुंबानी महाराष्ट्र आणि कर्नाटकाचा रस्ता धरला. राजापूर आणि मंगलोरच्या आसपास अजूनही यांची गावे आहेत. त्यांच्या मूळ गावांची नावे काळाच्या ओघात विस्मृतीत गेली तरी, आपले कुलदैत कोण याची स्मृती त्यांनी एवढ्या शतकांनंतरही कायम ठेवली आहे. असंही म्हटलं जातं, की केंपे तालुक्यातून ब्राह्मण नामशेष झाले, त्यामुळे पर्तगाळी मठाच्या स्वामींनी काही क्षत्रियांना ब्राह्मण्याची दीक्षा देउन देवांची पूजा अर्चा चालू ठेवली.

दिवाडी बेट मूळचं दीपावती. इथे सप्तकोटेश्वराच देऊळ होतं, सुंदर तळी होती, वेदशास्त्रसंपन्न ब्राह्मण वस्ती होती. पोर्तुगीजांनी हे देऊळ उद्ध्वस्त केले. त्याआधी एकदा आदिलशाहीतही हे देऊळ उध्वस्त झाले होते. पण ते परत बांधण्यात हिंदूंना यश आले होते. जसे सोमनाथच्या सोमेश्वराचे हाल झाले तसेच दिवाडीच्या या सप्तकोटेश्वराचेही अनन्वित हाल झाले.

मूळात हे देउळ कदंबांच्या राजघराण्याचे कुलदैवत. प्रथम कदंबांनी त्यांच्या गोवापुरी या राजधानीत अंदाजे बाराव्या शतकात सप्तकोटेश्वराची स्थापना केली. इ. स. १३४६ साली हसन गंगू बहामनीने कदंबांचा पराभव केला आणि हे देऊळ धुळीला मिळवले. नंतर देवगिरीच्या यादवांनी बहामनी सुलतानाचा पराभव केला आणि दिवाडी बेटावर नव्याने देऊळ बांधले. इ. स. १५६० साली पोर्तुगीजांच्या टोळधाडीने एका दिवसात २८० देवळे पाडण्याचा "महापराक्रम" केला. त्यात या देवळाचा अग्रक्रम होता. मग देवळातील लिंग एका विहिरीची पायरी म्हणून लावण्यात आले. शेवटी छत्रपती शिवाजी महाराजानी या महादेवाचे दुर्दैवाचे दशावतार संपवले आणि इ.स. १६६८ साली नार्वे येथे भक्कम देऊळ बांधून देवाची पुनर्प्रतिष्ठापना केली. सप्तकोटेश्वराची ही हकीकत प्रातिनिधिक म्हणावी लागेल.

एवढे सगळे होऊनही ब्राह्मण धर्म बदलत नाहीत म्हणुन त्यांच्या मुलांना पळवून नेऊन त्यांचे हालहाल करु लागले. शेवटी तेही आई-बाप होते. मुलांचे हाल होऊ नये म्हणुन ख्रिस्तीधर्म स्वीकारणे त्यांच्या नशिबी आले. मग त्या पूर्ण कुटुंबाचे ख्रिस्तीकरण. अश्या १५०५ ब्राह्मणांचे ख्रिस्तीकरण झाले.

साष्टी

गोवेकर हिंदू, मिशनर्‍यांबद्दल द्वेषभावना बाळगीत. आणि त्याचा उद्रेक रायतुरच्या मिशनर्‍यांवर दगडफेक करण्यात झाला. पेरु माश्करेन्यस (मास्कारेन्हास) हा सासष्टीत गेलेला पहिला पाद्री (मिशनरी). गावकर्‍यांना त्याच्यापेक्षा त्याच्याबरोबर आलेल्या एका नवख्रिश्चनाचा जास्त राग होता. कुर्हा डीचा दांडा गोतास काळ ठरला होता तो. लोकांनी त्याचे तलवारीने तुकडे केले. हे पाहून तो मिशनरी त्याची मदत करणे वगैरे विसरुन पळून गेला. कुठ्ठाळलाही पेरु कुलासो नावाच्या मिशनर्‍यावर दगडाचा वर्षाव झाला पण त्याला त्याच्यासोबत असलेल्या नवख्रिश्चनांनी वाचविले.

इ. स. १५६६ साली मिशनर्‍यांना पराभव स्वीकारावा लागतोय हे पाहून व्हाईसरॉयने नवा हुकूम प्रसृत केला. "नवीन देऊळ बांधता कामा नये. जुन्या देवळांची डागडुजी व्हाईसरॉयच्या परवानगीशिवाय करु नये." डागडुजीच्या परवानग्या नाकारण्यात येऊ लागल्या. आणि म्हणूनच लोक आपल्या दैवतांच्या मूर्ती बैलगाडीत बसवून शेजारच्या राज्यात नेऊ लागले. देव गावात नसेल पण किमान बाटणार तरी नाही हीच भावना यामागे होती.

इ. स. १५६७ मधे लोटलीचा रामनाथ आणि आसपासच्या शेकडो देवळांचा विध्वंस करण्यात आला. वेर्णेची, म्हाडदोळ वाड्यावरच्या म्हाळसादेवीची देवराई नष्ट झाली, तिची तळी भ्रष्ट करण्यात आली, मूर्तीची अक्षरशः राख केली गेली. आणि देवळाचाही विध्वंस झाला (आज ह्या देवीचे मंदिर फोंडा तालुक्यातील म्हार्दोळ या गावी आहे). हे देऊळ सासष्टीतील सर्वात भव्य देऊळ होते. वेर्णेकरांची धर्मनिष्ठा इतकी जाज्वल्य की ते देवळाचे अवशेष जतन करुन त्यांना भजु लागले.

देऊळ पाडल्यानंतर त्यावेळच्या कायद्यानुसार देऊळ असलेली जमीन सरकारच्या मालकीची होत असे. मूळ देवळाची ती जागा परत मिळविण्याचा प्रयत्न वेर्णेच्या गावकर्‍यांनी केला. एका युरोपियनाशी त्यांनी संधान बांधले. त्याने ती जागा सरकारकडुन विकत घ्यावी व दुप्पट किमतीत एक वेर्णेकराला विकावी. मिशनरी व पोर्तुगीज सरकार यांच्या अमानुष छळाची टांगती तलवार डोक्यावर असताना हा प्रयत्न नक्कीच कौतुकास्पद होता.

पण व्हाईसरॉयला ह्याचा सुगावा लागला व ती जमीन हिंदूंना परत मिळू नये म्हणुन देवळाच्या ठिकाणी त्याने एक भव्य चर्च बांधुन घेतले व दोन क्रॉस उभारले. त्यातला एक क्रॉस चर्चच्या प्रवेशद्वारात व दुसरा तुळशीवृंदावनाच्या ठिकाणी बांधण्यात आला. हे तुळशीवृंदावन पुरुषभर उंचीचे होते.

आजच्या ओल्ड गोवा इथल्या जगप्रसिद्ध चर्चच्या जागी गोमंतेश्वराचे देऊळ होते, अशी लोकांची समजूत आहे. चर्चच्या भिंतींवर काही ठिकाणी हिंदू पद्धतीची नक्षी आहे. तर चर्चच्या आतमध्ये एक विहीरही होती, ती आता बुजविण्यात आली आहे. चर्चच्या सर्व भागात लोकांना प्रवेश दिला जात नाही, त्यामुळे या गोष्टींची सत्यता पडताळणे शक्य नाही. पण इथून अगदी जवळच, साधारण अर्धा कि.मी. अंतरावर, वायंगिणी इथे रस्त्याच्या कडेला एक अत्यंत सुबक असा नंदी आपल्या महादेवापासून दुरावून बसलेला आहे. लोकानी त्याच्या शिरावर एक घुमटी बांधून त्याला ऊन पावसापासून वाचवला आहे.

बारदेशातही असाच हैदोस घालण्यात येत होता. बारदेश हा तालुका एवढा मोट्ठा आहे की तिथल्या देवळांच्या संख्येचा फक्त अंदाजच लावू शकतो आपण. अश्या ह्या पावन बारदेशातल्या सर्व देवळांतील मूर्ती जुने गोवे येथे बिशपसमोर नेऊन त्यांचे हजार तुकडे करण्यात आले. देवळाच्या ठिकाणी चर्च बांधण्यात आले आणि देवळांचे उत्पन्न चर्चला देण्यात आले.

धर्मांतरे तर इतक्या प्रमाणात झाली की सोय नाही . गोव्यात 'जोस'वाडा नावाचा एक वाडा आहे. हा पूर्वीचा जोशीवाडा होता. असाच 'वझे'चा वाझ झाला. 'लक्षुबा'चा लुकश / लुकास झाला.

कुंकळ्ळीचा उठाव

आपला धार्मिक जाच कमी होण्यासाठी सासष्टीच्या हिंदूंनी सनदशीर मार्गाने प्रयत्न केले होते. पहिल्या धर्मसभेने लादलेली बंधने दुसर्‍या धर्मसभेने शिथिल करावी म्हणुन खूप खटपट केली. पण त्यांनी उलट जुनी बंधने अजून जाचक केलीच पण अजुन नवे कायदे आणले जसे की लग्नाच्या आधीचे विधी करु नये, नवरीला हळद लावू नये इत्यादी.

सासष्टीचे लोक तसे मानी. कुंकळ्ळीच्या गावकर्‍यांना हा अपमान सहन झाला नाही. त्यांनी सरकारी खंड भरायला बराच विलंब केला. रायतुरच्या किल्ल्यात जाणे बंद केले. गव्हर्नरने साष्टी प्रदेशातील वसुलीसाठी इश्तेव्हाव रुद्रीगीश (रॉड्रीगीज) या क्रूर अधिकार्‍याला पाठवले. तो खंडवसुलीसाठी कुंकळ्ळीत गेला व लोकांना त्रास देण्यास सुरवात केली. इथल्या प्रभुदेसाई फळ वगैरे लोकांनी त्याला व त्याच्या काही सहकार्‍यांना असोळणे येथे ठार केले.

कुंकळ्ळीची जनता सत्तेविरुद्ध उभी राहिली. त्यांनी आसपासच्या गावातील लोकांना आपल्या बाजूस वळविले व पोर्तुगीज ठाण्यांवर हल्ल्याचा सपाटा सुरु केला. सासष्टीतील सर्व भागात ख्रिश्चन लोक असुरक्षित झाले. सैनिकांच्या मदतीसाठी मिशनर्‍यांनाही सैनिकांचे काम करावे लागले.

हे बंड मोडुन काढण्यासाठी गव्हर्नरने एक पलटण पाठवली. या सैन्याने हिंदुंची नवीन बांधलेली देवळे मोडली, गावंच्या गावं जाळून भस्मसात केली आणि पुढार्‍यांना ठार केले. एवढे झाल्यानंतर त्या प्रदेशात शांतता प्रस्थापित झाली. लोकांनी राजाशी एकनिष्ठ राहण्याचे व सरकारला खंड भरण्याचे कबूल केले. पण धार्मिक आक्रमणाला विरोध करण्याचे त्यांनी मनाशी पक्के ठरविले होते. म्हणुन त्यांनी आपली देवळे पुन्हा उभारली व देवळातील सर्व धार्मिक उत्सव थाटामाटात साजरे करु लागले. जमिनीचे उत्पन्न जे पूर्वी देवळांस मिळत असे व गेल्या काही वर्षांत चर्चना देण्यात येई ते गावकर्‍यांनी पुन्हा देवळांना देण्यास सुरु केले. वसुलीस चर्चची माणसे आली तर त्यांस उत्तर मिळे "जशी तुम्हास चर्चेस तशी आम्हास देवळे. आम्ही त्यांस खंड देऊ." अशा तर्हेसने त्यांनी सरकारी नियम धाब्यावर बसविले.

हा उठाव सैन्याच्या वापराने काबूत आणण्यात आला

हे लोक जागरुक व लढवय्ये होते. त्यांनी मिशनर्‍यांस आपल्या गावात स्थिर होऊ दिले नाही. अनेकदा जाळपोळ होऊनही पोर्तुगीजांची पाठ फिरताच ते पुन्हा आपल्या गावात येऊन घरे व देवळांची पुनर्बांधणी करत.

एक अशीच घटना सांगावीशी वाटते.

कुंकळ्ळीत चर्च बांधण्याचा मिशनर्‍यांचा मानस होता. १५ जुलै १५८३ रोजी सकाळी पाद्रींनी मास म्हटला व कुंकळ्ळीकडे कूच केले. आसपासच्या नवख्रिस्तींनी त्यांच्यासाठी मंडप उभारला होता.

हिंदूंनी तातडीने ग्रामसभा बोलावुन पाद्री आले तर देवालये उद्ध्वस्त करण्याच्या दुष्कृत्याचे जनक म्हणुन त्यांच्यावर सूड उगवावा असे ठरले.

पाद्रींच्या जथ्याला गावचा १ प्रतिष्ठित हिंदू सामोरा गेला. अभिवादन करुन स्वागत केले व गावकरी जेवून भेटायला येतील व गावात आलेल्या 'संतांचा' यथोचित सत्कार करतील असे सांगितले. त्याच्या पाठोपाठ स्त्री-पुरुषांचा मोठा घोळका तिथे गेला. त्यात एक घाडी होता व तो वेड्यासारखे मोठमोठ्याने ओरडत होता. इतर लोक टेहळणी केल्यासारखे फिरत होते. घाडी एवढ्या जलद बोलत असे की ऐकणार्‍याला अर्थबोध होत नसे.

पाद्रींनी गावकर्‍यांची बरीच प्रतिक्षा केली पण कुणीच फिरकले नाही. मग त्यांनी आपले काम सुरु केले. एक चर्च बांधावे, एक क्रॉस उभारावा असे ते आपापसात बोलत होते. तेवढ्यात ज्याने पाद्रींचे स्वागत केले होते तो ऊठला व दोन काठ्या घेउन , एक उभी व दुसरी त्याच्यावर आडवी धरुन एका माडाच्या बुंध्याजवळ गेला व त्यावर धरुन म्हणाला इथे क्रॉस छान दिसेल नाही का?

ही खूण दिसताच घोळक्यातील लोक गायब झाले व घाडी मोठमोठ्याने ओरडून लोकांना जागवु लागला. जसजसा तो मोठमोठ्याने ओरडू लागला तसतसा त्याच्या ओरडण्याचा आशय पाद्रींना समजू लागला आणि त्यांच्या ऊरात धडकी भरली. त्यांनी पळून जायचे ठरवले पण त्यांना जाता येईना. कारण त्यांच्या जथ्यातील काही माणसे खाण्यापिण्याच्या वस्तू खरेदी करण्यासाठी बाजारात गेली होती. ती येईपर्यंत थांबणे त्यांना क्रमप्राप्त होते. ते लोक येईपर्यंत देवळाच्या बाजूने आरोळ्या उठल्या. लोकांचा जमाव भाले, तलवारी, धनुष्यबाण, दगड असं मिळेल ते शस्त्र हाती घेउन त्यांच्या दिशेने येत होता. "आमच्या प्रदेशाची शांतता भंग करणार्‍यांना, देवळे उद्ध्वस्त करणार्‍यांना मारून टाका, ठार करा" अशा आरोळ्या उठत होत्या.

आणि त्या पाद्रींचे देह जखमांनी विद्ध झाले. त्यांना ठार करण्यापुर्वी गावकर्‍यांनी त्यांना देवालयाभोवती दोनदा फरफटत फिरविले, नंतर देवासमोर उभे करुन नमस्कार करविला आणि मग आबालवृद्ध त्यांच्यावर तुटून पडले. मेल्यानंतर त्यांच्या रक्ताने देवाला अभिषेक घालण्यात आला.

सैन्याच्या जोरावर पोर्तुगीजांनी हे बंड मोडून काढले आणि मिळतील तेवढे लोक ख्रिश्चन करून टाकले. काही हिंदू जीव वाचवून पळाले आणि आदिलशाही मुलुखात आपापली दैवतं बरोबर घेऊन गेले. यानंतर गोव्यात स्थानिक लोकांकडून म्हणावा असा उठाव झाला नाही तो इ. स. १८५२ पर्य़ंत. याला कारण म्हणजे गोव्यात तिसवाडी, बारदेश आणि साष्टीवगळून उरलेल्या भागात आलेली मराठी सत्ता.

क्रमशः

**

विशेष सूचना - या लेखमालेचे स्वरूप एकंदरीतच ललित लेखनाच्या अंगाने जाणारे पण गोव्याच्या समृद्ध इतिहासाचे, आणि वर्तमानाचेही, दर्शन वाचकांना करून देणे एवढेच आहे. वाचकांना विनंती की त्यांनीही ते तेवढ्याच बेताने घ्यावे. आम्ही कोणीही इतिहासकार / इतिहासतज्ञ वगैरे नाही आहोत. पण थोडे फार वाचन करून, माहिती जमा करून इथे मांडण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे. तपशीलात अथवा आमच्या निष्कर्षात चूक / गल्लत असू शकते. पण काही चांगले लेखन यावे आणि गोव्याची रूढ कल्पना सोडून त्याहून वेगळा गोवा काय आहे हे लोकांना कळावे म्हणूनच हा सगळा लेखमालेचा उद्योग.