मंगळवार, ५ जुलै, २०१६

रामेश्वरम - धनुषकोडी - भाग १


(फोटो सौजन्य : http://www.railnews.co.in या संस्थळावरुन साभार)



आमच्याकडे दर काही महिन्यांनी हापिसासाठी मी खूप राबले आता ब्रेक हवा असा साक्षात्कार होतो आणि आम्ही दोघांच्या कॉमन सुट्ट्यांमधे ट्रीप कधी प्ल्यान करता येईल हे बघतो. एकदा का हे झाल की मग त्या ट्रीपकडे डोळे लावुन उरलेले दिवस कंठतो असे आमचे सारे गणित असते. ;)


पण यावेळेस तसे झाले नाही. या वेळेस नुकतेच आम्ही कुरवपूर - अंबाजोगाई-लातुर अशी मोठी ट्रीप करुन लगेच १५ दिवसात परत साक्षात्कार झाला ;) मग काय ठरवल ट्रीपला जायचं. नवर्‍याला सुट्टीच असते मे महिन्यात , प्रॉब्लेम आमच्या हापिसचाच होता. म्हंटल त्याच काय ते नंतर करता येईल.आधी ठिकाण ठरवा. विचारमंथनात अनेक रत्ने निघाली. त्यात असा निष्कर्ष निघाला की ऐनवेळी हिल स्टेशन्स गजबजलेली असतात त्यामुळे हिलस्टेशन्स चा विचारही डोस्क्यात आणु नये . मग जाये तो जाये कहा? म्हंटल "कुठेही. अगदी धगधगता ज्वालामुखीही चालेल." बास्स. इतकच इकडच्या स्वारीला ऐकायच होतं. लगेच स्वारींनी चार्ज हाती घेतला , irctc  आणि भारतीय रेल्वे च्या साईट आणि त्यांच समर टाईमटेबल चेक केल आणि लगेच विचारणा झाली रामेश्वरम-धनुष्कोडी ला जायच?   अनेक वर्षांपासुन रामेश्वरम-धनुष्कोडी "to visit list " वर असल्याने तिथल्या उष्म्याला फाट्यावर मारुन लग्गेच हो म्हंटले.


आता जायचं तर म्हंटल तिकिट तर मिळायला हवीत. साधारणतः उत्तरेपेक्षा दक्षिणेला प्रवास करताना ऐनवेळी तिकिटं मिळण्याची शक्यता जास्त असते. आणि तसच झाल. दिवसभर irctc वर हाराकिरी करुन एकदाची तिकिटं बुक केली. कन्फर्म झाली ती पण. हा आमचा जातानाचा रुट.

                   गोवा--->बेंगळूर->चेन्नई->मदुराई->रामेश्वरम

चेन्नईहुन रामेश्वरम ला एक डायरेक्ट ट्रेन आहे ती फुल होती मग मदुराईच बघितल तर ते ऑप्शन होत. आणि मदुराई-रामेश्वरम पॅसेंजर ने रामेश्वरम ला वाट्टेल तेव्हा जाऊ शकत होतो. मग आंतर्जालावर शोधाशोधी आणि अभ्यास करुन किती दिवस कुठे रहायच ते ठरवल .

होटेल बुकिंग करण्या आधी कुठे किती काळ रहायचे हे ठरवणे मस्ट. आम्ही पहिले २ -३ दिवस ट्रेन मधेच असणार होतो. मदुराईत मिनाक्शीअम्मन ला भेटुन लगेच रामेश्वरम ला जायचं आणि तिथे ३ दिवस राहून मग परतणार होतो. परतीच्या वाटेतले प्लान्स वेगळेच होते. मग गुगल आणि ट्रिप एडव्हाईजर इक्सिबो सारख्या साईट्स वापरल्या आणि आमच्या बजेट मधे बसणारं होटेल हरिश चे एसी रुम निवडले. आणि लगेच फोनवुन कन्फर्म ही केले. होटेल स्वच्छ सुंदर आहेत. माणसं खूप छान . मदतीला कायम तयार. त्यांच स्वतःच किचन नाही. इथून जवळच रामेश्वरम च मंदिर आहे. स्टेशनही जवळच आहे.
जवळपास राजस्थानी खानावळी आहेत जिथे पोळी भाजी मिळते. एक गुजराती धर्मशाळा पण आहे जिथे पैसे देउन जेवता येत. पण त्यांची ठराविक वेळ आहे त्या वेळेतच जाव लागत. 

इतक झाल्यावर मग दुसर्‍या दिवशी अनेक जुगाड करुन सुट्टी आणि त्यासोबत गोवा सोडण्याची परवानगी काढली. इतर तयार्‍या याच्यापुढे काहीच नव्ह्त्या ;) त्या झाल्या लगेच पुर्ण. आणि आम्ही परत त्या शनवारची वाट पाहु लागलो ज्या दिवशी आम्ही निघत होतो. अखेरीस तो दिवस उजाडला आणि शनवारी रात्री आम्ही गोव्याहुन बंगळुरास प्रस्थान केले.

क्रमशः

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा